-ॲड. किशोर देशपांडे
दुर्योधनासोबत जुगार खेळताना युधिष्ठिराने स्वतःला पणास लावले व हारला. त्यानंतर त्याने पत्नीला- द्रौपदीला- पणास लावले व पुन्हा हारला. जिंकलेल्या दुर्योधनाने भावास आज्ञा देऊन द्रौपदीला फरफटत राजसभेत आणविले आणि तिला विवस्त्र करण्यास सांगितले. कौरवांच्या राजसभेत भीष्मासारखे वयोवृद्ध धर्मज्ञ आणि द्रोणासारखे ज्ञानी गुरु बसले होते. दुर्योधनाच्या या आदेशाविरुद्ध ते काहीच बोलले नाहीत, तेव्हा द्रौपदीने भीष्माला विचारलेला प्रश्न गेली काही हजार वर्षे तत्वचिंतनाचा विषय होऊन बसला आहे. स्वतःला पणाला लावून हारल्यानंतर पत्नीला पणास लावण्याचा युधिष्ठिराला (म्हणजे कोणत्याही पतीला) हक्क असू शकतो का ? हा तिचा प्रश्न होता. त्यावर भीष्माने इतकेच उत्तर दिले की ‘धर्माची गती सूक्ष्म असते’. त्याने दुर्योधनाला त्यावेळी समज दिली नाही. किंवा धर्म काय सांगतो हे देखील सांगितले नाही. श्रीकृष्णाने अधिकची वस्त्रे पुरवून द्रौपदीचे लज्जारक्षण तर केले, परंतु त्यानेही तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यामुळे पत्नीवर पतीची मालकी असते आणि तो मालक या नात्याने तिच्यासोबत व्यवहार करू शकतो, ही समजूत हिंदू धर्मात पसरली. तीच समजूत अगदी अलीकडील काळापर्यंत कायम राहिली आहे. आणि केवळ हिंदूच नव्हे तर सर्वच धर्मांमध्ये अशी समजूत रूढ झाली आहे.
विनाश्रया न शोभन्ते पंडिता वनिता लता
विद्वान पंडित, स्त्रिया आणि वेली या आधाराशिवाय शोभून दिसत नाहीत असे एक सुप्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे. कौमार्यावस्थेत पिता, यौवनावस्थेत पती तर वृद्धावस्थेत पुत्र हे स्त्रीचे रक्षणकर्ते असतात, तिची स्वातंत्र्याची पात्रता नाही, असे मनुस्मृती म्हणते. पुरुषांचा वंश वाढविणे हे स्त्रियांचे महत्वाचे कर्तव्य मानले गेले. त्यामुळे तिचे शीलरक्षण करणे हे तिच्या कुटुंबातील पुरुषांची जबाबदारी ठरली.
सोने, चांदी, जडजवाहीर, जमीन यांच्या प्रमाणेच स्त्रियांना जिंकणे हा कोणत्याही धर्मातल्या लढवय्या पुरुषांचा धर्मच मानला गेला आहे. पती हा पत्नीचा मालक असतो, ही भावना खोलवर रुजलेली आहे. “तुझ्या मालकाचे नाव काय ?” हा प्रश्न महिला साक्षीदारास विचारताना मी कोर्टात अनेक वकिलांना पाहिले आहे आणि ती महिला साक्षीदार देखील सहजतेने आपल्या पतीचे नाव सांगत असे. यात काही गैर आहे असे कोणालाच वाटत नसे.
लढाईमध्ये विरुद्ध पक्षाला नामोहरम, खजील व अपमानित करण्यासाठी स्त्रियांची लुट, बलात्कार हे सर्वसामान्य वास्तव राहिले आहे. सर्व धर्म पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे अपत्य आहेत. त्यामुळे केवळ लढाईतच नव्हे तर अगदी दोन व्यक्तींमधल्या भांडणात सुद्धा एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या देणे आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देणे समाजात अजूनही सर्रास सुरु असते. त्याची सवय झाल्यामुळे बहुदा आपल्याला त्या शिव्यांचा त्रास फार होत नाही. कदाचित अश्या शिव्या सवयीने देखील आपोआप दिल्या जात असतील व शिवी देणाऱ्याचा शिवीत असलेली धमकी पूर्ण करण्याचा हेतूही नसेल.
