घराच्या आजूबाजूला अजून बांधकामं चालूच होती. तिथे पडलेले मोठाले दगड पण ‘सेतू बांधा रे’ स्टाईलने मुलींनी आणि मी वेचून वेचून डोईवर वाहून आणले, आणि ते कलात्मकतेने(!)रचले. मातीचा.. वाळूचा थर देत, तिथे छोटंसं रॉक गार्डन पण केलं. तिथे सगळे कॅक्टस लावले.आता कोणाच्याही घरी गेलं की सगळं लक्ष त्यांच्या बागेतच असायचं. कुठून कुठून कॅक्टसच्या कटींग्ज आणल्या असतील त्याची तर गिनतीच नाही. पण आपल्याकडे ना कलेची किंमतच नाही कोणाला. ते दगडांवरचं ‘रॉक गार्डन’ बघून, ‘हे गबाळ का काढून टाकलं नाही बांधकामाचं’ .. असा प्रश्न जेव्हा एकाने केला तेव्हा तोच दगड उचलून त्याच्या डोक्यात घालण्यासाठी फार हात शिवशिवले होते.अंडरग्राउंड पाण्याच्या टाकी शेजारी उगं फूटभर जागा उरली होती ती तरी का सोडा म्हणून तिथे एक पाम ट्री लावून टाकलं. त्या पामने तर ऐसपैस मुळं पसरवत चार वर्षात आख्खी पाण्याची टाकी भेगाळून टाकली. ती टाकी दुरूस्त करायला, बांधताना झाला नाही एवढा खर्च झाला. आणि अर्थातच पाम ची आहूती पडली.