कोजागरी पौर्णिमेची रात्र! हवेत हलकासा गारवा. सर्वत्र शांत वातावरण… आणि अचानक त्याला छेद देत कानावर येऊन आदळलेलं संगीत! लक्षात आलं की शेजारच्या अपार्टमेंट मध्ये तरूणांचं टोळकं ‘आपल्या पद्धतीनं’ पौर्णिमा साजरी करतंय. आपली पद्धत…? या स्वतःच्याच शब्दावर हसायला आलं. त्यांची ही पद्धत आहे तर आपली कोणती होती? होती नं!…अंगणात ज्वारीच्या धांड्यांची खोपडी उभारून त्यात #भुलाबाई न् भुलोजी राणा बाळासह बसवायचे, पानं-फुलं-कणसांनी सुशोभित करायचे. खिरापत, खाऊ करायचा आणि सख्या सोबतीणींना घेऊन गाणी म्हणायची.
पहिली ग पूजाबाई देवा देवा साजे
साजिरा खंडोबा खेळी खेळी मंडोबा
खंडोबाच्या दारीबाई अवसणीचं पाणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्यानं वेळीला भात
जेविला कंथ हनुमंत बाळ
हनुमंत बाळाचे लांबलांब झोके
शिकारीचे डोळे हातपाय गोरे
भाऊ भाऊ टेकती माथा फुलं झळकती
झळकतीचं एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
अशी सुरूवात व्हायची. आता काही गाणी आठवतही नाहीत. पण ते संस्कार कुठे तरी आत, मनात आहेतच. म्हणून तर पौर्णिमेचा चंद्र आकाशी झळकतो तशी ही गाणी अंतर्मनात निनादत राहतात.
या आठवणी फेर धरायला लागल्या तसं अद्यापही बाहुल्या बसविणा-या माझ्या गावाकडच्या जावा, शोभा नि राजमतीला व पुतणी शुभांगीला फोन लावला. बोलताना लक्षात आलं की, गाणी कोणती आहेत? त्यातील लोकतत्वं, कारणमीमांसा….? वगैरे बद्दल नेहमी बोललं जातं. लिहिलं जातं. मात्र “भाद्रपदात पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत मोठ्या थाटामाटाने साजरा होणारा उत्सव, ज्यात पार्वती म्हणजे भुलाबाई आणि शंकरजी म्हणजे भुलोबा यांची स्थापना केली जाते. हा स्त्रीचा गौरव करणारा उत्सव आहे”, या पलीकडे कोणताही मजकूर आढळत नाही. खरंतर प्रत्येक रितीरिवाजांची नोंद ठेवणारे आपण… ! पण आपलं याकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्षच झालं आहे. अलीकडे मौखिक स्वरूपातली ही गाणी लिखित स्वरूपातही उपलब्ध झाली आहेत,
अक्कणमाती चिक्कण माती | जातं ते रोवावं
असं जातं सुरेख बाई | रवा तो दळावा
असा रवा सुरेख बाई | करंज्या कराव्या*
अशा करंजा सुरेख बाई | तबकात भराव्या
असं तबक छान बाई | माहेरी पाठवावं
असं माहेर सुरेख बाई | खेळायला मिळतं
असं सासर द्वाड बाई | कोंडू कोंडू मारतं
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे हळदीकुंकू दाटे
ही गाणी माहित आहेत. पण भुलाबाईची स्थापना कशी करतात? ग्रामसंस्कृतीतला त्याचा विधी कसा आहे? याची नोंद आपल्याला कुठेच सापडत नाही. मग आधी त्याचा मागोवा घ्यायचा ठरवला. लेखाजोखी नव्हे तर प्रत्यक्ष तो विधी आजही करणा-यांना विचारत गेले. कळलं ते असं की,… महिन्याभराच्या, २१ दिवसांच्या, पंधरा दिवसांच्या, पाच दिवसांच्या #भुलाबाई कोनाड्यात पाटावर बसवतात,
भाद्रपदाचा महिना आला
पार्वती म्हणे शंकराला
चला हो माझ्या माहेराला
रंगीत पाट बसायला
सोन्याचं घंगाळ अंघोळीला
चांदीचा ताट जेवायला
अशी ही स्थापना होते. शेवटच्या दिवशी मात्र कोनाड्यातून अंगणात आणत सगळी सजावट होत असते. त्यावेळी कृषीजीवनाचं समृद्धीचं प्रतीक असणारे ज्वारीचे पाच धांडे त्याला लगडलेल्या कणसासह आणले जातात. करदोळ्याच्या सहाय्याने बांधून त्याची खोपडी तयार होते. मधोमध पाट ठेवला जातो. पाटावर कापड नि त्यावर बाहुल्या म्हणजे बाळासह भुलाबाई न् भुलोजी राणा स्थापित केल्या जातात. सोबत मातीची माळीणही केली जाते. तिच्या हातात टोपली नि टोपलीत फुलं ठेवतात. रांगोळी काढतात. धांड्यांना करदोळ्याच्या सहाय्याने पाळणा बांधतात. कोणी त्यात बाळकृष्ण ठेवतात. तर कोणी मातीचं बाळ करून ठेवतात. खोपडीवर अर्धाकार आवरण म्हणून गणपतीच्या लाल रंगाचे प्रतीक असणारे कापड टाकतात. हा माहेरवाशीणीच्या पाठवणीचा दिवस असतो.
