सुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक

साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – 6

– सुरेश द्वादशीवार

अमेरिकेच्या राज्यघटनेने आपल्या नागरिकांना सुखप्राप्तीचा अधिकार (परस्युट ऑफ हॅपीनेस) दिला आहे. माणसाने सुखी व्हावे, दुःखापासून मुक्त व्हावे, त्याचे सारे प्रश्न सुटावेत आणि त्याला सगळी भौतिक सुखे मिळावीत व त्यासाठी त्याने सर्व तऱ्हेचे कायदेशीर प्रयत्न करावेत हा या मूलभूत अधिकाराचा अर्थ आहे.

सुख व आनंद हा माणसाचा निसर्गाधिकार आहे. ते अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणापत्रानेही जाहीर केले आहे. सुख व आनंद यांचा संबंध सदैव कोणत्या तरी चुकीच्या वा पापाच्या मार्गाशी जोडण्याच्या जगभरच्या धर्मतंत्रांहून हे वेगळे आहे, नवे आणि समाधानकारक आहे.

अमेरिकेची राज्यघटना आता तीनशे वर्षे पूर्ण करत आहे. सुखप्राप्तीचा अधिकार जनतेला देणाऱ्या या घटनेने त्या देशाला अनैतिक बनवले नाही. (तसे लोक इतरत्र ज्या प्रमाणात आढळतात तेवढेच ते तिथे आहेत.) या घटनेने अनीतीला, चंगळीला वा सुखलोलुपतेला प्रोत्साहन दिले नाही. उलट तिने व्यक्तीला स्वतंत्र करून सुखी होण्याचा मार्ग सांगितला. त्यासाठी जुनाट कल्पना, रूढी व परंपरा यांचे ओझे झुगारून देण्याची दिशा दाखवली. आज अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत व शक्तिशाली देश आहे. तिथली माणसे व्यक्तिस्वातंत्र्याबाबत कमालीची जागरूक आहेत. तिथल्या स्त्रियांनीही पुरोगामित्वात साऱ्या जगातील स्त्रियांना मागे टाकले आहे.

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वाताएवढे’ ही विचारसरणी केवळ दुःखमयच नाही तर सुतकी आहे. माणसाला त्याचा जन्म मिळतो तोच शिक्षा म्हणून, पूर्वजन्मीच्या संचिताचे प्रायश्चित्त म्हणून. ते प्रायश्चित्त या जन्मात चांगले अनुभवले तर त्याला पुढील जन्म चांगला मिळतो किंवा तो मोक्षप्राप्ती करतो. हे आपले धर्मचिंतन माणसाचे आयुष्य मुळातच दुःखी असल्याचे, संचिताचे फलित असल्याचे व ब्रह्मतत्त्वाशी सायुज्यता प्राप्त केल्याखेरीज  खरे सुख प्राप्तच होत नाही असे सांगणारे आहे.

ही रडतराऊ धर्मचिंतने ख्रिश्चन, बौद्ध, जैन यांनीही सांगितली आहेत. तात्पर्य… धर्म, सुखाचा निषेध करणारे, ते पापांचे फलित असल्याचे सांगणारे, त्यावर चोरटेपणाचा आरोप लावणारे आहेत. खरी सुखे त्यागात, भक्तीत, सर्वसंगपरित्यागात, संन्यासात वा संसारात राहूनही त्याचा आनंद न घेता राहणाऱ्यांना मिळतो असे म्हणतात.

ख्रिश्चन धर्म तर स्त्रीपुरुषांनी अपत्यप्राप्तीसाठी समागम करावा… पण त्या समागमाचा शारीरिक वा मानसिक आनंद मात्र घेऊ नये असे सांगतो. निर्वाणात आनंद, मोक्षात आनंद, स्वर्गात आनंद आणि मृत्यूनंतर तो मिळण्याची शक्यता हे धर्माचे सांगणे तर सुख याच जन्मात आजच व सर्व तऱ्हेच्या परिश्रमाने मिळवायचे हे अमेरिकेच्या घटनेप्रमाणे आधुनिक जगाचेही सांगणे आहे.

