नितीन पखाले
वऱ्हाडच्या मातीशी ग्रामीण कवितेचं नातं घट्ट करणारे यवतमाळचे सुप्रसिद्ध कवी शंकर बडे यांचा दि. शनिवार १ सप्टेंबर हा द्वितीय स्मृतिदिन. शंकर बडे यांना आपल्यातून जावून बघता बघता दोन वर्ष झाले. मात्र त्यांच्या कवितांचा आणि त्यांच्या आठवणींचा स्मृतिगंध मनाच्या कुपीत सदैव दरवळत आहे. शंकर बडे म्हणजे समवयस्कांचे बाबा बडे आणि नवीन पिढीचे बडे काका. त्यांच्या निधनाने ग्रामीण कवितेची मातीशी असलेली नाळ तुटली. वऱ्हाडी भाषेचं हे चालतं बोलतं विद्यापीठ अनपेक्षित काळाच्या पडद्याआड गेल्याने वऱ्हाडी भाषेचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणारं नाही. पण त्यांच्या आठवणी जतन करण्याचा प्रयत्न त्यांचा गोतावळा सातत्याने करीत आहे. हा गोतावळा म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नात्यातली माणसं नव्हे, तर त्यांनी आपल्या आयुष्यात कमावलेली ही माणसं. कवी बडे काकांच्या या आठवणी चिरंतन राहाव्या म्हणून काकांच्या गोतावळ्याने यावर्षीपासून ‘कवी शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान’ देण्याचे ठरविले. पहिला ‘मायबोली सन्मान’ वऱ्हाडच्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोला येथील कवियत्री मीरा अरविंद ठाकरे यांना जाहीर झाला. बोली भाषेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस यावर्षीपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
कवी शंकर बडे म्हणत, वऱ्हाडी बोलीनं मला साहित्य क्षेत्रात मान, सन्मान, प्रतिष्ठा दिली; पण त्याही पेक्षा कवितेनं मला माणसांची श्रीमंती दिली. मुंबई, कोकण, कोल्हापूरपासून चंद्रपूरपर्यंत कोणत्याही गावात, शहरात कवितेच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करणारा फार मोठा असा रसिकांचा गोतावळा त्यांना लाभला. म्हणूनच कोणत्याही गावात बडे काकांच्या कार्यक्रमाला हॉलमध्ये बसायलाही जागा नसते. इतकं उदंड प्रेम या माणसावर लोकं करतात. कवी शंकर बडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वऱ्हाडी कविता आणि या भाषेचा लहेजा पोहचविला. त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे श्रोते एकदा त्यांना भेटले की त्यांच्याही प्रेमात पडायचे. कारण रसिकांच्या मनात बडे काकांच्या कविता जशा घर करून आहेत तसेच भला माणूस म्हणून ते श्रोत्यांच्या हृदयात विराजमान आहेत. बडे काकांची साहित्य संपदा तशी बोटावर मोजण्याइतकी! त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘इरवा’ हा ४४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला, तोही मित्रांच्या रेट्यामुळे. त्यानंतर ३५ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये ‘सगुन’ आणि ‘मुगुट’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले. शंकर बडेंच्या कविता ह्या सामान्य माणसांशी, शृंगाराशी, ग्रामीण जीवनाशी, शेतीशी, शेतकऱ्यांशी, शेती व्यवहाराशी, ग्रामीण सणवारांशी नातं सांगणाऱ्या आहेत. म्हणूनच शंकर बडे हे वऱ्हाडच्या समाजजीवनाचा ‘मुगुट’मणी होते. आपल्या निरीक्षणातून ग्रामीण प्रतिमा आणि प्रतिकांचा चपखल वापर त्यांनी कवितांमध्ये केला. त्यामुळे त्यांची कविता अधिक वास्तववादी, मनाला भिडणारी आहे.
‘पावसानं इचीन कहरच केला, नं नागो बुढा काल वाहूनच गेला’ या कवितेने वर्हाडी साहित्यात लोकप्रियतेचा कळस गाठला. या कवितेचा जन्मही बोरीअरब (ता. दारव्हा) या आपल्या गावी ते दिग्मूढ अवस्थेत फिरत असताना झाला. ही आठवण सांगताना जणू कालच जन्मलेली ही कविता होय आणि तो नागो बुढा आपल्या सोबत बसून आहे, या पद्धतीने ते सांगायचे. ते नेहमी म्हणायचे, “पावसानं इचीन कहरच केला…’ ही माही बोहनीची कविता होय! या कवितेमुळे मला महाराष्ट्रभर फिरता आले. त्यात लाख मोलाचा ‘गोतावळा’ भेटला. लाखो रसिकांचं प्रेम मिळालं. कार्यक्रमाला गेल्यावर पहिल्यांदा ‘पावसानं इचीन..’ या कवितेची मागणी होते. त्यावरून मी त्या कवितेचं वय मोजतो. रसिकांच्या मनात वस्तीला राहणाऱ्या कविता लिहिता आल्या, यापेक्षा अजून काय हवे? कवितेमुळे मिळालेला हा ठेवा अक्षय राहो!” मुगुट मधील कवितांमध्ये मात्र विनोदापालिकडील संवेदनशील कवी शंकर बडेंचे रूप दिसते. बडे काकांची कविता ही १०० टक्के नैसर्गिक होती. या कविता गर्भातून येताना जन्मपूर्वीच चाल लेवून यायच्या. म्हणूनच काकांच्या बहुतांश कविता गेय आहेत. ओठांवर सहज रुळणाऱ्या आहेत. त्यामुळेच त्या लोकप्रिय आहेत. २०१६ मध्ये मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी त्यांचे “धापाधुपी” हे पुस्तक तयार झाले. त्याची पहिली प्रत प्रकाशकाकडून त्यांच्या हातात आली ती काका आजारी पडल्यावर. पण त्याही अवस्थेत साहित्यातील आपले हे चौथे अपत्य पाहुन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच अनपेक्षित ‘एक्झिट’ घेऊन जीवन-मृत्यूच्या धापाधुपीत ते जिंकले.
