सारेगामाचा फेसबुक सोबतचा करार हा अनेक अर्थांनी लक्षणीय असा आहे. एक तर अलीकडेच सारेगामाने स्पॉटीफाय या म्युझिक स्ट्रीमिंग कंपनीसोबत याच प्रकारातील करार केला आहे. या पाठोपाठ आता फेसबुकनेही याच प्रकारचे डील केल्याने सारेगामा आता डिजीटल विश्वात रग्गड कमाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सारेगामाची ही लवचिकता तशी आश्चर्यकारक नाही. कारण ही कंपनी काळाची पावले अचूकपणे ओळखण्यासाठी ख्यात आहे. १९०२ साली देशात ध्वनीमुद्रीत झालेली पहिली रेकॉर्ड असो की, १९३१ साली प्रदर्शित झालेला देशातील पहिला बोलपट यांचे रेकॉर्डीग त्यांनीच केले होते. नंतरही या कंपनीने सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतला आहे. यामुळे सारेगामाकडे आज विविध भारतीय भाषांमधील तब्बल एक लाखांपेक्षा जास्त गाणी आणि संगीताचे अधिकार आहेत. भारतातील निम्म्या संगीताचे स्वामित्व सारेगामाकडे आहे. तर याच्या विक्रीसाठी आवश्यक असणारे कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे. अनेक दशकांपर्यंत एलपी रेकॉर्डच्या माध्यमातून (एचएमव्ही ब्रँड !) त्यांनी संगीताची विक्री केली. यानंतर उण्यापुर्या दीड-दोन दशकांपर्यंत ऑडिओ कॅसेटस विकल्या. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सीडीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत संगीत पोहचवले. मध्यंतरी पेन ड्राईव्हमध्ये संगीताचे आकर्षक पॅक विकले. यानंतर विक्रीत साचलेपणा वाटू लागल्यानंतर त्यांनी ‘कारवा’ या डिजीटल प्लेअरला लाँच केले. याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून याला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. भारतीयांच्या भाव जीवनाशी एकरूप झालेल्या रेडिओचे बाह्यांग वापरून त्यांनी सादर केलेला हा डिजीटल म्युझिक प्लेअर तुफान लोकप्रिय झाला असून याला आजही खूप मागणी आहे. तर स्वतंत्र म्युझिक स्टोअर (https://www.saregama.com/musicstore ) आणि अॅपच्या माध्यमातूनही या कंपनीचे संगीत उपलब्ध आहे. युट्युब, गाना आदींसह १०० पेक्षा जास्त डिजीटल पार्टनर्सच्या माध्यमातून गाणी व संगीताच्या विविध प्रकारांपासून ते कॉलर ट्युन्सपर्यंत कमाईचे मार्ग त्यांनी आधीच शोधून ठेवलेले होते. यात आता फेसबुक सारख्या बलाढ्य पार्टनरची भर पडणार आहे.