हो, मी हिंदू आहे!

(साभार: साप्ताहिक साधना)

-आनंद करंदीकर

हिंदुत्ववादी ब्राह्मण्य टिकवून ठेवण्यासाठी कधी मुसलमानांच्या द्वेषाची आग लावून धार्मिक दंगे घडवतील, कधी मराठ्याच्या मुलीवर प्रेम केले म्हणून दलित तरुणाला ठार करतील, कधी इंटरनेटवर महाराजांची नालस्ती झाली म्हणून रस्त्यात दिसेल त्या मुसलमानाला ठार करतील, काय करतील याचा नेम नाही. मला ब्राह्मण्याची भीती वाटते. म्हणूनच मी हिंदुत्ववादी हिंदू नाही. आणि तरीही मी हिंदू आहे. अभ्यास करून माझ्या लक्षात आले की हिंदूंमध्ये असे अनेक पंथ, अनेक तत्त्वज्ञाने, अनेक जीवनशैली अशा आहेत की ज्या ब्राह्मण्यवादी, हिंदुत्ववादी नाहीत. माझे बहुतेक सर्व शेजारी हिंदू आहेत. त्यात सर्व सवर्ण हिंदू राहतात. माझे 99 टक्के मित्र आणि सहकारी हिंदू आहेत. त्यात बहुतेक कोणीही आक्रमक हिंदुत्ववादी नाहीत. पण ते दंग्याच्या वेळी घरीच बसून मुसलमान मारले म्हणून आनंद व्यक्त करतात.

…………………………………………………………

लंडनच्या पूर्व भागात मी एका ‘मॅाम आणि पॅाप’ दुकानात चहापत्ती खरेदी करायला गेलो. (लंडनच्या पूर्व भागाचा उल्लेख तिथे बरेच आशिया आणि आफ्रिकेतून आलेले लोक राहतात म्हणून, आणि ‘मॅाम आणि पॅाप’ दुकानाचा उल्लेख हे दुकानदार शेजाऱ्या-पाजाऱ्यांबद्दल ‘चौकशीप्रवीण’ असतात म्हणून आणि प्रस्तुत विषयाच्या संदर्भात हे दोनही संदर्भ महत्त्वाचे आहेत म्हणून केला आहे. ‘लंडन’चा उल्लेख भाव खाण्यासाठी केलेला नाही!) दुकानाच्या गोऱ्या मालकीणबाईंनी, मी कुठे राहतो? कोठल्या देशातून आलो? काय करतो? माझे लग्न झाले आहे का? बायको कोठे आहे? मी किती दिवस लंडनमध्ये राहणार आहे? हे प्रश्न एकामागोमाग विचारले. त्यांची उत्तरे मिळाल्यावर त्यांनी माझ्या पांढऱ्या अस्ताव्यस्त दाढी-मिश्यांकडे नजर रोखून विचारले, ‘‘तुम्ही हिंदू आहात का?’’ मी म्हणालो ‘हो.’ मग ओळख पुरेशी झाली अशा अर्थाने मान हलवून तिने मला, ‘‘चहा कोणता हवा?’’ असा व्यावहारिक प्रश्न विचारला आणि माझी चौकशी संपली.

जगातील बहुतेक सगळ्या भौगोलिक भागातून आलेले लोक पूर्व लंडनच्या या भागात राहतात. अनेक धर्मांचे, अनेक भाषा बोलणारे, निरनिराळे व्यवसाय करणारे लोक इथे राहतात. मग येथील गोऱ्या दुकानदार बाईला माझी ‘हिंदू’ ही ओळख महत्त्वाची का वाटली? आणि मी ‘हो’ का म्हणालो? या दोनही प्रश्नांनी मला चिंतनशील बनवले.

ती गोरी विक्रेती प्रश्न विचारायचे म्हणून विचारत नव्हती, तिला कोठला फॉर्म भरायचा नव्हता. पण मी भारतातून आलो ही ओळख तिला पुरेशी वाटली नाही. मी हिंदू आहे का हे तिला जाणून घ्यावेसे वाटले. का?

