योगी भांडवलदार-भाग २

सौजन्य- बहुजन संघर्ष  

‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार
भाग २

 

अनुवाद- प्रज्वला तट्टे

एक औपचारिकता अजून शिल्लक होती. शंकर देव यांच्या आश्रमाचा वारस होण्यासाठी त्यांच्याकडून दिक्षा घेणं आवश्यक होतं. करमवीर आर्यसमाजी असल्यामुळं त्यांनी दिक्षा घेण्यास नकार दिला. रामदेव मात्र आर्यसमाजी गुरुकुलाचे पदवीधर असून लगेच तयार झाले. ९ एप्रिल १९९५ ला गंगातीरी रामदेवनी त्यांच्या मित्र-कुटुंबीय-शिक्षक यांच्या साक्षीनं समारंभपूर्वक शंकर देव यांच्याकडून दिक्षा घेतली. त्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं, लग्न न करण्याचं, कुटुंबापासून अलिप्त राहण्याचं, भौतिक संपदांपासून दूर गरिबीत राहण्याचं आणि प्रसिद्धी परांगमुख राहण्याचं वचन दिलं. भगवे कपडे परिधान केले.

रामदेव-बालकृष्णचे जंगलात जाऊन जडिबुटी आणणे, च्यवनप्राश बनवणे-विकणे, घरोघरी जाऊन हवन करणे हे उद्योग जोरात सुरू झाले. रामदेवना सोबत घेऊन करमवीर यांनी गुजरातमध्ये योगा शिकवण्याचा टूर केला. रामदेवच्या आवाज चांगला होता. ते भजन गायचे आणि समूहाला योगा कसा शिकवायचा त्याचं बारीक निरीक्षण करायचे. तिकडून परतल्यावर कृपालू बाग आश्रमात योगा शिबीर आयोजित केले गेले. १२-१३ लोकांना रामदेव योगा शिकवत होते आणि करमवीर दुरून त्यांच्यावर नजर ठेवत होते, रामदेवच्या चुका टिपून घेत होते. त्या दुरुस्त करवून घेत होते. हळूहळू आश्रमात योगाभ्यासींना सामावून घेण्यासाठी जागा कमी पडू लागली.

तिकडे बालकृष्ण आपलं पोरबंदरातलं यश आठवून आयुर्वेदिक औषधांचे प्रयोग करून पाहत होता. पण औपचारिक पदवी नसल्यामुळं त्याला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट १९४५ अंतर्गत त्याला औषध निर्मिती विक्रीचा परवाना मिळू शकत नव्हता. स्वामी योगानंद नावाचे एक संन्यासी वैद्य करमवीरचे मित्र होते. त्यांच्याकडे परवाना होता. कर्मवीरच्या विनंतीवरून दिव्य योग मंदिर ट्रस्टच्या दिव्य फार्मसी साठी ते स्वतःचा परवाना वापरू द्यायला तयार झाले. एका टिनाच्या शेड मध्ये फार्मसी सुरू झाली.

फार्मसीची जाहिरात अशी केली गेली की तपासण्या फुकट करून मिळतील. विपीन प्रधान यांनी तिथं २००२ ते २००४ पर्यंत काम केलं. लेखिकेला ते सांगतात की, “डॉक्टर मोफत तपासायचे, पण
१५०० रूपयांच्या खाली औषध लिहून द्यायचं नाही, अशी कडक तंबी डॉक्टरांना दिली गेली होती.”
दिव्य फार्मसी च्या पॅकिंग मध्ये विकली जाणारी सर्व औषधं तिथेच तयार केलेली नसतात, दुसरीकडून घेतलेली असतात हे हरिद्वरात सर्वांना माहीत आहे. आणि मोफत तपासणीवालं मॉडेल सगळीकडे रुजलं, यशस्वी झालं आहे. बालकृष्ण पैशाच्या बाबतीत हिशोबी आहे.

धंद्यात जम बसल्यावर रामदेवबाबाचे कुटुंबीय आश्रमात येऊन राहायला लागले. त्यांच्या गावात सैद अलीपुर मध्ये पाण्याची पातळी खूप खोल गेल्यामुळं शेती करणं अशक्य होऊन बसलं होतं. आले तेव्हा सायकलवर गावात फिरणारा रामदेवचा भाऊ रामभरत मग बजाज चेतक मग पांढरी जिप्सी आणि मग लाल मारुतीतून फिरू लागला. योगा शिबीर अजूनही मोफत होतं. पोत्यानं पैसा दिव्य फार्मसीच्या औषध विक्रीतून येत होता.
मात्र गुरू शंकरदेव अजूनही सायकल वरूनच फिरत होते. नंतर नंतर त्यांच्या फिरण्यावर बंधनं घातली जाऊ लागली आणि क्वचित बाहेर पडलेच तर त्यांच्यामागे नजर ठेवणारा सुद्धा फिरू लागला.

