पण ते ऐतिहासिक गडकिल्ले, दऱ्या-खोऱ्या, बिकट घाट, मराठ्यांची रांगडी जीवनशैली आणि विश्वास पाटलांनी निर्माण केलेलं मराठमोळं शिवकालीन वातावरण इंग्रजी भाषेत आणण्याचं शिवधनुष्य पेलायचं कुणी ? आजच्या काळात जिथं मूळ अभ्यासापेक्षा अस्मिताच अधिक टोकदार झालेल्या असताना अनुवाद करते वेळी एक शब्दही मागे-पुढे झाला तर अनर्थ व्हावा. पण हे शिवधनुष्य पेललं ते इंग्रजी भाषा ज्यांच्या दारी पाणी भरते अशा प्रा. नदीम खान ह्यांनी. शिवरायांच्या पराक्रमावर गर्वित होण्यापेक्षा त्यांना आपल्या जाती धर्मात ओढण्यात गर्व वाटण्याच्या आजच्या अजब वातावरणात त्यांची भाषा आणि धर्माशी साधर्म्य नसलेल्या माणसाने शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे अधिक मोठ्या अवकाशात पोहोचविण्याचं व्रत घेणं आश्चर्यकारक आहे. पण आपण जेव्हा प्रा. नदीम खानांच्या अनुवादाच्या दुनियेतील मुशाफिरीकडे पाहतो तेव्हा हे आश्चर्य अचंब्यात बदलते. ‘रणखैंदळ’ ह्या खंडाच्या ‘द वाईल्ड वॉरफ्रंट’ ह्या नावानं प्रा. नदीम खानांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार शशी थरूर, साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासन आणि लेखक विश्वास पाटील ह्यांच्या उपस्थितीत २ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात प्रकाशन झालं.
अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन त्यांना सुमारे पंधरा वर्षांचा काळ लोटला पण झोकून देऊन काम करण्याची वृत्ती कायम राहिली. एका खासगी बैठकीत विक्रम सेठ ह्यांच्या ‘हनुमान चालीसा’ च्या इंग्रजी अनुवादाचं निरूपण त्यांच्या तोंडून ऐकलं आणि प्रतिभेच्या ह्या वेगळ्या पाण्याची ओळख करवून घेण्याचं मनात ठसलं. वैयक्तिक जीवनात शुद्ध नास्तिक जीवनशैलीचे पुरस्कर्ते असलेल्या व्यक्तीकडून ‘हनुमान चालीसा’चा अर्थ समजावून घेण्याचा अनुभव देखील अनोखा होता. कुठल्याही धार्मिक, जातीय अथवा इतर संकुचिततेच्या विचारापासून अलिप्त होऊन सार्थक आयुष्य जगण्याच्या दुर्मिळ उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तिच्या सहवासात आल्यावर आपल्या सारखे सर्वसामान्य निरिक्षक स्तिमीत झाल्याशिवाय राहत नाहीत. साहित्य अनुवादित करण्यात आपल्याला स्वारस्य असल्याचे सुमारे पन्नास वर्षांपुर्वी वयाच्या विशीत असतांनाच त्यांना जाणवले होते. मराठी आणि हिंदी साहित्यातील कवितांचे अनुवाद केवळ मौज आणि मनाला समाधान मिळते म्हणून इंग्रजीत आणि इंग्रजी कवितांचे अनुवाद ते हिंदीत करत असत. नियमित अनुवादक होण्याचे तेव्हा त्यांच्या कल्पनेतही नव्हते.
मातृभाषा मराठी नसूनसुद्धा त्यांच्यात मराठीची इतकी प्रगल्भ समज कशी आली ह्या प्रश्नावर ते म्हणतात की, “ मला संवादात्मक मराठी शिकता आली ती माझ्या विद्यार्थ्यांशी घडणाऱ्या संवादातून. अनुवादाचं सांगायचं तर, मला नेहमीच असे मित्र मिळत गेले ज्यांनी ह्या संदर्भात आलेल्या अडचणींवर मात करण्यात मला मदत केली. एका अनुवादकाला दोनही भाषांच्या संस्कृतीची जाणीव असणं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे तिच्यावर पकड असणं सुद्धा अनिवार्य. कारण, अनुवादाचा अर्थ केवळ दुसर्या भाषेतील समानार्थी शब्द शोधून लिहिणे इतकाच होत नसून स्रोत भाषेच्या संस्कृतीतील भावना नेमकी पकडून तिचं वहन इंग्रजी सारख्या पूर्णतः विदेशी संस्कृती असलेल्या भाषेत करायचं असतं ते देखील अत्यंत सुगम आणि सुबोध पद्धतीनं.” इंग्रजी भाषा त्यांच्या हाडात किती खोलवर रुजली आहे ह्याचा अंदाज असलेल्या त्यांच्या आणि विश्वास पाटलांच्या एका सामान्य मित्राकडून त्यांना ‘नॉट गॉन विथ द विंड’ ह्या मराठी पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला. आश्चर्य म्हणजे ते त्यांनी वाचलेलं त्यांच्या जीवनातील पाहिलं मराठी पुस्तक होतं. २०११ मध्ये ‘नॉट गॉन विथ द विंड’ चा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आणि लगेचच विश्वास पाटलांची मराठीत इतिहास घडवणारी कादंबरी ‘पानिपत’ च्या अनुवादाचं कार्य प्रा. नदीम खान ह्यांनी लीलया पार पाडलं. त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या हातून ‘पानिपत’ घडून गेल्यावर त्यांच्या अनुवादाच्या कामाला स्वीकार्यता आणि प्रकाशकांची उणीव भासली नाही.
अलीकडेच पेंग्विन ह्या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित सविता आंबेडकर ह्यांच्या ‘आंबेडकरांच्या सहवासात’ ह्या पुस्तकाचा त्यांनी केलेला अनुवाद राष्ट्रीय स्तरावर ‘बेस्टसेलर’ ठरला आणि त्याच्या आजतागायत १०,००० प्रति संपल्या सुद्धा. विश्वास पाटलांची त्यांनी आतापर्यंत आठ पुस्तक अनुवादित केली आहेत. चार पुस्तक अवधूत डोंगरेंची, आणि ‘सातपाटील कुलवृत्तांत’ धरून रंगनाथ पाठारे ह्यांची तीन पुस्तक एव्हाना त्यांनी अनुवादित केली आहेत.