‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१
– हेमंत खडके
जी.ए.कुलकर्णी हे वाचकांना पछाडून टाकणारे एक अरभाट लेखक! अवघ्या सत्त्याण्णव कथा लिहून त्यांनी मराठी कथावाङ्मयाला आयफेल टॉवरची उंची प्राप्त करून दिली. आपल्या प्रचंड पत्रव्यवहाराने मराठी पत्रवाङ्मयाचे क्षेत्र झळाळून टाकले. यांशिवाय, जागतिक कीर्तीचे साहित्य मराठीत आणणारे श्रेष्ठ भाषांतरकार म्हणून, बालकांना वेड लावणारे बालसाहित्यकार म्हणून आणि ललित आत्मकथनाची नवी वाट चोखाळणारे प्रयोगशील लेखक म्हणूनही त्यांचे कार्य मोठे आहे. या श्रेष्ठ साहित्यिकाच्या बहुपदरी, बहुआयामी, अफाट आणि काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा शोध.
00000000000000000000000
जी.एं.ची कथा पहिल्यांदा भेटली, तेव्हा मी इंग्रजी विषय घेऊन एम.ए. करायला निघालो होतो. खरे पाहता, माझा आवडीचा विषय मराठी होता; पण पोटापाण्याचा प्रश्न लवकर सुटेल, या अपेक्षेने मी इंग्रजी विषय घ्यायचे ठरवले होते. प्रेम मराठीवर होते आणि लग्न इंग्रजीशी लावायला निघालो होतो! अशात जी.एं.ची ‘विदूषक’ ही कथा मला पहिल्यांदा भेटली… हो! भेटली हाच शब्द मला योग्य वाटतो. एखादी तरुण, सुंदर आणि बुद्धिमान ललना आपल्याला भेटावी आणि तिच्या लावण्याचा डोळे आस्वाद घेत असतानाच, तिच्यातून एखादी विषकन्या बाहेर येऊन तिच्या डंखाने आपली रसिकता हिरवी-निळी पडावी – तशी ती जीवनाच्या उग्र-भीषण रूपाची पहिली भेट होती! घडले असे की, त्या रात्री मी तीर्थराजच्या (कापगते) खोलीवर मुक्कामी होतो. त्याने जी.एं.ची ‘विदूषक’ ही कथा नुकतीच वाचली होती आणि तो तिच्या धुंदीतून, अजून बाहेर यायचा होता. त्या रात्री आम्ही ‘विदूषक’ कथेचे सामूहिक वाचन केले. किती वेगळा अनुभव होतो तो! त्या साहित्याच्या अनुभवाने आस्वादाच्या माझ्या व्याख्या बदलून टाकल्या. शब्दाशब्दाला थरार आणि वाक्या-वाक्याला आश्चर्याचे धक्के देणारी ही कथा ‘सत्य’ या संकल्पनेवरचा माझा विश्वास उडवणारी… भावना कुंठित करणारी…. संवेदना बधीर करणारी… आणि जाणिवा करपून टाकणारी ठरली! त्या रात्री आम्ही झोपण्याचा प्रश्नच नव्हता. चर्चेला नुसते उधाण आले होते. पहाटे मी घोषणा केली, “तीर्थराज! ज्या मराठीत ‘विदूषक’सारखी महान कथा आहे, त्या मराठीतच मी एम.ए. करीन… मग माझ्यावर उपाशी राहायची पाळी आली, तरी चालेल!”
या भारावलेल्या मनःस्थितीतच तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेतला. जी.एं.च्या कथेवर विपुल आणि चोखंदळ समीक्षा लिहिणारे डॉ. द.भि. कुलकर्णी सर तिथे अध्यापक होते. जी.एं.च्या साहित्याने झपाटून गेलेले प्रा. स.त्र्यं. कुल्ली जी.एं.च्याच साहित्यावर संशोधन करण्यासाठी टीचर फेलोशिप घेऊन विभागात नुकतेच रुजू झाले होते. पहिल्या भेटीत प्रा. कुल्ली यांनी जी.एं.चा ‘रमलखुणा’ कथासंग्रह हातात दिला. त्यातील ‘प्रवासी’ आणि ‘इस्किलार’ या दोन्ही दीर्घ कथा मी एका रात्रीत वाचून संपवल्या. परक्या देशाची अनोळखी पार्श्वभूमी, भिन्न सांस्कृतिक पर्यावरणातील घटनाप्रसंग, त्यातून पात्रांच्या वाट्याला येणारे विदारक दुःखभोग, त्या दुःखभोगांतून सुटण्याची त्या पात्रांची अखंड धडपड, त्या धडपडीतील त्यांची हतबलता…आणि अखेर कठोर नियतीने त्या पात्रांवर मिळवलेला क्रूर विजय! या कथांनी माझ्या मनावर ‘विदूषक’च्याच अनुभूतीची तप्त मोहर उठवली!
या कथांच्या भेदक अनुभवांमुळे जी.ए. कुलकर्णी ही अक्षरे माझ्या काळजावर कायमची कोरली गेली आणि आज तीस वर्षानंतरसुद्धा ती अक्षरे तशीच कोरलेली आहेत. मग एम.ए.च्या अभ्यासासकट सार्याच गोष्टी माझ्यासाठी दुय्यम-तिय्यम झाल्या आणि जी.एं.ची पुस्तके मिळवून वाचणे, एवढाच एक सपाटा मी लावला. जी.एं.च्या साहित्यावरचे साहित्यही मी मिळवीत गेलो. प्रा. कुल्ली यांनी विद्यापीठाला सादर करण्यासाठी जी.एं.च्या साहित्यावर लिहिलेला जवळजवळ एक हजार पृष्ठांचा टंकलिखित प्रबंधसुद्धा मी त्या काळी वाचून काढला. जी.एं.च्या साहित्याने तर झपाटून गेलोच; पण त्या महान साहित्याला जन्म देणार्या त्यांच्या अचाट व्यक्तिमत्त्वानेही पछाडून गेलो.
