-अविनाश दुधे
गांधीजींच्या जीवनातील एक असेच औत्सुक्यपूर्ण प्रकरण अलीकडेच उजेडात आले आहे. गांधीजींचा नातू राजमोहन गांधी यांनी Mohandas: The true story of a man, his people, and an Empire या पुस्तकात फारच कमी लोकांना माहित असलेली महात्मा गांधींची प्रेमकहाणी सविस्तरपणे सांगितली आहे. आपल्या विवेकबुद्धीवर कमालीचे नियंत्रण असलेले गांधीजी वयाच्या ५0 व्या वर्षी सरलादेवी चौधरी या अतिशय सुंदर व प्रतिभावंत स्त्रीच्या प्रेमात पडले होते आणि तिच्यासोबत लग्न करायला निघाले होते, हे खळबळजनक सत्य राजमोहन गांधींनी त्या पुस्तकात मांडले आहे.
……………………………………
‘इंडिया टुडे’ या या देशातील लोकप्रिय साप्ताहिकाने आपल्या १९ जूनच्या अंकात महात्मा गांधींसोबत शेवटच्या काळात सावलीसारखी राहणारी त्यांची नात मनूबेनसोबत त्यांनी ब्रह्मचर्याचे प्रयोग कसे केलेत, त्या प्रयोगाचा तिच्या जीवनावर काय परिणाम झाला, याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. मनुबेन गांधींनी त्या काळात लिहिलेल्या डायरीतील मजकूर त्यांनी जसाच्या तसा प्रकाशित केला आहे. देश जातीय दंगलीत होरपळत असताना आणि स्वातंत्र्य उंबरठय़ावर आलं असतांना गांधीजींच्या त्यावेळच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगामुळे तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांच्यावर कठोर टीकाही झाली होती. वल्लभभाई पटेल, ठक्कर बापा हे त्यांचे जवळचे सहकारी अतिशय नाराज झाले होते. आजच्या पिढीला याबाबत फार माहिती नाही. मात्र याबाबत देशी-विदेशी लेखकांनी भरपूर लिहून ठेवलं आहे. त्या प्रयोगामुळे तेव्हा गांधीजींचे स्वीय सचिव असलेले आर.पी. परशुराम व निर्मलकुमार बोस त्यांना सोडून गेले होते. बोस यांनी त्यावेळचे अनुभव ‘माय डेज विथ गांधी’ या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांच्या ‘लास्ट फेस ऑफ गांधी’ (मराठीत अनुवाद- ‘अखेरचे पर्व’) या पाच भागात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही त्या प्रयोगामुळे निर्माण झालेल्या वादळाचा सविस्तर उल्लेख आहे.
गांधीजींच्या जीवनातील एक असेच औत्सुक्यपूर्ण प्रकरण अलीकडेच उजेडात आले आहे. गांधीजींचा नातू राजमोहन गांधी यांनी Mohandas: The true story of a man, his people, and an Empire या पुस्तकात फारच कमी लोकांना माहित असलेली महात्मा गांधींची प्रेमकहाणी सविस्तरपणे सांगितली आहे. आपल्या विवेकबुद्धीवर कमालीचे नियंत्रण असलेले गांधीजी वयाच्या ५0 व्या वर्षी सरलादेवी चौधरी या अतिशय सुंदर व प्रतिभावंत स्त्रीच्या प्रेमात पडले होते आणि तिच्यासोबत लग्न करायला निघाले होते, हे खळबळजनक सत्य राजमोहन गांधींनी त्या पुस्तकात मांडले आहे.
राजमोहन गांधींनी आपल्या पुस्तकाच्या प्रारंभीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आजोबांनी आयुष्यभर सत्याची आराधना केली. कुठलीही गोष्ट त्यांनी लपविली नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला हा अध्याय दडपून ठेवावा असे मला वाटत नाही. ही कहाणी आहे ऑक्टोबर १९१९ ते डिसेंबर १९२0अशा उणापुर्या १४ महिन्यांची. ऑक्टोबर १९ मध्ये एका आंदोलनाच्यानिमित्ताने गांधीजी लाहोरमध्ये आले होते. त्यावेळी संपादक रामभुज दत्त चौधरी व सरला चौधरी या जोडप्याच्या घरी त्यांचा मुक्काम होता. आंदोलनात रामभुज चौधरींना तुरुंगात जावे लागले., त्यावेळी फुललेली ही प्रेमकहाणी आहे. या कहाणीतील उत्कटता समजून घेण्याअगोदर गांधीजी जिच्यामुळे प्रचंड प्रभावित होऊन वयाच्या ५0 व्या वर्षी दुसरं लग्न करायला निघाले होते त्या सरलादेवी चौधरींबद्दल माहिती जाणून घेऊया.
