गेली दीड- दोन वर्ष पवार कुटुंबातील सत्तासंघर्ष महाराष्ट्रात गाजतो आहे. असा कौटुंबिक सत्त्तासंघर्ष महाराष्ट्राला नवीन नाही. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनाही पवारांप्रमाणेच सत्तेसाठी कुटुंबातील सदस्यांची आपसातील भांडणं पाहावी लागली होती. सत्ता म्हटलं की कुटुंब , नातेसंबंध, अगदी रक्ताचे नाते गौण ठरतात. महाराष्ट्राप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातही बाप -मुलगा , बहीण-भाऊ, सासू – सून अशा नात्यातील संघर्ष चव्हाट्यावर आले आहेत. देशाच्या सर्वोच्च सत्तास्थानी अनेक वर्ष विराजमान असलेल्या गांधी – नेहरू कुटुंबापासून, राजमाता शिंदे, भजनलाल, बन्सीलाल, करुणानिधी , एन. टी. रामराव अशा देशातील नामवंत नेत्यांच्या घरात सत्तेसाठी पराकोटीची भांडणं झालीत. परिणामी पक्ष तर फुटलाच कुटुंबाचीही अनेक शकले झालीत. इतिहासांत तर कौटुंबिक सत्त्तासंघर्षाची शेकडो उदाहरणं आहेत.
सत्ता मिळवण्यासाठी वा काबीज करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करणे हा मनुष्यस्वभाव आहे. पूर्वी राज्याची वा प्रांताची सत्ता मिळवण्यासाठी वा स्वतःच्या हाती ठेवण्यासाठी राजघराण्यातील लोकांची आपापसात युद्धे व्हायची . मुलाने बापाला तुरुंगात टाकले, भावाला वा प्रतिस्पर्ध्याला कपटाने मारले, कोणी बंड केले, कोणी फितुरी केली अशी शेकडो उदाहरणं इतिहासाच्या पानांपानात वाचायला मिळतात. आज राजघराणी नसली तरी अनेक राजकीय घराणी मात्र तयार झाली आहेत. तिथेही तो सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे . हल्लीच्या राजकीय घराण्यामध्ये रक्तपात वा युद्धे होत नसली तरी स्पर्धा, कटुता पूर्वीइतकीच आहे. देशात, राज्यात लोकशाही असली तरी सत्तेसाठी शत्रूला जाऊन मिळणे, त्यासाठी आपल्याच घरात बंड वा फितुरी करणे, केसाने गळा कापणे, पाठीत खंजीर खुपसणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. हे प्रकार पाहताना बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘जे जे म्हणविती पुढारी वेळ येता देती तुरी सुरा पाठीत छर्रा उरी तुम्हा आम्हा’ या ओळींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे सारे पुढारी अर्थातच ‘शब्दवीर, वाचावीर’ असल्याने या बोटाची थुंकी त्या बोटावर सहज करतात.
पूर्वी भारतासह अनेक देशांत राजेशाही होती आणि त्यात एकाच राजघराण्याची सत्ता चालायची. गुप्त घराणे, सातवाहन घराणे, चालुक्य, चोळ, वाडियार अशी घराणी, त्यांची साम्राज्ये आदींची माहिती अभ्यासात होती. मोगल व मुस्लिम राजघराणी आणि त्यांच्यातील सत्तासंघर्षही अभ्यासात होता. बाप, त्याचा मुलगा, नातू, पणतू, खापर पणतू अशी एकाच राजघराण्याची विशिष्ट प्रांत वा देशावर वर्षानुवर्षे सत्ता असायची. जगभर अशी परिस्थिती होती. घरातच सत्तेसाठी वाद व युद्धे व फंदफितुरी सु्रू असे. सरंजामशाहीमध्ये अशीच स्थिती होती. त्यातही सत्तेसाठी कुटुंबात घराण्यात संघर्ष होताच. संसदीय लोकशाहीमध्ये मात्र सारी सत्ता जनतेकडे असावी आणि त्यांनी निवडून पाठवलेले प्रतिनिधी जनतेच्या वतीने कारभार हाकणार, अशी अपेक्षा असते. पण भारतात अनेक राजकारण्यांची घराणी तयार झाली, तेच तेच निवडून येणारी व्यवस्था तयार झाली. स्वाभाविकच संबंधित घराण्यात सत्तेवरुन वाद व संघर्षही झाले आणि आताही ते सतत होताना दिसत आहे.
