आमदार बच्चू कडू, यशोमती ठाकूर ,रवी राणा , संजय खोडके, तुषार भारतीय यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई
टीम मीडिया वॉच
महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे , त्यात अमरावती मतदारसंघ पहिल्या काही क्रमांकावर असणार आहे . या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे वादग्रस्त जात प्रमाणपत्र , उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ वर हनुमान चालीसा म्हणण्याचा जाणीवपूर्वक केलेला अट्टहास आणि त्यामुळे झालेली जेलवारी, अमरावतीच्या सर्वपक्षीय नेतृत्वासोबत घेतलेले शत्रुत्व अशा विविध कारणांमुळे गेली पाच वर्ष त्या सतत प्रकाशझोतात होत्या. आताही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून प्रखर विरोध असतांनाही देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीकर नेत्यांच्या मेहरबानीमुळे त्यांनी भाजपचे तिकीट खेचून आणले आहे. स्वाभाविकच अमरावतीत काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अमरावतीच्या निवडणुकीत खालील १० मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.
१. महायुतीतील नेत्यांचा प्रखर विरोध
महायुतीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे फायरब्रॅंड नेते बच्चू कडू , राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते संजय खोडके , शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि भारतीय जनता पक्षाचे तुषार भारतीय हे सर्व प्रमुख नेते नवनीत राणा यांच्या पराभवासाठी एकजुटीने भिडले आहेत . आपल्या पक्षनेतृत्वाकडून कुठलीही कारवाई झाली तरी बेहत्तर, आम्ही राणा यांचे काम करणार नाही , असा पवित्रा या चौघांनीही घेतला आहे. विशेष म्हणजे या चौघांनी उघड बंडखोरी केली असतानाही त्यांच्या पक्षाने वा नेतृत्वाने ‘राणांचे काम करा’, असा कुठलाही आदेश त्यांना दिला नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई सुद्धा केली नाही . बारामतीत विजय शिवतारेने बंडखोरीचे सूर आळवल्यावर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांनी जातीने त्यांच्या मुसक्या आवळल्या , मात्र येथे तसा काहीही प्रकार घडला नाही , हे आश्चर्यकारक आहे.
२. राणांचा संधीसाधूपणा
२०१९ च्या निवडणुकीत मागासवर्गीय , मुस्लिम आणि मराठा -कुणबी या जिल्ह्यातील प्रमुख जातींनी नवनीत राणा यांना साथ दिली होती . त्या निवडणुकीत या तीन समाजाचे मोठे मतदान नवनीत राणा यांना झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या कोटयातील जागा त्यांना दिली होती . राष्ट्रवादी कॉँग्रेस व इंदिरा कॉँग्रेसने त्यांना उघड पाठिंबा दिला होता. त्यावेळी नवनीत व रवी राणा यांनी निवडून आल्यानंतर आपण संपूर्ण पाच वर्ष दोन्ही कॉँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहू , असे वचन जाहीर सभेत दिले होते . विश्वास बसावा म्हणून त्या काळात राणा दाम्पत्याने नरेंद्र मोदी व भाजपवर कडाडून टीकाही केली होती. ( तेव्हाचे त्यांचे ते Video समाज माध्यमावर तुफान फिरत आहेत. )मात्र निवडून आल्याबरोबर संसदेच्या पहिल्याच सत्रात राणाबाई भाजपच्या पंगतीत जावून बसल्या होत्या .मागासवर्गीय , मुस्लिम आणि मराठा -कुणबी हे तीनही प्रमुख समाज हा संधीसाधूपणा विसरले नाही. ते राणा यांना धडा शिकवण्याच्या मूडमध्ये आहे . राणांसाठी हा चिंतेचा विषय आहे .
३. मतविभागणीच्या प्रयत्नाबाबतसंताप
त्यामुळेच मागासवर्गीय व मुस्लिम समाजात मतविभागणी घडवून आणण्यासाठी राणा जोरदार प्रयत्न करत आहेत . रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर व रिंगणात असलेले बहुतांश उमेदवार हे मतविभागणीसाठी राणांनी उभे केले आहेत, असे उघडपणे बोलले जात आहे. राणांची ही चाल लक्षात आल्याने आनंदराज आंबेडकर व इतर उमेदवारांबाबत आंबेडकरी समाजात नाराजी व संताप आहे . यावेळी कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ द्यायची नाही, यासाठी आंबेडकरी समाजातील अनेक मान्यवर कामी लागले आहेत. त्यामुळे समाजात दिसत असलेली एकजुटता सर्वांना जाणवत आहे . अशीच एकजुट मुस्लिम समाजातही दिसत आहे.
