जेनिफर डोडुना: कोरोना लस शोधण्यात महत्वाचा सहभाग असलेली शास्त्रज्ञ

नीलांबरी जोशी

९ आॉक्टोबर २०२०. पहाटेचे तीन वाजले होते. ती “पालो अल्टो”तल्या एका हॉटेलमध्ये शांतपणे झोपली होती. “वृध्दत्व आणि त्याची जैविक कारणं” यावरच्या एका परिषदेला हजर रहाण्यासाठी ती आदल्या दिवशी तिथे आली होती. कोरोनाव्हायरसच्या साथीच्या काळात सात महिन्यात प्रथमच अशी आॉफलाईन – इन पर्सन परिषद झाली होती.

व्हायब्रेटर मोडवर असलेला मोबाईल फोन आवाज करायला लागला म्हणून ती जागी झाली. तो “ नेचर” मासिकाच्या वार्ताहराचा फोन होता. “तुला इतक्या पहाटे उठवल्याबद्दल सॉरी.. पण मला तुझी नोबेल पारितोषिकाबद्दल कॉमेंट हवी होती.. ” “कोणाला मिळालंय नोबेल?” तिनं विचारलं. आवाजात जरा अवेळी उठवल्याचा त्रासिकपणा होता.

“तुला खरंच माहिती नाही?” त्या वार्ताहरानं पुढे सांगितलं.. “तुला आणि इमॅन्युएल कारपेंटियरला नोबेल मिळालंय..” तिनं आपल्या मोबाईल फोनकडे पाहिलं. तर तिथे अनेक मिस्ड कॉल्स दिसले. स्टॉकहोममधून आले असावेत. ती बातमी मेंदूत / मनात उतरेपर्यंत ती एक क्षणभर थांबली आणि म्हणाली, “मी तुला परत फोन करते..”

आपल्याला रसायनशास्त्रातलं नोबेल मिळाल्याचं तोपर्यंत ठाऊकच नसलेली ती होती जेनिफर डोडुना.

**********

२०२० सालचं रसायनशास्त्रातलं नोबेल डोडुना आणि कारपेंटियर या दोघींना CRISPR तंत्रज्ञानातल्या जीन्सच्या संशोधनाबद्दल मिळालं होतं. अनेक कारणांनी हे नोबेल पारितोषिक महत्वाचं होतं. पण २०२० पर्यंतच्या १८४ विजेत्यांपैकी तोपर्यंत फक्त ५ स्त्रियांना हे पारितोषिक मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर डोडुनाचं पारितोषिक लक्षणीय ठरलं. “आपण कितीही जीव तोडून काम केलं तरी आपल्या कामाचा सोबतच्या पुरुषांच्या कामाइतका गौरव होणार नाही अशी भावना मनात असलेल्या अनेक स्त्रियांसाठी मला मिळालेलं हे पारितोषिक प्रेरणादायी आहे” असं डोडुनानं मुलाखतीत सांगितलं होतं.

CRISPR या डोडुनाच्या संशोधनामुळे जीन्सचं कार्य बदलणं / डीएनए सिक्वेन्स बदलणं याबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे जेनेटिक दोष सुधारणं, आजाराचा फैलाव रोखणं असे अनेक फायदे होऊ शकतात. CRISPR वरुन अर्थातच अनेक नैतिक प्रश्नही उभे राहिले आहेत.

हे सगळं वाचायला मिळतं ते वॉल्टर इसाकसन याच्या “द कोड ब्रेकर” या नवीन पुस्तकात.