जी.एं.च्या कथांनी माझी बुद्धिवादाची चौकट खिळखिळी करून टाकली. तर्कबुद्धी हे या जगाच्या आकलनाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे साधन असू शकत नाही, अशा तोर्यात मी तोवर जगत होतो. तर्कबुद्धी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, असा मला विश्वास होता. जी.एं.च्या कथांनी मला हे पटवून दिले की, व्यावहारिक जीवनासाठी तर्कबुद्धी आवश्यक असली, तरी ती संपूर्ण जीवनाचे आकलन करू शकत नाही. कारण जीवन म्हणजे काही एखादी शास्त्रीय संकल्पना नव्हे की, गणितातील एखादे कोडेही नव्हे! जीवन एक अनुभूती आहे. ती केवळ तर्कबुद्धीने जाणायची गोष्ट नसून, उत्कट मनाने समग्र व्यक्तिमत्त्वानिशी अनुभवायची, आस्वादायची आणि जाणायची गोष्ट आहे. मानसशास्त्राच्या परिभाषेत बोलायचे झाले, तर जीवन केवळ बुद्ध्यांकाच्या (आय.क्यू.च्या) आधारे आपल्याला अनुभवता येणारे नाही, तर त्यासाठी भावनांक (ई.क्यू.), अध्यात्मांक (एस.क्यू.), सर्जनांक (सी.क्यू.) या सर्वांची आपल्याला मदत घ्यावी लागेल.
जी.एं.चे साहित्य – मग त्या त्यांच्या कथा असोत, भाषांतरे असोत, पत्रे असोत की, आयुष्याच्या अखेरीस लिहिलेले ललित आत्मकथन (माणसे ः अरभाट आणि चिल्लर) असो, ते रसिक वाचकांना झपाटून टाकणारे आहे. या साहित्यामुळे वाचकांच्या मनात जी.ए. कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही आपसूक जिज्ञासा निर्माण होते. एवढ्या महान साहित्याला जन्म देणार्या या थोर लेखकाचे जगणे, वागणे, बोलणे कसे होते? त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या? त्यांच्यावर प्रभाव पाडणार्या व्यक्ती आणि लेखक कोण होते? त्यांना कथेचे विषय कुठे मिळत? त्यांच्या कथेतील चिंतनात जीवनाची शोकात्मता, निरर्थकता, असंबद्धता, नियती हे घटक प्रामुख्याने दिसतात ते का? ते नेहमी काळा गॉगल का लावत? ते माणूसघाणे होते का? ते तसे होते, तर त्यांना एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांशी पत्रव्यवहार का करावासा वाटला? हे प्रश्न जी.एं.च्या संदर्भात त्यांच्या वाचकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, या बाबतीतली सर्वात मोठी अडचण म्हणजे स्वतः जी.एं.ची या संदर्भातील भूमिका! साहित्याच्या आकलनासाठी किंवा आस्वादासाठी साहित्यिकाच्या खाजगी जीवनाकडे जाणे, ही गोष्टच त्यांना मान्य नाही. माझ्या लेखनाचा शोध घ्या… माझ्या खाजगी जीवनाचा नव्हे. ‘रायटिंग्ज, नॉट दि रायटर’ असे त्यांनी लिहूनच ठेवले आहे. “एखाद्या लेखकाची कलाकृती समजून घेण्यासाठी तो लेखक कसा आहे, हे पाहाणे, याला एक कुतूहल यापेक्षा काडीचेही महत्त्व नाही. ते संगमरवरी दगड इराणमधून आणले म्हणून ताजमहाल पाहायला आग्रा शहरात जाण्याऐवजी इराणमधील खाणीकडे जाण्यासारखे आहे.” असेही त्यांनी लिहिलेले आहे. आपल्या साहित्याच्या आकलन आणि आस्वादाच्या आड आपल्या खाजगी जीवनातील संदर्भ येऊ नयेत, असे त्यांना वाटे. त्यांनी आपल्या आयुष्याचे खाजगीपण पराकोटीला जाऊन जपले होते. “कुणाची पावले कितीही स्वच्छ, पवित्र असोत की मळलेली… त्यांना माझ्या माजघरात प्रवेश नाही,” असे ते निक्षून सांगत. एवढेच नाही तर, आपल्यामागे आपली कुणी आठवणसुद्धा काढू नये, असे त्यांना वाटे. ‘आय डोण्ट वाँट टू बी रिमेंम्बर्ड,’ असे ते म्हणत. जी.ए. नुसते असे सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली सर्व खाजगी कागदपत्रे, डायर्या, पत्रे स्वतः जाळून टाकली. त्यांनी कधीही आणि कुणालाही मुलाखत दिली नाही. स्वतःच्या परिचयपत्रात केवळ शिक्षण आणि साहित्यविषयक नोंदी ठेवण्याची त्यांनी सदैव काळजी घेतली. लोकांनी आपल्या जीवनातील खाजगी संदर्भ पूर्णपणे विसरून जावेत, म्हणून जी.एं.नी पराकोटीचे प्रयत्न केले. मात्र, जी.एं.वर पराकोटीचे प्रेम करणार्या त्यांच्या चाहत्यांनी हे प्रयत्न निष्फळ ठरवले. हा एक नियतीचाच डाव मानला पाहिजे. जी.एं.च्या भगिनी प्रभाताई, नंदाताई, आप्पासाहेब परचुरे, ग.प्र. प्रधान, सुनीता देशपांडे, म.द. हातकणंगलेकर, जयवंत दळवी, स.त्र्यं. कुल्ली, यांनी जी.एं.च्या लौकिक व वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे महत्त्वाचे लेखन केले आहे. या संदर्भातील सर्वात महत्त्वाचे लेखन म्हणजे वि.गो.वडेर यांचे. ‘अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन’ हा त्यांचा ग्रंथ जी.एं.च्या साहित्याच्या चरित्रात्मक समीक्षेसाठी पायाभूत ठरावा, अशा मोलाचा ग्रंथ आहे. जी.ए.प्रेमींच्या या लेखनातून जी.एं.च्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर बराच प्रकाश पडतो. या प्रकाशात उजळून निघणारे जी.एं.चे अरभाट व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे, तर त्यांच्या बालपणाकडे जावे लागेल.