४. जात प्रमाणपत्राबाबत उलटसुलट चर्चा
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने वैध ठरवले असले तरी या निर्णयाबाबत आंबेडकरी समाजात सार्वत्रिक नाराजी आहे . हायकोर्टाने आपल्या सविस्तर निकालात राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट आहे. त्यांनी केवळ जात पडताळणी समितीसोबत संविधानालाही धोका दिला आहे , असे कठोर ताशेरे मारले असतांना सुप्रीम कोर्टाने ते काहीही विचारात न घेता जात पडताळणी समितीच्या निकालात हायकोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, असा निकाल दिल्याने आंबेडकरी समाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे . हे असेच प्रकार सुरू राहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने राखीव जागांची निर्मिती केली त्यालाच हरताळ फासला जाईल, असे बोलले जात आहे. हायकोर्टाच्या निकालात नवनीत व रवी राणांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या लटपटी -खटपटी केल्या त्याचा सविस्तर उहापोह असल्याने सत्य काय आहे , हे सर्वांच्या लक्षात आले आहे.
५. भाजपवर संपूर्ण भिस्त
नवनीत राणांबद्दल नाराजीचा सार्वत्रिक सूर असतांना त्यांची संपूर्ण भिस्त आता भारतीय जनता पक्षावर आहे . पाच वर्षाच्या कार्यकाळात राणांच्या नावावर जमेच्या बाजूला फारसे काही नाही . दहीहंडी व होळी उत्सवात नृत्य करणे, दिवाळी व इतर सणांच्या वेळी किराणा वाटप व शहरात वेगवेगळ्या संत -महात्म्यांच्या नावे प्रवेशद्वार उभारणे यापलीकडे ठोस असे कुठलेही काम राणा पती-पत्नींच्या नावावर नाही. इतर नेत्यांनी खेचून आणलेली कामे स्वतःच्या नावावर खपवण्यात राणा कायम पुढे असतात. गेल्या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला त्या मागासवर्गीय, मुस्लिम आणि मराठा -कुणबी समाजाने यावेळी पाठ फिरवली असल्याने भाजपची एकनिष्ठ मते , काही प्रमाणात ओबीसी , मेळघाटातील आदिवासी आणि हिंदी भाषिक मतांच्या जोरावर आपण विजय मिळवू, सोबत भाजपची मायक्रो प्लॅनिंग, मोदी , शहा, योगी आदी मोठ्या नेत्यांच्या सभांच्या जोरावर आपण चमत्कार घडवून आणू , असा असा राणांना विश्वास आहे .
६ .कॉँग्रेसचा आश्वासक उमेदवार
अमरावती लोकसभा मतदारसंघात ४२ वर्ष काँग्रेसचा खासदार होता. मात्र १९९६ पासून आधी रिपाई व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला . दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदा लढत असलेल्या काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने अतिशय आश्वासक चेहरा या निवडणुकीत दिला आहे . स्वच्छ व सौम्य प्रतिमेचे वानखडे हे अनेक वर्षेपर्यंत जिल्हा परिषदेच्या राजकारणात कार्यरत होते . अतिशय साधा सरळ , गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे .जातीय राजकारणापासून कायम दूर असलेल्या वानखडे यांचे सर्व समाजातील नेते व कार्यकर्त्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत . दर्यापूर , अंजनगाव व इतरही एकही तालुक्यात मराठा -कुणबी समाजाचे नेते त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे , यावरून त्यांची सर्वसमावेशकता लक्षात येते.
