अण्णाभाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याची गोष्ट

(साभार : साप्ताहिक साधना)

– संजय देशपांडे

अण्णा भाऊंचं जन्मशताब्दी वर्षं साजरं करायचं, असं महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी घोषित केलं होतं. आमच्या मुंबई विद्यापीठानेही त्यानिमित्ताने अण्णा भाऊंना आदरांजली वाहावी, असा निर्णय घेतला. माझे वडील कम्युनिस्ट असल्यामुळे अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या आणि इतर साहित्याकडे कळत्या वयापासून मीही आकर्षित झालो होतो. पुढे माझ्या सासूबाईंनी अण्णा भाऊंचं जीवन आणि साहित्यावर नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केलेली होती. त्यामुळे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अण्णा भाऊंशी संबंध येतच होता. अण्णा भाऊंनी १९६१ मध्ये रशियाला भेट दिली होती आणि तिथे ते ४० दिवस राहिले होते. रशियातल्या त्यांच्या वास्तव्यावर आधारित ‘माझा रशियाचा प्रवास’ हे त्यांचं पुस्तक मी लहान वयातच वाचलेलं होतं. युरेशियन अभ्यास केंद्राचा संचालक आणि मुंबई विद्यापीठाच्या रशियन भाषा विभागाचा प्रमुख म्हणून मी गेली काही वर्षं काम पाहतो आहे. त्यामुळे मराठीतल्या साहित्यसृष्टीशी थेट संबंध कमी असला तरी सोव्हिएत जीवनाचं, रशियन समाजाचं टिपलं गेलेलं चित्रण म्हणूनही अण्णा भाऊंच्या या पुस्तकाचं महत्त्व मला वाटत होतं.

मातंग समाजाचे काही कार्यकर्ते २०१७ मध्ये मला भेटले. त्यांनी अण्णा भाऊंवर एखादा सेमिनार घेण्याविषयी सुचवलं होतं. मातंग ग्रुप डेव्हलपमेंट (एमजीडी) या त्यांच्या संघटनेमध्ये बरेच प्राध्यापक, इंटेलेक्च्युअल्स, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, समाजसेवक आहेत- होते. त्या सर्वांनी सेमिनारचा हा प्रस्ताव आमच्यापुढे ठेवला होता. त्या दृष्टीने मी चाचपणी सुरू केली आणि २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील रशियन दूतावासामध्ये अण्णा भाऊंच्या कार्यावर एक मोठा सेमिनार आयोजित केला. त्या एकदिवसीय सेमिनारसाठी अडीचशे लोक उपस्थित होते.

रशिया दौऱ्यात अण्णाभाऊंचे वास्तव्य याच ऐतिहासिक हॉटेलमध्ये होते

माझ्या पेशामुळे दर वर्षी काही कामानिमित्ताने माझं रशियाला जाणं होत असतं. मागच्याच वर्षीच्या मे महिन्यात मला माझ्या कुटुंबासोबत मॉस्कोला जाण्याचा योग आला. दहा दिवस तिथे राहिलो. त्या वास्तव्यादरम्यान अण्णा भाऊ ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, तिथे मी गेलो. त्या हॉटेलचं नाव ‘हॉटेल सोव्हिएतस्काय’. जगभरातील नामवंतांनी तिथे भेट दिलेली असल्यामुळे ते एक ऐतिहासिक हॉटेल आहे. अण्णा भाऊंची काही सही वगैरे तिथे आहे का, तिथे ते कोणत्या खोलीत राहिले होते- या सगळ्याविषयी मला उत्सुकता होती. मात्र जवळपास ६० वर्षांपूर्वीची ही माहिती त्यांच्या अर्काइव्हमध्ये उपलब्ध झाली नाही. या हॉटेलमध्ये पूर्वीही आलेलो होतो. कधी काळी तिथे राहून गेलेल्या जगप्रसिद्ध व्यक्तींची तैलचित्रे त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये लावण्यात आलेली आहेत. इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, फिडेल कॅस्ट्रो यांच्यासह जगभरातील अनेक राजकारणी, नेते, कलावंतांची चित्रे तिथे आहेत. ती पूर्वी पाहिलेली होती; त्या क्षणी माझ्या मनात आलं की, अण्णा भाऊंचंही चित्र इथे असायला हवं. मी लगेचच हॉटेल व्यवस्थापनाशी या बाबतीत चर्चा केली. त्यांनी सांगितलं- ‘तुम्ही तसा लेखी प्रस्ताव द्या आणि अण्णा भाऊंविषयीची माहितीही आम्हाला द्या.’ भारतात परतल्यानंतर लगेचच मी त्यांना तसा प्रस्ताव पाठवला आणि अण्णा भाऊंच्या तिथल्या वास्तव्याविषयीची माहितीही पाठवली. त्यांनी लगेचच तो प्रस्ताव मान्य केला आणि अण्णा भाऊंचं चित्र तिथे लावण्याची तयारी दाखवली.