आश्चर्य हे की, हेच चार्वाकांचे मत आहे. जोवर जगायचे  तोवर सुखाने जगा… कारण मृत्यू अज्ञात आहे, तो आला की सारे संपते. देहाची एकदा राख झाली की मग मागे काही उरत नाही हे चार्वाकांचे सुखदर्शी सांगणे आहे. सुखप्राप्तीचा संबंध सामान्यपणे कोणत्याही मार्गाने सुख प्राप्त करण्याशी जोडला जातो.

चंगळवाद, फसवणूक, हिंसा, दडपशाही, युद्ध वा जय हे सारे सुखप्राप्तीचेच स्वरूप व मार्ग आहेत. त्यांचा दरवेळी नीतीशी संबंध असतोच असे नाही. मग चार्वाकांना नीतीचा मार्ग अमान्य आहे काय? नाही. चार्वाकांचा मार्ग केवळ नीतीचाच नाही तर सुखी व सुरक्षित जीवन जगण्याचा आहे. आयुष्य सुरक्षित करणे, त्याच्या गरजा भागवणे आणि आपली सुखे अनुभवणे हा तो मार्ग आहे. त्यांना हिंसा, अनीती, फसवणूक व चंगळही मान्य नाही.

Business ethics and practice: Mahabharadha...........A DharmaYuddha based on SWADHARMA......महाभारतातले युद्ध जिंकून पांडव राजधानीत परत येत असताना त्यांच्या स्वागतासाठी ब्राह्मणांचा एक मोठा जमाव पुढे होतो. त्यातले चार्वाक मताचेही काही जण पुढे होऊन युधिष्ठिरावर आपला संताप व्यक्त करू लागतात. आपले भाऊ, काका, मामा व आप्त मारून हे रक्तरंजित राज्य मिळवले… या पापाचे प्रायश्चित्त तुला घ्यावेच लागेल असे म्हणून ते त्याला आप्तांची हिंसा केल्याचा शाप देतात. या वेळी तेथील इतर ब्राह्मणांचा वर्ग पुढे होऊन तो चार्वाकांना जिवंतपणी जाळून टाकतो.

हा प्रसंग चार्वाकांचा नीतिवाद सांगणारा आहे. तो कुटुंबवंश, आप्तसंबंध व अहिंसा या मूल्यांची शिकवण देणारा आहे. चार्वाकांना सुखप्राप्तीसाठी वा राज्यप्राप्तीसाठीसुद्धा आप्तांचे अहित वा हिंसा मान्य नाही, रक्त सांडणे, परिवाराचे हनन करणेही त्यांना मान्य नाही. माणसांशी केवळ माणसांसारखेच वागले पाहिजे ही या घटनेची शिकवण आहे. त्यांना यज्ञातील धार्मिक हिंसाचार, अन्नाची नासाडी व यज्ञासाठी केलेली युद्धेही मान्य नाहीत.

चार्वाकांचा हिंसेला असलेला विरोध आप्तांच्या हिंसेबाबत अधिक तीव्र आहे. एका अर्थाने ही जमातींची मानसिकता आहे. कोणत्याही जमातीत, तिचा सदस्य हाच तिचा प्राणभूत व महत्त्वाचा घटक असतो. त्याशिवाय जमातीची पूर्तताच होत नाही… त्यामुळे आपल्या रक्तसंबंधातील कुणाची हत्या ही चार्वाकांना कमालीची पापमूलक वाटते. ही एक बाब जरी लक्षात घेतली तरी त्यांचा मार्ग अनीतीचा वा चंगळीचा नाही हे कळून चुकते.

आदिवासींचे समाज कमालीचे एकजीव असतात. त्यात व्यक्तीला जमातीचा घटक म्हणूनच मान्यता व ओळख असते. तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तीत महत्त्वाचे नसते. हा समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे त्यात व्यक्तिस्वातंत्र येऊन त्याचे एकजिनसीपण कमी होते व त्यात व्यक्ती स्वतंत्रपणे ओळखली जाऊ लागते.