बेळगावच्या महादेव गल्लीतील घरात दि. 10 जुलै 1923 रोजी जी.ए. म्हणजे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बेळगावचे नामवंत वकील श्री. छत्रे यांच्याकडे कारभारी होते. वडील हयात असेपर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र, जी.एं.च्या वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. विसाव्या वर्षी त्यांची आई आणि त्यांना ‘दुसरी आईच’ असलेली सोनूमावशी गेली. तिसाव्या आणि पस्तिसाव्या वर्षी सुशी आणि इंदू या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही सर्वच जी.एं.च्या काळजातली माणसे होती. आतड्याची माया असलेल्या लोकांचा एकापाठोपाठ एक मृत्यू हे जी.एं.ना झालेले जीवनाचे पहिले शोकात्म दर्शन होते. यातूनच त्यांच्या मनात नियतीच्या क्रूर खेळातील मानवाच्या हतबलतेचा विचार खोलवर रुजला असावा.
जी.एं.नी ‘पिंगळावेळ’ कथासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत आपल्या वडिलांविषयीच्या भावना फार उत्कटपणे व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात,
“तीर्थरूप आबांस,
डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला नीट
पाहण्यापूर्वीच तुमची पाऊले उंबर्याबाहेर
पडली होती”
आप्तांच्या या मृत्यूपर्वाने जी.एं.ना फार गंभीर आणि अंतर्मुख बनवले. त्यांना पहिल्यांदा ‘नियती’च्या अफाट शक्तीचे दर्शन झाले असेल, ते या मृत्यूच्या तांडवात. दुसर्या बाजूने या आघातांनी जी.एं.ना अतिशय कणखरही बनविलेले दिसते. वडिलांनी आपल्या अल्पसहवासात जी.एं.वर केलेल्या मूल्यांच्या खोल संस्कारांना जी.एं.नी आयुष्यभर आपल्या काळजाच्या कुपीत अत्तरासारखे जपलेले दिसते. “धीराने राहा आणि स्वच्छ पावले टाकत जग,” या आबांच्या शब्दांप्रमाणेच जी.ए. अखेरपर्यंत मूल्यनिष्ठ जीवन जगलेले दिसतात.
जी.एं.च्या मनात बालपणापासून साहित्याची आवड निर्माण झाली, याचे श्रेय बरेचसे त्यांच्या घरातील वाङ्मयीन वातावरणाला द्यावे लागेल. त्यांच्या आईचे धार्मिक ग्रंथांचे वाचन चांगले होते आणि तिच्याकडून त्यांना बालपणातच चांगल्या कथा ऐकायला मिळत होत्या. आईच्या या कथाकथनाने जी.एं.च्या मनात कथाप्रेमाचे बीज रुजवले. पुढे अफाट व्यासंग, अचाट प्रतिभा आणि प्रचंड परिश्रम यांच्या साहाय्याने जी.एं.नी या बीजाचे रूपांतर विशाल आणि महाकाय वटवृक्षामध्ये केले. ‘हिरवे रावे’ या कथासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत जी.ए. लिहितात,
“कै.तीर्थरूप आईस,
रात्री उशिरा घरकाम करताना
तुला सोबत व्हावी म्हणून
लहानपणी मला समोर बसवून
तू पुष्कळ कथा सांगितल्यास
आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे”
वरील दोन्ही अर्पणपत्रिकांमधून, जी.एं.ना बालपणीच भोगाव्या लागलेल्या आईवडिलांच्या चिरविरहाच्या दुःखाचा आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचा, फार उत्कट आविष्कार झालेला दिसतो.
जी.एं.चे सर्व शिक्षण बेळगावातच झाले. प्राथमिक शाळेचे उल्लेख त्यांच्या लेखनात फार तुरळक येतात. मात्र, ज्या बेनन-स्मिथ इंग्रजी हायस्कूलमध्ये त्यांनी पाचवी ते मॅट्रिकचे शिक्षण घेतले, त्या शाळेतील शिक्षक, गमती-जमती, मित्र, घटनाप्रसंग यांच्या आठवणी त्यांच्या मनात शेवटपर्यंत रुंजी घालत होत्या. आयुष्याच्या अखेरीस लिहिलेल्या त्यांच्या ‘माणसेः अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातही त्या प्राचुर्याने आल्या आहेत. जी.एं.च्या पत्रव्यवहारातही त्या उफाळून येताना दिसतात. त्या ठिकाणी कृ.रा. परांजपे (पुस्तकातील दातार मास्तर) आणि सायमन मास्तर हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले दोन अफाट शिक्षक जी.एं.ना भेटले. परांजपे मास्तरांना साहित्य, संगीत, नाटक, सुतारकाम, चित्र, क्रिकेट, टेनिस, हॉकी अशा अनेक क्षेत्रांमध्ये गती होती. त्यांची काही पुस्तके, लेख प्रकाशित झाले होते, तर गीतांच्या रेकॉर्डस्ही निघाल्या होत्या. शिवाय, त्यांची शिकवण्याची हातोटी जबरदस्त होती. राम गणेश गडकरी हे परांजपे मास्तरांचे साहित्यातील दैवत! जी.एं.सारख्या कुशाग्र बुद्धीच्या संवेदनशील विद्यार्थ्यावर परांजपे मास्तरांचा प्रभाव पडला नसता, तरच नवल! परांजपे मास्तरांनी आपले काव्यप्रेम, गडकरीप्रेम आणि मूल्यप्रेम जी.एं.च्या अंतःकरणात खोलवर रुजवले. गडकर्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि भाषाशैलीचा प्रभाव जी.एं.च्या लेखनावर स्पष्ट दिसतो, त्याचे मूळ परांजपे मास्तरांच्या अध्यापनात असावे. जी.एं.प्रमाणेच शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक आणि संसदपटू बॅ. नाथ पै हेही परांजपे मास्तरांचेच नावारूपास आलेले विद्यार्थी.
जी.एं.चे दुसरे असामान्य शिक्षक म्हणजे सायमन मास्तर. ते शाळेतल्या जुनाट वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय आधुनिक राहायचे. जी.ए. त्यांच्याविषयी लिहितात, “सायमन मास्तर जवळून गेले की, सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस जवळून गेल्यासारखे वाटे… त्यांनी ‘ग्रे’ कवीची ‘एलिजी’ ही कविता शिकवायला वीस तास घेतले. त्यावेळी अनुभवलेला थरार अजूनही कधीतरी जागा होऊन आठवण उजळून जातो!”