शिव्या फक्त पुरुषच देतात असे नाही. पुरुषसत्ताक पद्धतीत रुळलेल्या अनेक स्त्रिया देखील इरसाल शिव्या देऊ शकतात. याचा अनुभव मी लहानपणी व तरुणपणी सुद्धा नळावरची भांडणं ऐकताना घेतला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी मी एकदा एका हिंदीभाषक मित्रासोबत त्याच्या मामाच्या गावी गेलो होतो. मित्राला त्याच्या आईच्या वडिलोपार्जित इस्टेटीतला हिस्सा मागायचा होता. आम्ही गेलो तेव्हा हे कारण त्याच्या मामीला माहित नव्हते. त्यामुळे तिने आमचा चांगला आदर सत्कार केला. पण मित्राने हा विषय काढताच मामीने चंडिकेचे रूप धारण केले आणि हिंदीतून अत्यंत अर्वाच्य शिव्या-शाप देणे सुरु केले. तशा शिव्या मी नळावरच्या भांडणातही ऐकल्या नव्हत्या. आपल्या समाजात शिव्यांना जातीचे अथवा धर्माचे बंधन नाही. सोवळे नेसून देवपूजा करत असलेले ब्राह्मण पुरुष पूजेच्या वेळी आवश्यक वस्तू समोर न दिसल्यास शिव्या देतानाही मी पाहिले आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन वरून ज्या धमक्या दिल्या, त्यात आईवर व पत्नीवर बलात्कार करण्याचीही धमकी अनेकदा दिलेली आढळते. ती धमकी प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा हेतूही नसेल. परंतु त्यांनी व इतर सर्व शिवीवीरांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाज हळू हळू का होईना, बदलत आहे. शिक्षणात मुली मुलांना मागे टाकत आहेत. स्वयंपाकघराबाहेर पडून स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. नुकताच घडलेला एक वाद नमुन्यादाखल सांगतो. एका आमदार नेत्याने एका माजी महिला खासदारांवर काही टीका केली. उत्तरादाखल त्यांनी ते आमदार “चिल्लर” आहेत असे म्हटले. पुन्हा प्रत्युत्तर देताना त्या आमदारांनी माजी महिला खासदारांच्या व्यक्तिगत चारित्र्यावरच शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेचे पती हे सुद्धा अनुभवी आमदार आहेत. त्यांनी टीका करणाऱ्या नेत्यास असे उत्तर दिले की, ‘महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांना नेहमी सन्मानाचे आदराचे स्थान राहिले आहे, महिलांबाबत कसे बोलले पाहिजे हे त्या नेत्याने शिकून घ्यावे’. मला इतकेच म्हणावेसे वाटते की एवढीच तीव्र प्रतिक्रिया आमच्या आमदारांची आणि माजी खासदारांची संजय गायकवाड यांच्या धमकीवरही यायला पाहिजे.
समाजात जगभर एकीकडे प्रचंड हिंसा आणि क्रौर्य वाढताना दिसत असले तरी दुसरीकडे माणसांच्या जाणीवेत अधिकाधिक संवेदनशीलता देखील वाढत आहे. स्त्री ही पुरुषाच्या मालकीची वस्तू नसून ती देखील माणूसच आहे आणि समान वागणुकीचा हक्क सर्व स्त्री-पुरुषांना असला पाहिजे, हे तत्व मान्यता पावत आहे. भारतीय संविधानात “ FRATERNITY assuring the dignity of the individual” म्हणजे ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आश्वासित करणारा बंधुभाव’ निर्माण करणे हे देखील एक उद्दिष्ट मानले आहे. व्यक्ती म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक, ज्यात ५०% स्त्रियाही आहेत. याशिवाय संविधानाच्या कलम ५१-अ(ई) अंतर्गत स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सर्व प्रथांचा त्याग करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य मानले आहे. परंतु आमच्या दररोजच्या संभाषणात शिव्या वापरून आम्ही स्त्रियांची प्रतिष्ठा कळत-नकळत डागाळत असतो, याचे भानही आम्हाला नसते.
