अभूतपूर्व मन्वंतर

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक – २०२०)

-जितेंद्र घाटगे

दृश्य 1

साल 1893. मूव्ही प्रोजेक्टरचे आगमन होण्यापूर्वी ‘कायनेटोस्कोप’ हे यंत्र अस्तित्वात आले. हलत्या चित्रांचा भास करणार्‍या या यंत्राला असलेल्या लहान भिंगातून एका वेळी एकच व्यक्ती ते चलचित्र बघू शकत असे. ‘ब्लॅकस्मिथ सीन’ या प्रसंगाचे पहिले प्रदर्शन 9 मे रोजी ब्रुकलीन, न्युयॉर्क येथे झाले. पर्सनलाइज व्ह्युईंगने फिल्म दाखवण्याचा पहिला प्रसंग!

कट टू, दृश्य 2

साल 1897. आपल्याकडे सिनेमागृह, म्हणजे सिनेमाचं स्वतःचं असं घर नव्हतं तेव्हाची गोष्ट. नाटकाचे थिएटर, एखादा मोठा हॉल किंवा तंबूमध्ये विदेशातून आयात केलेले मूकपट दाखवले जात. सिनेमाला कलेचा दर्जा नसल्याने श्रीमंत लोकांना गर्दीत मिसळत मूकपट बघणे कमीपणाचे वाटे. कायनेटोस्कोपभारतात चित्रपट माध्यमाची पायाभरणी करणारे ‘हरिश्चंद्र भाटवडेकर’ उर्फ सावेदादा यांनी प्रोजेक्टर खरेदी केल्यानंतर स्वतः निर्मित केलेले माहितीपट धनिकांच्या घरी दाखवायला सुरुवात केली. एका अद्वितीय कलाप्रकाराची सिनेमागृहाच्या अभावी व्यक्तिगत किंवा प्रायव्हेट स्क्रीनिंगमध्ये मुहूर्तमेढ झाली.

कट टू, दृश्य 3

साल 2001. सिनेमा बघायला जाणे, म्हणजे इव्हेंट असायचा तेव्हाचे दिवस. 1000 पेक्षा जास्त आसनक्षमता असलेले हाउसफुल थिएटर. डोळ्यांना 120 अंशात फक्त सिनेमा दिसावा, एवढा मोठा रुपेरी पडदा. शेकडो लोकांच्या एकाच वेळी टाळ्या शिट्ट्या… अद्भुत चैतन्याने भारलेलं वातावरण… एखाद्या महत्त्वाच्या क्षणी असंख्य प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके एकाच वेळी ऐकू यावे, इतकी पिनड्रॉप शांतता. भावुक प्रसंगी अनेकांनी गिळलेला आवंढा, रोखून ठेवलेल्या श्वासांचा सामूहिक आवाज… आयुष्यात खूप मोठं काहीतरी larger than life अवर्णनीय काहीतरी बघून येतोय अशी भावना… एकाच छताखाली घटकाभर विसावलेल्या भारतीयांचा सिनेमाने दाखवलेला विस्तृत स्पेक्ट्रम.

कट टू, दृश्य 4

साल 2020. कोव्हीड-9 विषाणूच्या उद्रेकाने जगभरात परिस्थिती हाताबाहेर जायला लागली, तशी सार्वजनिकरित्या एकत्र येण्याला बंदी आली. यात सगळ्यात आधी कुठल्या उद्योगावर गदा आली असेल, तर तो चित्रपट व्यवसाय. सिनेमा प्रदर्शनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या सलग आणि अनिश्चित कालावधीसाठी जगभरातील सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली. छोट्या-मोठ्या सर्वच बॅनरच्या फिल्म्स अडकून पडल्या किंवा ओटीटी (over the top) प्लॅटफार्मवर प्रदर्शित होऊ लागल्या. लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडलेल्या लोकांनी मनोरंजनाचे माध्यमांतर मान्य केल्याने नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टारसारख्या OTT च्या प्रेक्षकसंख्येत (किंबहुना ग्राहकसंख्येत) प्रचंड प्रमाणात वाढ झाली. घराघरात सगळ्यांच्या हातात मोबाईल… आपापल्या 5-6 इंचाच्या स्क्रीनवर बघत मान खाली… कानात इअरफोन!

