चिरेबंदी भिंती. मोठी माडी. पूर्वी गडांना असायचा तसा भला मोठा दरवाजा…. तुटलेली डोली,नक्षीदार डमनीचे जू ,कोरीव -आखीव खांब. जुना लाकडी नक्षीदार पलंग. लाकडी जिना, हे सगळं पाहताना या वाड्याने एकेकाळी काय वैभव अनुभवलं असेल , याची कल्पना करत असताना काका सांगत होते , ‘हे सगळं चारशे वर्षापूर्वीचं आहे ललित. आमचे वंशज गजमलसिंह इंगळे. ते आमच्या घराण्याचे मूळपुरुष. त्यांनी हा वाडा बांधला.’ त्यांच्या फोटोकडे बोट दाखवत ते एकेका पिढीतील प्रमुखाचा फोटो दाखवत होते. आपल्या कर्तबगार पूर्वजांनी कष्टाने उभारलेलं हे वैभव जपता यायला हवं, त्याचं मातेर होऊ नये असं त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ते सांगत असल्याचं मला जाणवत होतं.
काकांचे आजोबा बापूराव उर्फ बापूसाहेब देशमुख हे फार हुशार, धोरणी,आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. डॉ. पंजाबराव देशमुख,आबासाहेब खेडकर हे बापुरावांचे जवळचे मित्र. बापूसाहेब देशमुख त्यांचे सोबत कायम विविध सामाजिक कामात अग्रेसर असायचे. सामाजिक कार्याच्या निमित्ताने बापूरावांची गाडगेबाबांसोबत अनेकदा भेट व्हायची. एकदा बोलता बोलता बाबांनी मी अमुक एक महिन्यात कीर्तनासाठी तळेगावला येणार आहे , असे सांगितले . ते ऐकताच बापुरावांनी मनाशी काहीतरी ठरवले . वाड्यात येताच त्यांनी सुतारांना बोलावून घेतले . गाडगेबाबांसाठी एक विशेष खुर्ची बनवायची आहे , असे त्यांनी सांगितले . जवळपास १५ दिवसाच्या मेहनतीनंतर गाडगेबाबांसाठी खास खुर्ची तयार झाली . गाडगेबाबा तळेगावला आले. वाड्यात आलेत. सगळीकडं फिरले. डोक्यावर गाडगं आणि हातात झाडू घेऊन फिरणारा हा फकीर बापूरावांच्या आग्रहाखातर काही वेळासाठी या खुर्चीत बसला. बापुरावाचं दातृत्व, समाजासाठीची त्यांची तळमळ. वाड्याच्या जागेत उघडलेली शाळा. गोरगरीबांसाठी धडपडणारं त्यांच संवेदनशील मन, हे गाडगेबाबांना दिसत असावं. त्यामुळेच त्यांनी खुर्चीत बसण्याचा आग्रह मानला असावा .
एकदा गाडगेबाबा त्या खुर्चीत बसले म्हटल्यावर पुढे त्या कोणी त्या खुर्चीवर बसण्याचं काही कारणंच नव्हतं. पुढे वाड्यात येणारा प्रत्येक माणूस त्या खुर्चीसमोर श्रद्धेने नतमस्तक व्हायचा. बाबांच्या चरणस्पर्शाने देशमुखांचा वाडा आणि वाडेकरी पावन झालेत. मी त्या खुर्चीकडे एकटक पाहत होतो. गाडगेबाबा शांतपणे बसलेले मला दिसलेत. दुसरीकडे बापूराव गाडगेबाबांच्या प्रसन्न मुद्रेकडे बघत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर धन्य झाल्याचे भाव आहेत, असे मला बापुरावांच्या फोटोत दिसत होते . तेव्हा काय संभाषण झालं असेल त्या दोघांमधे? काय संदेश दिला असेल गाडगेबाबांनी? काय सांगितलं असेल त्यांनी? आजच्या पिढीतील काकांना ते माहीत नाही. त्यांचे भाऊ,त्यांचे काका, कोणालाच माहीत नाही. फक्त त्या संवादाचा एकच शाश्वत साक्षीदार आहे. तो म्हणजे ४०० वर्षाचा देशमुखांचा वाडा. जरा आपुलकीने,विश्वासाने,प्रेमाने विचारलं तरं वाडा इतिहासातील ती जीर्ण होऊ लागलेली पानं अलगद उघडून दाखवेल, असा विचार माझ्या मनात डोकावून गेला . पण ही सारी कल्पनाच. पुढे या वाड्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पावलंही लागलीत.या दोन युगपुरुषांची आठवण जपणारा वाडा ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक धरोहर आहे .
अप्रतिम फारच सुंदर मांडणी व अनुभव…
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
धन्य धन्य हो सतगुरु राया.तो वाडा ती खूरची जतन करा