आठवणी नदीच्या!

-प्रमोद मुनघाटे

आमच्या गावाजवळची नदी… कठाणी तिचं नाव. वैनगंगा या आमच्या पूर्वविदर्भातील मोठ्या नदीची ती उपनदी. वैनगंगा बारमाही भरून वाहणारी. तर कठाणी उन्हाळ्यात काहीशी रोडावलेली असते. पण उन्हाळ्यातही नदीवर जाण्यात एक वेगळेच सुख असते. कारण नदीच्या थडीपासून वाळूच्या पात्रातून चालत जावे लागते. चपला हातात घेऊन आपण चालू लागतो. शुभ्र आणि मऊशार वाळू. उन्हाळा असला तरी सकाळी पावलांना गार वाटते वाळू. रेशमी मलमली स्पर्श. पावलांचे लाड करते ही वाळू. रोमांच येतात सर्वांगावर. त्यातच खूप जवळचा मित्र-मैत्रीण सोबत असेल चालताना तर, तो अनुभव हृदयाच्या तळाला गुदगुल्या करणारा असतो. समोर अफाट पसरलेली वाळू. डोळ्यांना दिसणारी दूरवरची वाहत्या पाण्याची धार. मध्येच मृगजळाच्या ज्वाळा. सर्व दिशा उजळून निघलेल्या. क्षितिजापर्यंत निरभ्र आकाश. दूरवर पाण्याच्या धारेकाठी निश्चल उभे असलेले पांढरे बगळे.

अशा मोकळ्या वातवरणात मनही वितळून जातं. उत्फुल्ल मनाच्या तळाची गुपितं मग तरंगत वरती येऊ लागतात. सोबतच्या मित्राच्या कानात काही सांगण्याचा प्रश्नच नसतो. सारे आसमंत एकांताने ओसंडून वाहत असते. मनाच्या शिंपल्यातील आठवणींचे मोती आपण उघड करतो मित्राजवळ. बालपणातील, कुमारवयातील काही आपल्यापुरती जपलेली रहस्य प्रथमच उघड करताना, मोहरून गेलेला असतो कण न कण आपल्या अस्तित्वाचा. चालता चालता एक बारीक धार येते. पावलांना थंड-कोमट वाहत्या पाण्याच्या स्पर्श होतो आणि अंगावर काटा येतो.

कठाणी ही आमच्या गडचिरोलीची गावनदी. प्रत्येक गावाचे एक गायरान असते. जनावरं जंगलात जाण्यापूर्वी गोळा होतात ते आखर असते. आठवडी बाजाराची जागा सुद्धा असते, प्रत्येक गावाची. पण प्रत्येक गावाला एक नदी असतेच असे नाही. आम्हाला गावाच्या चारही सीमांवर नद्या आहेत. पण धावत जावून डुबकी मारावी अशा अंतरावर कठाणी नदी. एका बाजूला पाल नदी येऊन मिळते. तो आमच्या गावाजवळचा संगम. बाबांनी (गो. ना. मुनघाटे) ‘गडचिरोली जिल्हा गौरवगीत’ लिहिले आहे. पंचक्रोशीत ते फार लोकप्रिय आहे. त्या गीतात त्यांनी आमच्या जिल्ह्यातील नद्या आणि संगमाचे वर्णन कसे केले आहे पहा:

वैनगंगा पावन सरिता पश्चिम क्षितिजावरी
आलिंगन वर्धेला देवून प्राणहिता अवतरी ।

पाल, खोबरागडी, कठाणी, दिना, पोर, गाढवी
साथ सख्यांना घेवून सरिता जल-वैभव वाढवी ।

उत्तरवाहिनी वैनगंगा जेथे विख्यात
मार्कंडयाचे कलाशिल्प हे वैभव गीत गात ।

दक्षिण गोदा, सदैव शुभदा साक्षी कालेश्वर
सिंहस्थाची इथे पर्वणी बारा वर्षावर ।

कोटरा, पामुल – गौतम, बांदी, पर्लकोटा
पूर्व किनाऱ्यातून प्रकटली इंद्रावती आता ।

सोमनूरचा सुरेख संगम इंद्रा गोदावरी
थक्क जाहल्या जलौघ बघुनी स्वर्गीच्या जलपरी ।

भामरागडला जिथे प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प आहे (हेमलकसा) तिथे पामुल-गौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. आम्ही आमच्या नद्यांची ही नावे सांगतो तेंव्हा पुष्कळ लोकांना ती काल्पनिक वाटतात. असो.

संगमाच्या किती आठवणी बालपणापासूनच्या. पहिली ते चौथी. डिसेंबर महिन्यात दरवर्षी आमची सहल या संगमावर. देशमुख बाई होत्या. त्या मुलांना सांगायच्या घरून तांदूळ, डाळ, तिखट-मीठ आणायला. आणि दहा की वीस पैसे आता नेमके आठवत नाही. सगळ्यांचा शिधा गोळा झाला की दोन दोनच्या रांगेने आमची सहल संगमाच्या दिशेने जायची. आठवडी बाजार आणि आखर ओलांडला की एक पांदण लागते नदीकडे जाणारी. शेतांच्या काठाकाठाने एकमेकांना ढकलत, खोड्या करत आमची वरात उंच उंच थडीच्या कड्याच्या दिशेने जाताना मध्ये झुडपी जंगल लागायचे. ते एक बोरवनच म्हणता येईल. तिथे आमच्या रांगेची शिस्त शरण जात असे. काटेकुटे काहीही न बघता मुली धावत जायच्या बोरीच्या दिशेने. समोर गेलेल्या देशमुखबाई धावत यायच्या. पण त्या येईपर्यंत मुलामुलींनी बरीच बोरं गोळा केलेली असत. मग घाटाच्या उतारावरून खाली जाताना तोल जावू नये म्हणून कोण तारांबळ. एकदाचे नदीकाठी बस्तान बसे आमच्या सहलीचे.