‘कायनेटोस्कोप’ पासून सुरू झालेली पर्सनलाइज स्क्रीनिंग शारीरिक-मानसिकरित्या जगापासून तोडणार्‍या अँटिसोशल अवस्थेला येऊन पोचली आहे. गेल्या 125 वर्षात झालेलं हे स्थित्यंतर चक्रावून टाकणारं आहे. 1952 साली भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात आला. त्यावेळी चित्रपटप्रेमी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महोत्सवाला पाठवलेल्या संदेशात लिहिले होते – International film festival is window to world गहन अर्थ असलेल्या ह्या वाक्यामागच्या शक्यता आता पूर्णतः बदलल्या आहेत. या स्थित्यंतराचा फिल्म इंडस्ट्रीच्या कमाईवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ग्राहकसंख्येवर आमूलाग्र बदल होतोय. मात्र, त्यासोबतच प्रेक्षकांच्या मानसिक जडणघडणीत अन् कलाक्षेत्रात अभूतपूर्व मन्वंतर होत आहे. सिनेमाविषयक जाणिवा बदललेला प्रेक्षक अन् त्या अनुषंगाने नव्याने उदयास येत असलेल्या या सिनेमासंस्कृतीची नोंद घेणे अपरिहार्य ठरते. ज्या देशात सहकुटुंब सिनेमा पाहायला जाणे हा अनेकांसाठी सोहळा असतो, तिथे 7 महिन्यांहून जास्त काळ सिनेमागृह बंद राहिल्यास होणारे बरे-वाईट परिणाम फक्त मनोरंजन उद्योगावर झालेले नसून, रूट लेव्हलवर झिरपलेले असतात. लॉकडाऊन दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकसंख्येत अभूतपूर्व वाढ झालीये. त्याची मीमांसा करताना ओटीटीने काबीज केलेलं मार्केट आणि त्याची आकडेवारी अचंबित करणारी असली तरी – प्रेक्षकांच्या अभिरुचीवर झालेले परिणाम, सिनेमा-सिरीजचा बदललेला रचनाबंध, त्याने आपल्या मानसिक जडणघडणीत झालेले खोलवर बदल, ‘सिनेमागृह’ हे माध्यमच वगळले गेले तर, ढासळलेली इंडस्ट्रीची इकोसिस्टिम – यावर बोलणं तितकंच गरजेचं वाटतं.

भारताचा पहिला स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म ‘बिगफ्लिक्स’ रिलायन्स एंटरटेनमेंटने 2008 मध्ये सुरू केला. सिमलेस, सुपरफास्ट आणि सर्वसामान्यांना परवडण्याजोगे इंटरनेट तेव्हा उपलब्ध नसल्याने, ते सगळ्यांपर्यंत पोचू शकले नाही. दरमहा ठराविक मासिक रक्कम आकारून कंटेंट दाखवण्याचा जो पायंडा आज भारतात दिसतो, त्याची सुरुवात NexG TV, Ditto TV, Yupp TV या मोबाइल अिि ने झालेली आहे. पण, खर्‍या अर्थाने OTT इंडस्ट्रीला आपल्याकडे जो बूस्ट मिळाला, तो 2015 मध्ये लाँच झालेल्या हॉटस्टारपासून. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ व्हिडिओचं आगमन झालं आणि मनोरंजन क्षेत्राच्या मक्तेदारीची समीकरणे बदलायला सुरुवात झाली. 4G इंटरनेट सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांचे अंतर्गत युद्ध प्रेक्षकांच्याच पथ्यावर पडल्याने अल्प दरात भरमसाठ डेटा सहजसाध्य झाला. समोर असलेल्या अमर्याद पर्यायातून आपल्याला हवं ते कंटेंट, हवं तेव्हा बघण्याची लवचिकता बोटाच्या एक क्लिकवर आली. गेल्या 2-3 वर्षात ही इंडस्ट्री एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, आज तब्बल 40 पेक्षा अधिक OTT प्लॅटफॉर्म भारतात उपलब्ध असून, त्यांचे मूल्य 4000 करोडहून जास्त आहे. गेल्या वर्षी भारतीय फिल्मने कमावलेली एकूण Gross domestic रक्कम 12,500 करोड होती. यावरून अंदाज येऊ शकतो की OTT येत्या काही वर्षात किती बलाढ्य इंडस्ट्री होऊ शकते. लॉकडाऊन हे त्यासाठी केवळ उत्प्रेरक ठरले. मल्टिप्लेक्सचे वाढलेले तिकीट दर बघता, 4 व्यक्तींच्या कुटुंबाला जेवढा खर्च एक सिनेमा बघण्यासाठी येतो, तेवढ्याच पैशात हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन संपूर्ण वर्षभर असंख्य हिंदी, इंग्लिश, रिजनल फिल्म्स आणि दर्जेदार सिरीज दाखवतात. हा सर्व बदल पाहता अशी शक्यता वर्तविली जातेय की, येणार्‍या काही वर्षात सिनेमागृहात कालबाह्य होऊन तिथे फिल्म बघणार्‍यांचं प्रमाण अत्यंत कमी होईल. त्या अनुषंगाने OTT प्लॅटफॉर्मने केलेल्या याच बर्‍या वाईट बदलांचा लसावी काढून पाहूया.

