-अखिलेश किशोर देशपांडे
भालचंद्र नेमाडे यांची “हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ” ही कादंबरी दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाली. मान्यवर लेखक, विचारवंत आणि साहित्यिक यांनी त्यावर विपुल टीका-टिप्पणी केली आहे; परंतु ज्याला ‘सायलंट रीडर’ म्हणता येईल अशा घटकाला या कादंबरीबद्दल नेमके काय वाटले, याची क्वचितच कुठे दखल घेतली गेली असेल.
‘हिंदू’ ही निश्चितच नेमाडेंची सर्वात महत्वाकांक्षी कादंबरी आहे. त्यात पुढे आणखी तीन मोठ्या कादंबऱ्या लिहून या कथानकाचा विस्तार करणार असल्याचे नेमाडेंनी घोषित केल्याने ‘हिंदू’च्या भव्यतेत आणि वलयात आणखीनच भर पडली. भरपूर गाजावाजा होऊन बाजारात दाखल झालेल्या ‘हिंदू’ने बहुतांश वाचकांना निराश केले नाही. नेमाडे यांचे साहित्य व त्यांच्यामुळे प्रसारित झालेल्या ‘देशीवाद’ या संकल्पनेचे पूर्वीपासूनच टीकाकार असणाऱ्या विचारवंतांना सुद्धा ‘हिंदू’ने विस्तृत परामर्ष घेण्यासाठी प्रवृत्त केले. प्रत्यक्ष कादंबरीमध्ये सुद्धा नेमाडेंचा सविस्तर समाचार घेण्यास खतपाणी घालणारा असा बराच मजकूर आहे.
‘हिंदू’च्या निमित्ताने मराठी साहित्य व विचारविश्वात जे चर्चेचे वादळ उठले ते जिज्ञासू वाचकांना वैचारिक मेजवानी देणारे ठरले. त्यामुळे एक समाज म्हणून आपली जडण-घडण नेमकी कशी झाली यावर अतिशय मूलभूत आणि व्यासंगपूर्ण ऊहापोह झाला. त्यातून साहित्य-वाचन करणाऱ्या मराठी समाजाच्या जाणीवेत मौलिक भर पडली असे नक्कीच म्हणता येईल. अव्यक्तपणे साहित्य वाचन करणारा (त्यातही नेमाडेंचे साहित्य आवर्जून वाचणारा) असा मोठा वाचक-वर्ग महाराष्ट्रात आहे.
‘हिंदू’वर नेमाडेंच्या ‘देशीवाद’ या संकल्पनेची छाप तर स्पष्टच दिसून येते. नेमाडेंनी ‘हिंदू’च्या प्रकाशनानंतर दोन-तीन वर्षांनीच, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पुणे-स्थित एका नियतकालिकाला सविस्तर मुलाखत दिली. ती “अनेकवचनी भूतकाळी” या शीर्षकासहित त्याच्या २०१३ मधील एका अंकात प्रकाशित झाली. त्या मुलाखतीत नेमाडेंनी देशीवादाला धरून केलेली काही बेजबाबदार वक्तव्ये वादग्रस्त ठरली आणि नवे काहूर माजले. अनेक विचारवंतांनी नेमाडेंना यथेच्छ (व अभ्यासूपणे) झोडपून काढले. त्यानंतर झालेले ‘हिंदू’चे वाचन हे एकतर या वादंगामुळे निर्माण झालेल्या कुतूहलापोटी झाले, नाहीतर त्या वाद-विवादांच्या पडछायेत झाले. त्यामुळे कादंबरीतील नेमाडेंच्या भाषा-कौशल्याचा निखळ आनंद घेणे थोडे अवघड होऊन बसले.
‘हिंदू’ने मराठी साहित्याच्या भाषिक समृद्धीत पुष्कळच भर घातली. त्यावर ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराची मोहोर उमटल्याने (आणि ज्ञानपीठ-पुरस्कार निवड अजून तरी संशयाच्या भोवऱ्यात न आल्याने) त्या पैलूबद्दल आणखी काही बोलणे अप्रस्तुत ठरेल. म्हणूनच मला कादंबरीच्या वादग्रस्त ठरलेल्या समाज-शास्त्रीय पैलूबद्दल थोडे विवेचन करावयाचे आहे.