जी.एं.नीच एके ठिकाणी म्हटले आहे की, “काही माणसांना काव्याचा स्पर्श कधी होत नाही, तर काहींची काव्याची धुंदी कधी उतरत नाही!” जी.एं.च्या या दोन्ही शिक्षकांची काव्याची धुंदी अखेरपर्यंत उतरली तर नाहीच; पण उलट ती त्यांनी जी.एं.च्या मनातही कायमची पेरलेली दिसते.
एका बाजूला शाळेत असे अफाट वाङ्मयप्रेमी-कलाप्रेमी शिक्षक, तर दुसर्या बाजूला घरी स्वतःचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह असलेले श्री. गोपाळमामा आणि श्री. गोविंदमामा. सोबतीला इंग्रजी कवितेत बुडी मारणारा राजाराममामा. (जी.एं.चा राजा) या तिन्ही मामांच्या व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव जी.एं.नी आत्मसात केलेला दिसतो. जी.एं.च्या कथेत जादूटोणा, मंत्रतंत्र, रमलविद्या यांचा वावर दिसतो, त्याचे मूळ गोपाळमामांच्या आवडीत दाखवता येते. गोविंदमामांकडून जी.एं.नी इंग्रजी भाषेचे प्रेम घेतले. गोविंदमामांचे इंग्रजी वाङ्मयाचे वाचन अफाट होते आणि चिपळूण परिसरात अध्यापक म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. जी.एं.नी आपला अध्यापन क्षेत्रातील आदर्श म्हणून या मामांकडे पाहिले व आपल्या मामांसारखाच लौकिक इंग्रजीच्या अध्यापनात मिळवला. राजाराममामा (राजा) हा तर जी.एं.साठी मामा कमी आणि मित्रच जास्त होता. या मामाच्या स्वभावातली बैरागीपणाची छटा जी.एं.ना प्रभावित करून गेली असावी. या सर्व वातावरणात जी.एं.चे व्यक्तिमत्त्व आकाराला येत होते.
जी.एं.च्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्यांचे कंगोरे त्यांच्या बालपणातच दिसू लागले होते. त्यांना बालपणापासूनच वाचनाचे प्रचंड वेड होते. पुढे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात या त्यांच्या वाचनवेडाचे रूपांतर अक्षरशः व्यसनात झाले. आयुष्याच्या अखेरीस प्रकृती बिघडून डोळे खराब होईपर्यंत आणि डॉक्टरांनी वाचनावर बंदी आणेपर्यंत त्यांचे हे वेड कायम होते. त्यांच्या वाचनासाठी प्रचंड, बेसुमार, अखंड, चौफेर आणि अफाट हे सर्व शब्द एकत्रितरित्या वापरले, तरी ते कमीच पडतील! पुस्तकांच्या अचूक माहितीसाठी काही शिक्षक जी.एं.वर अवलंबून राहात असत, एवढा अधिकार त्यांनी शालेय वयातच मिळवला होता. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. वाचलेले सगळे लक्षात राही. आधीच तल्लख असलेली बुद्धी वाचनाने कुशाग्र झाली होती. घरचे लोक सोडले, तर बाहेर ते त्या वयातही फार मिसळत नसत. खेळ, सहली, सभा, संमेलने अशा गोष्टींचे त्यांना बालवयातही आकर्षण नव्हते. पुढे बेळगावच्याच अतिशय नामवंत अशा लिंगराज महाविद्यालयात त्यांनी बी.ए.च्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला. प्रो. रामस्वामी, प्रो. श्रीनिवास अय्यंगार असे इंग्रजी साहित्याचे दिग्गज अभ्यासक त्यांना प्राध्यापक म्हणून लाभले. या महाविद्यालयाच्या शिक्षणानुकूल वातावरणात जी.एं.च्या वाचनसरितेने महासागराचे रूप धारण केले. जी.एं.ना खूप कमी वयात चष्मा लागला, तो या अतिवाचनामुळेच. त्यावेळी ते काळ्या काड्यांचा पांढरा चष्मा वापरत असत. त्यांनी काळा गॉगल का व केव्हापासून वापरणे सुरू केले, हे गूढ मात्र अजून अभ्यासकांनाही उकलेले नाही. जी.ए. महाविद्यालयातील इतर उपक्रमांना थांबत नसत. कोणात फार मिसळत नसत. या संदर्भात त्यांच्या प्राध्यापकांनीही त्यांना काही विचारण्याची किंवा सांगण्याची हिंमत केली नाही. त्यांच्या प्रचंड वाचनाचा, कुशाग्र बुद्धीचा आणि परखडपणाचा वचक त्यांच्या प्राध्यापकांवरही होता.
जी.एं.च्या वाचनाविषयी खूप लोकांनी लिहून ठेवले आहे. ते रोजची 300-400 पाने वाचत. ‘आय अॅम अ प्रोफेशनल रीडर’ असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. प्राध्यापकांचा पगार मर्यादित असणार्या त्या काळातही त्यांनी 5 हजार उत्कृष्ट इंग्रजी पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह केला होता. सकाळचे कॉलेजचे तास आटोपले की, ते दुपारपासून रात्री उशिरापर्यंत कर्नाटक विद्यापीठाच्या ग्रंथालयात वाचत बसत. त्यांच्या वाचनात विविधता होती. जागतिक कीर्तीचे महान लेखक तर त्यांनी वाचलेच होते; पण श्रेष्ठ असूनही दुर्लक्षित राहिलेल्या लेखकांकडे त्यांचे जास्त लक्ष जात असे. अशा शेकडो लेखकांचा त्यांनी आपल्या पत्रांमध्ये उल्लेख केला आहे. देश-विदेशातील पुराणकथा, महाकाव्ये, रहस्यकथा, भयकथा, प्रवासवर्णने, चरित्रे, आत्मचरित्रे, कविता, कादंबर्या, कथा, नाटके, वैज्ञानिक शोध, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मग्रंथ, लोकसाहित्य, कोश, मंत्रतंत्रविषयक ग्रंथ, ज्योतिषशास्त्र, रमलविद्या, नॅशनल जिऑग्राफीसारखी मासिके या सर्वांना कवेत घेणारे त्यांचे वाचन होते. आपल्या या ऐसपैस आणि चौफेर वाचनाबद्दल जी.ए. मोठ्या मिश्कीलपणे सुनीता देशपांडे यांना लिहितात, “माझे इंग्रजीतील वाचन फार उनाड आहे. गळ्यात मंगळसूत्र बांधल्याप्रमाणे एखादी प्रखर निष्ठा ठेवून त्या लेखकाचा सखोल अभ्यास करून विद्वत्ता मिळवावी, हा माझा स्वभाव नाही की, तशी माझी महत्त्वाकांक्षा नाही… शेक्सपिअरची काही नाटके मला इतकी कंटाळवाणी वाटतात की, कॉलेजनंतर मी त्यांना स्पर्श केला नाही… तेव्हा सखोलता किंवा विस्तार या कोणत्याही दृष्टीने वाचक म्हणून माझे नाव कधीही पंचकन्यांच्या यादीत येणार नाही. फार तर एखाद्या चवचाल बाईविषयी म्हणावे की, काडीचेही चारित्र्य नाही, पण बाई जगली मात्र अंगातील अर्धे रक्त मदिरा झाल्याप्रमाणे!”