व्यक्तीने आपले सुख स्वबळावर मिळवावे. कुणाचीही फसवणूक, हिंसा वा कुणावर बळजोरी करून ते मिळवायचे नसते. स्वतःचे कष्ट, बुद्धी, प्रतिभा इत्यादींच्या सामर्थ्यावर माणसाने सुखी व्हायचे असते. तसे करताना आपल्यासोबतच्या इतरांच्या सुखाचा विचका होणार नाही, त्यांच्या सुखाच्या मार्गात आपल्यामुळे अडसर उत्पन्न होणार नाही आणि आपल्याला सुखी होण्याचा जेवढा अधिकार व स्वातंत्र्य आहे तेवढेच ते इतरांनाही आहे याची जाणीव त्यांच्या सुखप्राप्तीच्या विचारामागे आहे. तात्पर्य, हा सुखविचार जेवढा व्यक्तिगत तेवढाच समूहगत व सामाजिकही होतो.

या दृष्टीने चार्वाक व्यक्तींच्या हिताएवढेच समाजाच्या हिताचाही विचार करणारे ठरतात. त्यात व्यक्ती व माणसे महत्त्वाची आहेत. वर्ग, वर्ण, जाती व अन्य घटक महत्त्वाचे नाहीत. प्रत्येकाला सुखी होण्याचा हक्क आहे आणि तो समाजातील प्रत्येकाने मान्य करायचा आहे. एका अर्थाने हा विचार सामाजिक बांधिलकी सांगणारा व समाजाचे ऐक्यच नव्हे तर त्यातील व्यक्तींची समता सांगणाराही आहे. सुखी माणसे कुणाला दुःखी करून नाही तर स्वतःची क्षमता वाढवून सुखी होतात ही त्यांची शिकवण ठरते.

चार्वाक मताने देवधर्म नाकारले असले तरी त्यांचे इंद्रियगोचर जगाशी संबंध असणारे काही विधी होते की नाही? वैदिकांनी ते असणे नाकारले असले तरी बौद्धायनसुत्त, दिव्यावदानसुत्त इत्यादी बौद्ध ग्रंथांनी त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. त्यांच्या मते हे विधी तांत्रिकाच्या जवळ जाणारे होते. वैदिक काळातही तांत्रिकांचे व मांत्रिकांचे प्रस्थ समाजात होते. जे काहीसे आजच्या जादूटोण्याच्या मार्गाने जाणारे होते. ते वैदिकांच्या मते कनिष्ठ व अडाणी असले तरी समाजाचा एक मोठा वर्ग या तंत्राची कास धरणारा होता. तो तसा आजही आहे.

ग्रामीणांचा व अशिक्षितांचाच नव्हे तर शहरी सुशिक्षितांचा वर्गही अशा तंत्रमंत्राच्या मागे लागणारा आहे. गंडेदोरे, बुवा, बाबा, चमत्कार किंवा हातचलाखी यांच्यामागे असणारा, हातांना मोठाले धागे बांधणारा, ज्याला कोणत्याताही आध्यात्मिक अधिकाराची जाण नाही त्या बाबाच्या भजनी लागणारा मोठा वर्ग समाजात सर्वत्र आहे.

या वर्गाच्या समजुती व चालीरिती जगात सर्वत्र पाहायलाही मिळणाऱ्या आहेत. आदिवासींच्या कित्येक जमातींत नरबळी देण्याची पद्धत थेट विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होती. पशूंचे बळी ईश्वरी कृपाप्रसादाच्या आशेने आजही दिले जातात. देवदासीची प्रथा भारताच्या अनेक भागांत होती… तशी ती प्राचीन रोमन साम्राज्यातही होती. अगदी ट्राय नगरीच्या राजानेही आपली मोठी मुलगी देवाला अर्पण करून तिला देवदासी व अनेकांची भोगदासी बनवले होते. ट्रायवर हल्ला चढवणारा ग्रीक सम्राट ॲगमेमनॉन याने त्या हल्ल्यापूर्वी आपल्या मुलीचा देवासमक्ष बळी दिला होता. बकऱ्या, रेडे, गायी, बैल यांचे असे बळी देण्याची प्रथा सर्वत्र आहे. ती अजूनही आदरणीय आहे. या श्रद्धांचा संबंध काहीतरी मिळवण्याशी, इष्टदेवतेला प्रसन्न करण्याशी आहे.