अशी गोष्ट, जी जगाला सांगितली नाही, तर स्वतःचा स्फोट नक्की आहे, अशा कथा प्रत्येक कलाकार सोबत घेऊन जगत असतो. जगभरातील कलाकार कलेच्या माध्यमातून ही घुसमट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ दिग्दर्शक अनुराग कश्यपला मुंबई आणि तेथील व्यक्ती-समूह, तत्कालीन घटनांचे माणसांवर होणारे परिणाम, लोकसमूहाचा इतिहास, संस्कृती परंपरा, पारंपरिक मिथके, धार्मिक वर्गीकरण, बदलती मूल्ये आणि त्याची चिकित्सा यात विशेष रस होता. त्याला अभिप्रेत असलेलं मुंबईच्या बाह्य आणि आंतरिक वास्तवाचे दर्शन त्याने वेळोवेळी त्याच्या सिनेमातून करण्याचा प्रयत्न केला, पण सेन्सॉरच्या आडमुठेपणामुळे दरवेळी कात्री लावली गेली. धार्मिक आणि राजकीय चिकित्सा सिनेमातून करता यावी, असे वातावरण भारतीय सिनेसृष्टीत कधीच नव्हतं, ना इथल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत. त्याची पहिली फिल्म ‘पांच’ सेन्सॉरच्या कचाट्यात अडकल्याने कधीच प्रदर्शित होऊ शकली नाही. अर्थात, हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण! जी कहाणी बाहेर आली नाही तर कलाकाराच्या मनाची अखंड घालमेल अन् कधीही न संपणारी घुसमट डोक्यात चालूच राहिली, तर त्याचा शेवट कुठे?

आपली बौद्धिक-मानसिक शक्ती एकवटून ज्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा लागेल, अशा कलाकृती देण्याइतकी सध्याची हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री समृद्ध नाही. त्या सर्व स्तरातील कथा समोर येण्यासाठी कुठलेही सशक्त माध्यम OTT येइपर्यंत उपलब्ध नव्हते. धर्म, श्रद्धा, आस्था याबाबत स्वतःची भूमिका घेऊन काही अपवाद वगळता कुठलाच सिनेकर्ता फिल्म किंवा टेलिव्हिजनद्वारे त्याची गोष्ट सांगू शकला नसता. OTT प्लॅटफॉर्म नसता तर ‘सेक्रेड गेम्स’ सारखी बेधडक कलाकृती कधीच प्रेक्षकांसमोर येऊ शकली नसती. समकालीन भारताचा बर्ड आय व्ह्यू आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यू आळीपाळीने दाखवणारा ‘पाताललोक’ थिएटर किंवा टीव्ही चॅनलवर एरवी प्रदर्शित होणं शक्य नव्हतं. भारतातील सर्वोत्तम वेब सिरीजपैकी एक असलेली ‘दिल्ली क्राईम्स’ सिरीज निर्भया रेप केसच्या सखोल तपासावर आधारित आहे. देश हादरवून टाकणारा संवेदनशील विषय, सत्तातंत्र-नोकरशाहीचे दबावतंत्र, राजकीय प्रभाव, स्पेशल केसमध्ये पोलिसांना मिळत असलेली अपुरी संसाधने – यासंदर्भात भाष्य करणारी कलाकृती OTT ने दिलेल्या पाठबळाशिवाय इतर कुठल्याही माध्यमातून प्रदर्शित होऊ शकली नसती. भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग, शेयर मार्केट यातले लूपहोल्स ओळखून हजारो कोटींचा घोटाळा करणार्‍या ‘हर्षद मेहता ची गोष्ट (‘स्कॅम 1992-द हर्षद मेहता स्टोरी’) सांगताना दिग्दर्शक हंसल मेहता संपूर्ण यंत्रणेला स्कॅनरखाली घेतात. OTT प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मिळालेलं स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या लवचिकतेशिवाय हे शक्य नव्हत.