कादंबरीचा नायक ‘खंडेराव’चे स्मरण-रंजन या रूपाने नेमाडेंनी ‘हिंदू’चा एक विशिष्ट आकृतिबंध तयार केलाय. ‘खंडेराव’ हा जळगाव जिल्ह्यातील मोरगावचा एक पुरातत्व-विशारद. खानदेशात बहुसंख्येने असणाऱ्या एका प्रमुख जातीच्या समाज-गटातील जमीनदार कुटुंबात जन्मलेला. पाकिस्तानात उत्खननाचे काम करत असताना ‘खंडेराव’ला आपले वडील मृत्युशय्येवर असल्याचे समजते आणि तो गावाकडे प्रयाण करतो. प्रवासात तो आपले गावगाड्यात व्यतीत झालेले गत-जीवन खोदत जातो. त्यातून मोरगावच्या रूपाने तत्कालीन भारतीय खेड्याची एक समाज-शास्त्रीय रचना आपल्यासमोर उलगडत जाते.
नेमाडेदेखील खानदेशातील ‘त्याच’ जातीच्या एका घराण्यात जन्मलेले. त्यामुळेच ‘खंडेराव’च्या माध्यमातून नेमाडे ज्या स्वानुभवांचे चित्रण कादंबरीत करतात ते अस्सल वठल्याचे प्रतीत होते. पण ते चित्रण त्या प्रमुख समाज-गटाला मध्यवर्ती ठेऊन केल्याने अशी गोची होते की त्या विशिष्ट समाज-गटातील तत्कालीन जात-जाणिवांच्या अनुषंगानेच गावातील व्यवहारांचे आकलन नेमाडे सादर करतात. त्यामुळे ते पूर्वग्रह-दूषित असल्याचा रास्त समज निर्माण होतो. ‘खंडेराव’ हा गावाबाहेर पडून उच्चशिक्षित होऊन पुरातत्वज्ञ झालेला व्यक्ती जरी असला तरी नेमाडे त्याला ‘जात-मुक्त’ झाल्याचे दर्शवीत नाहीत. म्हणूनच त्याच्या नजरेतून जेंव्हा गावगाडा उलगडतो तेंव्हा, जातीय उतरंडीत त्या प्रमुख जातीपेक्षा कमी दर्जाच्या मानल्या गेलेल्या अशा दलित व भटक्या-विमुक्त जमातींचे वा त्यातील व्यक्तींचे काहीसे हेटाळणीयुक्त वर्णन कादंबरीत येते.
शिवाय ‘खंडेराव’चा मोठा भाऊ असलेल्या ‘भावडू’ने काढलेले आधुनिकतेबद्दलचे उद्गार ‘खंडेराव’चे त्याच्यावर असणारे प्रेम आणि नेमाडेंच्या देशीवादाची एकूणच आधुनिकतेकडे संशयाने पाहण्याची वैचारिक भूमिका यामुळे ‘हिंदू’ चांगलीच वादग्रस्त ठरली. तिच्यावर जाती-व्यवस्था समर्थक असल्याचे आरोप झाले. त्यात नेमाडेंनी त्यांच्या मुलाखतीत जाती-व्यवस्थेचे समर्थन केल्याने आगीत तेल ओतले गेले आणि मत-मतांतराचा वणवा पेटला. याचा एक दुष्परिणाम म्हणजे नेमाडेंनी कादंबरीत मांडलेले एक अपेक्षारूपी सूत्र होरपळून निघाले.
पूर्वी सुभाष घईंच्या प्रत्येक चित्रपटात पार्श्वभूमीला एक विशिष्ट सांगीतिक धून वाजत असे. ती ‘धून’ हीच त्या चित्रपटाची ओळख ठरत असे. तसेच नेमाडेंच्या या भव्य कलाकृतीत हे सूत्र अधून-मधून डोकावत राहते. ते ‘हिंदू’ची ओळख मात्र ठरू शकले नाही. “जाणीवेच्या इतिहासाचे उत्खनन झाले पाहिजे” असे वाक्य असणारे हेच ते अपेक्षारूपी सूत्र. नेमाडेंवर विभिन्न विचारधारांच्या दृष्टीकोनातून टीका झाली. त्या टीकेत (कादंबरीतील एक-दोन प्रसंगांचा दाखला देऊन) नेमाडे ब्राह्मण-विरोधी असल्यापासून ते नेमाडे (पुरोगामी मुक्तिदायी समाज-निर्मितीचे विरोधक या अर्थाने) प्रतिगामी असेपर्यंतची उदाहरणे आहेत.