भात, वांग्याची तिखट भाजी आणि वरण हे त्या खुल्या वातावरणात भरपूर भूक लागायची. तीन दगडांच्या चुलीवर शिजवलेल्या भाताला ओलसर लाकडांच्या धुराचा वास चिकटलेला असे. ती चव आठवणीने आजही जिभेवर रेंगाळते. मग संगमाच्या पाण्यात मनसोक्त खेळणे. गार गार वारे झोंबायचे सर्वांगाला. नदीच्या स्फटिकासारख्या नितळ पाण्याने ओठ आणि पोट जणू हुळहुळत असायचे. शुद्ध प्राणवायूच्या लाटाच्या लाटा नाक-कान आणि घशात जणू धुडगूस घालत असत. त्या प्रचंड ताज्या शुद्ध हवेचा चोहोबाजूने इतका मारा होत असे की गुदमरून जायला होत असे.

पुढे पुढे आम्हा मित्रांच्या टोळ्या नदीवर जाण्यासाठी शाळेच्या सहलींवर अवलंबून राहिल्या नाहीत. एका बागेत कपडे भरायचे. आईला पोहे मागायचे. जुन्या लुगड्याच्या कपड्याची पोह्यांची पुरचुंडी. गूळ असेल तर गूळ नाही तर साखर. आणि संक्रांतीचे दिवस असले की चिवडा आणि तीळगुळाचे लाडू घाईघाईत पिशवीत टाकून आम्ही सात आठ मित्र धावत असू संगमाच्या दिशेने.

कपडे काढून कधी एकदा त्या थंडगार पाण्याच्या कुशीत स्वतःला लोटून देतो असे व्हायचे. उथळ पाण्याच्या धारेत उपडे किंवा उताणे पडून राहण्यासारखे दुसरे सुख नसे. किंवा छातीभर पाण्यातून ,या तीराकडून त्या तीराकडे जाणे म्हणजे मोठे धाडस केल्याचे समाधान. ओंजळीत पाणी घेऊन एकमेकांच्या अंगावर फेकणे, ढकलणे अशा मस्त्या चालायच्या. थकल्यावर परत उथळ पाण्यात स्वतःला मोकळे सोडून देणे. प्रवाहाला वेग असला तर पाण्याच्या धारेत देह पुढे पुढे सरकत जायचा पाठीला मखमली गुदगुल्या व्हायच्या आणि पायाच्या बोटांशी इवले इवले मासे खेळत. त्यांच्या ओझरत्या चाव्यांनी गमतीदार वेदनांच्या अतिसूक्ष्म लहरींनी शरीर शहारून जात असे.

खूप वेळ पाण्यात भिजलेले अंग धावत जाऊन मऊमऊ उबदार रेतीत लोटून द्यायचे. गडबडा लोळत जायचे. सगळे असे खेळ झाले की पाण्यातल्या एका मोठ्या खडकाच्या कपारीत, दोन दगडांच्या खोबणीत जावून बसायचे. पाय पाण्यात सोडून अंगाला लागलेल्या वाळूला तळहातांनी रगडायचे सगळी त्वचा लाल लाल होईपर्यंत.

उन्हाचे कवडसे बिलोरी आरशाप्रमाणे पाण्यावर चमचम करीत. बगळ्यांचे थवे, टिटवीचे आवाज, दूरवर पाण्यात डुंबनाऱ्या म्हशींच्या पाठीवर बसलेले कावळे. पाठीवर जाळ्याचे ओझे आणि खांद्यावरील धुटीत पकडलेल्या मासोळ्या सांभाळत चाललेले कातळासारख्या कभिन्न देहाचे कोळी. रंगीबेरंगी लुगडी-पातळ धुवून ते रेतीत वाळवत बसलेली परटीन आणि तिच्या मुली. समोरच्या तीरावरून खांद्यावर सायकल घेऊन पाण्यातून येणारा गडी. नदीत असे सारखे काही तरी घडत राही. कुणीतरी पलीकडच्या तीरावरील कुणाला तरी जोरात हाळी द्यायचा. त्या आवाजाने निवांत बसलेल्या पक्ष्यांचा थवा फडफड करून उडून जायचा. जिवंत अवकाशाच्या कॅनव्हॉसवर जणू असले सगळे घटीतांचे फटकारे.

वाळत घातलेले आपले कपडे घडी करून पिशवीत भरून निघताना, वाटायचे आणखी थोडावेळ रेंगाळावे नदीवर. आणखी पाय भिजवावे धारेत. निघताना सगळे भोवतालचे दृश्य साठवून ठेवण्याची धडपड. आता काही वेळाने संध्याकाळ होणार. मग रात्र होणार. रात्र कशी असते नदीवर. आकाशातील ताऱ्यांचे प्रतिबिंब पाण्यात कसे उमटत असेल. हे कातळ कसे दिसत असतील. हे बगळे कुठे जात असतील आणि नदीच्या काठावरचे हे झाड अंधाराचाच एक भाग कसे बनत असतील. अशा कल्पनांचे जाळे विणत विणत पावलं नदीपासून दूर दूर जाऊ लागत.

-(लेखक नामवंत समीक्षक आहेत)

770900 12078

Previous articleएक अद्भुत ग्रंथ-‘सिरी भूवलय’
Next articleहे तर , शेपटी तोडलेले संपादक !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.