आमच्या लहानपणी आणि तरुणपणी हिंदी चित्रपटांचे नायक नायिकांचा पिच्छा करायचे, चित्र-विचित्र अंगविक्षेप करून त्यांची छेडछाड करायचे, त्यांच्याकडे टक लाऊन पहायचे. सर्व प्रेक्षक हे सीन एन्जॉय करायचे. आता मात्र कोणत्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक सलगी करणे अथवा लैंगिक स्वरुपाची कॉमेंट करणे, तिचा पिच्छा करणे, तिचे खासगी अवस्थेतील फोटो,व्हिडीओ काढणे व ते प्रसारित करणे अथवा पाहणे हे भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७७ व ७८ नुसार गुन्हे मानले गेले आहेत व त्यासाठी तीन वर्षेपर्यंत शिक्षा होऊ शकते. बलात्कारासाठी तर कलम ६४ नुसार कमीतकमी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. परंतु वरील सर्व प्रकार हे प्रत्यक्ष कृतीशी संबंधित आहेत.
लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत सर्व आमदार व खासदार हे संविधानाला स्मरून शपथ घेत असतात. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणारी वागणूक न करणे, हे संविधानांतर्गतच प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य मानले गेल्याची जाण सर्वप्रथम या लोकप्रतिनिधींना यायला हवी. त्यासाठी लोकप्रतिनिधित्व कायद्यात एक किरकोळ दुरुस्ती करून कोणत्याही आमदाराने अथवा खासदाराने कोणालाही त्याच्या आई, पत्नी, बहिण, मुलगी अथवा अन्य स्त्रीवर अत्याचार करण्याची धमकी असलेली शिवी दिल्याचे सिद्ध झाल्यास त्याची अथवा तिची आमदारकी अथवा खासदारकी तात्काळ रद्द होईल (म्हणजे संबंधित आमदार अथवा खासदार ते पद धारण करण्यास अपात्र ठरेल) अशी तरतूद करणे आवश्यक आहे. कोणत्याही ‘सांस्कृतिक’ अडचणीमुळे केंद्र सरकार तो कायदा दुरुस्त करण्यास इच्छुक नसल्यास निदान महाराष्ट्राच्या विधीमंडळाने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, बाजार समिती, सहकारी संस्था, महानगरपालिका इत्यादी आपल्या अखत्यारीतील कायद्यांमध्ये तशी दुरुस्ती करून शिवी देणाऱ्या निर्वाचित सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद करावी.
आमदार गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या पक्ष नेत्यांनी नेमकी काय “समज” दिली ते कळले नाही. परंतु आता ते दिवंगत पानसरे यांच्या विरुद्ध मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. तसेच पानसरे यांचे पुस्तक छापणाऱ्या, विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करत आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः जी काही शिवीगाळ केली व धमक्या दिल्या, त्याबद्दल त्यांना फारसा पश्चाताप होत असलेला दिसत नाही. “नारीशक्ती वंदन” किंवा “नारी ते नारायणी” प्रकरणी जर सत्तारुढ पक्ष आणि त्याचे हिंदुत्ववादी समर्थक खरेच गंभीर असतील तर त्यांनी या व अशा प्रकारच्या शिवीगाळ प्रकरणी कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. सत्तारुढ व विरोधी पक्षातील निदान महिला नेत्यांनी तरी याबाबतीत पुढाकार घ्यावा.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954