***************

““द कोड ब्रेकर” या चरित्रात्मक पुस्तकासाठी जेनिफर डोडुनाची निवड का केली?” या प्रश्नावरचं इसाकसनचं उत्तर चरित्रलेखनासाठी व्यक्तीची निवड कोणत्या निकषावर करावी याचं मूलभूत उत्तर आहे..! ते उत्तर असं :

अॅटम, बिट आणि जीन (Atom / Bit / Gene) – आधुनिक जगात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात या तीन क्रांतिकारी गोष्टींनी आमुलाग्र बदल घडवला. याच अनुषंगानं इसाकसननं या तीन गोष्टीतले क्रांतिकारी शोध लावणारे अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीव्ह जॉब्ज आणि जेनिफर डोडुना या तिघांची चरित्रं लिहिण्यासाठी निवड केली.

अर्थात बेंजामिन फ्रॅंकलिन, लिओनार्डो द विंची अशा जिनिअस लोकांचीही चरित्रं लिहिणाऱ्या इसाकसनचं विज्ञान, जिनिअस माणसं, प्रयोगशीलता, वेगळ्या वाटेनं गेलेली माणसं याबद्दल असलेलं आकर्षणही या पुस्तकाच्या विषयाच्या निवडीमागे स्पष्ट दिसतं.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकात इसाकसननं डोडुनच्या हवाईतल्या बालपणापासून, CRISPR चा शोध लावणं, त्याबद्दलच्या वादांना सामोरं जाणं आणि नोबेल मिळवणं हा प्रवास सोप्या भाषेत मांडला आहे. ६३४ पानांच्या ९ भागातल्या ५६ प्रकरणांमधल्या या पुस्तकातला नववा भागही अत्यंत महत्वाचा आहे. डोडुनाचा कोरोनाव्हायरसची लस शोधण्यातला सहभाग त्या प्रकरणात वाचायला मिळतो.

**********

१२ मार्च २०२०. डोडुनाला अजिबात झोप लागत नव्हती. एक तर, बर्कली, ज्या विद्यापीठात ती CRISPR मुळे सुपरस्टार बनली होती त्या विद्यापीठानं कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे कॅंपस बंद केला होता. दुसरं म्हणजे, रोबो तयार करण्याच्या एका स्पर्धेसाठी तिनं आपल्या मुलाला – अॅंडीला – एका ठिकाणी सोडलं होतं. तिथे १२०० मुलं एका हॉलमध्ये जमणार होती. त्या विचारानं तिला झोप लागत नव्हती.

अखेरीस पहाटे २ वाजता ती उठली आणि नवऱ्याबरोबर जिथे मुलाला सोडलं होतं तिथे गेली. स्पर्धा सुरु होण्याआधी मुलाला गाडीत घातलं. तेवढ्यात पार्किंग लॉटमध्येच मुलाला मोबाईलवर मेसेज आला.. “स्पर्धा रद्द झाली आहे. सगळ्यांनी ताबडतोब घरी जावं”.

त्या क्षणी डोडुनाच्या लक्षात आलं – विज्ञानाचं विश्व संपूर्णपणे बदललं आहे. सरकारच्या मनात कोविडबद्दल काय करावं याबाबत गोंधळ आहे. आता प्राध्यापक, विद्यार्थी यांनी आपल्या टेस्ट ट्यूब्स आणि पिपेटस घेऊन यात सर्व सामर्थ्यानं झोकून द्यायला हवं. दुसऱ्याच दिवशी १३ मार्च २०२० रोजी डोडुनानं बर्कलीतले सहकारी आणि त्या भागातले इतर संशोधक यांच्याबरोबर एक मीटींग बोलावली.

“कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत आपण काय करु शकतो?” हा त्या मीटींगचा विषय होता.