मे महिन्याच्या त्या वास्तव्यामध्ये मी आणखीही एक गोष्ट केली. पुश्किन स्टेट रशियन लँग्वेज इन्स्टिट्यूटशी मुंबई विद्यापीठातर्फे आम्ही करार केला होता. अण्णा भाऊंच्या नावावर एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन आम्ही करणार होतो. त्यासंदर्भात त्या इन्स्टिट्यूटतर्फे असं सुचवण्यात आलं की, अफानासी निकितिनचाही समावेश या परिसंवादात करावा. अफानासी निकितिन हा पहिला युरोपीय खलाशी जो ‘वास्को द गामा’च्याही आधी भारतात आलेला होता. तो रशियन होता. तो भारतात १४६९मध्ये आला आणि तीन वर्षं इथे राहिला. भारतातल्या अनुभवांवर आधारलेलं पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. अफानासी निकितिन आणि अण्णा भाऊ अशा दोघांवर आम्ही तो परिसंवाद आयोजित केला. दि.१६ व १७ सप्टेंबर २०१९ रोजी पुश्किन स्टेट रशियन लँग्वेज इन्स्टिट्यूट, मॉस्को इथे हा सेमिनार झाला. त्यासाठी भारतातून जवळपास साडेतीनशे लोक गेलेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रासह १६ राज्यांचे प्रतिनिधी हजर होते. त्याआधी या सेमिनारसाठी ४१ निबंध आम्ही तज्ज्ञांकडून लिहून घेतले होते आणि ते पुश्किन विद्यापीठाकडे पाठवले होते. पुश्किन विद्यापीठाने ते तिथे छापून प्रकाशित केले. त्यांचं प्रकाशन भारताचे रशियातील राजदूत डी.बी.व्यंकटेश वर्मा यांच्या हस्ते झालं. यादरम्यान १५ सप्टेंबरला हॉटेल सोव्हिएतस्कायच्या व्यवस्थापनाकडे अण्णा भाऊंचं तैलचित्र आम्ही सुपूर्त केलं. मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते ते तैलचित्र आम्ही तिथे दिलं. नांदेडहून खास बनवून घेतलेल्या त्या तैलचित्राचा नांदेड ते मुंबई, मुंबई ते मॉस्को असा प्रवास घडला होता. आता ते तैलचित्र हॉटेल सोव्हिएतस्कायमध्ये विराजमान आहे.

त्या वेळी माझ्या मनात आणखीही एक कल्पना आली. रशियामध्ये ‘मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ नावाचं एक खूप मोठं ग्रंथालय आहे. मी विद्यार्थी असताना अभ्यास करण्यासाठी अधून-मधून तिथे जात असे. मे महिन्यातल्या त्या रशिया भेटीदरम्यान माझ्या कुटुंबासोबत त्या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी गेलो होतो. त्या ग्रंथालयाच्या समोर एक चौक आहे, तिथे अनेकांचे पुतळे आहेत. महात्मा गांधींचाही पुतळा त्यात आहे. तिथे मी अशी विचारणा केली की, ‘अण्णा भाऊंचाही पुतळा या ठिकाणी आपल्याला बसवता येईल का?’ त्या वेळी पहिल्यांदा त्यांच्याकडून नकारच आला. मॉस्कोहून परत आल्यानंतर मी याबाबत ई-मेलद्वारे बराच पाठपुरावा केला. सप्टेंबरमध्ये काही मातंग बांधवांसोबत त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चाही झाली.