जीवनाचे बालवयातच झालेले उग्रभीषण दर्शन, प्रचंड वाचन, सूक्ष्म-तरल चिंतन, अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड व्यासंग यांमुळे जी.एं.च्या आवडीनिवडी फार काटेरी होऊन गेल्या होत्या. “माय लाईक्स अँड डिसलाईक्स आर व्हायोलंट,” असे त्यांनी या संदर्भात स्वतःच लिहून ठेवले आहे. एखादा लेखक, एखादी कलाकृती भावली, म्हणजे तिचे मोठेपण जी.ए. फार गर्जून सांगत असत. आणि एखादी कलाकृती मुळात साधारण असून, प्रचार तंत्राने गाजवली जात आहे, असे त्यांच्या लक्षात आले की, त्या कलाकृतीचे परखडपणे वाभाडे काढायला ते मागेपुढे पाहात नसत. या संदर्भात त्यांच्यावर बहुमताचा किंवा एखाद्या मोठ्या माणसाच्या मताचाही प्रभाव पडत नसे. मग तो माणूस कितीही मोठा असो. या बाबतीत ते लिहितात की, “कोणी कुणाचे कितीही मोठेपण सांगितले, तरी आपले तीर्थक्षेत्र शेवटी आपल्यालाच ठरवावे लागते… तिथे इतरांची मते कामात येत नाहीत.” यासंदर्भात त्यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारसरणीवरही परखड टीका केली आहे. आणि दुसरीकडे पंडित नेहरू यांचे मात्र कौतुक केले आहे. ऐहिक आनंदाला महत्त्व न देणे, स्त्रीला केवळ अपत्याची माता समजणे, जगण्यातला आनंद घेण्याचा उत्साह संशयास्पद ठरवणे, जेवणात चवीलाही मीठ न घेणे, शरीराचे लाड न पुरवणे – या गांधीवादाला अपेक्षित गोष्टी जी.एं.ना जीवनाच्या मायमुळावर घाव घालणार्या वाटत. “गांधीवाद जीवनाचे सारे रंगच खरवडून टाकून तळापर्यंत जाण्यात आनंद मानतो व शेवटी कसला ना कसला मळका रंग शिल्लक राहातो म्हणून हताश होतो…” असे मिश्कील भाष्य जी.एं.नी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात केले आहे. पुढे ते असेही लिहितात की, “…आपण म्हणजे केवळ शरीर नव्हे, हे सांगायला मोठा थोर वेदान्त हवा असे नाही; पण हे शरीरही आपलेच आहे, हीदेखील जाण हवी… आयुष्यभर या शरीराचे हात, पाय, नाक, कान वापरून सुखी व्हायचे; पण आत्म्याचा प्रश्न येताच मात्र त्या आत्म्याचे ओझे सहन करत आलेल्या त्या शरीराला मागे हटवायचे, ही एक अत्यंत कृतघ्न अस्पृश्यता आहे… काळाने माझ्यापुढे कापडाचा जो एक लहानसा तुकडा टाकला आहे त्यावर मी काहीतरी गिजबीज करीन. भाग्य असेल, तर त्याचे एक चित्रदेखील होईल… पण, त्याची भगवी लंगोटी मात्र करण्याचा खुळचटपणा मी करणार नाही.”
गुलजार, गुळगुळीत प्रेमकथांनी लोकांचे केवळ मनोरंजन करणार्या फडक्यांच्या कादंबर्या जी.एं.सारख्या गंभीर जीवनचिंतनात बुडालेल्या लेखकाला आवडणे शक्यच नव्हते. जी.एं.नी ही आपली नावड फार हिंसक शब्दांमध्ये व्यक्त केली आहे. जयवंत दळवी यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “…फडक्यांच्या कादंबर्यांमधील ते ओपन कॉलर शर्ट, काचा मारलेले धोतर, भव्य बुद्धिमत्तादर्शक कपाळ, वार्यावर भुरभुरणारे कुरळे केस, मोतिया ब्लाऊज, चापूनचोपून नेसलेली आकाशी रंगाची साडी, धनुष्याकृती भुवया… सालं या सगळ्या माणसांना एकजात मरीन ड्राईव्हवर उभे करावे व फाडफाड मुस्कटात मारत जावे! खरे म्हणजे, फडक्यांच्या पात्रांसारखी निरुपद्रवी पात्रे सार्या जगात शोधून मिळायची नाहीत. बिचारी कधी छापल्या पानाबाहेर पडत नाहीत. वाचकांना कधी डिवचत नाहीत… तिथल्या तिथे प्रेमात पडतात, मरतात आणि पुस्तक मिटले की, कोणाकडे देण्याघेण्याचे टुमणे लावत नाहीत. गरवारे की कोणी प्लास्टिक युग नंतर सुरू केले असेल; पण त्याआधी कितीतरी वर्षे फडके प्लास्टिक युगप्रवर्तक होऊन बसले होते!”