ब्रिटिशांनी संस्थानिकांची सत्ता संपवली आणि देश स्वतंत्र झाल्यावर सारी संस्थांनेही भारतात विलीन झाली व केली. पण काही संस्थानांत जुन्या संस्थानिकांचा प्रभाव होता. ते त्या आधारे लोकशाहीतील लोकप्रतिनिधींना आव्हान देऊ लागले. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचा तनखा बंद केला आणि त्या संस्थानिकांच्या विरोधात काँग्रेसने लोकांना बळ दिले. तसे करताना इंदिराजी यांनी या नेत्यांची राजकीय घराणी होऊ नयेत, असे प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, स्वतः इंदिरा गांधी यांचीही राजकीय घराणेशाही होतीच. आजोबा मोतीलाल नेहरू काँग्रेसचे नेते, वडील जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, मावशी विजयालक्ष्मी पंडित या राज्यपाल आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधी. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे स्वातंत्र्यसैनिक व राज्यसभेचे सदस्य होते. नेहरू यांचे राजकारण व कार्यपद्धतीचे ते कट्टर विरोधक होते. पं. नेहरू यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान केले नाही, पण नेहरू घराण्याच्या पुण्याईचा इंदिरा गांधींना फायदा झालाच. अर्थात तेव्हाही काँग्रेसजन या कुटुंबावर अवलंबून असत. पुढे त्यांनी मुलगा संजय यांना पुढे आणले. संजयच्या अपघाती निधनानंतर त्या घराण्यात सत्तेसाठी पहिली ठिणगी पडली. संजय यांच्या पत्नी मेनका यांनी घरात बंड केले. संजयच्या पश्चात इंदिरा गांधींनी आपणास राजकीय वारस जाहीर करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण इंदिराजींनी सुनेऐवजी आपले दुसरे पुत्र राजीव यांच्या पारड्यात वजन टाकले. त्याबरोबर अन्याय… अन्याय अशी आरोळी ठोकत मेनका गांधी घराबाहेर पडल्या आणि पुढे काँग्रेसला आव्हान देणाऱ्या जनता दलात जाऊन केंद्रात मंत्री झाल्या. त्याआधी मनेका १९८४ साली राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झाल्या. काही काळ अपक्ष राहून नंतर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. केंद्रात मंत्री झाल्या, पुत्र वरुणही भाजपचे खासदार झाले. पण त्यांचे बंड यशस्वी झाले नाही.
मनेकांच्या बंडाने इंदिरा गांधींची घराणेशाही संपली नाही. त्यांच्या हत्येनंतर राजीव पंतप्रधान झाले. त्यांचीही हत्या झाली. त्यानंतर काँग्रेस तीनदा सत्तेत आली, सोनिया गांधी यांनी सत्तेचे पद शक्य असूनही स्वीकारले नाही. मात्र परदेशी वंशाची व्यक्ती पंतप्रधानपदी येण्याच्या चर्चेने शरद पवार व काही जण काँग्रेसमधून बाहेर पडले. सत्तेपेक्षा सोनिया गांधी यांनी आणि मग व राहुल व गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका यांनी काँग्रेस मजबूत करण्यावर भर देणे सु्रू ठेवले आहे.. दिल्लीच्या या नेहरू-गांधी घराण्याचा सत्तेबाहेर असतानाही भारतीय राजकारणावर प्रभाव कायम आहे. काँग्रेसही टिकून आहे ती या घराण्यामुळेच.