“शिक्षणक्षेत्र सहसा हे करत नाही.. पण आपण आता या व्हायरसविरोधात उभं रहायला हवं..” हे त्या मीटींगमधले डोडुनाचे उद्गार होते. तिच्या CRISPR संशोधनात व्हायरसवरच्या संशोधनाचा मोठा भाग होता. त्यामुळे या मीटींमध्ये तिनं अत्यंत मुद्देसूदपणे स्लाईडस दाखवून कोरोनाव्हायरसची लस शोधण्यासाठी काय करायला हवं ते मांडलं. सहावीत असताना डोडुनाच्या वडिलांनी तिच्या उशाशी “द डबल हेलिक्स” हे जेम्स वॉटसनचं पुस्तक ठेवलं. ती एक डिटेक्टिव्ह कथा आहे असं समजून तिनं वाचली आणि आपण संशोधक व्हायचं हे ठरवलं. त्यानंतर आयुष्यात हा दुसरा आयुष्य पालटवणारा निर्णय तिनं घेतला होता. तिचं Crack in creation हे पुस्तक त्यासाठी वाचायला हवं.

आज डोडुना बर्कलीमधल्या “इनोव्हेटिव्ह जिनोमिक्स इन्स्टिट्यूट (आयजीआय)” या संस्थेतल्या कोविड-१९ टेस्टिंग सेंटरची प्रमुख आहे. दररोज तिथे कोरोनाच्या १००० सॅंपल्सचं टेस्टिंग होतं. “CRISPR based कोविड-१९ चाचणी RTPCR टेस्टपेक्षा वेगानं आणि कमी खर्चात होते” असा हवाला “मॅमथ बायोसायन्सेस” या कंपनीनं दिला आहे.

इसाकसनच्या पुस्तकातल्या नवव्या भागात, डोडुना आणि तिच्या सहकाऱ्यांनी कोरोनावरच्या लशींच्या चाचण्या घेण्यासाठी केलेली धावपळ, सतत चर्चा करुन आखलेल्या योजना , ठरवलेली धोरणं आणि हे करताना विज्ञानविश्वात सगळ्यांसमोर खुली केलेली माहिती याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातून वाचायला हवं.

आज अनेक देशांमध्ये कोरोनाचं थैमान असताना शास्त्रज्ञांनी तुलनेनं कमी काळात तयार केलेली त्यावरची लस हे वरदान आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या तरी तो एकच मार्ग आहे. आपल्या अस्तित्वाला भिडणाऱ्या कोरोनाबद्दल वैज्ञानिक माहिती वाचायला हवी.

**********

इसाकसननं हे पुस्तक स्वत: निरनिराळ्या विज्ञान परिषदांना हजर राहून, प्रयोगशाळांमध्ये फेऱ्या मारुन, जीनोम संशोधनाबाबत वाद असल्यानं दोन्ही बाजूंच्या संशोधकांना / तज्ञांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन लिहिलं आहे. पुस्तकाच्या अखेरीस तो म्हणतो,

“विज्ञानाचं मूलभूत कार्य कायम एकच आहे. पिढ्यांमध्ये सहयोग घडवून आणणं. डार्विन, मेंडेल, वॉटसन / क्रिक आणि डोडुना / कारपेंटियर या सर्वांनी तेच काम केलं आहे. “आपण या ग्रहावर काही काळ आहोत. आपण आपलं काम करतो आणि आपला प्रवास संपल्यावर इतरजण ते काम पुढे नेतात”. असं कारपेंटियरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

त्यावरुन “या पुस्तकात मी ज्यांचा उल्लेख केला आहे ते सर्व शास्त्रज्ञ पैसा किंवा प्रतिष्ठा यासाठी संशोधन करत नव्हते. तर जग जास्त चांगलं व्हावं यासाठी निसर्गातली रहस्यं उलगडण्याचा प्रयत्न करत होते. या पॅनडेमिकच्या निमित्तानं काही जणांना संशोधनाचा हा वारसा प्रोत्साहित करेल आणि तो किती महत्वाचा आहे हे पटेल.” हे इसाकसनचे उद्गार सार्थ वाटतात.

संदर्भ : The code breaker : Gene Editing and future of the Human Race by Walter Isaacson

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

Previous article…धूप की चादर बिछाये बैठ गये!
Next articleनिर्लज्जम सदा सुखी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here