मराठी आत्मचरित्रांमध्ये दिसणार्या आत्मसंतुष्ट वृत्तीवरही जी.एं.नी अशीच काटेरी टीका केली आहे. ‘माणूस नावाचा बेटा’ या कथेतील नायक दत्तू जोशी या संदर्भात भाष्य करताना म्हणतो, “मराठीतील चरित्रे पाहिली की, महाराष्ट्रात सारे सद्गुणांचे राक्षसच जन्माला आले की काय, असे वाटते!… सारे आयुष्य साफ गिलावा केलेले! कुठे फट नाही. कुठे खळगा नाही. कुठे पाप नाही, गुन्हा नाही, शरम नाही… सारा प्लॅस्टर ऑफ पॅरिस गुळगुळीतपणा. या लोकांना जीवनाचे पदरच दिसले नाहीत की, या पुजार्यांनी सारी बिळेच लिंपून टाकली आहेत, त्यातील काळे-पिवळे नाग झाकून टाकले आहेत? … खड्ड्यात गेले ते सत्कार, ती भाषणे, तो तुरुंगवास. तुमच्या चरित्रात हा जिवंत माणूस आहे कुठे?” जी.एं.नी हे भाष्य दत्तू या पात्राच्या तोंंडी टाकले असले, तरी मुळात ते त्यांचे मत आहे व त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रांमध्ये केला आहे.
आपल्या आवडत्या लेखकांबद्दल लिहिताना मात्र जी.एं.चा सूरच बदलून जातो. महर्षी व्यास, डोस्टोव्हस्की, चेकॉव्ह, कोस्लर यांच्या लेखनावर लिहिताना जी.एं.च्या मनातील त्यांचे आकर्षण शब्दा-शब्दांमध्ये ओसंडत राहाते. कुणीतरी जी.एं.ची तुलना चेकॉव्हशी केली. त्यावर जी.एं.चे भाष्य असे की, “जो माझी तुलना चेकॉव्हशी करीन त्याला माझा शाप आहे.” जी.एं.च्या लेखनात, विशेषतः पत्रांमध्ये जागोजाग डोस्टोव्हस्कीचे उल्लेख येत राहतात. “माझ्या संभाषणात पहिल्या 8-10 वाक्यांमध्ये जर डोस्टोव्हस्कीचा उल्लेख आला नाही, तर माझी तब्येत बरी नाही की काय, अशी भीती माझ्या मित्रांना वाटते,” अशा मिश्कील शैलीत त्यांनी आपले डोस्टोव्हस्कीप्रेम व्यक्त केले आहे. व्यासांच्या लेखनापुढे तर ते फारच नम्र होतात. व्यासांनी महाभारतात एका ठिकाणी द्रौपदीच्या अंगाला निळ्या कमळाचा गंध होता, असे वर्णन केले आहे. यावर जी.एं.चे मार्मिक आणि मिश्कील भाष्य असे की, “निळे कमळ खरेच अस्तित्वात नसेल; आणि असल्यास त्यास द्रौपदीगंध नसेल, तर ती व्यासाची चूक नसून, परमेश्वराची चूक आहे. व्यासासारख्या महाकवीला जी गोष्ट अत्यंत आकर्षक वाटते, ती गोष्ट मुळात निर्माणच करायची नाही, असला गलथानपणा सृष्टीनिर्मितीच्या कामात दाखवायचा म्हणजे काय? छट्…आय स्ट्राँगली डिसअप्रूव्ह!!”
जी.एं.च्या या काटेरी आवडीनिवडीमागे कधी कधी एक अजब तर्कशास्त्र काम करताना दिसते. जे जे लोकप्रिय झाले, ज्याला ज्याला सामान्य लोकांनी डोक्यावर घेतले ते ते दुय्यम, सुमार आणि साधारण असे हे विचित्र तर्कशास्त्र दिसते! ‘माणूस’, ‘देवदास’, ‘मुघलेआझम’ हे चित्रपट जी.एं.ना अजिबात आवडत नसत. कारण, हे तिन्ही चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले होते. ‘देवदास’ ही त्यांना फार विनोदी कादंबरी वाटली, असे त्यांनी सुनीताबाईंना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे. मुघलेआझमची जाहिरात पाहून पोटात ढवळून आले, असेही त्यांनी म्हटले आहे. खूप प्रशंसा ऐकल्यामुळे आपल्याला ‘ताजमहाल’ ही वास्तू फार आवडली नाही, असेही भाष्य त्यांनी केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांची ‘प्रदक्षिणा’ ही कथा बरीच गाजली. मराठीत तिची बर्यापैकी चर्चा झाली. त्यावर ग.प्र. प्रधानांसारख्या रसिकाने जी.एं.ना लिहिले की, “मोठ्या समजल्या गेलेल्या लोकांची ढोंगे दाखवण्यात तुम्हाला आनंद होतो.” यावर जी.एं.नी प्रधानांना उलट उत्तर पाठविले. ते लिहितात, “नेमके हेच मला त्यात दाखवायचे नव्हते… उलट त्या पुढार्याचीही काही बाजू असेल, असे मला त्यातून सुचवायचे होते… पण, तुमच्यापर्यंत जर तुम्ही म्हणता तोच अर्थ पोचला असेल, तर मी कथा लिहिण्यात कमी पडलो असे आपण समजावे.” म्हणजे थोडक्यात काय, तर अनेकांना आवडलेली जी.एं.ची ही कथा जी.एं.नी स्वतःच बाद करून टाकली!
गंभीर स्वभावाच्या कथा लिहिणार्या जी.एं.जवळ तल्लख विनोदबुद्धी होती. स्वतःवर विनोद करण्याइतपत ते खिलाडू वृत्तीचे होते. त्यांच्या कथांमध्ये क्वचित विनोद आला होता; पण तो भेदक स्वरूपाचा होता. मात्र, त्यांच्या पत्रांमधून आणि ‘माणसेः अरभाट आणि चिल्लर’ या अखेरच्या पुस्तकातून जो विनोद आला आहे, तो फार प्रसन्न व आल्हाददायक आहे. त्या विनोदाचे काही नमुने ः
1) साधारणतः पोस्टाचे शिक्के इरसाल मुत्सद्यांसारखे असतात. त्यांच्याकडे पाहता येते; पण ते वाचता येत नाहीत. प्राचीन काळी स्वयंवरात पोस्टाचा शिक्का वाचणे असा एखादा पण जर सर्रास असता, तर त्या वेळच्या राजकन्या कायम अविवाहितच राहिल्या असत्या.