21व्या शतकाच्या सुरुवातीस मल्टिप्लेक्सने नव्या सिनेमाला जन्म दिला, ज्यात व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमा यातील सीमारेषा धूसर होत गेल्या. आता OTT ने नव्या सिनेमासंस्कृतीला जन्म दिला आहे, ज्यात छोटा-मोठा असा फरक नाही. एखाद्या मोठ्या बॅनरची, स्टारपुत्राची फिल्म आणि छोट्या स्केलची Independent फिल्म यांची रेस एकाच स्टार्टिंग लाइनपासून सुरू होते. व्यक्तिपूजा हा प्रेक्षकांचा स्थायीभाव असल्याने भारतीय फिल्म इंडस्ट्री वर्षानुवर्षे स्टार ड्रीव्हन राहिली आहे. एखाद्या मोठ्या स्टारच्या साधारण चित्रपटाला सुद्धा तुफान प्रतिसाद आणि तुलनेने अर्थपूर्ण असून देखील छोट्या स्केलच्या चित्रपटाकडे दुर्लक्ष हे बॉलिवूडमधील नेहमी दिसणार चित्र होतं. या यंत्रणेला सुरुंग लावू शकणारे OTT हे क्रांतिकारी माध्यम म्हणून पुढे आले आहे. ओरिजिनल, निवडक आणि विश्वसार्ह कंटेंट ही OTT प्लॅटफॉर्मची सगळ्यात जमेची बाजू. एखादी फिल्म नेटफ्लिक्सवर आली की, कुठल्या गुणवत्तेची असू शकते, याचा प्रेक्षकांनी लावलेला अनुमान सहसा चुकत नाही. कलानिर्मितीची प्रेरणा किंबहुना तिचा उगम समाजजीवनाशी निगडित असतो. मात्र, भारतीय समाजयंत्रणा एवढी गुंतगुंतीची आहे की, सिनेमातून दाखवलेली कोणती गोष्ट प्रेक्षक कशी स्वीकारतील, याचा काहीएक नियम नियम नाही. प्रेक्षकाचं वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी आणि प्रांतवार वर्गीकरण करून त्याला अपील होईल अशा फिल्म्स, वेब सिरीज त्याच्या पुढ्यात ठेवणे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहजशक्य झाले आहे.

थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघताना आपल्याकडे प्रेक्षकांना इंटरवलची/मध्यांतराची सवय असल्याने फिल्मची कथा पुढे कशा पद्धतीने सरकावी, याचे काही नियम फिल्ममेकर अनेक वर्ष पाळत आले. मध्यंतरापर्यंत उत्सुकता ताणत न्यायची आणि पुन्हा चित्रपट सुरू झाल्यानंतर प्रेक्षक लवकर आपल्या सीटवर सेटल होत नाही तोपर्यंत महत्त्वाचे नसलेले प्रसंग विनाकारण पेरले जातात. बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे निरीक्षण केले असता लक्षात येईल की, इंटरवलनंतरची 10 मिनिटे एकतर नाचगाण्यात, नाहीतर विनोदी प्रसंगाने भरलेली असतात. सिनेमातील महत्त्वाची घटना या 10 मिनिटांमध्ये कधीच घडत नाही. अर्थात ही बाब प्रेक्षकांना आपले पॉपकॉर्न एन्जॉय करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असली, तरी मुख्य प्रवाहातील भारतीय सिनेमा बर्‍याच वेळा ह्या प्रकारामुळे एका पटकथा प्रोग्रेशनच्या साच्यात अडकून पडला. OTT ने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे कुठल्याही सिनेमाच्या गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. वेबसिरीजच्या प्रत्येक भागाचे प्रोग्रेशन अशा पद्धतीने केले जातेय की, प्रेक्षक ‘बिंज वॉचिंग’ करण्यास प्रवृत्त होतो. विशाल आणि गुंतागुंतीचा पट मांडणार्‍या एखाद्या कादंबरीचे रूपांतर 2-3 तासांच्या फिल्ममध्ये करणे न्यायसंगत नाही, हे मत गेली अनेक दशके जनमानसात, समीक्षकांमध्ये रुजले होते. मात्र, गेल्या काही वर्षात वेबसिरीजची मांडणी अनेकपदरी आणि विस्तृत होतेय. व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी सिनेमा, इंटरऍक्टिव्ह सिनेमा ही तंत्रे OTT मध्ये बघायला मिळतील, तसं हे माध्यम अजून जास्त प्रगती करेल, यात शंका नाही.