शरद पवार यांनी परदेशी वंशाच्या व्यक्तीला म्हणजे सोनियांना विरोध करीत काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यांनी आधीही १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडून आणि इंदिरा गांधी यांच्याविरोधात बंड करून स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. पुढे ते स्वगृही आले आणि मग पुतण्या अजित पवारांना वारस केले. त्यांचे सत्तेतील स्थान भक्कम केले, त्यांना उपमुख्यमंत्री हे पद दिले. पण कन्या सुप्रिया सुळेही राजकारणात आल्याने खरा वारसदार कोण, अशी चर्चा सु्रू झाली. त्यातच पवारांनी रोहित या चुलत नातवालाही आमदार केले. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या अजित पवार यांनी आधी २०१९ मध्ये बंड केले. देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दिवसांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. पुन्हा ते काकांकडे आले खरे, पण २०२२ साली पुन्हा काकांविरोधात त्यांनी यशस्वी बंड केले. त्यांनी पक्षच फोडला आणि काका शरद पवार अल्पमतात गेले. या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून अधिकच कटुता वाढवली. आता बारामती काकांची की पुतण्याची असा वाद सु्रू आहे. त्यासाठी सहकारी संस्थांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न पवार घराण्यात सु्रू झाले आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांनी युगेंद्र पवार या आणखी एका चुलत नातवाला सत्तेच्या पटावर पुढे केले आहे.
ज्यांच्याबरोबर अजित पवार गेले आहेत, त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस हेही राजकीय घराण्यातील. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस विधान परिषद सदस्य होते, तर काकू शोभाताई फडणवीस बराच काळ विधानसभेच्या सदस्य होत्या. तिथे संघर्ष नव्हता. पण अजित पवार ज्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ठाकरे घराणेशाहीला सुरुंग लावला. तेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुत्र आदित्य मंत्री असताना. शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट तर पाडलीच पण ठाकरे सरकारही पाडले. शिवसेना व ठाकरे घराण्याला बसलेला हा सर्वात मोठा फटका. अनेक आमदार व मंत्री शिंदे यांना फितूर असल्याचे आणि शिंदे व भाजप यांच्यात सत्तेचा समझोता असल्याचे तेव्हा उघड झाले. हे सारे उद्धव ठाकरे उघड्या डोळ्याने पाहत होते. या फु्टीमुळे शिंदेशाही तयार झाली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. शिंदेसेनाही एकचालकानुवर्ती आहे.
ठाकरेशाहीत व संघटनेत भूकंप घडवून आणणारे बंड शिवसेनाप्रमुखांच्या पुतण्याने म्हणजे राज ठाकरेंनी केले होते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी संघटनेतून बाहेर पडून नवनिर्माण सेना स्थापन केली होती. बाळासाहेबांचे खरे वारसदार आपणच, असा त्यांचा दावा होता. त्यांच्यामागे असंख्य शिवसैनिक गेले, लोकांचा पाठिंबाही मिळाला. पण त्यांनी संघटनेकडे हवे तेवढे लक्ष न दिल्याने पक्ष कमकुवत झाला. याउलट उद्धव यांनी पक्ष बळकट केल्याने फुटीनंतरही त्यांची स्थिती बरीच चांगली दिसत आहे.
