‘कायनेटोस्कोप’ पासून सुरू झालेली पर्सनलाइज स्क्रीनिंग शारीरिक-मानसिकरित्या जगापासून तोडणार्या अँटिसोशल अवस्थेला येऊन पोचली आहे. गेल्या 125 वर्षात झालेलं हे स्थित्यंतर चक्रावून टाकणारं आहे. 1952 साली भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात आला. त्यावेळी चित्रपटप्रेमी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महोत्सवाला पाठवलेल्या संदेशात लिहिले होते – International film festival is window to world गहन अर्थ असलेल्या ह्या वाक्यामागच्या शक्यता आता पूर्णतः बदलल्या आहेत. या स्थित्यंतराचा फिल्म इंडस्ट्रीच्या कमाईवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ग्राहकसंख्येवर आमूलाग्र बदल होतोय. मात्र, त्यासोबतच प्रेक्षकांच्या मानसिक जडणघडणीत अन् कलाक्षेत्रात अभूतपूर्व मन्वंतर होत आहे. सिनेमाविषयक जाणिवा बदललेला प्रेक्षक अन् त्या अनुषंगाने नव्याने उदयास येत असलेल्या या सिनेमासंस्कृतीची नोंद घेणे अपरिहार्य ठरते. ज्या देशात सहकुटुंब सिनेमा पाहायला जाणे हा अनेकांसाठी सोहळा असतो, तिथे 7 महिन्यांहून जास्त काळ सिनेमागृह बंद राहिल्यास होणारे बरे-वाईट परिणाम फक्त मनोरंजन उद्योगावर झालेले नसून, रूट लेव्हलवर झिरपलेले असतात. लॉकडाऊन दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकसंख्येत अभूतपूर्व वाढ झालीये. त्याची मीमांसा करताना ओटीटीने काबीज केलेलं मार्केट आणि त्याची आकडेवारी अचंबित करणारी असली तरी – प्रेक्षकांच्या अभिरुचीवर झालेले परिणाम, सिनेमा-सिरीजचा बदललेला रचनाबंध, त्याने आपल्या मानसिक जडणघडणीत झालेले खोलवर बदल, ‘सिनेमागृह’ हे माध्यमच वगळले गेले तर, ढासळलेली इंडस्ट्रीची इकोसिस्टिम – यावर बोलणं तितकंच गरजेचं वाटतं.