आधुनिकता हे मूल्य हिंदूंनी आत्मसात करायला हवं

-सुनील तांबे

तुर्क असोत की अफगाण वा मुघल हे शस्त्रास्त्र विद्येत प्रगत होते.

राज्य चालविण्याची, महसूल गोळा करण्याची त्यांची यंत्रणा भारतीयांपेक्षा वेगळी होती. लष्कराच्या शिस्तीवर त्यांची नजर असायची.

जन्माने नाही तर शौर्य व कर्तबगारीने बढती मिळत होती. त्यांच्यामध्ये जातिव्यवस्था वा वर्ण व्यवस्था नव्हती.

तुर्क, अफगाण, मंगोल, असे भेद होते. परंतु ते वांशिक भेद होते.

इस्लाम वरील श्रद्धा या सर्वांना जोडणारी होती.

ते एकेश्वरवादी होते. त्यांच्या धर्मात अंधश्रद्धांचा बुजबुजाट नव्हता. नवीन ज्ञान, तंत्रज्ञानाचं अवलंब करण्याची वृत्ती होती. नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती होती. मंगोल असो की पर्शियन साम्राज्य, त्यांच्याकडून त्यांनी अनेक बाबी — प्रशासन, महसूल, इत्यादी बाबी शिकून घेतल्या होत्या.

बाबरने हिंदुस्तानात तोफखाना आणला. तोफेच्या ओतकामावर बाबर देखरेख करत असे. सैन्याच्या शिस्तीकडे बाबरचं लक्ष असे. बाबर नंतरच्या सम्राटांनी तोफांमध्ये अनेक बदल केले. छोट्या तोफा, मोठ्या तोफा, किल्ल्यावरच्या तोफा, जनावरांनी वाहून न्यायच्या तोफा इत्यादी. त्यामुळे मुघलांच्या लष्करी हालचाली वेगाने व्हायच्या. त्यामुळे युद्धात त्यांचा वरचष्मा होता.

त्यांची महसूल पद्धतीही प्रगत होती. त्यांनी व्यापाराला चालना दिली.

व्यापारामध्ये क्रेडीट वा कर्जाला महत्व असतं. मुसलमान धर्मामध्ये व्याज घेण्यावर बंदी होती, व्याज देण्यावर बंदी नव्हती. त्यामुळे हिंदू सावकार-व्यापारी यांना मुस्लिम राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं.

हिंदू, जैन व शीख सावकार व व्यापारी, शेतकरी आणि कारागीर (कारखान्यांना) कर्ज देत. कारण कोणत्या मालाला कुठे मागणी आहे याची माहिती त्यांना असे.

मुघल सत्तेच्या विस्तारासोबत मारवाडी व्यापारी (ही एक जात नाही) मारवाडपासून कोलकत्यापर्यंत आणि दक्षिणेत महाराष्ट्र, कर्नाटक इथपर्यंत पसरले. ते मुघल सत्तेला एकनिष्ठ होते. त्यासाठी त्यांना धर्मांतर करण्याची अट घालण्यात आली नव्हती.

मुघलांनी राजपूत, बनिया, जैन, शीख इत्यादी सर्व व्यापार्यांना आपलंसं केलं. कारण त्यांच्यामुळे खजिन्यात भर पडते हे ते जाणून होते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी, नगदी पिकांच्या लागवडीसाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. त्यातल्या काही अपेशी ठरल्या, काही यशस्वी झाल्या. शेती, उद्योगधंदे, व्यापार यांना बरकत आली तरच राज्य चालवता येतं याची जाण त्यांना होती.

ही दृष्टी विजयनगरच्या साम्राज्याकडे होती. परंतु विजयनगरच्या सम्राटांकडे आधुनिक शस्त्रविद्या नव्हती. तोफा आणि दारूगोळा याबाबतीत त्यांनी संशोधन-विकास केलेला नव्हता. त्यामुळे तुर्क-पर्शियन या बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगरचा पराभव केला. विजयनगर साम्राज्य या बहामनी सुलतानांशी राजनितीक संबंध ठेवून होतं. कूटनीतीवर त्या साम्राज्याचा भरवंसा होता. सर्वात मोठी अडचण होती उत्पादन व्यवस्थेची. ही व्यवस्था जातिव्यवस्थेवर आधारीत होती. तुर्क, अफगाण, मुघल यांनी त्या व्यवस्थेत बदल केला नाही मात्र सदर व्यवस्था आपल्या फायद्यासाठी राबवली. ही सर्व प्रक्रिया विलक्षण गुंतागुंतीची होती.

इस्लामच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भक्ती संप्रदाय निर्माण झाला.

परंतु नवीन ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती त्यामुळे रुजली नाही.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी नवीन आर्थिक-राजकीय-लष्करी रचना घेऊन आली. त्याचं आकलनही भारतीयांना झालं नाही. १७५७ साली प्लासीच्या लढाईनंतर बंगाल-बिहार-उत्तर प्रदेशात कंत्राटी शेती सुरु झाली. अफू, नीळ त्यानंतर ऊस यांची. ईस्ट इंडिया कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी. मात्र याची दखल मराठ्यांनी घेतलेली नव्हती. कारण अफू असो नीळ वा साखर यांच्या जागतिक बाजारपेठेची जाण त्यांना नव्हती. त्यासाठी वेगळ्या आर्थिक-राजकीय-सामाजिक रचनांची गरज आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं.

राजा राममोहन राय, लोकहितवादी, म. फुले यांनी हे जाणलं होतं. म्हणून तर देशाभिमानी असूनही त्यांचा भर धर्मसुधारणा, समाजसुधारणा यावर राह्यला. दुर्दैवाने हा इतिहास आपल्याला शाळेत शिकवला जात नाही. त्यामुळे काँग्रेसने (दादाभाई नवरोजी-गोखले-रानडे-सुरेंद्रनाथ बानर्जी-टिळक-गांधी-नेहरू-आंबेडकर) काय केलं हेही नीटपणे शिकवलं जात नाही. त्यामुळे निव्वळ अस्मितांचा जयघोष केला जातो.

मिलेनियल म्हणजे सध्या तिशी-चाळीशीची पिढीही हिंदुत्ववाद्यांच्या प्रचाराला बळी पडते. आधुनिकता हे मूल्य आपण म्हणजे हिंदूंनी आत्मसात करायला हवं. मुसलमान तर केवळ १४ टक्के आहेत. ८० टक्के हिंदूंनी आधुनिकता आत्मसात केली तर मुसलमानही त्याच मार्गावर येतील, एवढी साधी बाब आपल्याला समजत नाही. बाबरच्या आक्रमणाच्या आधीपासून हिंदूंची हीच मनोवृत्ती आहे.

(लेखक हे नामवंत पत्रकार व अभ्यासक आहेत)

9987063670