नेहरू-गांधी घराणे आणि महाराष्ट्रातील ठाकरे व पवार घराण्यांप्रमाणे अन्य राज्यांच्या राजकीय कुटुंबामध्येही असे संघर्ष झाले आणि आजही सुरूच आहेत. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष एकचालकानुवर्ती आहेत आणि तिथे सत्तेसाठी सर्वाधिक संघर्ष झाला. काँग्रेसमध्येही तो त्या ठिकाणी झाला, जिथे त्या पक्षाची व राज्यांची सत्ता एकाच व्यक्तीच्या हाती एकवटली होती. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे हरियाणा. देवीलाल, बन्सीलाल, भजनलाल हे आधी काँग्रेसमध्ये होते. राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर येऊ शकतात, हे पाहून या नेत्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले. सत्तेत आले, पण त्यांच्या कुटुंबात सत्तेसाठी भाऊबंदकी वाढली. केंद्रीय मंत्री स्व. बन्सीलाल यांनी हरयाणा विकास मंचामार्फत मुलगा सुरेंद्र सिंहला उपमुख्यमंत्री केले. दुसरे पुत्र काँग्रेसमध्ये. त्यामुळे सुरेंद्रच्या अतिमहत्वाकांक्षी पत्नी अलीकडेच भाजपमध्ये गेल्या. एके काळी मंत्रिमंडळासह पक्षांतर करणारे भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांचा काँग्रेस, स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा प्रवास आहे. देवीलाल १९७१ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यांची दुसरी व तिसरीच नव्हे, चौथी पिढीही राजकारणात आणि वेगवेगळ्या पक्षांत आहे. सत्तासंघर्षात देवीलाल घराण्यात उभी आडवी फूट पडली आहे. देवीलाल पुत्र चारदा ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री झाले आणि भ्रष्टाचाराबद्दल दहा वर्षे तुरुंगात राहिले. वडिलांनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल लोकदलाचे ते सर्वेसर्वा आहेत. पण सारी सत्ता त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या एका भावाने आणि त्याच्या मुलांनी जननायक जनता पार्टीची स्थापना केली. दुसरा भाऊ व त्याची मुले भाजपमध्ये गेली. काही जण काँग्रेसबरोबर आहेत. दोन सुनांनी आपल्या दिरांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्यांच्या कुटुंबात सत्तेसाठी इतके संघर्ष झाले की कोण कुठल्या पक्षात हे लक्षात येत नाही. राज्यातील विविध संस्था व संघटना देवीलाल घराण्यातील दहा -बारा जणांच्या ताब्यात आहेत. एका कुटुंबातील सर्वाधिक लोक विविध पक्षांत व एकमेकांच्या विरोधात लढत असणारे हे एकमेव घराणे.
सत्तासंघर्ष ग्वाल्हेरच्या संस्थानातही झाला. विजयाराजे सिंदिया या जनसंघ-भाजपमध्येच. पण पुत्र माधवराव सिंदिया काँग्रेसमध्ये होते. त्यांचे राजकारण परस्परविरोधी होते. माधवरावांच्या पश्चात वारसदार म्हणून पुत्र ज्योतीरादित्य यांनी केंद्रात व राज्यात मंत्रिपदे भूषवली आणि काँग्रेसची सत्ता जाताच भाजपमध्ये उडी मारली. वसुंधराराजे व यशोधराराजे या विजयराजेंच्या कन्या. वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचा मुलगा भाजपचा दुष्यन्त खासदार, तर बहीण यशोधराराजे राज्यात मंत्री. या सिंदिया संस्थानिकांनी सत्तेसाठी आपापसात न लढता वेगवेगळ्या पक्षांत जाऊन सत्ता उपभोगली, असे म्हणता येईल.
हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह ३५ वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर होते. त्यांनी पत्नी प्रतिभा सिंह व मुलगा विक्रमादित्य यांना सत्तेची पदे दिली. वीरभद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. पण काँग्रेसने सुखविंदर सुखखू यांना मुख्यमंत्री केल्याने त्या दोघांनी बंडाचे झेंडे फडकावले. राज्यसभा निवडणुकीत मते फोडण्याची व पक्षाचा उमेदवार पाडण्याची व्यवस्थाही केली. काही घराण्यांतील नेते सत्तेसाठी आपला पक्ष कसा संपवण्यास तयार होतात, त्याचे हे उदाहरण.