OTT प्लॅटफॉर्ममुळे निपजलेल्या या नव्या सिनेमासंस्कृतीचे काही प्रतिकूल परिणाम देखील आहेत. जे येणार्‍या काळात कदाचित ठळकपणे पुढे येतील. OTT प्लॅटफॉर्मचा आजमितीला जो सगळ्यात मोठा USP मानला जातोय तो म्हणजे – ‘आपल्याला हवं ते कंटेंट आपण आपल्या सोयीनुसार परवडणार्‍या किमतीत बघू शकतो’. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रेक्षकांच्या पथ्यावर पडणारा हाच USP उलट कसा फिरू शकतो हे पाहणं हादरवून टाकणारे आहे. अनेक OTP कंपनी प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचं कंटेंट समोर ठेवण्यासाठी Psychographic Segmentation (मानसशास्त्रीय वर्गीकरण) करतात. प्रेक्षकाकडे त्यात ग्राहक म्हणून बघितले जाते. या ग्राहकांची विचारसरणी, जीवनशैली, सामाजिक स्थिती, मते याचा डेटा त्याच्या नकळत घेऊन ग्राहकपरत्वे कंटेंट समोर ठेवला जातो. अर्थातच, Data is the biggest commodity असण्याचा काळात भविष्यात आपल्या आवडीनिवडीमध्ये हेरफेर करू शकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रेक्षकांना किंबहुना ग्राहकांना भुलवणार्‍या युक्ती या सिनेमा माध्यमाच्या उगमापासून वापरल्या जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यात आर्यन थिएटरच्या मालकाने अशी शक्कल लढवली की, त्यांच्याच एका गिरणीत आर्यन थिएटरचे तिकीट दाखवले की, 5 शेर धान्य फुकट दळून मिळत असे. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ च्या प्रचारासाठी अशी जाहिरात केली की, ‘फक्त एका आण्यात दोनशे मैल लांबीचा (रीळची लांबी) दीड तास पाहता येणारा चित्रपट पहा’. अर्थातच ही सगळी आमिषं निरुपद्रवी होती. मात्र काहीशा अशाच क्लुप्ती हल्ली OTT वापरतात (सुरुवातीचा ठरविक काळ मोफत सेवा देणे, एका OTT सोबत संलग्न दुसर्‍या कंपनीची सेवा देणे) तेव्हा त्या माध्यमांनी आपल्या वैयक्तिक जीवनात केलेला शिरकाव आणि त्याचे परिणाम दूरगामी असतात. मोफत सेवा देण्याच्या या काळात कंपन्यांना ग्राहकांचा अचूक वेध घेता येतो. ग्राहकाची इंटरनेट वापराची पद्धती, आवडीनिवडी, भौगोलिक पार्श्वभूमी यानुसार कुठल्या जाहिराती, कुठले उत्पादन त्याच्यासमोर विकायला ठेवयाचे, याचा वेध घेणे सोपे झाले आहे. एका सर्वेनुसार भारतीय व्यक्ती रोजचे सरासरी 70 मिनिट ऑनलाइन स्ट्रीमिंग करण्यात घालवतोय. ‘मोफत किंवा अत्यल्प किमतीत आपल्या आवडीचे भरमसाठ कंटेंट पहा’ या ट्रेंडमध्ये आपण मोफत काय पाहतोय आणि मोफत काय देतो, याचं उत्तर ज्याचं त्याने शोधावं.