याखेरीज प्रत्येक सणासुदीला, स्त्रिया बाळंतपणाच्या काळात, जमिनीत पिके येण्याच्या सुमारासही निर्मितीला सुलभता यावी म्हणून अशा श्रद्धांची कास धरली जाते. पिके येण्याच्या काळात शेतात रजस्वला स्त्रियांना निजवल्यास पीक चांगले येते, मुलामुलींच्या जन्माच्या वेळचे विधी त्यांचा जन्म सुखाचा व चांगला करतात अशा समजुती जगात सर्वत्र आहेत.

दुर्दैव हे की, या अंधश्रद्धांशी जुळलेल्या प्रथा-परंपरानाच चार्वाकांच्या विधिपरंपरा मानण्याचे काम जुना बौद्ध, वैदिक जैन व ख्रिस्ती परंपरांनी केले आहे. आधुनिक विचारवंतही त्यांपासून दूर राहिले नाहीत. अगदी देवीप्रसाद चट्टोपाध्यायांसारखा स्वतःला साम्यवादी समजणारा थोर तत्त्वचिंतकही या प्रथांचा संबंध चार्वाकांशी जोडणारा आहे. मंत्र, तंत्र, जादूटोणा यांना चार्वाकांचे श्रद्धाविधी समजणाऱ्या एका अभ्यासकाने त्याचमुळे चार्वाकांना थेट पूर्वमीमांसेशी जुळवून दाखवण्याचा प्रयत्न केला.

प्रस्तुत लेखकाने प्रत्यक्ष देवीप्रसादांची त्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी भेट घेतली. ते राजस्थानच्या राज्यपालपदी राहिले होते. या भेटीच्या वेळी ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. सुरेंद्र बारलिंगे हेही हजर होते. चार्वाकांना अनुभव प्रमाण होता, प्रत्यक्ष व प्रत्यक्षाधारित अनुमानच मान्य होते एका बाजूला असे म्हणत असताना त्यांना चमत्कार किंवा अंधश्रद्धाही मान्य होत्या असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी त्याला सरळ उत्तर न देता अडाणी समाजाच्या धर्माविषयीच्या अज्ञानाचा या अंधश्रद्धांशी असलेला संबंध जोडून दाखवला. मनु चार्वाकांना नास्तिक म्हणतो… पण हे नास्तिकही काही विधी पाळतातच असे म्हटले. रजस्वला स्त्रियांना शेतात निजवले तर तीत पिके येत असतील तर त्या स्त्रियांना खडकावर वा वाळवंटात निजवले तरी तिथे पीक येईल काय? या प्रश्नालाही त्यांनी सरळ उत्तर दिले नाही. या श्रद्धांचे स्वरूप काळानुरूप पाहिले पाहिजे असे ते म्हणाले… मात्र असे केल्याने चार्वाक मताची सारी विश्वसनीयताच मातीमोल होते असे त्यावर प्रस्तुत लेखकाने म्हणताच ‘विचारही कालसंगत असावा लागतो…’ असे सुभाषितवजा वाक्य उच्चारून त्यांनी बोलणे थांबवले.

1959च्या सुमारास प्रकाशित झालेला देवीप्रसादांचा लोकायत हा ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या व चार्वाक मताच्या अभ्यासकांत आजही प्रमाण मानला जातो. त्याचाच आधार घेऊन मराठीसह अनेक भाषांतील लेखकांनी त्यांची चार्वाकांवरची पुस्तके लिहिली आहेत.

प्रत्यक्ष व अनुमान ही दोन प्रमाणे विज्ञानाची प्रमाणे आहेत. तीच प्रमाणे चार्वाकांनी स्वीकारली व अन्य प्रमाणांना या प्रमाणांच्या कसोटीवर तपासून कधी नाकारले तर कधी स्वीकारले हे मान्य केले की चार्वाक हे देशातले पहिले विज्ञानवादी ठरतात. त्यांच्या विज्ञानवादी भूमिकेसमोर मग यज्ञयाग व त्याचे फळही टिकत नाही. अशा विज्ञानवादी परंपरेचा संबंध अंधश्रद्धांशी व तशा समजुतींशी जोडून दाखवणारी माणसे, धर्मश्रद्धांसोबतच अंधश्रद्धांचा निषेध करायलाही कचरतात. ती चार्वाकांना न्याय देत नाहीत आणि धार्मिक श्रद्धांची शहानिशाही विज्ञानाच्या कसोटीवर करत नाहीत.

