विमानवाहू युद्धनौकांचे अद्भुत विश्व

-अमित जोशी

ज्या देशाभोवती अथांग समुद्र आहे आणि ज्या देशाला आपल्या महत्वाकांक्षा संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्या देशाला विमानवाहु युद्धनौकांशिवाय पर्याय नाही.  संरक्षण क्षेत्रात, कोणत्या देशाच्या नौदलाकडे किती विमानवाहु युद्धनौका आहेत यावरून त्या देशाच्या ताकदीचे मोजमाप होते

विमानवाहू युद्दनौकांवरील लढाऊ विमानांच्या सहाय्याने विस्तृत समुद्राच्या भागावर वर्चस्व ठेवता येते. म्हणजे समजा विमानवाहू युद्दनौकेवरील लढाऊ विमानाचा युद्ध क्षमतेचा पल्ला – ‘लढाऊ पल्ला ‘ हा जास्तीत जास्त 1000 किमी आहे, ( म्हणजे ५०० किमी अंतर कापत, हल्लाच्या ठिकाणी जात कसरती करत, हल्ला करत विमानवाहू युद्धनौकेवर परतायचे ). तेव्हा विमानवाहु युद्धनौकेच्या ५०० किमी परिघात असलेल्या समुद्रात किंवा किनाऱ्यापासून आत जमिनीवर खोलवरच्या भागापर्यंत वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे विमानवाहू युद्धनौकांना अनन्य साधारण महत्व आहे.

ज्या देशांकडे अनेक विमानवाहू युद्दनौका आहेत त्या देशांना ‘ ब्ल्यू वॉटर नेव्ही ‘ म्हणून ओळखले जाते. म्हणजेच स्वतःच्या देशापासून कित्येक हजार किलोमीटर दूरवर मुक्तपणे संचार करत दबदबा ठेवणे, वर्चस्व गाजवणे हे विमानवाहू युद्धनोकांमुळे शक्य होते. म्हणुनच अमेरिका ही सध्याच्या काळांत खऱ्या अर्थाने ‘ब्ल्यू वॉटर नेव्ही ‘ ओळखली जाते. अर्थात अणु पाणबुड्यांची साथही आवश्यक ठरते.

दुसऱ्या महायुद्धात जपानला नमवण्यात जेवढे अणु बॉम्बचे महत्व आहे तेवढेच विमानवाहू युद्धनौकांचेही. विमानवाहू युद्धनौकांमुळे जपानच्या नौदलाचे कंबरडे अमेरिकेने मोडले होते. १९८२ च्या फॉकलंड बेटांच्या युद्धात इग्लंडकडे असलेल्या विमानवाहु युद्धनौकांमुळे हजारो किलोमीटर दूरवर जात अर्जेटिनाला नमवण्यात इंग्लडला यश आले होते. १९९१ पर्यंत रशिया – अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात विमानवाहू युद्धनौकांमुळेच अमेरिकेचा रशियासमोर दबदबा कायम राहिला होता. एवढंच काय १९७१ च्या भारत पाक युद्धात तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या बंदरांची – चितगांवच्या नाकेबंदीमध्ये आयएनएस विक्रांतने महत्त्वाची भुमिका बजावली होती, हे कसं विसरुन चालेल. म्हणून विमानवाहू युद्धनौकांना नौदलात अनन्य साधारण महत्व आहे.

सध्या कोणत्या देशांकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत आणि किती बांधल्या जात आहेत (माहिती कंसामध्ये ) हे बघूया-

अमेरिका – 11 (2),चीन – 2 (1), इटली – 2 (1), इंग्लंड- 2, फ्रान्स – 1, भारत – 1 (1), रशिया -1, स्पेन -1, थायलंड -1, जपान – 0 (2)

ढोबळपणे विमानवाहू युद्धनौकांचे तीन प्रकारात वर्गीकरण केलं जातं. हलक्या वजनाच्या, मध्यम आकाराच्या आणि मोठ्या ( Super carrier ).

आपल्याकडे असलेली विक्रांत – विराट या हलक्या वजनातील विमानवाहू  युद्धनौका होत्या, ज्याचे वजन अनुक्रमे 22 हजार  27 हजार टन एवढे होते. साधारण 30 हजार टन वजनापर्यंतच्या विमानवाहू युद्धनौका या हलक्या वजनाच्या समजल्या जातात. तर मध्यम आकाराच्या विमानवाहू युद्धनौका या ढोबळपणे या ३० हजार ते ७० हजार टन वजनांत मोडतात. सध्या आपल्याकडे असलेली विमानवाहू  युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे वजन हे सुमारे 45 हजार टन एवढे आहे. अमेरिकेकडे असलेल्या सर्व विमानवाहू युद्धनौका या तब्बल 90 हजार ते एक लाख टन वजनाच्या आहेत.

