कोरोना संसर्गाने जगात देशच्या देश गारद होत असताना आपले काय होईल, हा प्रश्न तुम्हा, आम्हा सर्वांनाच भेडसावतोय. अमेरिका, इटली सारख्या प्रगत वैद्यक ज्ञान असणाऱ्या देशांनी कोरोनासमोर हात टेकले आहेत. अशा स्थितीत आपल्या भारतातील वैद्यकीय सुविधांचा विचार केला तर… त्यापुढचा विचारही करवत नाही. करोनाबाधित रूग्णास हाताळण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची, साधनांची आपल्याकडे आताच वाणवा आहे. गेल्या काही दिवसांत आपण व्हाट्सअपवर प्रगत देशातील अनेक व्हिडिओ बघितले असतील, त्यात करोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर्स, कर्मचारी किती प्रचंड खबरदारी घेतात, हे दिसते. उपचार करणाऱ्यांच्या शरीराचा मुंगी शिरावी इतकाही भाग उघडा नसतो. तरीही अनेक डॉक्टर्स, परिचारिकांना हा संसर्ग झाला, यावरून करोना संसर्गाची कल्पना यावी.
सध्या साधा सर्दी, खोकला, घशात खवखव झाली आणि शिंक आली तरी आपण हादरतो. विचार करा, आयसोलेशन सेंटरमध्ये (विलगीकरण कक्ष) प्रत्यक्ष कोरोनाबाधित रूग्णांवर, संशयितांवर पुरेशा साधनांअभावी उपचार करणारे डॉक्टरर्स, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल? खरे तर संपूर्ण वैयक्तिक सुरक्षा कवच वापरूनच अशा रूग्णांवर उपचार व्हावेत, अशा गाईडलाईन आहेत. पण, आपल्या सारख्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असलेल्या देशात या सूचनांचे तंतोतंत पालन करणार कसे? कोरोना संसर्गापासून बचावात्मक पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट), मास्क, सॅनिटायझर ही अत्यंत गरजेची साधने मिळत नसतील तर अशा महामारीच्या युद्धात आम्ही जिंकणार कसे? शिवाय आमची सरकारी यंत्रणा अशा साधन, सामग्रीचा पुरवठा किती इमानेइतबारे करतात, हाही प्रश्नच आहे. आजच एक बातमी वाचनात आली, त्यात केवळ महाराष्ट्रापुरता विचार केला तरी राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) आहेत. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांत दररोज करोनाबाधित व संशयितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एकूणच आरोग्य यंत्रणेचे संरक्षण कसे करणार आहोत?
पीपीई काय आहे ?
पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) हे अत्यंत जोखमीच्या रूग्णांची सुश्रृशा करताना कर्मचाऱ्यांनी अंगावर घालावयाची साधनं आहेत. एक प्रकारचा अंगरखा म्हणूया. यात हेल्मेट, हेअर कॅप, हॅण्डग्लोव्हज, ट्रीपल लेअर गाऊन, सॉक्स, गमबुट, गॉगल, डायपर आदी सर्व महत्वाची साधनं असतात. ही पीपीई किट वापरण्याची पद्धत आहे. ती कशी घालायची याचेही नियम आहेत. शिवाय एका किटचा वापर फक्त एकदाच करता येतो. कोणतीही किट वापरल्यानंतर ती कोणाच्याही संपर्कात न येता नष्ट करण्याच्या सूचना आहेत. थोडक्यात या किट ‘युज ॲन्ड थ्रो’ आहेत. सोबतच्या व्हिडीओची लिंक बघा, यात पीपीई किट कशा पद्धतीने वापरायची हे दिसते.
आयासोलेशन वार्डात उपचार कसे होतात?
सर्वसामान्य जनतेत आयसोलेशन वार्डाबद्दल (विलगीकरण कक्ष) प्रचंड भीती आहे. तिथे रूग्णास किमान १४ दिवस किंवा संपूर्ण बरे होईपर्यंत एकट्यास राहावे लागते. हा एकांतवास करोना संसर्ग झालेल्या आजारी व्यक्तीस दिलासा देण्याऐवजी नैराश्यच अधिक देवू शकतो, असे अनेक गैरसमज पसरले आहेत. मुळात अशा रुग्णांना औषधोपचारांसोबतच त्यांचे मानसिक आरोग्यही सुदृढ राहावे, यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. आपण समाजमाध्यमांवर बघितले असेल की, अनेक दवाखान्यांमध्ये अशा रूग्णांना दिलासा देण्यासाठी, विरंगुळा म्हणून तेथील कर्मचाऱ्यांनी नृत्य, गाणं, मिमिक्रीच्या माध्यमातून परिस्थितीत खूप सकारात्मक बदल केले आहेत.