2)‘नरो वा कुंजरोवा’ म्हणून धर्मराज द्रोणाचार्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले, ते कशाबद्दल? तर खोटे बोलल्याबद्दल! आणि ते कसले? तर त्याची करंगळी गळून पडली! एखाद्याने टाइमबाँब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशाची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे!
3) पुस्तक व आपले डोके एकत्र येताच खट् असा लाकडी आवाज जर झाला, तर तो दोष नेहमी पुस्तकाचाच असतो, असे नाही.
4) ती बाई टेलिफोनवरून भयंकर समाजसेवा करीत असे!
5) ‘प्रदक्षिणा’ या कथेच्या संदर्भात हातकणंगलेकर यांना पाठविलेल्या पत्रात जी.ए. लिहितात, “सगळ्यांना ही कथा एक सटायर वाटली… समाजातील ढोंगावर मी चोख प्रकाश टाकला, असा एकंदरीत लोकांचा सूर आहे व त्यासाठी त्यांनी माझी बरीच स्तुती केली आहे… हा प्रकार म्हणजे हृषिकेशला वैतगाने निघालेल्या संन्याशाला सोनेरी व्हिजिटिंग कार्ड भेट देण्यासारखे अथवा मोकळ्या केसाच्या द्रौपदीला रिबीनची भेट किंवा दुर्वासाला डेल कार्निजीच्या ‘हाऊ टू विन फ्रेंड्स’ पुस्तकाची प्रत भेट म्हणून देण्यासारखे आहे!”
मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या आणि लोकांपासून फटकून राहणार्या जी.एं.चे कौटुंबिक पार्श्वभूमीवर फारच वेगळे रूप दिसते. तिथे ते कुटुंबवत्सल, व्यवहारदक्ष कुटुंबप्रमुख असतात. ते धारवाडहून बेळगावला येत, तेव्हा त्यांच्या बहिणींना फार आनंद होत असे. जी.एं.च्या सख्ख्या बहिणी हयात नव्हत्या. मात्र, मावशीच्या मुली प्रभावती व नंदा यांना जी.एं.नी सख्ख्या बहिणींसारखेच प्रेम दिले. त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून फार काळजी घेतली. नंतर तर त्यांना ते धारवाडलाच घेऊन गेले. या बहिणींनीना लहानपणी भुताखेताच्या गोष्टी सांगणे, त्यांना सहलीला, सिनेमाला घेऊन जाणे, चांगले खाऊपिऊ घालणे, त्यांच्या शिक्षणाची, भवितव्याची काळजी घेणे या गोष्टी जी.ए. अतिशय प्रेमाने करीत असत. पुढे नंदाताईंचे लग्न होऊन त्या सौ. पैठणकर झाल्या. त्यांच्या मुग्धा व मनीषा या मुलींवर जी.एं.चे फारच प्रेम होते. जी.ए. बालसाहित्याकडे वळले, ते बहुधा या आपल्या लाडक्या भाच्यांसाठीच. कारण, आपली बालसाहित्याची पुस्तके जी.एं.नी मुग्धा आणि मनीषाला अर्पण केली आहेत. प्रभाताईंवरही जी.एं.ची फार माया होती. इंग्रजीच्या अभ्यासासाठी मिळालेली परदेशातील स्कॉलरशिप आणि प्रभाताईंचा आजार या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, तेव्हा या आपल्या बहिणीसाठी जी.एं.नी स्कॉलरशिपची संधी सहजपणाने सोडून दिली. जी.एं.चा देवावर विश्वास नव्हता; पण ते प्रभाताईंना देवदर्शनासाठी आपल्या स्कूटरवरून घेऊन जात. ते स्वतः देवळात जात नसत, बाहेर स्कूटरजवळ थांबत. कधी कधी प्रभाताईसाठी घरी भजन मंडळीची व्यवस्था करून रात्री उशिरापर्यंत क्लबमध्ये थांबत.
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही त्यांची फार चांगली प्रतिमा होती. त्यांच्या अध्यापनावर विद्यार्थी खूश असत. शिस्त आणि वक्तशीरपणासाठी त्यांची ख्याती होती. कडक स्वभावाचे असूनही, ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. फळ्यावर भरपूर संदर्भ लिहून देणे, विषयाच्या खोलात जाऊन मांडणी करणे, विद्यार्थ्यांसाठी नोट्स तयार करून ठेवणे आणि प्रभावी अध्यापन, यांमुळे त्यांच्या वर्गात विद्यार्थी मंत्रमुग्ध होत. महाविद्यालयात त्यांचा धाक असा होता की, त्यांच्या तासाला कोणी उशिरा येत नसे. एकदा माजी मंत्र्याची मुलगी उशिरा वर्गात आली. जी.एं.नी तिला वर्गाबाहेर काढले! एकदा काही उशिरा येणारे विद्यार्थी जी.एं.ची तक्रार घेऊन प्राचार्यांकडे गेले. प्राचार्य त्यांना म्हणाले, “तुम्हाला माझ्या तासाला थोडा उशीर झाला, तर हरकत नाही, मात्र जी.एं.च्या तासाला तुम्ही उशिरा येऊ नका. या बाबतीत त्यांना काही सांगण्याची माझी हिंमत नाही.” हुशार, होतकरू, जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी जी.एं.च्या मनात खूप प्रेम होते. अशा विद्यार्थ्यांना ते स्वतःहून मदत करीत.
जी.ए. फार मनस्वी आणि स्वाभिमानी वृत्तीचे होते. कुणाकडूनही काही मदत स्वीकारणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळे आपल्यामध्ये मिंधेपणा येईल, असे त्यांना वाटे. त्यामुळे कुणी थोडी मदत दिली, तर त्याची परतफेड ते भरभरून करीत. व्यावहारिक फायद्यांसाठी त्यांनी कधी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही किंवा कधी कुणापुढे हात पसरला नाही. वरिष्ठांची हाजीहाजी करणार्यांचा त्यांना तिटकारा होता. कॉलेजची वेळ झाल्यावर प्राचार्यांनी “थांबा” म्हटले, तर “माय टाइम इज ओव्हर’ असे सुनावून निघून जाण्याइतका करारीपणा त्यांच्यात होता. या मनस्वी वृत्तीमुळेच ‘काजळमाया’ला मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या संदर्भात वाद निर्माण झाला. तेव्हा जी.एं.नी तो पुरस्कार (सोबत मिळालेल्या रकमेसह) तडकाफडकी परत केला.