आपे दूध तापे त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई साळ्या लेवून जाय
कशी लेवूदादा घरी नणंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा परोपरी नणंदा घरोघरी
नणंदेचा बैल डुलत येईल
सोन्याचं कारलं फेकत जाईल
अशी समजूत घालून पाठवणी करायची असते. म्हणून भुलाबाई, भुलोजीवर पिवळ्या रंगाचं कापड शालीप्रमाणं पांघरलं जातं. ते साडीचोळीचं प्रतीक असतं. पूर्वी हळदीच्या पाण्यात भिजवून ते पिवळं केलं जायचं. आता बाजारातून विकत आणल्या जातं. आजूबाजूला दोन-दोन विड्याची पानं ठेवतात, ती असतात लक्ष्मी नि कुबेर. महिन्याभराच्या बाहुल्या असतील तर नारळाच्या करवंटीत माती ठेवून धान पेरतात. नारळाच्या करवंटीत का बरं? तर त्याचं इतकं सुंदर आणि पटणारं स्पष्टीकरण आहे की पूर्वी बाजारातून टोपल्या आणायची एखादीची ऐपत नसावी. तिनं शक्कल लढवली आणि नारळाच्या करवंटीचा उपयोग केला. सोयीसाठी केलेली कृती हळूहळू परंपरा झाली.
यादिवशी जशी खिरापत केली जाते तसेच मातीचे सात माडे केल्या जातात. हे ऐकलं नि मी दचकलेच. हे माडे काय प्रकार आहे? तर ते असतात मातीचे दिवे! जे आडवे नव्हे तर उभे तयार करतात, असे राजमतीने सांगितले नि देवळाच्या आवारातली दीपमाळ माझ्या नजरेसमोर उभी राहिली. खिरापत काय असते? ते सांगताना शोभा म्हणाली की, भिजवलेल्या हरभ-याच्या डाळीत कोरडे पोहे आणि साखर घालून ती तयार करायची.
आता हे तयार केलेले सात माडे पूर्ण गाणे म्हणे पर्यंत भुलाबाई समोर उजळत मंद प्रकाश देत असतात. सजीवांच्या पोषणासाठी निसर्गाने जे भरभरून दान दिले असते तर या दानाची, सर्जनाची ही पूजा असते, असे परंपरा सांगत असते आणि याच परंपरेतील एक उपचार म्हणजे, गाणी म्हटल्यावर आरती नंतर ३२ पदार्थांचा नैवेद्य, खिरापत, भुलाबाईची शिदोरी बांधणे. त्यात आवर्जुन असाव्यात गुळाच्या करंजा! कारण,
लाडाच्या लेकीले गुळाचे कानवले
सितासारख्या सुनेले धाडीले पाण्याले
करंजीसह इतर पदार्थ तर हवेतच पण सोबत पाच पु-या बांधणे पण परंपरेनं आवश्यक मानले आहे. हे सगळं झाल्यावर त्या सात दिव्यांपैकी एक दिवा चुली जवळ, एक दिवा विहिरीजवळ, एक तुळशीजवळ, एक खताजवळ, एक देवाजवळ आणि दोन भुलाबाई जवळ ठेवायचे.