पाश्चात्य देशांमध्ये ९०च्या दशकात योगाचं क्रेझ वाढू लागलं होतं. १९९८ साली मॅडोनानं ऑपराह विनफ्रे शो मध्ये ती अष्टांग योग करत असल्याचं सांगितलं होतं.एप्रिल २००१ मध्ये Time मध्ये एक स्टोरी ‘Power of Yoga’ प्रसिद्ध झाली, ज्यात १५ million अमेरिकी रोज योगा करतात अशी बातमी होती. त्यामुळं मग भारतातही योगाच्या लोकप्रियतेची लाट आली. २००० मध्ये मुंबईत सुरू झालेल्या आस्था चॅनलने योगाचे प्रशिक्षण प्रक्षेपित करावे म्हणून आस्थाचे मालक किरीट मेहता यांच्या मागे अलाहबादचे एक पत्रकार माधवकांत मिश्रा लागले. यांच्याच सांगण्यावरून आस्थानं कुंभमेळ्याचं थेट प्रक्षेपण केलं होतं आणि टी आर पी चा इतिहास घडवला होता. मिश्रा हिट होऊ शकणाऱ्या योग गुरूच्या शोधात हरिद्वारला गेले. करमवीर आणि रामदेव यांच्यातला भगवेवस्त्र परिधान केलेला जास्त हिट होणार हे मिश्रा नी ताडलं. आणि त्यांची ती पोटाचे स्नायू गरं गरं फिरवणारी नौलीक्रिया शूट करून घबाड गवसल्याच्या आनंदात मुंबईत आस्थाकडे गेले. पण आस्थाच्या CEO ना हे व्हीडिओ शूटिंग आणि हा योगा प्रकार काही रुचला नाही. त्यांनी प्रक्षेपणास नकार दिला.

पण रामदेवच्या डोक्यात tv चॅनेलची आयडिया घुसली ती कायमची. आस्था कडून नकार आल्यावर रामदेव संस्कार चॅनेलकडे गेले. आणि त्यांच्याकडून २० मिनिटांचा वेळ विकत घेतला. तोपर्यंत विकाऊ धर्मगुरूंना हे माहीत झालं होतं की धर्माच्या धंद्यात टिकायचं तर tv ची मदत हवी. हे बाबा स्वामी लोक ‘चॅनेलच्या ऑफिस मध्ये येऊन, “तुम्ही त्या फलाण्याला का दाखवता, तो तुम्हाला किती पैसे देतो, मी त्यापेक्षा जास्त देतो”, असं म्हणायचे. खरे बाबा गुरू साधू संत चॅनेलपासून दूरच असायचे. आले तरी वेळ विकत घ्यायला पैसे कमी पडले म्हणून टिकायचे नाहीत. आस्था आणि संस्कार चॅनेलच्या वेळांची बोली लागत होती. रामदेवने संस्कार चा २० मिनिटांचा वेळ एक लाख पन्नास हजारात विकत घेतला. रामदेवने सर्वच पैसे आगाऊ देता येत नसल्यामुळं उर्वरित पैसे प्रक्षेपण झाल्यानंतर देतो आणि प्रक्षेपणानंतर पैशाचा ओघ वाढेल असा विश्वास व्यक्त केला.

पहिलं शूटिंग संस्कारने हरिद्वारच्या आश्रमातल्या शिबिराचं केलं. ते इतकं हिट झालं की रामदेवनी देणग्यांची मागणी केल्यावर प्रक्षेपण बघत असलेल्यांनपैकी दोघांनी मिळून पाच लाखाचा चेक देऊ केला. म्हणजे संस्कारला देऊ केलेल्या रकमेपेक्षा अधिक. संस्कारचा टी आर पी वाढला. आस्थाला चुकल्यासारखं झालं. मग मिश्रा रामदेवला पुन्हा आस्थात आणण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात संस्कार मध्ये रामदेवचं काही तरी भांडण झालं. रामदेव आस्थात आले.

एक २००० साली सुरू झालेल्या आस्था चॅनलचे ९३% शेअर्स गोठवण्याची कारवाई सेबीने २००५ मध्ये केली. २००७ पर्यंत हे शेअर्स गोठवले गेले.