जी.ए. एकांतप्रिय आणि अलिप्त वृत्तीचे होते. स्वतःचे खाजगीपण प्रकर्षाने जपणारे होते. या खाजगीपणाच्या सीमारेषा ओलांडणार्यांना त्यांनी आपल्या आयुष्यातून वजा करून टाकले. “नोबडी कॅन टेक मी फार ग्रँटेड” असे ते म्हणायचे. त्यामुळे कुणी त्यांना गृहीत धरून त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला, तर ते त्याला झटकून टाकायचे. या कारणाने त्यांनी अनेक मोठमोठ्या साहित्यिकांना भेटी नाकारल्या. अशा भेटी टाळण्यासाठी ते निरनिराळ्या सबबी सांगायचे. त्यांच्या स्वभावात एक गूढपणाचा आणि लहरीपणाचा भाग होता. त्यामुळे ते कुणाशी कसे वागतील, याचा नेम नसे. अशा काही प्रसंगांतूनच जयवंत दळवी, ग. वा. बेहरे हे लोक दुखावले गेले असावेत.दळवींनी जी.एं.वर खोटेपणाचा व स्वतःच्या खोट्या प्रतिमा निर्माण करण्याचा आरोप केला आहे, तर बेहरे यांनी जी.एं.वर नाटकीपणाचा, न्यूनगंडाने पछाडल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही आरोपांना स. त्र्यं. कुल्ली यांनी उत्तरे दिली असून, ती पटण्यासारखी आहेत. कुल्ली लिहितात, “जी.एं.ना स्वतःच्या खोट्या प्रतिमा निर्माण करण्याची काहीच गरज नव्हती. मराठीतील एक श्रेष्ठ कथाकार आणि एक यशस्वी प्राध्यापक म्हणून त्यांची प्रतिमा आधीच मोठी होती… आणि न्यूनगंडाने पछाडून जावे, असेही जी.एं.मध्ये काही नव्हते. ते प्रकृतीने धडधाकट, बुद्धिमान आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.
जी.एं.चे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते, याबद्दल स.त्र्यं. कुल्ली यांनी फार मार्मिक मांडणी केली आहे. त्यांच्या मते, “जी.एं.चे व्यक्तिमत्त्व बहुपदरी, बहुआयामी होते. त्यांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वातील एखादा घटक घेऊन त्यावरून जी.एं.च्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाबद्दल निर्णायक मत बनविणे अन्यायकारक होईल.” एका पातळीवर जी.ए. व्यवहारदक्ष, कुटुंबवत्सल, घरंदाजपणाची कल्पना बाळगणारे, शिस्तप्रिय शिक्षक होते. येथे जी.ए. एक जबाबदार कुटुंबप्रमुख, आदर्श शिक्षक, उत्कृष्ट नागरिक आणि स्त्रियांशी मर्यादाशील वागणूक असलेले चारित्र्यवान गृहस्थ ठरतात. व्रतस्थ, कलोपासक आणि ज्ञानोपासक ही जी.एं.च्या जगण्याची दुसरी पातळी. येथे ते एकांतप्रिय, अलिप्त, अंतर्मुख, व्यासंगी कलावंत म्हणून जगतात. येथे लेखन ही त्यांच्या दृष्टीने एखाद्या व्रतासारखी पवित्र आणि गंभीर गोष्ट ठरते. त्यांच्या या एकांतप्रियतेचा अर्थ तुसडेपणा, माणूसघाणेपणा असा करणे बरोबर नाही. कारण, एकांत हा त्यांचा पळपुटेपणा नव्हता. नव्या कल्पना, विचारांना, कलारूपांना जन्म देणारा असा तो सर्जनशील एकांत होता. जी.एं.च्या जगण्याला आणखी एक पातळी होती. ही पातळी आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील परस्परविरुद्ध प्रवृत्ती-प्रेरणांची, नेणिवेची, अथांग काळोखाची, अदृश्य छायांशी चाललेल्या संवाद-संघर्षाची, गूढतेची पातळी! या पातळीवर त्यांना सगळे हवे होते आणि कुणीही नको होते. येथे त्यांना एकांतवासाची गरज होती, तशी मायेच्या माणसांचीही गरज होती. या तीनही पातळ्यांवर वावरणारे जी.एं.चे व्यक्तिमत्त्व अतिशय गुंतागुंतीचे आहे. जीवनासक्ती व जीवनविरक्ती यांचे द्वंद्व या व्यक्तिमत्त्वात आढळते. जी.एं.चे जीवनावर प्रेमही होते; पण त्याचबरोबर हे जीवन मृत्यू, विनाश, दुःख यांनी झाकोळून गेल्याचेही त्यांना जाणवत होते. आयुष्याची अर्थपूर्णता त्यांना कळली होती आणि त्याची निरर्थकताही त्यांनी जाणली होती. म्हणून ते एकाच वेळी माणसांचे लोभीही होते आणि एकांतप्रियही होते!” जी.एं.च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल भिन्न प्रवृत्तीच्या लोकांची भिन्न मते होती. ही मते तयार होताना लोकांचे राग, लोभ, असूया, आदर यांचे मिश्रणही त्यात झाले असणारच… जी.एं.बद्दल कुणाचे मत काहीही असो – मराठी साहित्याच्या क्षेत्रात जी.ए. नावाचे एक अफाट व्यक्तिमत्त्व होऊन गेले… त्यांच्या एकांताने मराठी साहित्यात अमूल्य आणि अक्षर अशा कथावाङ्मयाची भर घातली आणि त्यांच्या लोकांताने मराठी पत्रवाङ्मय अतिशय समृद्ध केले, एवढे मात्र निश्चित! मराठी रसिकांना जी.ए. नावाच्या या अरभाट व्यक्तिमत्त्वाचे नेहमीच आकर्षण वाटत राहील.
(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत.)
9822841190