तरीही तंत्राच्या बाजूने एक गोष्ट सांगता येण्याजोगी. तंत्रमार्ग हा अतिप्राचीन, अगदी वेदपूर्व असल्याचे पुरावे ग्रंथात आहेत. काही वेदान्त्यांनी वेद आणि तंत्र हे दोन भिन्न मार्ग असल्याचे म्हटलेही आहे. समाजातील वर्गवारीनेही हे घडवले वा अभ्यासकांच्या मनात भरवले असणार. तंत्रवादाची मूळ भूमिका देहवादाची आहे, त्या मार्गाच्या मते देह हा साऱ्या विश्वाचेच प्रातिनिधिक म्हणावे असे लहान रूप आहे… त्यामुळे देहाचे सुख आणि आनंद हेच वैश्विक सुखाचे साधन व मार्ग असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकायतांप्रमाणेच तेही इंद्रियगोचर विश्वाखेरीज सारेच असत्य व भ्रममूलक मानतात… त्यामुळे अनेक प्राचीन अभ्यासकांनीही तंत्र व लोकायत हे एकच असल्याचे म्हणण्याची चूक केली आहे.

तंत्राचा भर विधींवर असतो. अमुक विधी केला की त्याचे तमुक फळ प्राप्त होते. विधीवाचून फलप्राप्तीही नाही अशी त्या मार्गाची श्रद्धा आहे. त्या अर्थाने व मूळ अर्थानेही वैदिकांचे यज्ञकर्म हाही तंत्राचाच भाग होतो. यज्ञ करून पाऊस पाडता येतो, पिके भरभराटीला आणली जातात, त्याने धंद्याला बरकत येते, सांपत्तिक स्थिती सुधारली जाते, यज्ञाच्या बळावर शस्त्रशक्ती व सैन्यशक्ती वाढवून शत्रूंवर विजय मिळवता येतो. राजसूयासारखे पूर्वीचे यज्ञ हा याच तंत्राचा भाग आहे. पूजाअर्चा, पोथ्यापुराणे, देवदेवळे याही तंत्राच्याच बाजू आहेत.

प्रत्यक्ष व प्रत्यक्षाधारित अनुमान हे चार्वाकांचे निकष लागू केले तर त्यावरही या गोष्टी उतरत नाहीत… त्यामुळे तंत्र प्राचीन आहेत, इष्ट फलप्राप्ती करून देणारे आहेत अशी श्रद्धा असली तरी ते चार्वाक मतापासून वेगळे व दूरचे आहेत. चार्वाकांचा त्यांच्याशी संबंध जोडणाऱ्यांनी नेमकी हीच बाब दुर्लक्षित केली आहे.

विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टी यांच्या विरोधात जाणारी एक महत्त्वाची गोष्टही इथे नोंदवली पाहिजे. विज्ञानाचा मार्ग आणि त्याची दृष्टी स्वीकारायला मन व बुद्धी यांना एक चांगली व विवेकी पातळी गाठावी लागते. श्रद्धांचे तसे नाही. श्रद्धा सुबुद्धांएवढ्याच निर्बुद्धांनाही स्वीकारता येतात. श्रद्धेच्या अधीन व्हायला मन विचारी असावे लागत नाही. त्याला इंद्रियगोचर ज्ञानाची महतीही जाणवत नाही.

प्रत्यक्ष दिसणाऱ्या व अनुभवाला येणाऱ्या गोष्टीही श्रद्धावादी माणसे नाकारताना दिसतात. उलट अनुभवाला न येणाऱ्या, प्रयोगाने सिद्ध न होणाऱ्या व विवेकाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टीही त्यांना खऱ्या वाटत असतात. पूर्वजन्म कुणी पाहिलेला नसतो. पुनर्जन्म कुणाला ठाऊक नसतो. ईश्वर, भुतेखेते वा अस्तिवात नसलेल्या अनेक गोष्टी केवळ भासमान म्हणून वा परंपरेने आपल्यापर्यंत आणल्या म्हणून ही माणसे त्या स्वीकारत असतात.

