पुढे राजन गवस किंवा संदेश भंडारे या मित्रांसह अनेकदा त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग आले. बरेचदा त्यांच्या घरी तरुण मुला-मुलींचा जमघट दिसे. आजही त्यांच्या घरी गेल्यावर अशा गटचर्चा अनुभवता येतात. जगभरातील अनेक घटना-प्रसंग-साहित्यावर या चर्चा असतात. मला आमच्या विद्यापीठीय चर्चासत्रांपेक्षा खरेंच्या बैठकीतील चर्चा अधिक अर्थपूर्ण वाटत. कारण त्यात औपचारिकता नसे. प्रमाणपत्र नसत. स्पर्धा नसे. खरे आपल्या आवाजाचा टोन न बदलता कितीतरी घटनांचे दाखले देतात. फार जुन्या इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचे दाखले देत ते आपली मते मांडतात. तेंव्हा माझ्यासारख्याला आपले अज्ञान किती अगाध आहे, या जाणिवेने वाईट वाटत नाही, तर त्या क्षणी इतक्या हळुवारपणे या माणसाने आपले अज्ञान कसे विरघळून टाकले, याच आनंदाने मन मोहरून जाते.
नंदा खरे ‘उद्या’ या कादंबरीत मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध घेतात. युटोपिया किंवा डिस्टोपिया अशा पद्धतीने विचार न करता ‘उद्या’ ही कादंबरी मला खरे यांनी मांडलेला मानवाच्या तात्त्विक आणि मूल्यात्मक उत्क्रांतीचा पटच वाटतो. गुहेत राहणारा, शिकार करणारा माणूस सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करतो. पण पुढे त्या व्यवस्थेशीच संघर्ष करत करत सत्य-न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे स्वप्न पाहतो. या प्रवासात मूळचा माणूस किती उरला आहे. प्राण्याहून वेगळे होण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसाने घेतला, त्या व्यवस्थेच्या, त्या तंत्रज्ञानाच्या सापळ्यात तो स्वतःच अडकला का? हे काही प्रश्न आहेत. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली यांच्या दीर्घ प्रवासात लोकशाहीसारख्या व्यवस्थेत ‘स्वातंत्र्याचा’ शोध लागल्याचा मनुष्याचा आनंद क्षणिक ठरतो की काय, असे ‘उद्या’चे चित्र पाहताना वाटते. खरे यांना दिसणारे उद्याचे चित्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा लवकरच नजरेच्या टप्प्यात येऊ घातले आहे की काय असे वाटते.
नंदा खरेच्या साहित्याचे खरे खुरे समिक्षण ! निमित्त आदरांजली चे तरी , साहित्य प्रेमी तुमच्या टिप्पणी मुळं “खुष”युवा !