काँग्रेसमध्ये सर्वाधिक घराणेशाही असण्याचे एकमेव कारणे म्हणजे तो पक्ष सर्वांत जास्त काळ केंद्र व राज्यांत सत्तेत होता. आता भाजप ११ वर्षे केंद्रात सत्तेमध्ये आहे आणि बऱ्याच राज्यांत भाजपचो सत्ता आहे. परिणामी तिथेही घराणेशाहीची लागण झाली आहे. सुषमा स्वराज यांच्या पश्चात मुलीला खासदारकी मिळाली आहे. अनुराग ठाकूर दिल्लीत तर वडील हिमाचलात आहेत. अमित शाह यांचे पुत्र जय हे केवळ वडिलांमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, एकनाथ खडसे, विजयकुमार गावित आदी नेत्यांची मुले अचानक सत्तेच्या दारात दिसू लागली. नारायण राणे यांचे सुपुत्र आता त्यांच्या भाषेमुळे ओळखीचे झाले आहेत. गंगाधर फडणवीस व शोभाताई फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले नाते सर्वांना माहीत आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू हेही वडिलांमुळे सत्तेच्या राजकारणात आले आहेत. पियुष गोयल यांचे आई व वडील भाजपचे नेते होते. राजनाथ सिंह, नाथुराम मिर्धा, कल्याण सिंह अशी किमान ५० नावे इथे देता येतील. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला माजी खासदार बृजभूषण सिंहऐवजी त्याच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली. एके काळी शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या दत्ता मेघे यांची समीर व सागर या मुलांमर्फत भाजपमध्ये घराणेशाही सु्रू आहे. मात्र भाजपच्या कोणत्याही कुटुंबातील नेत्यांमध्ये सत्तासंघर्ष अद्याप दिसला नाही. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांची नाराजी असली तरी ती किरकोळ म्हणावी लागेल.
पण प्रादेशिक पक्षांचा इतिहास आणि वर्तमान पाहिल्यास राजकीय घराण्यात सत्ता संघर्ष दिसला आहे. जम्मू व काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स (शेख अब्दुल्ला घराणे), पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ( मुफ्ती मोहम्मद सईद ) या घराण्यात किंवा जम्मू व काश्मीर संस्थांनचे शेवटचे प्रमुख राजा हरिसिंह यांचे पुत्र डॉ. करण सिंह या घराण्यात मात्र तो झाला नाही. पण पंजाबमध्ये अकाली दलातील घराणेशाही डोळ्यासमोर येते. प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री असताना आणि ते हयात असतानाच त्यांचे पुत्र सुखबीरसिंग बादल दोनदा उपमुख्यमंत्री झाले. पुतण्या मनप्रीत सिंग बादल अर्थमंत्री झाला. सुखबीर यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या नरेंद्र मोदी सरकारमध्ये होत्या. आता पुत्र अनंतबीर राजकारणात उतरले आहेत. मनप्रीत बादल यांचा वाढता प्रभाव इतरांना खुपला. त्यांनी पद सोडले. पक्षात भवितव्य नसल्याने ते आधी काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर गेले भाजपमध्ये. हरसिमरत कौर यांचे बंधू विक्रम मजिठीया हेही प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारमध्ये होते. पण अमली पदार्थ व्यापार व व्यवहारात संबंध आढळल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. सत्तेचा दुरुपयोग कोणत्या पातळीवर होतो, याचे हे उदाहरण.
उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते. नंतर पुत्र अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. आता खासदार आहेत. पत्नी डिम्पल यादव याही लोकसभा सदस्य आहेत. मुलायमसिंह यांचे भाऊ राम गोपाल यादव हे राज्यसभा सदस्य तर आणि शिवपाल यादव आमदार. मुलायमसिंग जिवंत असताना सत्तासंघर्षात ते आणि बंधू शिवपाल हे एकत्र आणि अखिलेश व राम गोपाल यांचा वेगळा गट होता . सात वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांत दोन्ही गटांनी स्वातंत्र उमेदवार जाहीर केले. पक्ष पूर्णपणे फुटणार असे दिसत असताना बापाने मुलाशी समझोता केला. अखिलेशचे सर्व उमेदवार मुलायमसिंह यांनी मान्य केले. शिवपाल व अखिलेश यांच्यात नेतृत्वावरून वाद होतेच. पण शिवपाल शांत झाले. अखिलेश लोकसभेत गेल्यावर त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला विरोधी पक्षनेता केले. शिवपाल पुन्हा वंचित आहेत. त्याच घराण्यातील धर्मेंद्र यादव भाजपचे खासदार. मुलायमसिंह यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक राजकारणात नसला तरी त्याच्या पत्नी अपर्णा भाजपमध्ये आहे . भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत होत्या. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना राज्य महिला आयोगाचे उपाध्यक्ष केले आणि या राजकीय घराण्यात फूट कायम ठेवली. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही आपला भाचा आकाश आनंद यालाच आपला वारसदार म्हणून जाहीर केले आहे. पण तो खूप सक्रिय होताच मायावती यांनी त्याचे पंख कापले, महत्व कमी केले आणि मग पुन्हा वारस केले
बिहारमधील राजकारण माजी मुख्यमंत्री माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि कुटुंबाच्या मालकीच्या राष्ट्रीय जनता दलाच्या अवतीभोवती फिरत राहते. चारा घोटाळ्यात त्यांची रवानगी तुरुंगात झाली, तेव्हा त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री केले. त्या विधान परिषदेच्या सदस्य व विरोधी पक्षनेत्याआहेत. लालू यांचे पुत्र तेजस्वी उपमुख्यमंत्री होते व आता विरोधी पक्षनेते आहेत. दुसरे पुत्र तेजप्रताप आमदार आहेत. आमदार तेजप्रताप हे यशस्वी आणि पूर्ण यादव कुटुंबासाठी त्रासदायक बनले आहेत. एक मुलगी मिस भारती यंदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या, पण रोहिणी आचार्य पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांचीही कुरकुर सु्रू आहे. या सर्वांना सांभाळणे लालूप्रसाद यांना अवघड झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाचा अभिजीत याच्याच पारड्यात वजन टाकले आहे. पण एका क्षणी त्याचेही महत्व दीदींनी कमी करून टाकले.तो डोईजड होणे त्यांना नको होते.
आंध्र प्रदेशात प्रदेश काँग्रेसचे वाय. चंद्रशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते. हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात काँग्रेसने आपणास मुख्यमंत्री करावे, अशी त्यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांची इच्छा होती. ती पूर्ण न झाल्याने त्यांनी वडिलांच्या नावाने वायएसआर काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि २०१९ साली विधानसभा निवडणुकांत बहुमत मिळवून ते मुख्यमंत्री झाले. पण यावर्षी निवडणुकांत ते पराभूत झाले. कुटुंबातील सत्तासंघर्षामुळे बहीण शर्मिला आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मातोश्री विजयलक्ष्मी यांनीही दोन वर्षांपूर्वी मुलाचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काका विवेकानंद रेड्डी हे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते आणि जगन मोहन सरकारविरुद्ध आवाज उठवीत. त्यांची अचानक हत्या झाली. आताचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू हे तेलगू देसमचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. टी. रामा राव यांचे जावई. एनटीआर यांच्या कन्या आधी तेलगू देसम, पुढे काँग्रेस व आता भाजपमध्ये आहेत. त्यांची दोन मुलेही राजकारणात सक्रिय आहेत. एनटीआर जिवंत असतानाच दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वती राजकारणात आल्याने चंद्राबाबू यांनी बंडखोरी केली होती. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी मोठे आंदोलन उभारणारे के.चंद्रशेखर राव हे राज्याच्या स्थापननंतर मुख्यमंत्री झाले खरे, पण त्यांनी मुलगा रामा राव याला मंत्री केले. मुलगी के. कविता यांना खासदार केले. दिल्लीमधील दारू घोटाळ्यात के. कविता यांचे नाव जोडले गेले आणि त्या पाच महिन्याहून अधिक काळ तुरुंगात होत्या. हेही सत्तेच्या कथित दुरुपयोगाचे उदाहरण. सत्ता गेल्यापासून मुलगा व मुलीचे पटत नाही आणि ते दोघे आपले वडील के. चंद्रशेखर यांना विचारेनासे झाले आहेत.