विज्ञानाच्या व तर्क मानणाऱ्यांच्या मार्गात श्रद्धा हीच सर्वात मोठी अडचण आहे. तिचा अवलंब बहुसंख्य लोक करतात. विज्ञानाची व तर्काची गळचेपी इतिहासाएवढीच वर्तमानातही करत असतात. चार्वाक मताच्या विस्तारातली सर्वात मोठी अडचण हीच आहे. वेदांचा शब्द, परंपरांचे दाखले आणि ईश्वराच्या तोंडची म्हटली जाणारी वचने त्यांना समोर दिसणाऱ्या वास्तवाहून खरी वाटतात.

नाही म्हणायला काही वैदिक ग्रंथांत तर्काधिष्ठित विधायक वचने आली आहेत. श्राद्धाचे जेवण ब्राह्मणांना खाऊ घातल्याने स्वर्गातील पितरांची पोटे भरत असतील तर ते जेवण प्रवासी लोकांना का दिले जात नाही? तसे केल्याने ते सत्कारणी लागेल व प्रवासी लोकांना सोबत अन्नाचे ओझे नेण्याचे कष्टही पडणार नाहीत. हे वचन वास्तावाधारित आहे… मात्र अशी वचने फक्त काही ग्रंथांतच आली आहेत. छांदोग्यात ती आहेत, बौद्धांच्या व जैनांच्या ग्रंथांत आहेत… मात्र बहुतेक ग्रंथ व संप्रदाय वेदांविषयीच्या श्रद्धा जागवण्यात आणि वेदांनी ज्या राजसत्तांना व प्रस्थापितांच्या वर्चस्वाला वाढवण्यास मदत केली त्यांचे मोठेपणच सांगणारी आहेत. सामान्य व गरीब माणसांसाठी हे ग्रंथ द्रवत नाहीत आणि त्यांच्यासाठी सहानुभूतीचे शब्द लिहीत नाहीत. सत्ता, संपत्ती व धर्म यांचा समन्वय व त्यांनी समाजावर ठेवलेला आपला दरारा कायम राखणे हेच त्या बहुतेकांचे उद्दिष्ट आहे.

खरेतर वेदांचीही एक गंभीर अस्थिरता व त्यातले कालमानानुसार (व वरिष्ठ समाजाच्या गरजेनुसार) होणारे बदलही सांगितले पाहिजेत. पाऊस व्यवस्थित पडत होता. अन्नाचे पीक पुरेसे होत होते. प्रजाजनांची वाढ नियमित व हवी तेवढी होत होती तेव्हा पर्जन्याचे महत्त्व होते… त्यामुळे वेदांमधला पहिला महत्त्वाचा देव वरुण हा राहिला. पुढे संख्येच्या वाढीमुळे वा दुष्काळामुळे आणि अन्नाच्या तुटवड्यामुळे वरुणाला बाजूला सारून त्याच्या जागी इंद्राला आणले गेले. इंद्र हा युद्धाचे नेतृत्व करणारा देवतांचा नेता होता. वरुण ही शांतताकालीन तर इंद्र ही युद्धकालीन देवता होती.

वेदांचे ईश्वरही माणसांच्या गरजांनुसारच बदलत होते ही गोष्ट लक्षात घेतली की ईश्वर व ग्रंथ समाज घडवत नाहीत, समाजच ग्रंथ व ईश्वर घडवत असतो या विलक्षण सत्याची जाणीव होते. ही जाणीव अनेक श्रद्धावानांना मान्य होणारी नसली तरी तीच खरी आहे… कारण श्रद्धेपेक्षा तर्कच सत्याच्या व वास्तवाच्या जवळ आहे. श्रद्धा पायरीशी थांबते तर तर्क सरळ कळसापर्यंत जातो.

(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleगर्दिश में हूं आसमान का तारा हूं, आवारा हूं!
Next articleकालानुरूप ईश्वरात झालेले बदल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here