७ . प्रहारचा दमदार उमेदवार
हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित असे धार्मिक ध्रुवीकरण आणि मतविभागणी करून अमरावती मतदारसंघातील समीकरण आपण आपल्या बाजूने वळवू , अशा आत्मविश्वासात असलेल्या राणांना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी जबरदस्त धक्का दिला. त्यांनी शिवसेनेचे जुनेजाणते कार्यकर्ते व जिल्हा प्रमुख (उद्धव ठाकरे गट) दिनेश बूब यांना प्रहारची उमेदवारी देवून अमरावती लोकसभा मतदारसंघात उलथापालथ घडवून आणली आहे . दिनेश बूब हे अमरावती शहरातील सर्वात मोठ्या न्यू आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा असून गेल्या अनेक वर्षापासून ‘हेल्पलाईन’ या संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवा, अखंड अन्नदान ,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदत अशा अनेक उपक्रमांमुळे सर्व जाती -धर्मातील नागरिकांसोबत त्यांचा व्यापक संपर्क आहे. दिनेश बूब हे हार्ड कोअर शिवसैनिक असल्याने शिवसेना आणि भाजपातील मतदारांना एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
८ . भाजप आणि संघ परिवारातील नाराजी
अमरावती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे . आतापर्यंत हा मतदारसंघ भाजप – सिवसेना युतीत कायम शिवसेनेकडे होता . आता पहिल्यांदाच भाजप येथून निवडणूक लढवत असताना पक्षाने नवनीत राणांना उमेदवारी दिल्याने भाजप -संघ परिवारात मोठी नाराजी आहे . भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी या नाराजीला जाहीर रुप दिले आहे . गेले पाच वर्ष जो माणूस सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्रास देत असताना , त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करत असताना , पक्ष कार्यालयावर दगडफेक केली असतांना त्याचे काम करायचे कसे , असा प्रश्न तुषार भारतीय यांनी उपस्थित केला आहे . भारतीय यांच्या भावनेशी संघ परिवारातील अनेकजण सहमत आहे . त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणांना साथ न देता दिनेश बूब यांना मदत करायची असा निर्णय संघ परिवारातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे . भाजप – संघ परिवारातील २० टक्के मते जरी अन्यत्र वळली तर या मतदारसंघातील निकाल खूप वेगळा लागेल.
९ . आमदार ठाकूर , कडू , खोडके व भारतीय यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई
ही निवडणूक आमदार बच्चू कडू ,कॉँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर , राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके व भाजपचे नेते तुषार भारतीयांसाठी अतिशय प्रतिष्ठेची लढाई आहे . यशोमती ठाकूर सोडल्या तर इतर तिघांनी आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे कानाडोळा करून राणांविरोधात उघडपणे तलवार उपसली आहे . हे चारही नेते संपूर्ण ताकतीने या लढाईत भिडले आहे .बच्चू कडू यांनी नवनीत राणांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू अशी प्रतिज्ञा केली आहे . प्रहारचे उमेदवार दिनेश बूब असले तरी बच्चू कडू हे स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे . माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख , काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व इतरही सर्व लहान मोठ्या नेत्यांना सोबत घेऊन त्या जीवाचे रान करत आहेत . संजय खोडके यांचा पक्ष महायुतीत असला तरी प्रचाराला सुरुवात होत नाही तोच राणांनी पोस्टरवर फोटो वापरल्याबद्दल जाहीर तंबी देऊन आपला फोटो प्रचारासाठी वापरायचा नाही, अशी समज देताना आपण उघडपणे विरोधात आहोत, हे खोडकेंनी स्पष्ट केले होते. अमरावतीच्या राजकारणात राणांनी खोडके यांना राजकारणातून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. खोडके ते विसरले नाही. विसरणार नाहीत.
१० . राणांचा ‘जुगाड’ कामी येईल?
नवनीत व रवी राणांसाठी या निवडणुकीत अनेक गोष्टी प्रतिकूल असल्या तरी गेल्या काही वर्षात आपल्या ‘जुगाड टेक्नालॉजी’ ने त्यांनी अनेक बरेच काही आपल्या मनाप्रमाणे घडवून आणले आहे . राणांच्या जुगाड क्षमतेवर त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांचाही अफाट विश्वास आहे . राणा आपल्या पोतडीतून काय काढतील याचा अंदाज कोणालाच लावता येत नाहीय. निवडणूक आता काही दिवसांवर आली असतांना राणा धनशक्तीचाही बेफाम वापर करून पारडे पलटवू शकतात , अशी शंका अनेकांना आहे.