जनता दल (सेक्युलर) हा राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेत असला तरी कर्नाटकात तो माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पुत्र व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, दुसरे पुत्र रेवण्णा आणि त्या दोघांची मुले यांची जणू खासगी मालमत्ता आहे. तो तेथील प्रादेशिक पक्षच. देवेगौडा यांचे पुत्र देवेगौडा आणि त्यांचा मुलगा रेवण्णासध्या महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याच्या चित्रफिती यामुळे वादात सापडले आहेत. दोन्ही मुले व नातवंडे आता देवेगौडा यांचे अजिबात ऐकत नसल्याने ते एकटे पडत चालले आहेत. पण घराबाहेर मात्र आम्ही सारे एकत्र आहोत, असा आव सारे जण आणत आहेत या पक्षाची कर्नाटकात भाजपशी आघाडी आहे.
तामिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम म्हणजे द्रमुकची घराणेशाही टिकून आहे. के. करुणानिधी मुख्यमंत्री असतानाच त्यांनी पुत्र एम. के. स्टॅलिन यांना राजकारणात आणले. ते आधी मद्रासचे (आता चेन्नई) महापौर झाले. आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांची बहीण कनिमोळी लोकसभा सदस्य आहेत. त्या सहा महिने तुरुंगात होत्या. स्टॅलिन यांचे इंग्रजी वा हिंदी लिहिता, बोलता न येणारे बंधू अळगिरी हे केंद्रात मंत्री होते. पक्षात व राज्य सरकारमध्ये त्यांचा गट व समर्थक स्टॅलिन यांच्या रस्त्यातील काटे बनला आहे. त्यांनी मध्यंतरी स्टॅलिनविरुद्ध आघाडीचे उघडली होती. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी हाही राज्यात मंत्री आहे. माजी केंद्रीय मंत्री मुरसोली मारन हे करुणानिधी यांचे भाचे. आता दयानिधी मारन हे द्रमुकचे खासदार आहेत. पुत्र उदयनिधी व मामेभाऊ दयानिधी यांच्यात अधूनमधून संघर्ष सु्रू असतो. अण्णा द्रमुकचे नेते व माजी मुख्यमंत्री आणि चित्रपट अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांची घराणेशाही नव्हती, पण त्यांच्या पश्चात पत्नी जानकी मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा अभिनेत्री व अण्णा द्रमुक नेत्या जयललिता व त्यांच्या समर्थकांनी बंड केले. अवघ्या तेवीस दिवसांत जानकी रामचंद्रन यांचे मुख्यमंत्रीपद गेले. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची वाताहात झाली आहे.
