आपण असतो एक गाव…

-गजानन घोंगडे

आपण असतो एक गाव

आपल्या नावाचं.

चांगलं दोन-तीन हजार वस्तीचं.

ज्याप्रमाणे गावाच्या नावाचं त्या

गावात काहीच असत नाही.

त्याप्रमाणे आपल्यातही आपल्या नावाचे

आपण असत नाही.

काही हार्डवेअर निसर्ग इनबिल्ट करुन पाठवतो.

काही गुणसुत्रांमधून पूर्वज अवतरले असतात.

काही घडत्या वयातले, वाढत्या वयातले

संस्कार म्हणा, अनुभव म्हणा तेही

राहायला आलेले असतात.

आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, मावशी,

आत्या, काका, चुलत, मामे, आते भाऊ हे असतात

ह्या गावातले आद्य रहिवासी.

हळू-हळू वस्ती वाढते.

कुठ मुरलेलं असतं गावाचं हवापाणी

काही ठिकाणी ठाण मांडून बसलेली

असतात काही गावातली माणसं.

एखाद्या व्याधीसारखी नको असतांना चिटकलेली.

काही असतात शिक्षक शाळेत, कॉलेजमध्ये भेटलेले.

एखाद्या पारिजातकासारखे बहरलेले

आपल्याला आपला वाटणारा हा सुगंध

ह्या पारिजातकामधून येत असतो.

त्याच शाळा कॉलेजच्या वयातले असतात.

काही मोरपीसं हळूवार स्पर्शून गेलेली असतात.

त्या रंगाच्या खुणाही वाटतात.

आपल्याच आपल्याला…

आपण आपलेच समजतो ते रंगही.

काही भेटतात कथेत

काही कादंबरीत

काही कवितेत

अन्‌ येतात मुक्कामालाच लेखकासहीत.

निसर्गातल्या अनंत रंगांनी, आकारांनी

काही कलावंतांच्या कुंचल्यांनी

काही सुरावटींनी, काही सुरांनी

सजलेलं हे गाव

आपल्याला वाटतं आपल्यामुळेच

सजलंय, आपल्यामुळेच आलाय हा आकार.

असतात अनेक कावळे काव-काव

करणारे पण त्यांच्यामुळेच

स्वच्छताही राहते या गावात

काही असतात घुशीसारखे पोखरणारे

म्हणूनच चिरंबंदी होतं गाव.

उभं राहतं भक्कमपणे

वाऱ्या-वादळात…

काही दिसत नाहीत, माहीत नसतात

जाणवत नाहीत पण असतात उभे

आंब्याच्या, निंबाच्या झाडासारखे

चैत्राचा वणवा झेलत

आपल्याला सावली देत.

काही नंतर फुटतात

बायको, मुलं…


झऱ्यासारखे

गावातली ओलं टिकवून ठेकवून ठेवतात.

गाव असेपर्यंत…

कधीकाळी निसर्ग नियमानं

बुडतं प्रलयात, होतं दिसनासं हे गाव.

पण तोपर्यंत काही ओळखीच्या खुणा जपत…

वसतं अनेक गावात

ती गावं साकार करण्यासाठी…

आपण असतो एक गाव.

आपल्याचं नावाचं, दोन तीन हजार वस्तीचं…

(लेखक ग्राफिक डिझायनर, कॉलिग्राफर, व्यंगचित्रकार व Standup Comedianआहेत.)

9823087650

.

Previous articleज्योतिर्लिंग व शक्तीपीठ एकत्र असलेले असलेले श्रीशैलम
Next articleविवेकवाद आणि धर्मचिकित्सा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here