सिंगल स्क्रीनपासून मल्टिप्लेक्समध्ये संक्रमण होताना काही बदल हे अचंबित करणारे होते. प्रेक्षकांची सिनेमागृहात महागडे खाद्यपदार्थ खरेदी करण्याची कुवत नसली, तरी तिथे पैसे खर्च करण्याच्या जाळ्यात तो कसा ओढला गेला, हे बघणं मजेशीर होतं. जी व्यक्ती 200-250 रुपये एका तिकिटासाठी देऊ शकते, तीच व्यक्ती 200 रुपये पॉपकॉर्न किंवा कोल्ड्रिंकसाठी सुद्धा खर्च करू शकते, हे मल्टिप्लेक्स चालकांनी गृहित धरले होते. मल्टिप्लेक्स धारकांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा निर्माते/वितरक, मनोरंजन टॅक्स (आता GST) यात जातो. त्यापेक्षा इथे चारपट किमतीत विकलेले खाद्यपदार्थ जास्त नफा मिळवून देतात, हे लक्षात आल्यानंतर थेटरओनर्स स्वतः हॉटेल/हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत उतरले आहेत. मल्टिप्लेक्स चेन ही स्वतःच एक फूड इंडस्ट्री बनण्याच्या तयारीत आहे. आपल्याकडे प्रेक्षक म्हणून बघण्यापेक्षा ’प्राईज कमोडिटी’ म्हणून गृहित धरले गेले, हे कटू सत्य आहे. ही समीकरणे OTT ने केलेल्या स्थित्यंतरात बदलतील का? नक्कीच नाही. एका तिकिटाच्या पैशापेक्षा अमूल्य काही नजीकच्या काळात सर्वानी गमावलेलं असेल. Artificial intelligence, Machine learning, Automation च्या विळख्यात आपल्या आवडी या आपणच ठरवलेल्या असतील, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. Alt Balaji ने सांगितलेल्या आकडेवारीनुसार त्यांचा 80% वरींर मोबाईल वर बघितला जातो. पूर्वी सिनेमागृह हे स्वप्न बघण्याचं ठिकाण असायचं, आता हातातील 5-6 इंच स्क्रीन आपली विचारसरणी फोर्ज करणारं माध्यम होऊ शकतं.

फिल्म व्यवसायाची सुद्धा एक अन्नसाखळी असते. एखादी फिल्म सिनेमागृहात न पाहता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघितली जाते, तेव्हा या अन्नसाखळीतील अनेक घटक आपोआप वगळले जातात. 21 व्या शतकात मल्टिप्लेक्स संस्कृती महानगरासोबत टियर 2, टियर 3 निमशहरी भागात रुजत गेली, तशी सिंगल स्क्रीनसोबत जुळलेल्या अनेक गोष्टी नामशेष झाल्या. सिनेमागृह आणि त्याची सोशिओलॉजी याचा विस्तृत विचार करताना सिंगल स्क्रीन टॉकीजवर अवलंबून असणारे आणि त्याबाहेर व्यवसाय करणारे लोक हा प्रबंध होऊ शकेल, इतका मोठा विषय वाटतो. हे फक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांपुरते मर्यादित नाहीये. तिकीट विकणारे, प्रोजेक्टर चालवणारे, रीळ इकडून तिकडे पोचवणारे, पोस्टर रंगवणारे, प्रत्येक सिनेमासाठी वेगळ्या कॅलिग्राफीत नावं रंगवणारे, सायकल स्टँड सांभाळणारे, अंधार्‍या हॉलमध्ये टॉर्च हातात घेऊन प्रेक्षकांना खुर्च्या दाखवणारे… हे सगळे प्रत्यक्ष अवलंबून असलेले… तर तिकीट ब्लॅक करणारे, बी – सी ग्रेड मूव्हीजच्या थेटरबाहेर घुटमळणारे सेक्स वैदू, वेश्या, सायकल पंक्चर काढणारी दुकानं, एक शिलाई मशीन घेऊन बसून जुने कपडे रफू करणारी जमात, टॉकीजभोवती असणारी गर्दी ओळखून तिथे जादूचे, थोडे सापाचे खेळ करणारे बहुरूपी, चांभार, तीन पत्ते किंवा तीन ग्लास घेऊन पैसे लुबाडणारे, मंजन, फिल्मचे पोस्ट कार्ड विकणारे, काळपट पेटी गळ्यात अडकवून कान साफ करणारे… हे सगळे अप्रत्यक्ष! शेवटचा श्वास मोजत असलेल्या सिंगलस्क्रीन टॉकीज कालबाह्य होत आहे, तशा त्या समांतर चाललेले व्यवसाय-कला देखील लुप्त झाल्या आहेत. एका सर्वेनुसार लॉकडाऊनमध्ये भारतात 200 सिंगल स्क्रीन थिएटर कायमस्वरूपी बंद पडले आहे! या व्यवसायातून झिरपत जाणारा पैसा ज्या हातात पोचायचा, ते हात आता कदाचित कधीच तिथे दिसणार नाही. अनेकांच्या खिजगणतीत देखील नसलेली अर्थव्यवस्था मूकपणे जीव सोडतेय. कदाचित सिंगल स्क्रीनसोबत मल्टिप्लेक्ससुध्या या कचाट्यात ओढले जातील. (गेल्याच महिन्यात हैदराबादच्या प्रसाद आयमॅक्स थेटरचे प्रोजेक्शन ऑपरेटर यांनी लॉकडाऊनमध्ये सॅलरीअभावी झालेली कुटुंबाची वाताहत सहन न झाल्याने आत्महत्या केली.) लॉकडाउनमध्ये OTT प्लॅटफॉर्मची वाढत असलेली मक्तेदारी म्हणजे Final nail in the coffin!

