(साभार : कर्तव्य साधना)
व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली डॉ. ऐश्वर्या रेवडकर सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहते. विविध सामाजिक उपक्रमांत तिचा सक्रीय सहभाग असतो. किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी Menstruation, Sex Education, Feminism and Gender Equality या विषयांवर ती सेशन्स घेते. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील आदिवासी भागात रुग्णसेवा करत असताना अनुभवलेले आदिवासी जनजीवन, तिथले सकारात्मक बदल आणि झालेले सर्जनशील प्रयोग तिने शब्दबद्ध केले. ‘बिजापूर डायरी’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या साधना प्रकाशनाच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार नुकताच मिळाला. ऐश्वर्याने 29 मार्च ते 10 एप्रिल असा वीस दिवसांचा काश्मीर दौरा केला. आणि या भेटीत तिने पाहिलेला, अनुभवलेला काश्मीर शब्दबद्ध केला. दोन भागांत प्रसिद्ध होणाऱ्या रिपोर्ताजरुपी अनुभवाचा हा पूर्वार्ध. उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल.
…………………

अधिक कदमने त्याच्या सहकाऱ्यांसोबत 2002मध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन (बीडब्ल्यूएफ) या संस्थेची स्थापना केली. काश्मीरमध्ये सततच्या चालणाऱ्या हिंसाचारात अनाथ झालेल्या मुलींसाठी ही संस्था वसतिगृह चालवते. सुरुवातीला कुपवाडा जिल्ह्यात चार मुलींना घेऊन संस्थेची सुरुवात झाली. सध्या काश्मीर खोऱ्यात चार आणि जम्मूमध्ये एक अशी पाच वसतिगृहे ही संस्था चालवते. अगदी दीड वर्षांच्या असल्यापासून काही मुली तिथे वास्तव्यास आहेत. त्यांची बारावीपर्यंतची सर्व सोय, शिक्षण वसतिगृहात राहून होते. बारावीनंतर त्यांची गुणवत्ता, गरज आणि इच्छा पाहून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. गुणवत्ता असलेल्या मुलींना बीडब्ल्यूएफकडून पुणे, कन्याकुमारी, बेंगलोर येथील इंजिनिअरिंग, ग्राफीक डिझायनिंग, इतर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम यांसाठी पाठवले जाते. अधिकच्या संस्थेने पालकाची भूमिका पार पाडत कित्येक मुलींची लग्नेही लावली आहेत. निखिल वागळे यांनी घेतलेली अधिकची मुलाखत मी पाहिली आणि तेव्हाच ठरवले की, एके दिवशी याचे काम पाहायला जायचे. फेसबुकवरून अधिक कदमचा नंबर घेऊन फोन केला आणि तोही आत्मीयतेने ‘ये’ म्हणाला.
गप्पांमध्ये मी म्हणून गेले की, ‘तुम्ही काश्मीरमध्ये जन्माला आला आहात कारण तुम्ही नशीबवान आहात, इतके सुंदर आहे काश्मीर.’ त्यावर एकीचे उत्तर आले की, ‘मला नाही आवडत इथे काश्मीरमध्ये कारण खूप भेदभाव केला जातो मुलामुलींमध्ये. माझ्या भावाला माझ्यापेक्षाही कमी मार्क्स मिळाले तरी त्याला घरी भेटवस्तू दिल्या जातात. मला पुष्कळ जास्त मार्क्स मिळूनही घरी कोणी माझे कौतुकसुद्धा केले नाही.’ तिनेच मग मला विचारले की, ‘दीदीऽ तुला कसा नवरा हवा?’ या अनपेक्षित प्रश्नातून मी सावरायच्या आधी तिने स्वतःच उत्तर दिले की, ‘मला अमेरिकेतला जन्टलमन नवरा हवा… जो मला पाहिजे तो जॉब करू देईल.’ मी तिला अमेरिकेत जायचे कारण विचारले तर ती उत्तरली की ‘शिक्षण घेऊन आम्ही स्मार्ट होतो. इथे श्रीनगरमध्ये शहरी राहणीमानातल्या स्वतंत्र मुली पाहून आम्हालाही तसे राहावेसे वाटते परंतु घरच्यांची अपेक्षा असते की, आम्ही मात्र गावातील दबून राहणाऱ्या मुलींसारखेच राहावे. असे कसे शक्य आहे?’
रात्री मुलींसोबत पुन्हा बसून माझे उरलेले सेशन मी पूर्ण केले. त्यात मी मानसिक त्रास, आजार यांबाबतही माहिती दिली. मुलींचा खूप छान प्रतिसाद मिळाला. मी त्यांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या अनुभवांवर निबंध लिहायला सांगितला. तोयबा आणि बिल्कीश या अकरावी-बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी दुसऱ्या दिवशी निबंध लिहून माझ्याकडे सोपवलाही. बिल्कीशला बारावीनंतर इंजिनिअरिंगला जायचे आहे. आम्ही चर्चा केली की, तुझे मार्क्स आले की सांग, आपण प्रयत्न करू चांगले कॉलेज शोधायचा. येथील सर्वच्या सर्व 18 मुलींनी त्यांची नावे माझ्याकडून रोज वदवून घेतली. दुसरीतील गुड्डी माझ्याजवळ तिचे इंग्लीशचे पुस्तक घेऊन आली आणि तिने इंग्लीशचा धडा घडाघडा वाचून दाखवला. तिची हुशारी पाहून मी चाटच पडले. बोलताना तिने टेबलावर तबल्यासारखी बोटे सुरेख वाजवून दाखवली, म्हणाली की अधिकभैय्याने शिकवले आहे असे वाजवायला.







Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.