मी ज्या शहरात राहतो, ते फार मोठे नाही. परंतु, राज्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिल्या चार पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये या शहरातील तिघे होते. त्यांच्यावर सतरा दिवस यशस्वी उपचारानंतर त्यांना नुकतीच सुट्टी झाली. याचाच अर्थ कोरोना संसर्गात मृत्यूची शक्यता ही सर्वच रूग्णांमध्ये नसते. या रूग्णांवर उपचार कसे होतात, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तर कोरोनाबाधितांची तपासणी कशी होते, हे आपण बघुया. सर्वप्रथम सर्दी, ताप, घसा खवखवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या अशा रूग्णांची ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ सर्वप्रथम तपासली जाते. अर्थात तो ही लक्षणं दिसण्यापूर्वी कुठे-कुठे फिरून आला, हे बघितले जाते. पहिल्या टप्प्यात साधारणपणे परदेशातून आलेल्या प्रवाशांमधून आपल्याकडे कोरोना संसर्ग पसरल्याचे आढळले आहे. तर अशा संशयित रूग्णांच्या घशातील लाळीचा नमूना (थ्रोट स्वॅब) व नाकातील द्रवाचा नमूना तपासणीसाठी वैद्यक प्रयोगशाळेत पाठविला जातो. हा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास या रूग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार केले जातात. या दरम्यान रूग्णाच्या नाडीचे ठोके, रक्तदाब सातत्याने तपासला जातो. त्याच्या छातीत निमोनियाची लक्षणे नाहीत ना, याबाबत सतत तपासणी होत राहते. कोरोना विषाणू फुफ्फुसांमध्ये थेट आघात करत असल्याने या तपासण्या सातत्याने कराव्या लागतात. गरज पडल्यास रूग्णास कृत्रिम श्वसनप्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवले जाते. १४ दिवसानंतर त्याचे दोन्ही नमूने पुन्हा तपासणीसाठी पाठविले जातात. हे नमूने ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर रूग्णास कधी ‘डिस्चार्ज’ द्यायचा हे ठरते. एकदा सुट्टी कधी द्यायची निश्चित झाले की, २४ तासाच्या अंतराने त्याचे दोन्ही नमूने पुन्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. हा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला की, त्याच्या सुट्टीवर शिक्कामोर्तब होते. मात्र विलगीकरण कक्षातून सुट्टी झाली म्हणजे, रूग्ण पूर्ण बरा झाला, असा याचा अर्थ नाही. त्यानंतर किमान १४ दिवस हा रूग्ण वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ‘होम क्वारंटाईन’ असतो. त्याच्यावर पोलिसांचीही नजर असते. मात्र डिस्चार्ज देताना रूग्णांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाते. त्यात पुढील १४ दिवस तो कोणाच्याही संपर्कात न येता घरातच सुरक्षित राहील, अशी प्रतिज्ञा घेणे क्रमप्राप्त ठरते.
खरे तर कोरोनामुळे संपूर्ण जगाची अवस्था ‘भय इथले संपत नाही’, अशी झाली आहे. पंरतु, स्वत:ला गर्दीपासून सुरक्षित ठेवणे म्हणजेच सोशल डिटन्सिंग करणे, वैयक्तिक स्वच्छता, हात वारंवार धुणे, निर्जंतूक साधणं वापरणे, पौष्टिक आहार, योग्य व्यायाम, ध्यानधारणा आणि स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अधिकाधिक दक्ष असणे, या गोष्टींचे नियमित पालन केले तर कोरोनाच्या भयातून मुक्ती मिळविणे आणि त्याच्या संसर्गापासून दूर राहणे सहज शक्य आहे.
सर…. खूपच सुंदर लेख अगदी ……मनभावन…. सर्व डॉक्टर लोकांना आवडणारा आणि वस्तुस्थितीला समोर ठेवून लिहिलेला हा लेख आहे आत्ताच माझ्या सर्व डॉक्टर बांधवांना हा लेख वाचण्यासाठी पाठवीत आहे
डॉ. शिवचरण हिंगमिरे विडुळ ता उमरखेड जी यवतमाळ…
सर…. खूपच सुंदर लेख अगदी ……मनभावन…. सर्व डॉक्टर लोकांना आवडणारा आणि वस्तुस्थितीला समोर ठेवून लिहिलेला हा लेख आहे आत्ताच माझ्या सर्व डॉक्टर बांधवांना हा लेख वाचण्यासाठी पाठवीत आहे
डॉ. शिवचरण हिंगमिरे विडुळ ता उमरखेड जी यवतमाळ…