अशी वाताहत मल्टिप्लेक्सच्या वाट्याला नसली तरी, लॉकडाऊन पूर्णपणे उघडल्यानंतर देखील काही महिने, वर्ष थिएटर पूर्वीसारखे हाऊसफुल राहणार नाही. कोरोनाचे सावट आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाहता, प्रेक्षक पुनः चित्रपटगृहाकडे वळतील की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम आहे. गेल्या 7 महिन्यात OTT ने घरबसल्या उत्तमोत्तम कंटेंट पुरवल्याने अनेक प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पैसे खर्च करण्यास उदासीन झाले असण्याची शक्यता आहे. मात्र सिनेसृष्टीवर आलेले हे पहिले संकट नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. असे म्हटले जाते की, 1857 च्या राष्ट्रीय उठावाच्या काही कारणांमध्ये एक कारण, इंग्रजांनी देशात आणलेली ‘रेल्वे’ हेही होते. सगळ्या जातिधर्मांना शेजारी बसवून घेऊन जाणारी रेल्वे, ही अनेक तथाकथित उच्चजातीयांच्या अहंकाराला धक्का पोचवणारी होती. सिनेमा आणि सिनेमागृह यांची सुरुवात झाली तेव्हाही, आपल्या शेजारी तिकीट काढून दुसर्‍या वर्ग-वर्ण-वंशाची व्यक्ती देखील बसू शकतो, ही भावना दुर्दैवाने अनेक उच्चवर्णीय प्रेक्षकांच्या मनातून निघण्यास तयार नव्हती. पिटातल्या प्रेक्षकापासून ते गोल्ड क्लासच्या सोफ्यावर बसणार्‍या वर्गापर्यंत सगळ्यांना एकाच वेव्हलेंथवर आणून त्यांच्यातील सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक दरी थिएटरच्या अंधारात धूसर करण्याची किमया सिनेमाने इतक्या वर्षात साधली आहे. या स्थित्यंतरात काय मिळवलं काय गमावलं, याचा हिशेब कधीही न संपणारा आहे. मात्र, प्रेक्षकांची जात, धर्म, लिंग, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी काहीही असली, तरी सगळ्यांना एकाच छताखाली आणणारा ‘सिनेमाधर्म’ मिळालाय, हे नक्की.

तंबू थेटर, जत्रेतल्या टूरिंग टॉकीज, सिंगल स्क्रीन, व्हिडीओ हॉल, UFO/Satelite द्वारे प्रक्षेपण, मल्टिप्लेक्स संस्कृतीचे आगमन, ओपन थेटर रेस्टोरंट आणि सरतेशेवटी उपलब्ध असलेले ओटीटीचे विविध पर्याय… यात सिनेमा आणि प्रेक्षक यांच्या नात्याचे डायनामिक्स झपाट्याने बदलत आहेत. ‘काळाच्या ओघात सिनेमागृह तगून राहतील का?’ हा प्रश्न याआधीही ऐरणीवर आलाय. मात्र दोन विश्वयुद्धे, टेलिव्हिजन, प्रायव्हेट चॅनलचे आगमन, VCR, VCD, DVD, Blue ray disc, खुलेआम विकल्या जाणार्‍या पायरेटेड सीडी, टोरेंटवरून बेकायदेशीरपणे सुरू असलेले डाउनलोड या प्रवासात जेवढी आव्हाने येत गेली, तेवढा हा कलाप्रकार अधिक उत्क्रांत होत गेला. आणि सोबतच प्रेक्षकसुद्धा. 2014 मध्ये Dog House Diares ने केलेल्या ‘What each country leads the world in या सर्वेक्षणात काही भन्नाट तथ्ये समोर आली. कोणता देश कुठल्या बाबतीत इतरांपेक्षा अग्रेसर आहे, अशी यादी त्यात देण्यात आली. भारत त्यानुसार जगात सगळ्यात जास्त सिनेमांची निर्मिती करणारा देश म्हणून ओळखला जातो! अशा देशात सिनेमागृह आणि त्या हॉलमध्ये पडद्यासमोर बसणारी कुठलीच गोष्ट निर्जीव नसते. प्रेक्षक गुंग झालेले असताना सगळं वातावरण चैतन्याने भारलेलं असतं.

‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे’ या वाक्याची अनुभूति घ्यायची असेल, तर हाऊसफुल सिनेमागृह बघावं. प्रेक्षक थिएटरमध्ये फक्त सिनेमा पाहायला जातो, हा समज लागलीच मोडीत निघेल. सिनेमा हा बिग स्क्रीन, Immersive experience आहे. डोळ्याना 120 अंशांत पडदा दिसण्याच्या अनुभवाची तुलना कुठल्याही OTT माध्यमासोबत केली जाऊ शकत नाही. प्रियदर्शन किंवा डेव्हिड धवनचा एखादा विनोदी सिनेमा आठवून बघा. त्यातला विनोदी प्रसंग मोबाइलवर बघितल्यास चेहर्‍यावर किंचित हसू येते. तोच प्रसंग कुटुंबासोबत, मित्रांसोबत थिएटरमध्ये बघितल्यास जो मनमोकळा, गडगडाटी हशा फुटेलला असतो, त्याची अनुभूती घरात मोबाईल किंवा टीव्हीवर निश्चितच येणार नाही. हीच बाब हॉरर फिल्मला देखील लागू होते. सामूहिकपणे सिनेमा पाहणे, ही माणसाची गरज आहे. शेकडो, हजारो प्रेक्षक जेव्हा एकाच वेळी श्वास रोखणे, सुटकेचा निःश्वास सोडणे या क्रिया करतात, तेव्हा भावनांचे झालेले amplification कमाल असते. (सैराटचा क्लायमॅक्स आठवून पहा) ‘Collective viewing experience मध्ये प्रेक्षागृहातील अनोळखी लोकांमध्येही भावनिक, तरीही सकारात्मक परस्परसंबंध निर्माण झालेले असतात. भरगच्च भरलेल्या हॉलमध्ये सलमानचा शर्ट निघतो किंवा सनी देओल त्वेषाने पेटून उठतो, तेव्हा प्रेक्षकांमध्ये उसळलेली हर्षवायुची लाट OTT च्या पसार्‍यात विरून जाणार नाही. गेल्या महिन्यात ‘ख्रिस्तोफर नोलन’चा ‘Tenet’’ काही देशांमध्ये प्रदर्शित झाला. तो सिनेमा केवळ आयमॅक्स स्क्रीनवर बघता यावा म्हणून काही सिनेप्रेमींनी हजारो रुपये खर्च करून दुसर्‍या देशात सिनेमा पाहायला पसंती दिली. तर, ऑनलाइन पायरेटेड कॉपी उपलब्ध असूनही भारतीय प्रेक्षक ‘Tenet’’ फक्त मोठ्या पडद्यावर पाहता यावा, म्हणून वाट बघत आहे. Tenet, 83, सूर्यवंशी, राजमौलीचा ’RRR’ हे सिनेमे जेव्हा प्रदर्शित होतील, तेव्हा प्रेक्षक पुनः एकदा मोठ्या संख्येने सिनेमागृहाकडे वळतील, हा विश्वास ठेवायला हरकत नाही.

चार्ल्स डार्विनचं उत्क्रांतीवादाबद्दलचे एक प्रसिद्ध विधान आहे. It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent, but the one most responsive to change. सिनेमा, माध्यमं, प्रेक्षक, फिल्ममेकर गेल्या 125 वर्षात जेवढ्या बदलाला सामोरे गेलेय, तितके अधिक प्रगत होत गेले आहे. ‘सिनेमागृह की OTT प्लॅटफॉर्म?’ याचं काहीएक ठराविक उत्तर न राहता, दोन्ही माध्यमं एकमेकांसोबत उत्तरोत्तर उत्क्रांत होत राहतील, हेच खरं!

(लेखक चित्रपट माध्यमाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

९६८९९४०११८

Previous articleओटीटी प्लॅटफॉर्म्स विरुद्ध सिनेमा : आगामी लढ्याची नांदी
Next articleमहाराष्ट्रात ‘भूषण’ दुष्काळ ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.