TV च्या मदतीनं रामदेव बाबाची लोकप्रियता आणखी वाढत गेली. जिथं जिथं शिबीर होईल तिथं तिथं दिव्य योग फार्मसी चे मोफत तपासणी करणारे पण औषधांचं तगडं बिल काढणारे वैद्य सुद्धा फिरू लागले. अनेक रुग्ण तर थेट कंखालला जाऊनच तपासणी करवून घेऊन औषधं घेऊ लागले. कृपाळू बाग आश्रमाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. आत मध्ये किमान दोन डझन वैद्य तपासण्या करू लागले. ‘दिव्य’ चं लेबल लावून विकण्यासाठी दुसऱ्या फार्मसीतून आणलेली औषधं कमी पडू लागली. विपीन प्रधान, ज्यांनी २००२ ते २००५ पर्यंत आश्रमात काम केलं, ते लेखिकेला सांगतात, ‘रात्रीच्या वेळेला आम्ही तासंतास पैसे मोजत बसायचो. एका रात्री आम्ही २२लाख रुपये मोजले. मे २००४ मध्ये आम्ही पैसे मोजायला नकार दिला. तेव्हा त्यांनी पैसे मोजायचं मशीन आणलं.’

मात्र २००४-५ मध्ये दिव्य फार्मसीनं ६,७३,००० रुपयाचा फायदा दाखवला आणि ५३,००० रुपये आयकर भरला. जेव्हा आयकर ऑफिसरला याची शंका आली तेव्हा त्यांनी दोनशे किलो कागद पत्र जमा करून आश्रमावर धाड घातली. तेव्हाचे सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर जितेंदर राणा म्हणतात, “अनेक व्यवहार त्यांनी कागदावर येऊच दिलेले नाहीत.” राणांच्या अंदाजानुसार दिव्य ने २००५ पर्यंत किमान ५ कोटींचा आयकर चोरला. याचा अर्थ, किमान त्यांनी किमान ६० कोटी रुपये लपवले. गव्हर्नर सुदर्शन अग्रवाल यांनी राणांवर दबाव आणायला सुरुवात केली. नोकरीला चार वर्षे शिल्लक असताना या दबावाला त्रासून मी नोकरीतून व्ही आर एस घेतली.

विपीन प्रधान म्हणतो, ‘बाबाजींना जमीनी, संसाधनं द्यायला खूप लोक एका पायावर तयार होते. त्यात पोद्दार होते, हिंदुजा होते, सुब्रता रॉय होते..’ मैत्रीचा हात पुढे करून सोबत यायला अनेक तयार होते. पण त्यातल्या सर्वात अधिक उपयोगी दोघांना बाबानं प्रथम निवडलं. एक उत्तराखंडचे रंगेल मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी आणि दुसरे रामदेव यांचेच आडनाव असलेले मुलायमसिंह यादव. सुदर्शन अग्रवाल यांच्या ‘हिमज्योती’ नावाच्या एन जी ओ ला बाबांनी २५ लाखाची देणगी दिल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस ने प्रसिद्ध केली होतीच!

१९९५ ते २००३ पर्यंत ज्या एन पी सिंह(स्वामी योगानंद) यांच्या नावावर दिव्य योग मंदिर ट्रस्टचा परवाना होता ते स्वामी आता नाराज झालेले होते आणि परवान्याचं नूतनीकरण करू द्यायला राजी नव्हते. दिव्य योगच्या वाढलेल्या धंद्यातून त्यांना काहीही मिळालेलं नव्हतं. आता दुसऱ्या एका वैद्याच्या नावानं -सत्यपाल सिंह, जो आश्रमातच नोकरीवर होता, त्याच्या नावे परवाना घेण्यात आला.
ज्या वेळी भरतासाहित अनेक समुद्री बेटांवर त्सुनामीने हाहाकार माजवलेला होता त्याच वेळी २७ डिसेंम्बर २००४ रोजी स्वामी योगानंदांचा खून झाला. शेजारच्यांनी म्हणे त्या सायंकाळी बाचाबाचीचा आवाज ऐकला होता. पण साधं विजेचं आणि टेलिफोनचंही कनेक्शन नसलेल्या स्वामी योगानंदांना कुणी सुऱ्यानं भोसकून मारून टाकेल याची त्यांनी कल्पना केली नाही. काही वेळानं वसंत कुमार सिंह यांनी मृत योगानंद यांना बघून पोलीस बोलावले. तरुण कुमारनी तक्रार केली. त्यानंतर दहा महिन्यांनी २५ ऑक्टोबर २००५ रोजी बी बी जुयाल या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने अपराधी सापडला नाही म्हणून केस बंद करून टाकली.

(भाग १- याच वेब पोर्टलवर ‘ताजे लेख’ मध्ये वाचा )

सौजन्य- बहुजन संघर्ष  

अनुवाद- प्रज्वला तट्टे

Previous articleमहात्मा गांधी आणि संघ यांचे साम्य कशात आहे?
Next articleपत्रकारिता विकायला काढलीय!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.