मी हो का म्हणालो? तिच्या प्रश्नांच्या सरबत्तीतून झटकन सुटावे म्हणून मी हा सोपा मार्ग स्वीकारला नाही हे नक्की. मी कोठलाच धर्म मानत नाही असे तिला सांगितले असते तरीही तिचे प्रश्न बंद झालेच असते आणि तिने मला चहापत्ती विकली असती. तेव्हा ‘मी हिंदू आहे’ ही माझी ओळख मला ‘योग्य’ का वाटली?

मी ‘हो’ का म्हणालो असा प्रश्न मला पडला याचे मुख्य कारण मी भारतात, विशेषत: उच्च जातीय हिंदूंमध्ये वावरताना, ‘मी हिंदू नाही, हिंदुत्ववादी ब्राह्मणी हिंदू तर नक्कीच नाही’ असे आग्रहाने सांगत असतो; यात दडलेले असावे. भारतातील उच्च जातीयांमध्ये माझी ओळख मला ‘मी हिंदू नाही’ अशी वाटते आणि लंडनमधील गोऱ्या विक्रेतीसमोर मला माझी ओळख ‘हिंदू’ अशी वाटते. ही काय भानगड आहे हा माझ्या चिंतनाचा विषय बनला.

आपली ओळख आपल्या रोजच्या वागणुकीतून आपल्याला आणि समाजाला होत असते. वरकरणी माझ्या वागणुकीत मी हिंदू असतोही आणि नसतोही. मी वेद अपौरुषेय आहेत, भगवद्गीता पवित्र आहे असे मानत नाही, पण मी सध्या त्यांचा जमेल तितका अभ्यास करतो आहे; इतर दुसऱ्या धर्माच्या कोठल्याही धर्मग्रंथाचा असा अभ्यास मी करीत नाही. मी देव मानत नाही. देव आहे किंवा नाही याबद्दल मला कोठलाही निर्णायक पुरावा मिळालेला नाही. पण देव नाही असे धरून चालले तर तोटा काही नाही आणि देव आहे असे मानून चालले तर थोडा वैयक्तिक तोटा आणि मोठा सामाजिक तोटा होतो, हे मला विचार करून पूर्णत: पटले आहे. म्हणून मी निरीश्वरवादी वर्तणूक करतो. मी पूजा-अर्चा करीत नाही, पण तरीही देवळातील घंटा वाजवण्याचा मोह मला होतोच. विंदांची ‘त्रिपदी’ हा कार्यक्रम करताना सरिता (आवाड) जेव्हा ‘भीमाचे जेवण’ कविता, गोष्ट सांगून सादर करते आणि लहान मुले त्याचा आनंद लुटतात तेव्हा आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालतो आहोत असे मला वाटत नाही. मला हिंदू पुराणकथांमधील वैचित्रे आणि सहजपणे सांगितलेल्या असंभव गोष्टी यांचे आकर्षण आहे.

मी जानवे घालत नाही, शेंडी तर राखत नाहीच, गंधही लावत नाही. पण नरकचतुर्दशीला उटणे लावून अंघोळ घालून घ्यायला मला आवडते. मी हिंदूंच्या कोठल्याही संघटित कार्यक्रमाला जात नाही. पण चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बालपणीच्या आठवणी माझे मन आजही उल्हसित करतात. आरती चालू असेल तर मीही ती गुणगुणू लागतो. मी उपास करीत नाही. पण अजूनही मला श्रावणी सोमवाराला रताळ्याचा कीस खाताना वेगळाच आनंद मिळतो. मी सर्व प्रकारचे अन्न खातो, केरळमध्ये मी गोमांसही खाल्ले (ते मला आवडले नाही हा कदाचित माझ्यातील उर्वरित ब्राह्मणीपणाचा भाग असू शकेल.) आणि तरीही श्रीखंड आणि कोल्हापुरी मटणरस्सा हे माझे सर्वांत आवडते पदार्थ आहेत. मी ख्रिसमसला आकाशकंदील लावतो. पण दिवाळीत पणत्या लावताना जाणवणारे मांगल्य मला आकाशकंदील लावताना जाणवत नाही. अशी माझी कितीतरी वागणूक हिंदू असण्याची माझी ओळख सांगते आणि हिंदू नसण्याचीही माझी ओळख सांगते. त्याबद्दल मला गर्व, अभिमान, लाज किंवा अपराधी असं काहीही वाटत नाही.