कवितांसोबतच ते व्यक्तिचित्रण बेमालूमपणे करत. त्यांचा ‘बॅरिस्टर गुलब्या’ असाच त्यांना फिरस्ती दरम्यान भेटलेल्या अनेक व्यक्तींच्या इरसाल मिश्रणातून जन्मलेला आहे. जिवंत माणसांशी नातं सांगणारं हे एक काल्पनिक व्यक्तिचित्र! पण काकांनी आपल्या सादरीकरणातून हा अस्सल ग्रामीण ढंगातील बॅरिस्टर गुलब्या साक्षात जिवंत केला. लोकांच्या मनामनात नेऊन बसविला. त्याचे शेकडोवर प्रयोग त्यांनी केले. ‘अस्सा वर्हाडी माणूस’ ही बडे काकांची आणखी एक दर्जेदार काव्यकलाकृती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीन हजारावर प्रयोग झाले. अस्सल वऱ्हाडीची चव या काव्य कालाकृतीने महाराष्ट्राला दिली. वऱ्हाडचा वाघ (प्रा. विठ्ठल वाघ) आणि बडे (शंकर बडे) यांची काव्य मैफल म्हणजे वऱ्हाडचा ठेचा! हा ‘मेन्यू’ असला की रसिक हास्य तृप्तीची ढेकर देत! शंकर म्हणजे महादेव आणि बडे म्हणजे मोठा. महाराष्ट्राच्या भूमीत रसिकांच्या मनामनात वसलेला वऱ्हाडचा ‘मोठा महादेव’ म्हणजे शंकर बडे होते. वऱ्हाडी शब्दांना प्रतिष्ठा मिळवून देणारा हा भोळा शंकर स्वतः मात्र मरेपर्यंत फकीरी वृत्तीनंच जगला. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेपासून ते कायम दूर राहिले. वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व वयोगटातील जीव ओवाळून टाकणारी माणसं हीच शंकर बडेंची गर्भ श्रीमंती!
ते कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर आयोजकांकडे कधीच चोचले करीत नव्हते. कायम एसटीने फिरायचे. जिथे कार्यक्रम आहे त्या गावात, आसपास आपल्या परिचितांपैकी कोणी असेल तर काकांचा मुक्काम त्या घरी ठरलेला असायचा. त्यातूनच त्यांना जिवाभावाची माणसे भेटत गेली. काकांना जावून दोन वर्ष झालीत, तरी त्यांच्या घरी असलेल्या लॅन्डलाईनवर आजही अनेक रसिक फोन करून काकांच्या आठवणी जागवितात. आपल्या मिश्किल स्वभावातून हास्याचे कारंजे उडविणारे शंकर बडे कवितांमधून व्याकुळही करतात. वऱ्हाडचे अनेक कवी, लेखक ‘ग्लोबल’ झाले. पण बडे काका आपला वऱ्हाडी बाणा जपत अखेरपर्यंत याच मातीला घट्ट पकडून राहिले. अरबाच्या बोरीची अडाण नदी आणि शिवार त्यांना कायम खुणावत होतं. म्हणूनच की काय, मृत्यूपूर्वी त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम हा त्यांच्या मूळ गावी बोरी(अरब) येथेच झाला होता. ‘कवितेनं इतभर पोटच नाही तर मनही समाधानाने भरून पावते, तो अनुभव मी घेतला. कवितेने मायची माया लावली आणि महाराष्ट्राने जीव लावला म्हणूनच प्रत्येक दिवस सोन्याचा झाला’, असे ते नेहमीच म्हणायचे. सहवासातील प्रत्येकालाच कोणत्याही कठीण प्रसंगात ‘झोल खाची नाई’, असा वऱ्हाडी धीर ते आवर्जून द्यायचे. पण दोन वर्षांपूर्वी एका छोट्या अपघाताचे निमित्त झाले आणि वऱ्हाडच्या या ‘शंकराने’ का कोणास ठाऊक झोल खाल्ली! शेती-माती, नाती-गोती हीच त्यांची ऊर्जा. शेतीशी, मातीशी, माणसांशी आणि शब्दांशीही इमान राखणारा ‘बाबा बडे ऊर्फ बडे काका’ १ सप्टेंबर २०१६ रोजी ऐन पोळ्याच्या दिवशी हे जग सोडून जावे यात नियतीच्या मनातही काही स्वार्थ निश्चितच दडला असावा, असं आता सारखं वाटतं. ते कवितेला मायसारखे जपायचे. खरं तर त्यांचं काळीजच मायचं होतं! त्यांची ‘लेक’ ही कविता त्याचीच साक्ष देते.
‘लाडा कौतुकाची लेक आज सासरी चालली,
जसी किसन देवाची कोनं बासरी चोरली!’
या दोन ओळीतच कविता थेट मनाच्या गाभाऱ्यात शिरते आणि बाप-लेकीचे नाते कसे असते याचे दर्शन घडविते. हेच नातं शंकर बडेंचं आणि कवितेचं होतं. कविवर्य शंकर बडे म्हणजे वऱ्हाडी मायबोलीचा विठ्ठलच. ते आयुष्यभर उत्सवासारखे जगले. फुलांची माळ ओवावी तशी हृदयात माणसांची माळ ओवली. त्यांचा स्मृतिगंध असाच दरवळत राहील युगान युगे!
-नितीन पखाले
मो. ९४०३४०२४०१
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे सहसंपादक आहेत )