घराणेशाही सु्रू असलेले पण फारसा संघर्ष नसलेले महत्वाचे राज्य म्हणजे अर्थातच महाराष्ट्र. महाराष्ट्रात काँग्रेसमधील घराणेशाहीही खूप मोठी आहे. त्या राजकीय घराणेशाहीचे एक कारण येथील सहकारी चळवळ आणि त्यातील पैसा हे आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी असलेली सहकारी चळवळ प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांनी सु्रू केली. विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, शरद पवार सुंदरराव सोळंकी, विलासराव देशमुख आदी अनेक नेत्यांनी ती सु्रू करण्यासाठी आणि तिच्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न केले. सुमारे १५० साखर कारखाने. ३१ हजार दूध डेअऱ्या, १०७ दूध संघ, ५०० सहकारी बँका, १६ हजार पतपेढ्या नोकरदारांच्या, ७५५० संस्था आणि ३०० सूत गिरण्यांचे यांचे जाळेच विणले. पण त्यातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले, अनेकांना भ्रष्टाचाराचे कुरणच सापडले. त्या संस्था हातात राहाव्यात यासाठी राजकारणात आपले व घराण्याचे स्थान भक्कम करण्याकडे कल खूपच वाढला. या चळवळीने नेत्यांना राजकीय बळ दिले, पण काहींच्या गैरकारभारामुळे आता साखर कारखाने व दूध संघ अडचणीत तर गिरण्या बंद पडल्यात जमा आहेत. राज्यात २० वर्षांपूर्वी सुमारे ५० राजकीय घराणी होती. तो आकडा आता ७५ च्या वर गेला असेल. वसंतदादांचे घराणे होते. त्यात शालिनीताई, त्यांचे बंधू मनोहर फाळके होते. शालिनीताई पाटील यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी वसंतदादांना खूप त्रास दिला होता. प्रकाशबापू खासदार झाले, पण त्यांना घराण्याची सत्ता टिकवता आली नाही. प्रतीक प्रकाश पाटीलही खासदार झाले, पण दादांचे कुटुंब राजकारणातून फेकले जाईल असे दिसत होते. मात्र यंदा बंडखोरी करून विशाल पाटील लोकसभेवर गेले आणि आपण काँग्रेससोबत राहू, असे सांगून त्यांनी सांगलीत कुटुंबाची सत्ता मजबूत केली. शंकरराव मोहिते पाटील, त्यांचे पुत्र विजयसिंह, त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह, विजयसिंह यांचे बंधू यांचे अकलूजमधील साम्राज्य मोठे आहे. त्यातील काही राष्ट्रवादीसोबत, तर काही भाजपचे मित्र.म्हणजे तिथे सत्तेसाठी स्पर्धा आहेच.
नगरमध्ये बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे व पुत्र अजय विखे ही घराणेशाही आहे. साताऱ्याच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यात तणाव असतो. कोल्हापूरच्या राजघराण्यातील खा.शाहू महाराज (दुसरे) व संभाजी महाराज यांच्यातील वादाच्या बातम्या मध्येच येतात. शंकरराव चव्हाणांचे पुत्र अशोकराव आणि त्यांच्या पत्नी यांनी सत्तेसाठी वा चौकशांना घाबरून चव्हाण घराणे भाजपमध्ये नेले आहे. विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित काँग्रेसमध्येच आहेत, पण केशरबाई क्षीरसागर यांचे पुत्र जयदत्त, अंकुश टोपे यांचे पुत्र राजेश टोपे, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी टोप्या बदलल्या. नगरमधील कोल्हे, रणजित व अनिल देशमुख, काळे व यशवंतराव गडाख तसेच सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, सुनील दत्त व प्रिया दत्त यांनी सत्तेसाठी संघर्ष केला नाही, पण मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. सुनील तटकरे व मुलगी अदिती तटकरे या दोघांनी शरद पवार यांना पाठ दाखवली. अवधूत तटकरे घराच्या सत्ता समीकरणामुळे भाजपमध्ये आहेत. सत्ता असताना या नेत्यांची मुले राज्याच्या सार्वजनिक जीवनात किंवा विद्यार्थी वा युवक चळवळीत फारशी सक्रिय दिसत नव्हती. आपले राजकीय घराणे व सत्ता टीकावी म्हणून ही मुले सक्रिय झाली आणि आपल्या पक्षाची सत्ता जाताच त्यातील अनेकांनी आपल्या टोप्या व शालीचे रंग बदलले.