विचारपूर्वक स्वीकारलेली आणि कसोशीने राबवलेली जीवनशैली सगळेच संस्कार नाकारत नाही. आणि अनेक संस्कार, विशेषत: बालपणीचे संस्कार हे धार्मिक असतात. पण माझी हिंदू असण्याची ओळख आणि हिंदू नसण्याची ओळख ही फक्त या सहज वर्तनाबद्दलच मर्यादित नाही हे मला अधिक चिंतनानंतर आता जाणवते आहे.

माझे ब्राह्मण्याबद्दलचे, हिंदुत्वाबद्दलचे आकलन हळूहळू वाढत गेले आहे. हा प्रवास अजूनही चालूच आहे. माझ्या लहानपणी माझे वडील हे माझ्या माहितीतील एकटेच व्यक्ती हिंदुत्वाच्या विरोधात होते. बाकी सगळे, म्हणजे माझी आई, सर्व नातेवाईक, सर्व शेजारी, सर्व शिक्षक, सगळे सवंगडी हिंदू होते, एवढेच नव्हे तर चित्पावन ब्राह्मण होते. ते आक्रमक, हिंसक हिंदुत्ववादी नसले तरी ‘गर्विष्ठ ब्राह्मण्य’ ही त्यांची स्वाभाविक संस्कृती होती. या ब्राह्मणी संस्कृतीत मला अगदीच असंस्कृत वाटू नये म्हणून माझ्या वडिलांनी मला मारुतिस्तोत्र, रामरक्षा आणि काही संस्कृत श्लोक अर्थ सांगून शिकवले, माझ्याकडून पाठ करून घेतले. माझ्या वडिलांनी माझी मुंज केली नाही आणि वाचलेल्या पैशातून मला क्रिकेटचे सर्व साहित्य आणून दिले. पण यापलीकडे मला हिंदुत्वाच्या, ब्राह्मण्याच्या विरोधात माझ्या वडिलांनी काही सांगितले नाही, पटविणे तर दूरच राहिले. (माझ्या वडिलांचा ब्राह्मण्याला असलेला प्रखर विरोध हा मला मी माझ्या 65व्या वर्षी त्यांच्या कविता पुन्हा वाचल्या तेव्हा कळला!)

मी कॉलेजमध्ये शिकत असताना युवक क्रांती दलात (युक्रांद) मध्ये सामील झालो. तेथे माझी हिंदुत्व, ब्राह्मण्य यांची ओळख आणि अभ्यास सुरू झाला. युक्रांदमध्ये मला ब्राह्मण जातीत न जन्मलेले मित्रमैत्रिणी आणि सहकारी भेटले. आपण आपल्या चाळीत ज्यांना सुसंसकृत समजत आलो त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक सुसंस्कृत असे हे आपले नवे मित्र आहेत आणि त्यांची संस्कृती ब्राह्मणी नाही हे लक्षात आले. आणि मग मला एकामागून एक धक्के बसत गेले. पहिला मोठा धक्का ‘गवई बंधू’ प्रकरणात बसला. दलितांचे डोळे काढण्यात आले. त्याचा निषेध करणारे अत्यंत प्रभावी आणि झोप उडवणारे पोस्टर सुभाष तेंडलेने बनवले. युक्रांदीय मित्रांबरोबर फिरून ते पोस्टर लावताना मला प्रथम जातीय उतरंडीची चीड आली आणि माझ्या ब्राह्मण जातीची शरम वाटली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करायला विरोध म्हणून दंगल झाली. दलितांच्या घरांची जाळपोळ झाली.

 महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमताने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून विद्यापीठाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले तर हे काय घडते? मला हा दुसरा धक्का होता. मी ज्या समाजात, ज्या हिंदू समाजात राहतो तो समाज मला काहीच कसा माहीत नाही? मी मराठवाड्यात उदगीरला जाऊन स्थाईक झालो. उदगीरमध्ये सायकलरिक्षा चालवणाऱ्या दलित आणि मुसलमान कष्टकऱ्यांची संघटना बांधण्याच्या कामाला लागलो. नामांतराच्या मागणीसाठी युक्रांदने काढलेल्या ‘मार्च’मध्ये लातूरहून औरंगाबादला चालत निघालो. गावागावांतील गावगाडे आणि दलित वस्त्या पाहिल्या. दलित वस्तीत रात्री भीमांची गाणी ऐकली आणि दिवसा रस्त्यावरच्या सवर्ण टवाळखोरांच्या शिव्या ऐकल्या. जातिव्यवस्था, विषमता, ब्राह्मणी मनोवृत्ती आणि रीतिरिवाज आपल्या समाजात किती खोलवर आणि व्यापक प्रमाणात आहेत याचा मला साक्षात्कारी प्रत्यय आला.

त्याच वेळी आणि त्यानंतरही मी स्त्रीमुक्ती चळवळीत काम करायला लागलो. माझा कल लक्षात घेऊन माझ्या आईने मला कॅथरीन मेयो यांचे ‘मदर इंडिया’ हे पुस्तक वाचायला दिले. कॅथरीन मेयो या भारतद्वेष्ट्या कमी, प्रामाणिक संशोधक होत्या असे सांगितले जाते. पण त्यांनी पुस्तकाच्या शेवटी त्या काळात भारतात डॉक्टरकी करणाऱ्या स्त्री डॉक्टरांनी सरकारला केलेला अर्ज जोडला आहे. (हा अर्ज बनावट आहे असे कोणी म्हटल्याचे माझ्या वाचनात नाही.) या अर्जात वयात न आलेल्या मुलींशी जबरी संभोग करून त्यांच्या नवऱ्यांनी त्यांची काय दशा केली, याची वर्णने आहेत. ती वाचून अंगावर काटा आला. त्याच वेळी लहानपणी चाळीत ऐकलेली आणि म्हटलेली भोंडल्याची गाणी अभ्यासली आणि त्यातील भयानक विरूप समोर आले. ब्राह्मण कुटुंबातील स्त्रियांच्या कमालीच्या छळाची,  ब्राह्मण्याची गरज लक्षात आली, तिचे इतर जातींत चाललेले अनुकरण लक्षात आले, आणि पुरता हादरलो. माझा हिंदुत्वी ब्राह्मण्याला असलेला विरोध हा फक्त शेंडी, जानवे आणि शाकाहाराला असलेला विरोध नाही. तो सर्वंकष ब्राह्मण्याला, जातिव्यवस्थेला, हिंदुत्वाला असलेला विरोध आहे.

