-डॉ. मुकुंद कुळे
कुळाचार-कुलविधी म्हणून परंपरेनं चालत आलेल्या धार्मिक विधी-विधानांत नाट्य किती ठासून भरलेलं असतं, याचा आपण सहसा विचार करत नाही. केवळ परंपराशील म्हणून ते नाकारण्याकडेच आपला कल असतो. परंतु कुळाचार म्हणून केल्या जाणाऱ्या विधी-विधानांत किती प्रभावी नाट्यात्मकता असते ते ‘कांतार’ या सिनेमाने सिद्ध केलंय. या सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक आणि नायकही असलेल्या ऋषभ शेट्टीने आपल्या तुळुनाडू (प्रामुख्याने तुळू बोलीभाषा असलेला दक्षिण कन्नड प्रदेश) प्रदेशातील आदिवासींच्या भूतकोला या वार्षिक उत्सवातील विधींच्या वापरातून सिनेमा एका वेगळ्याच उंचीला नेला आहे. या विधींच्या वापरामुळेच आशयाच्या दृष्टीने सिनेमा अगदी तोकडा असतानाही, परिणामाच्या दृष्टीने तो भलताच टोकदार झाला आहे.
खरंतर आजच्या काळाच्या चौकटीत बघायला गेलं तर परंपरेनं चालत आलेली धार्मिक विधी-विधानं एखाद्याला अविवेकी-अतार्किक वाटतील आणि तशी ती आहेतही. मात्र या धार्मिक विधी-विधानांच्या मुळाशी समूहमनाला आकर्षित करणारी असलेली आवाहकता आपण लक्षात घेत नाही. त्या आवाहकतेमुळेच आजही ग्रामीण भागात वसलेला साठ-सत्तर टक्के समाज या पारंपरिक अतर्क्य नि अगम्य विधी-विधानांना धरून आहे. वास्तविक या अगदी प्रागैतिहासिक काळातील मनोधर्माच्या गोष्टी आहेत; मात्र काळ बदलला तरी मनोधर्म फारसा बदललेला नाही. त्यामुळेच निसर्गसंवादी असलेल्या लोकसंस्कृती आणि आदिवासीसंस्कृतीत आजही एखादा पशू-पक्षी, दगड किंवा वृक्षवल्ली देवतासमान मानल्या जातात. ‘कांतार’ सिनेमात आदिवासींच्या वार्षिक कोला उत्सवात ज्या देवतांचं स्मरण आणि जागरण दाखवलेलं आहे, त्याही एकप्रकारे पशू (पांजुर्ली-रानडुक्कर) आणि दगडरूपीच (गुलिगा-दगडाच्या स्वरूपातील देव) आहेत. खरंतर ग्रामीण भागातील या देवता म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राचं रक्षण करणारे क्षेत्रपाळ देवच आहेत. मात्र ते नेहमीच देवतास्वरूप असण्याचं कारण नाही, अनेकदा ते पितर किंवा आत्मास्वरूपही असतात.
‘कांतार’ सिनेमात दाखवण्यात आलेले देव हे असेच देवतारूपी नसून ते आत्मारूपी आहेत. क्षेत्रपाळ म्हणून नावारूपाला येणारा देव किंवा आत्मा म्हणजे प्रत्यक्षात त्या-त्या प्रदेशात-समूहात होऊन गेलेली एखादी लोकोत्तर व्यक्तीच असते. फक्त मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीला पशू किंवा दगड रूपात पूजलं-भजलं जातं. याच अर्थाने कोकण किंवा महाराष्ट्राच्या इतरही प्रदेशातील वेतोबा-बिरोबा-जोतिबा हे एकप्रकारे क्षेत्रपाळ देव आहेत आणि परंपरेनं चालत आलेल्या त्यांच्या विधी-विधानांत ज्याप्रमाणे धार्मिकता आहे, त्याचप्रमाणे नाट्यात्मकताही आहे. मात्र दक्षिणेकडे ज्याप्रमाणे प्राचीन परंपरांचं अवगाहन करून त्यांचा वापर विविध कलांमध्ये (नाटक-सिनेमा-नृत्य-संगीत) केला जातो, तसा तो आपल्याकडे केला जात नाही!
‘कांतार’ सिनेमात जो भूतकोला उत्सव दाखवलेला आहे, तो सरळसरळ सिनेमात दाखवलेल्या विशिष्ट प्रदेशातील समूहाचा वार्षिक उत्सव असून, तो एकप्रकारे गावबांधणीचा विधी आहे. गावबांधणीचा विधी म्हणजे गावावर कोणतंही अरिष्ट येऊ नये किंवा एखादं अरिष्ट आलेलं असेल तर ते दूर करण्यासाठी देवाला किंवा पितराच्या आत्म्याला आवाहन करून, त्यांचं आगमन झाल्यावर त्यांना त्यावरचा उपाय विचारला जातो. हा सगळा जो देव किंवा पितरांशी संवाद साधण्याचा विधी असतो तो अतिशय नाट्यात्मक असतो. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष देव किंवा पितरांच्या आगमनाआधी या सगळ्यासाठी एक भारित भूमी तयार केली जाते. ही भारित भूमी म्हणजे एकप्रकारचा या उत्सवासाठीचा रंगमंचच असतो. विविध प्रकारची वाद्य आणि त्या वाद्यांच्या संगतीने म्हटलेली देव किंवा पितरांच्या गाण्यातून उत्सवासाठी आवश्यक ती वातावरणनिर्मिती होत असते. तुळुनाडूमध्ये याप्रकारच्या गाण्यांना पाड्दाना असं म्हटलं जातं. ही गाणी म्हणजे पितरांना गाण्यातून केलेलं आवाहन असतं. या गाण्यांना प्रतिसाद देत पांजुर्ली किंवा गुळिगा या त्या समाजांसाठी देवस्वरूप असलेल्या पितरांच्या आत्म्याचं आगमन होतं आणि मग त्या गावाच्या-समूहाच्या प्रश्नांचं-समस्यांचं निराकरण हे देवतारूपी पितर करतात.