अरवण बरवण बोरीचं झाड
पाळणा हाले झुळ झुळ दोई दोई हात
निज रे निज रे तान्ह्याबाळा
मी तर जाते सोनारवाडा
सोनार वाडचा दिवा जळे
लेकराची हसळी गळली नाही
मी तर जाते भुलाबाईच्या माहेरी
भुलाबाईच्या माहेरी तांब्याची चूल
मखर घातलं जाळी फुल
नाव ठेवलं सूर्यापाशी
लग्न लावलं तुळशीपाशी
माझा नमस्कार भुलाबाईपाशी
आडण की गोडण
चिंचेखालचं तोडण
आज भुलोजी घरी नाही
कथा कोणी करावी
करावी तं करावी
शंकरानं करावी
ऐकावी तं ऐकावी
पार्वतीनं ऐकावी
दुस-या दिवशी सकाळपर्यंत ते माडे उजळत ठेवतात. दुस-या दिवशी सकाळी पुन्हा एक-दोन गाणी म्हणून पाळणा म्हटल्या जातो आणि शिदोरीसह भुलाबाईची पाठवणी केल्या जाते. नदीवर, विहिरीवर, शेततलावावर मुली भुलाबाई घेऊन जातात. शेवयांचा नेवैद्य केलेला असतोच. पाच कानोले, पाच पु-यासह बांधलेली शिदोरी असतेच. कणकचे पाच दिवे आणि दोन मुठीये असतात. का? ते कारण कोणालाच माहित नाही. पण परंपरेनं केल्या जातात म्हणून करतात. पाण्याजवळ पुन्हा एकदा दोन-तीन गाणी म्हणून विसर्जन केले जाते.
हा भुलाबाई उत्सवाचा विधी, जो आजही त्याच श्रद्धेन गावाकडे साजरा होतो. तसं म्हटलं तर ही गीताची मौखिक परंपरा आहे. स्थळ विशिष्टता घेऊन आलेली. भोवतालचा निसर्ग, ॠतू, व्यवसाय प्रतिबिंबित करणारी, पुनरावृत्ती हा त्याचा विशेष असतो. निर्मिती विषयीचा आनंद व्यक्त करणारा हा उत्सव आहे, असे अभ्यासक मानतात. ते भुलाई, माडी आणि आसणी भराडी गौर, भुलाबाई या उत्सवातील शब्दांचा सारखेपणा दाखवतात तेव्हा आपणही म्हणतो की रिती, पद्धती वेगवेगळ्या आहेत पण गाण्यांमध्ये अनेक साम्य स्थळं आहेतच की….! इतकंच नव्हे तर ‘सीमाप्रदेशातील भावगंगा’ अभ्यासताना,
या या गौरूबाई दिव्याच्या ज्योती
दिव्याच्या ज्योतीला नायकाच्या लेकी
नायकाच्या लेकीला तायताचा हार
तायताच्या हारावर सारंगपाणी
घालणारी गौरूबाई भुलोजीची राणी
आणा आणा लवंगाचे रोप
लावा लावा केगामतीच्या दारी
त्याला आले कौळे कौळे फूल
राम तोडी लक्षुमनाच्या दुरड्या भरी
आले आले हरी बसले पलंगावरी
असं एखादं गाणं आपल्याला चकित करतं. या सगळ्या गाण्यांना वरवर पाहता कोणताच अर्थ दिसत नाही. पण त्यातील काही शब्दांना संस्कृतीचा प्रतिकात्मक अर्थ आहे. जसे, हनुमंत शक्तीचे प्रतीक. निळा रंग काम तत्वाचे प्रतीक, फुलं पावित्र्याचं, फळ समृद्धीचं, पान चैतन्याचं, जगण्याच्या आसक्तीचं प्रतीक मानलं जातं. गुजरातच्या अश्र्विन गरब्याशी मिळताजुळता असा हा टिपरी उत्सव. मातृत्व, समृद्धी, नवमांगल्याची पूजा बांधणारा हा उत्सव लहानपणच्या भावविश्वाचा भाग होता. आज निरव शांततेचा भंग करणारी यांत्रिक गदारोळाची गाणी कानावर आदळलीत आणि विसरत चाललेल्या परंपरेचा शोध घ्यावासा वाटला. जसे शिवराम कारंथ लिहितात की, “अल्लड निरागस उमलणा-या कन्यकांना गीताबरोबर झुलताना पाहून मला जगण्याची फार मोठी शक्ती लाभते” तसंच काहीसं माझं झालं. गावाकडचा भुलोत्सव समजून घेताना अनेक गाणी आठवली. कधी ‘कारल्याचं बी’ तर कधी ‘नणंदा भावजया’, कधी ‘यादवराय या राणी’ तर कधी ‘झाब्रं कुत्रं’.… अशी अनेक गाणी आठवली आणि जणू काही जगण्यातली मरगळ जावून आयुष्यात नव्याने धमारे फुटू लागले.