जेवढा वजनाचा आकडा साधारण तेवढी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हे त्या विमानवाहू युद्धनौकांवर असतात. म्हणजे 45 हजार टन वजनाच्या विक्रमादित्यवर सुमारे 40 – 45 पर्यंत लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवता येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे विमानवाहू युद्धनौका या अत्यंत उच्च दर्जाच्या डिझेल इंजीनावर किंवा तत्सम इंधनावर चालतात. फक्त अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या विमानवाहु युद्धनौका या अणु ऊर्जेवर चालतात. म्हणजेच या दोेन देशांच्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये असलेल्या अणु भट्टीत एकदा इंधन भरले की पुढील काही वर्षे इंधन भरण्याची आवशक्यता नाही.

विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक छोटेसे स्मार्ट शहरंच. जे स्मार्ट शहरांत असतं ते सर्व या विमानवाहू युद्धनौकांवर बघायला मिळतं. बाजारपेठ सोडली तर अनेक सुविधा उपलब्ध असतात. शुद्ध पिण्याचे पाणी, ATM, जीम, सिनेमागृह, इंटरनेट, सांडपाण्याचा पुर्नवापर, वीजेची बचत होईल अशी उपकरणे….अगदी काही ठिकाणी तरणतलाव सुद्धा उपलब्ध आहे. अर्थात युद्धनौकेवर चैनीच्या गोष्टींना मर्यादित स्थान ठेवले जाते.

विक्रमादित्यवर एका वेळी १६०० जण कार्यरत असतात, तर अमेरिकेच्या निमिट्झ वर्गातील विमानवाहू युद्धनौकांवर तर तब्बल 6000 जण कार्यरत असतात, एवढा राबता या युद्धनौकांवर असतो. दिशादर्शन विभाग, हवामान विभाग, संदेश देवाणघेवाण विभाग, हेलिकॉप्टर – लढाऊ विमानांशी संबंधित यंत्रणा, अन्नधान्य प्रक्रियेसंदर्भातला विभाग, logistic संदर्भातला विभाग, इलेक्ट्रिक – इंजिनाशी संबधित अभियांत्रिकी विभाग असे विविध विभाग हे विमानवाहू युद्धनौकेवर कार्यरत असतात.

विमानवाहू युद्धनौकांचा आकार मोठा असल्यानं रडारने सहज त्यांना शोधता येते. त्यामुळे संरक्षणासाठी विमानवाहू  युद्धनौका ही इतर युद्धनौका, पाणबुड्या यांच्या संरक्षणात संचार करते.

विमानवाहू युद्धनौका बांधणे, बाळगणे हे अत्यंत खार्चिक आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे जगात नौदल असलेल्या सर्वच देशांना या विमानवाहू युद्धनौका बाळगणे परवडत नाहीत.

विमानवाहू  युद्धनौकांच्या बाबतीत  अमेरिका सध्या निर्विवादपणे आघाडीवर आहे. अमेरिकेबरोबर रशिया, फ्रान्स, इंग्लंड देशांच्या विमानवाहू युद्धनौकांचे तंत्रज्ञानही पुढारलेले आहे. भारतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. विमानावाहू युद्धनौका बांधणीचा सपाटा सुरु केलेला चीन हा भविष्यात अमेरिकेपुढे आव्हान निर्माण करणार यात शंका नाही.

विमानवाहू युद्धनौका आतून न बाहेरुन बघता येणे, त्यावर एक दिवस का होईना रहायला मिळणे हे संरक्षण विषयक रुची असणाऱ्यांचे स्वप्न नक्कीच असेल. माझ्या bucket list मधील ही गोष्ट केव्हाच पूर्ण झाली आहे. 2012 च्या फेब्रुवारीत मला आयएनएस विराटवर मुक्काम करण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर गोवा ते मुंबई असा स्वप्नवत प्रवासही करायला मिळाला.

विमानवाहु युद्दनौकांवर खुप सुंदर, माहितीपुर्ण असे माहितीपट यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची लिंक पुढे देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=LhqLn1wKJAw&t=1605s

https://youtu.be/c0pS3Zx7Fc8

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleबाईत खोल काय असतं?…आईपण की बाईपण?
Next articleअ सुटेबल बॉय: विक्रम सेठची भन्नाट कादंबरी छोट्या पडद्यावर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here