‘कांतार’ सिनेमात दाखवण्यात आलेले देव हे मग तो पांजुर्ली असो किंवा गुळिगा हे सर्जक-संरक्षक असे प्रेतात्मे आहेत. ते गावाच्या-समूहाच्या भल्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांच्या नावाने दरवर्षी भूतकोला उत्सव साजरा केला जातो. गंमत म्हणजे तुळुनाडूमध्ये असे पांजुर्ली किंवा गुळिगासारखे किमान हजारेक संरक्षक देव-पितर आहेत आणि त्यात वीस-पंचवीस मुस्लीम समाजातील आहेत. म्हणजे परंपरेने चालत आलेल्या तुळू धार्मिक आचार-विचारांशी एकरूप होऊन नंतरच्या काळात तिथे आलेल्या मुस्लीम समाजाने मूळ समाजांच्या धर्तीवर आपलेही पितररूपी देव निर्माण केले.
‘कांतार’ या शब्दाचा अर्थ आहे- जंगल. म्हणजे एकप्रकारे जंगल आणि त्यातील पशू-पक्षी व माणसांच्या संरक्षणाचं काम पांजुर्लीसारखे पितरदेव करतात. या पांजुर्लीची म्हणजेच रानडुकराचीही तुळू भाषिकांत एक लोककथा प्रचलित आहे. रानडुक्कर म्हणजे खरंतर शेतकऱ्याचा शत्रूच. कारण शेती कुठलीही असो, रानडुकरं ती कायमच उद्ध्वस्त करतात (महाराष्ट्रात कोकणातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी केवळ रानडुकरांच्या त्रासामुळे भातशेती करणं सोडून दिलं आहे.). तुळू लोककथेतील डुकरांच्या नर-मादीच्या एका जोडीला याच कारणास्तव सामान्यांचा कैवारी असलेला शंकर मारतो. परंतु त्यांच्या गोंडस पिलांनाही तो मारायला निघतो तेव्हा पार्वती मध्ये येते आणि त्या पिलांना वाचवते. केवळ पार्वतीच्या मध्यस्थीमुळेच शंकर त्या पिलांना सोडतो, मात्र एका अटीवर- तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान करायचं नाही, तर तिचं रक्षण करायचं! तेव्हापासून तुळुनाडूच्या काही प्रदेशात पांजुर्ली म्हणजे रानडुक्कर तेथील स्थानिक समाजाचा संरक्षक देव बनलेला आहे. तो समाज आपल्या गावबांधणीच्या विधीच्या वेळी जेव्हा पितरांना आमंत्रित करतो, तेव्हा ते पवित्र पितर किंवा प्रेतात्मे या पांजुर्लीच्या रूपातच अवतरतात.
तुळुनाडूमधील इतर प्रेतात्मे किंवा त्यांच्या स्वरूपाविषयी विशेष माहिती नाही. परंतु तुळू लोककथा काहीही असली, तरी ‘कांतार’ सिनेमात कोला उत्सवाची भूतदेवता म्हणून पांजुर्लीचे केलेले उपयोजन एकदम खास आहे. खास अशासाठी की आपल्याकडच्या कोकण प्रांतापासून ते अनेक ठिकाणच्या लोककथांनी आणि समूहमनानेदेखील रानडुक्करावर कायमच भूता-प्रेताची सावली असल्याचं मानण्यात आलेलं आहे. कोकणात तर आजही जुनीजाणती माणसं जंगलांत डुक्कर दिसलं तर त्याच्या सावलीला जाऊ नका, असं आवर्जून सांगतात. कारण त्याची सावली अंगावर पडली तर भूत-पिशाचबाधा होते, असं म्हटलं जातं. अर्थात ‘कांतार’ मध्ये पांजुर्ली म्हणजेच रानडुक्कर हा परंपरेने संरक्षक प्रेतात्मा म्हणून आलेला आहे. मात्र तरीही प्रसंगी तो तारक आणि मारक दोन्ही प्रकारचा असू शकतो.