हिंदुत्ववादी ब्राह्मण्य टिकवून ठेवण्यासाठी कधी मुसलमानांच्या द्वेषाची आग लावून धार्मिक दंगे घडवतील, कधी मराठ्याच्या मुलीवर प्रेम केले म्हणून दलित तरुणाला ठार करतील, कधी इंटरनेटवर महाराजांची नालस्ती झाली म्हणून रस्त्यात दिसेल त्या मुसलमानाला ठार करतील, काय करतील याचा नेम नाही. मला ब्राह्मण्याची भीती वाटते. म्हणूनच मी हिंदुत्ववादी हिंदू नाही. आणि तरीही मी हिंदू आहे. अभ्यास करून माझ्या लक्षात आले की हिंदूंमध्ये असे अनेक पंथ, अनेक तत्त्वज्ञाने, अनेक जीवनशैली अशा आहेत की ज्या ब्राह्मण्यवादी, हिंदुत्ववादी नाहीत. माझे बहुतेक सर्व शेजारी हिंदू आहेत. मी ज्या इमारती समूहामध्ये राहतो त्यामध्ये 300 सदनिका आहेत. त्यात सर्व सवर्ण हिंदू राहतात. माझे 99 टक्के मित्र आणि सहकारी हिंदू आहेत. त्यात बहुतेक कोणीही आक्रमक हिंदुत्ववादी नाहीत. पण ते दंग्याच्या वेळी घरीच बसून मुसलमान मारले म्हणून आनंद व्यक्त करतात. ते कोठल्याही जातीचे असू द्या, ते ब्राह्मण्याचे बळी आहेत. मी त्यांना सारखा, प्रत्येक गोष्टीबाबत विरोध करत नाही, करू शकत नाही. पण मला त्यांना बदलायचे आहे. त्यांचे हे अमानवी जिणे मला पाहवत नाही. परवडतही नाही. पण मला त्यांच्यात राहूनच त्यांना बदलायचे आहे. कधी वाटते बौद्ध व्हावे, मुसलमान व्हावे, ख्रिस्ती व्हावे. निदान मी निधर्मी असल्याचा बिल्ला गळ्यात घालावा. पण त्याने काय साधेल? माझा सभोवतालच्या हिंदूंशी संबंध कमी होईल, दुराव्याचा होईल. हिंदुत्वाचे, ब्राह्मण्याचे नवे व बदलते आविष्कार मला कळणार नाहीत. हिंदूंमध्ये कट्टर हिंदुत्ववादी, सनातनी हिंदू कमी आहेत. बहुतेक सगळे अजाणतेपणे स्वीकारलेल्या ब्राह्मण्याचे बळी आहेत. त्यांना बदलायचे, माणूस बनवायचे तर मला त्यांच्यात हिंदू म्हणूनच राहिले पाहिजे. थोर महामानवांनी ते त्यांचे आयुष्य कसे जगले यातून या बाबत शिकवण दिली आहे. डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर ब्राह्मण्याशी लढा दिला तेव्हा ते हिंदू होते. अगदी शेवटी ते बौद्ध झाले. महात्मा गांधी तर कट्टर हिदुत्ववाद्यांशी आयुष्यभर लढले आणि आयुष्यभर हिंदूच राहिले. मग म्यां पामराचे ते काय? होय. मी हिंदू आहे.

या चिंतनातून मला माझी ओळख अधिक चांगली झाली, पण त्या गोऱ्या विक्रेतीने मला ‘तू हिंदू आहेस का’, असा प्रश्न का विचारला याचे उत्तर उमगले नाही. मी तर्क लढवले. पण नेमके उत्तर मिळेना. दोन दिवसांच्या श्रमांनंतर मी तिलाच शरण गेलो. तिला म्हटले, मला कुतूहल आहे, मी हिंदू आहे का, असा प्रश्न तुम्ही मला का विचारला? ती म्हणाली, ‘‘मला कधी कधी माणसाच्या माहितीबद्दल अंदाज करायला आवडतो. तुम्ही ज्या शांतपणे माझ्या आधीच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत त्यावरून मला तुम्ही शांत, सोशीक आणि मनमिळाऊ वाटलात. म्हणून मी अंदाज बांधला की तुम्ही हिंदू असावेत. मलाही कुतूहल होते म्हणून प्रश्न विचारून खात्री करून घेतली. तुम्हांला राग तर नाही आला?’’  मी म्हणालो, ‘‘स्वत:बद्दल एवढे चांगले ऐकून राग कसा येईल? थँक यू.’’ ‘आता परिस्थिती बदलते आहे, पुढच्या वेळी धोका खाल’ वगैरे तिचे प्रबोधन करण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. मोठ्या खुशीत मी घरी आलो आणि शांत झोपलो.

[email protected]

(आनंद करंदीकर यांनी विविध नियतकालिकांत लिहिलेल्या व काही अप्रसिद्ध अशा एकूण 30 लेखांचा संग्रह ‘वैचारिक घुसळण’ या नावाने पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे. राजकारण, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा करंदीकर आणि परिशिष्ट अशा सहा विभागांत मिळून 30 लेख आहेत. या सर्व लेखांचे स्वरूप ललित-वैचारिक आहे.)

(हा लेख ‘साप्ताहिक साधना’ च्या https://www.weeklysadhana.in या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here