वर नमूद सूत्ररूपी वाक्यातून मात्र असे दिसून येते की नेमाडेंना ‘हिंदू’कडे बघण्याची एक देशीवादापलीकडील चौकट अभिप्रेत असावी. “एका विशिष्ट कालखंडातील भूगोलात जगणाऱ्या समाजातील घडामोडी त्या कालखंडातील परिसरात विकसित झालेल्या जाणिवांच्या संदर्भातच तपासणे” असे त्या चौकटीचे स्वरूप दिसते. त्यामुळेच नेमाडेंच्या जाती-व्यवस्थासमर्थक भूमिकेला पाठींबा न देतासुद्धा असे म्हणता येईल की नेमाडेंचे आधुनिक व पुरोगामी दृष्टीकोनातून केलेले वैचारिक मूल्यमापन काहीसे अपुरे ठरते. उदाहरण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या केलेल्या धारदार वैचारिक शस्त्रक्रियेकडे पाहता येईल. ती आवश्यकच नव्हे तर गांधींच्या इतर टीकाकारांपेक्षा अधिक कळीची आणि मूलभूत होती. परंतु गांधींची समाज-धारणेबद्दल असणारी वैचारिक बैठक समजून घेण्यास ती अपुरी पडत होती. ती बैठक सदोष होतीच व डॉ. आंबेडकरांनी तसे दर्शवूनही दिले, पण तत्कालीन भारतात गांधींच्या राजकारणावर मात करू शकेल असे बलाढ्य पर्यायी राजकारण बाबासाहेबांना तेव्हा उभे करता आले नाही.
नेमाडेंच्या टीकाकारांना (त्यांची टीका योग्य असूनही) अजून तरी ‘हिंदू’ सारखा व्यापक पैस नि परीघ आवाक्यात घेणारे सकस साहित्य निर्माण करता आले नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. आज जात-जाणीवा तीव्र असल्या तरी जातीव्यवस्था-धारित गावगाडा जवळपास कोसळलेला आहे. नेमाडेंनी ‘हिंदू’व्दारे त्याचे कितीही स्मरण-रंजन केले तरी तो पुनर्जीवित होणे शक्य नाही. शिवाय ‘खंडेराव’ पासून नेमाडे पूर्णतः अलिप्त नसले तरी काही अंतर राखून आहेत. म्हणून ते कादंबरीत स्वतःच्याच स्मरण-रंजनाचा तेजोभंग करताना दिसतात. अभ्यासाची आवड जागृत झालेल्या ‘खंडेराव’ची शेतीविषयक कामकाजाच्या धबडग्यात होणारी घुसमट, घरकाम व सततच्या पाहुणचारापोटी प्रचंड कष्ट उपसावे लागल्याने खचत जाणारी ‘भावडू’ची बायको, गढीवरच्या देशमुखांकडील घरंदाज स्त्रियांचा होणारा कोंडमारा, कुटुंबाने सोडून द्यायचे ठरविल्याने लहानपणीच महानुभाव पंथाची जोगीण म्हणून ‘खंडेराव’च्या आत्याला पत्कारावा लागलेला संन्यास असे कादंबरीत येणारे प्रसंग गाव-गाड्यात व्यक्ती-स्वातंत्र्याला नसणारी प्रतिष्ठा दर्शवितात आणि देशीवादाच्या जल्लोषाला गालबोट लावतात.
बदलणाऱ्या भारतीय समाजाबरोबरच गांधी राजकीयदृष्ट्या अप्रस्तुत होत गेले आणि त्याचवेळी आंबेडकरांची राजकीय लोकप्रियता विस्तारत गेली. नेमाडेंच्या देशीवादाची तीच गत झाल्याचे सहज दिसून येते. पण त्यामुळे (एका विशिष्ट जात-जाणीवेच्या मर्यादेत का होईना) ‘हिंदू’ने केलेले गाव-गाड्याचे सर्जनशील चित्रण बिनमहत्वाचे ठरत नाही. किमान त्याला कालबाह्य ठरवणारे अधिक दर्जेदार नि वास्तव-वादी साहित्य निर्माण होत नाही तोपर्यंत तरी.
(लेखक युवा अभ्यासक आहेत.)
9420128660
–