अण्णा भाऊंचं लेखक म्हणून असलेलं स्थान आणि रशियन भाषेतही अनुवादित झालेलं त्यांचं साहित्य याविषयी मी त्यांना सांगितलं. अखेर मागील वर्षी जून महिन्यात ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाने पुतळ्याला परवानगी दिली. पुतळा ग्रंथालयाच्या आत ठेवायचा की बाहेर, याविषयी भरपूर मतमतांतरे झाली. आमची मागणी होती की, तो पुतळा ग्रंथालयाबाहेर चौकात असावा. चर्चेअंती त्यांनी ते मान्य केलं. मातंग ग्रुप डेव्हलपमेंटमधील आमच्या मित्रांना मी याविषयी सांगितलं. त्यांनी आपणहून पैसे गोळा करून, काही लाखांमध्ये ज्याची किंमत आहे असा एक पुतळा तयार करून घेतला आणि तो आम्ही मॉस्कोला पाठवला. त्यामुळे मागच्या वर्षीच तो पुतळा रशियाला जाऊन पोहोचला आहे. या वर्षी जन्मशताब्दीचं औचित्य साधून ऑगस्टमध्ये त्याचं अधिकृत रीत्या अनावरण आम्ही करणार होतो. मात्र दरम्यान उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तो कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. सगळं व्यवस्थित होताच आम्ही पुन्हा तिथे जाणार आहोत आणि अधिकृत रीत्या तो पुतळा त्यांना सुपूर्त करणार आहोत. त्या ग्रंथालयाचे उपमहासंचालक या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

मागच्या वर्षी सप्टेंबरच्या परिसंवादाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याची आमची कल्पना होती. मात्र १६-१७ तारखेला कार्यक्रम आणि १५-१६ तारखेलाच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. मात्र पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. निदान एका दिवसासाठी तरी त्यांनी मॉस्कोला यावं, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. ग्रंथालयाच्या उपमहासंचालकांनीदेखील, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना आम्ही रीतसर आमंत्रण देऊ’ असं सांगितलं आहे. या सगळ्या कामात मुंबई विद्यापीठाची मला मोठी मदत झाली आहे. ‘या बाबतीत तुम्हाला योग्य वाटतील ते निर्णय तुम्ही घ्या’ अशी मोकळीक विद्यापीठ प्रशासनाने मला दिली. मे महिन्यात, सप्टेंबरमध्ये रशियाला जाण्यासाठीच्या रजा उपलब्ध केल्या. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला असला, तरी आम्ही दि.१ मेपासून फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला आयोजित केली आहे. दि. १ ऑगस्टला त्या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. त्याशिवाय ग्रंथालयाचे उपमहासंचालक पॅवेल कुझमिन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, मुंबई दूतावासातील रशियाचे महावाणिज्यदूत अलेक्सेई सुरोवत्सेव, रशियन स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापिका इंदिरा गाझीएव्हा आदी मान्यवर त्या व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत.

साहित्यातून आणि प्रत्यक्ष भेटीतून अण्णा भाऊंचा रशियाशी जुळलेला संबंध हा त्यांच्या कार्याचा पैलू आजवर काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्याची आठवण करून देणारं यथोचित स्मारक असावं, असं मला वाटलं. अण्णा भाऊंचं रशियावरील प्रेम आणि रशियन लोकांचं अण्णा भाऊंवरचं प्रेम पाहता, त्यांच्यासारख्या मोठ्या साहित्यिकाला त्याचा सन्मान मिळवून द्यावा, हे मला माझं कर्तव्य वाटलं. योगायोगानेच हे सगळं त्यांच्या जन्मशताब्दीला जुळून आलं. एक सत्कार्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी समन्वयकाची भूमिका मला करता आली याचा मला अभिमान वाटतो आणि खूप समाधानही…

(शब्दांकन : सुहास पाटील)

Previous articleगोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची!
Next articleडरना जरुरी है!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here