रुपेरी पडद्यावर सुपर हिरो-हिरोईनची भूमिका साकारणारे कलावंत प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हाने स्वीकारण्यात अगदीच कुचकामी ठरतात. आयुष्याच्या वाटेवर चालताना एखादा निर्णय चुकला तरी दुसरा पर्याय असतो, ही सामान्य माणसांना कळणारी गोष्टही त्यांना कळत नाही . त्यामुळे त्यांच्या आयुष्याची शोकांतिका होते.
………………………………………………………
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमक्या कोणत्या कारणाने त्याने आत्महत्या केली याबाबत फिल्म इंडस्ट्रीत घमासान सुरु आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून पोस्ट केलेल्या व्हीडिओत ‘सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे. मूव्ही माफियांनी सुशांतला सुनियोजित पद्धतीने मानसिकरीत्या दुर्बल बनवलं.’, असा खळबळजनक आरोप केला आहे . कंगनाने सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलीवूडमधल्या घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. प्रसिध्द दिग्दर्शक व अभिनेता शेखर कपूरनेही ‘सुशांत तुझ्या वेदनांची मला कल्पना आहे. तुला ज्या लोकांनी दूर लोटलं आणि निराश केलं त्या लोकांबाबत मला माहीत आहे. तुझ्यासोबत जे काही घडलं ते त्यांचं कर्म आहे; तुझं नाही’ असे ट्वीट करून सुशांतच्या आत्महत्येमागे काही वेगळी कारणं आहेत, असे सूचित केले आहे . सुशांतची मैत्रीण रिया चक्रवतीनेही सुशांत निराश होता. डिप्रेशनमध्ये गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे . फिल्म इंडस्ट्रीतील कलावंतांच्या आत्महत्यांचा इतिहास पाहता सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण बाहेर येईल की नाही , याबाबत शंका आहे. कारणं काहीही असतील, पण सुशांतसारख्या देखण्या व हुशार अभिनेत्याने स्वतःला संपवून घ्यावं, याबाबत सार्वत्रिक हळहळ आहे.
फिल्म इंडस्ट्रीत सुशांतच्या अगोदरही अनेक कलावंतांनी स्वतःला अकाली संपविले आहे. प्रसिध्द दिग्दर्शक गुरुदत्त, परवीन बाबी, दिव्या भारती, सिल्क स्मिता, डिम्पल कपाडियाची बहिण रीम कपाडिया, नफिसा जोसेफ, जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी, मनमोहन देसाई अशा अनेकांनी वैयक्तिक आयुष्यातील निराशा, अपयश, प्रेमभंग, आर्थिक अडचणी, मानसिक रोग, लोकप्रियता ओसरणे या व अशा कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. काहीजणांच्या आत्महत्येची कारणं चकित करणारी आहेत. परवीन बाबी ही ‘पॅरानाईड स्क्रिझोफेनिया’ या मानसिक रोगाने ग्रस्त होती. या आजारात कोणीतरी आपला जीव घ्यायला निघालं आहे, असा कायम भ्रम होत असतो. त्या अवस्थेत परवीन बाबीने अमिताभपासून बिल क्लिंटनपर्यंत, तर अमेरिका, ब्रिटन सरकारपासून वेगवेगळ्या गुप्तचर संस्था आपल्या जिवावर उठल्या आहेत, असे आरोप केले होते. कोर्टात तिने तशी याचिकाही दाखल केली होती. फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलावंत कमी जास्त प्रमाणात मानसिक रोगाचे शिकार असतात. कमालीची असुरक्षितता, केवळ यश आणि पैशाला महत्व देणारी माणसं… यामुळे झगमगाटी आयुष्य जगणाऱ्या अनेक कलावंतांना आयुष्याच्या सायंकाळी येणारं एकटेपण व नैराश्य पेलवत नाही. ज्यांना असह्य होते , ते स्वत:ला संपवतात . बाकी दारू आणि मादक द्रव्याच्या आहारी जातात .
एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्नाबद्दल असे सांगितले जाते की आपण ‘सुपरस्टार’ आहोत या भ्रमातून त्याला कधीच बाहेर येता आले नाही. शेवटच्या काही वर्षात डिप्रेशनमध्ये असताना तो प्रचंड दारू पित असे. त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी घरी शूटिंगसाठी वापरतात तसे लाईट वापरायला सांगून लाईट…अॅक्शन…कट या शूटिंगदरम्यान वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या सहाय्याने प्रत्यक्ष शूटिंग होते आहे, असा आभास निर्माण करा. त्याला तो सुपरस्टार असल्याचा फील द्या , अशी ट्रीटमेंट सुचविली होती, एकेकाळी मराठी नाट्यविश्वात तुफान लोकप्रिय असलेल्या काशिनाथ घाणेकरांचीही अवस्था अशीच होती. राजेश खन्ना असो वा घाणेकर या एकेकाळी प्रचंड यश व लोकप्रियता अनुभवलेल्या कलावंतांना स्वतःच्या सुवर्णकाळातून बाहेरच येता येत नाही. त्यांच्यासाठी काळ तिथेच गोठला असतो. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही मानसिक उपचाराचा फायदा होत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता एकेकाळी लाखो लोकांचे आयडॉल असलेल्या कलावंतांचे अखेरचे दिवस केविलवाणे असतात. अगदी स्पष्ट सांगायचं झाल्यास रुपेरी पडद्यावर सुपर हिरो-हिरोईनची भूमिका साकारणारे, वाटेल ते आव्हान लीलया पेलणारे हे कलावंत माणूस म्हणून अगदीच कुचकामी असतात. आयुष्याच्या उतरत्या वाईट कालखंडात इतर क्षेत्रातील व्यक्तींसारखं आपल्याला साधंसुधं आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं, हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही.
‘फिल्म इंडस्ट्रीत नामांकित नट- नटी व्हायचं ही आकांक्षा घेवून आलेली मुलं-मुली इंडस्ट्रीत येतात, तेव्हा जेमतेम २०-२२ या वयोगटात असतात. या वयात शिक्षण अर्धवट झालं असतं. वाचनाचा दूरपर्यंत संबंध नसतो. जगाचा व माणसांचाही कुठलाही अनुभव नसतो. अशा अवस्थेत चित्रपटातील कारकीर्द सुरू होते. काही जण एका रात्रीत स्टार होतात. कालपर्यंत सामान्य असलेल्या या मुला-मुलींच्या पायाशी यश, पैसा, ग्लॅमर व प्रचंड प्रसिद्धी येते. रक्ताने पत्र लिहिणारे चाहते यांना भेटतात. हे सगळं पचविण्याची ताकद मात्र त्यांच्यात नसते. या काळात पडद्यावर ते जसं चकचकीत आयुष्य जगतात, तसंच आयुष्य प्रत्यक्ष जीवनातही जगत असतात. यशाची सोबत असल्याने सभोवतालची माणसं तेव्हा कुठल्या हेतूने जवळ आली आहेत, हे त्यांना कळत नाही. मात्र यशाची लाट ओसरायला सुरुवात झाली की, पैसा, ग्लॅमर, चाहते सारेच दूर जाण्याचा अनुभव त्यांच्यासाठी अपेक्षेपलीकडचा असतो. काम न मिळणे किंवा इतर कुठल्याही कारणाने प्रसिध्दी, फॅन फॉलोईंग कमी होऊ शकतं असं किंचित जाणवलं तरी ते प्रचंड अस्वस्थ होतात निराशेकडे झुकतात. बहुतांश स्टार या मन:स्थितीत कोसळतात. अशा अवस्थेत ज्याला आपलं वा आपली समजत होतो त्यांना आपल्यात नाही तर आपला पैसा, ग्लॅमर व शरीरातच रस होता, हे समजताच त्यांच्यामध्ये मुळापासून उखडल्याची भावना होते. ‘
सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत नामवंत लेखिका नीलांबरी जोशी लिहीतात की, ‘आपल्याला पुढे कोणते चित्रपट मिळणार आहेत याबद्दल त्याच्या मनात साशंकता असू शकते. सेलिब्रिटी म्हणून उंचावलेलं रहाणीमान, स्टेटस कमी होणार ही भीती त्याला भेडसावलेली असू शकते. इंजिनिअरिंग त्यानं मध्येच सोडलं होतं. शिक्षण पूर्ण न करता आपण चित्रपट क्षेत्राच्या मोहजालात अडकलो याबद्दल मनात अपराधी भावना असू शकते. ग्लॅमरच्या क्षेत्रातील कुठल्याही व्यक्ती या अशा अवस्थेतून जातात. आयुष्याच्या वाटेवर चालताना एखादा निर्णय चुकला तरी दुसरा पर्याय असतो, हे अगदी सामान्य माणसांना कळणारी गोष्ट त्यांना कळत नाही किंवा कळत असली, तरी त्यांचा इगो ते स्वीकारण्याची संमती देत नसावा. अशावेळी त्यांच्या दृष्टीने जग संपलेलं असतं. आणि त्यांच्यासाठी स्वत:ला संपवण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नसतो. सुशांतच्या विषयात हे असंच काहीस घडलं असावं.’
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत)
खरी नीती ,विचार पडद्या मागची आणि पुढची स्थिती दाखवणार मीडिया वाच आपल्याला खरा आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतेय……..