ग्रामीण भागातील गावबांधणीसारखे जेवढे पारंपरिक विधी असतात, त्यांचं पौरोहित्य म्हणजेच पुजारीपण परंपरेनं एका कुटुंबाकडेच असतं. या मंडळींना अनेकदा गुरव किंवा भगत असं म्हटलं जातं. गाण्या-बजावण्यातून पवित्र देव किंवा पितरांची भाकणूक सुरू झाली की भावनांच्या एका परमोच्च क्षणी ही भगत मंडळी वेगळ्या ट्रान्समध्ये जातात. मग त्यांचं शरीर पवित्र आत्मा धारण करतं आणि एकप्रकारे गावसुनावणी घेतं. अशा वेळी पवित्र आत्म्याच्या मनाजोगतं घडलं तर ठीक, पण एखाद्याने त्याचा अवमान केला, निंदा केली, तर तो आत्मा संतापतो आणि अद्दलही घडवतो. ‘कांतार’ सिनेमात सगळ्यात प्रभावी काही असलं तर हेच आहे. पवित्र आत्मा गुरवाच्या-भगताच्या शरीरात येण्यापासून ते गुरवाचा पेहराव, चेहऱ्यावरील रंगरंगोटी (कथाकली आणि यक्षगानमधील कलावंतांशी साधर्म्य असणारी), भूतकोला उत्सवासाठी सुपारीच्या फुलांची केलेली सजावट, चिडल्यावर पवित्र आत्म्याने संतापून भाताच्या लाह्यांचे भरलेले बकाणे आणि अग्नी हातात घेऊन जंगलात ठोकलेली धाव… सारं काही भलतंच नाट्यात्मक आणि भारावून टाकणारं. एकाच वेळी रौद्र आणि अद्भुत रसांचं दर्शन घडवणारं. म्हणूनच भूतकोला उत्सवातील नाट्यात्मक विधींचा ऋषभ शेट्टीने आपल्या सिनेमासाठी करून घेतलेला वापर कल्पक आणि प्रभावी आहे.
मात्र यात ऋषभ शेट्टीने एक गडबड केलीय. त्याने सिनेमाच्या क्लायमॅक्सला आदिवासींचा देव असलेल्या पांजुर्लीचा संबंध विष्णूच्या वराह अवताराशी जोडलाय, जो त्याचा वाह्यातपणा आहे. त्यासाठी त्याने ‘वराह रूपम’ या संस्कृत श्लोकाचा वापर केलाय. प्रत्यक्षात आदिवासींच्या देवांचा नि वैदिक वा हिंदू धर्मातील देवांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आदिवासी संस्कृती ही आदिम असून नंतरच्या काळात विकसित झालेल्या सर्व संस्कृतींपासून भिन्न आहे. तसंच हे जे क्षेत्रीय देव किंवा पवित्र आत्मे असतात ते कायमच सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्या निम्न स्तरातील समूहांतून आकाराला आलेले असतात आणि म्हणून ते बव्हंशी उग्रही असतात. परंतु ऋषभ शेट्टीने ‘कांतार’ सिनेमाच्या शेवटी विष्णूच्या वराह अवताराशी संबंधित श्लोक टाकून एकप्रकारे आदिवासी संस्कृती नि त्यांचे देव हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे आपल्या मुलाखतींमधूनही तो तेच सांगतो आहे आणि त्यामुळेच कर्नाटकातील लोकसाहित्याच्या व इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी त्याच्यावर जोरदार टीकाही केली आहे. आदिवासींचे देव-धर्म हे प्रस्थापितांच्या हिंदू धर्म नि देवांपेक्षा कायमच वेगळे होते आणि आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.
…तरीही परंपरेनं चालत आलेल्या भूतकोलासारख्या विधीनाट्याचा आपल्या सिनेमासाठी अचूक वापर केल्याबद्दल ऋषभ शेट्टीचं कौतुक करायला हवं. यात काळाच्या मागे खेचणाऱ्या पारंपरिक विधींचं समर्थन करण्याचा हेतू निश्चितच नाही, परंतु त्या विधींमधील नाट्यात्मकतेचं जतन व्हायला काय हरकत आहे? ज्या काळात हे पारंपरिक कुळाचार विधी जन्माला आले, तेव्हा मानवाला निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टींमागील कार्यकारण भावाचं आकलन व्हायचं होतं. परिणामी त्याने आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींसाठी निसर्गातील शक्तींनाच कारण मानलं आणि त्यांची पूजा-अर्चा सुरू केली. अर्थात ही पूजा-अर्चा किंवा विधी हे नंतरच्या काळात, म्हणजे धर्म नावाची गोष्ट आकाराला आल्यानंतर आणि त्याचे हक्क एका विशिष्ट वर्गाने आपल्या हातात घेतल्यावर जो एकप्रकारचा सात्त्विक-नैतिक भाव त्या विधींना प्राप्त झाले तसे नव्हते. ते उग्र आणि भयंकर होते. मात्र त्यामुळेच ते नाट्यात्मक नि कलात्मकही होते. तेव्हा जुन्या प्रथा-परंपरांतील विधी-विधानांचं उपयोजन आजच्या आधुनिक काळात संपलेलं असलं तरी, त्यातील नाट्यात्मकता वेगवेगळ्या कलामाध्यमांमध्ये वापरायला हरकत नाही!
(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)
9769982424