इंद्रियांवर मात करण्याचा सातत्याने प्रयत्न करणार्या गांधीसारख्या मोठय़ा माणसाला जिने मोहित केलं होतं ती अर्थातच सामान्य स्त्री नव्हती. सरलादेवी ही महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठय़ा बहिणीची अतिशय देखणी व तेवढीच हुशार मुलगी होती. तिचे वडिल जानकीनाथ घोषाल हे बंगालमधील काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातील महत्वाचे नेते होते. आई स्वर्णकुमारी १९ व्या शतकातल्या पारंपारिक बंगालमध्ये साहित्यविश्वात सक्रिय असं व्यक्तिमत्व होतं. अशा क्रियाशील जोडप्याने आपल्या लेकीला अतिशय उत्तम शिक्षण दिलं होतं. त्या काळात तिला इंग्रजी आणि फ्रेंच शिकायला त्यांनी परदेशात पाठविलं होतं. पर्शियन आणि संस्कृतमध्येही तिने प्रभुत्व मिळविलं होतं. घराण्याचं बाळकडू, उत्तम शिक्षण व देश-विदेशातील प्रतिभावंत व्यक्तिंचा सहवास लाभल्याने सरलादेवींच्या व्यक्तिमत्वात स्वाभाविकच अष्टपैलूत्व आलं होतं. शिक्षण झाल्यानंतर बंगालमधील सशस्त्र राष्ट्रवादी मंडळींसोबत तिचा संपर्क आला. ती लवकरच त्यांच्यासोबत काम करू लागली. या संघटनेसाठी तिने अनेक देशभक्तीपर गीत रचलीत व त्यांना संगीतही दिलं. त्या गीतांचा सतगान नावाचा संग्रहही काढण्यात आला होता. सरलादेवीच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी तेव्हा भल्याभल्यांवर होती. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमेरिका दौर्यात तिला सोबत चलण्याची विनंती केली होती. पण घरच्यांनी परवानगी दिली नाही. पुढे लेखक, संपादक रामभुज दत्त चौधरीसोबत लग्न होऊन ती कोलकात्याहून लाहोरला आली. तिथेही ती चांगलीच सक्रिय होती.
लाहोरमध्ये सामाजिक व कौटुंबिक जीवनात ती रमली असताना गांधी नावाचं वादळ तिच्या आयुष्यात आलं आणि तिचं पुढील आयुष्यच बदलून गेलं. राजमोहन गांधींनी आपल्या पुस्तकात महात्मा गांधींनी सरलादेवींबद्दल इतरांना आणि सरलादेवींना लिहिलेल्या ज्या पत्रांचा समावेश केला आहे, त्यातून त्यांच्यात निर्माण झालेल्या नाजूक भावना स्पष्ट होतात. गांधीजींनी २७ ऑक्टोबर १९१९ ला अहमदाबाद आश्रमातील अनुसयाबेनला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मी येथे मजेत आहे. सरलादेवी माझी अतिशय काळजी घेतात. त्या अतिशय प्रेमळ आहेत. त्यांचा सहवास कोणालाही आवडावा असाच आहे. नंतरच्या काही महिन्यात गांधीजी सरलादेवींच्या व्यक्तिमत्वामुळे अतिशय प्रभावित झाल्याचे दिसते.ते संपादित करत असलेल्या यंग इंडिया या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर त्यांनी तिची कविता प्रसिद्ध केली. नवजीवन या दुसर्या साप्ताहिकातही तिची एक दुसरी कविता छापून सोबत ती कविता परिपूर्ण असल्याचे सांगत गांधीजींनी तिची प्रशंसा केली. पुढील काळात हे दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे दिसते.
२३ जानेवारी १९२0 ला एका मित्राला लिहलेल्या पत्रात त्यांनी ‘ Saraladevi has been showering her love on me in every possible way’ या शब्दात सरलादेवी त्यांच्याशी कसं वागतात, हे लिहून ठेवलं आहे. २ मे १९२0 ला लाहोर सोडल्यानंतर सरलादेवींना लिहिलेल्या पत्रात गांधी म्हणतात, ‘अलीकडे तू नियमितपणे माझ्या स्वप्नात येतेस. हे आश्चर्य नाही की, पंडितजी (रामभुज दत्त चौधरी) तुला महान शक्ती म्हणतात.’ २३ ऑगस्ट १९२0 च्या पत्रातून त्यांच्या नात्यातील जवळीकतेवर अधिक प्रकाश पडतो. त्या पत्रात गांधी लिहतात ‘you are mine in purest sense. you ask for a reward of your great surrender, well, it is its own reward.’ गांधी आणि सरलादेवींनी एकमेकांना लिहिलेली अशी अनेक पत्र राजगोपाल गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहेत. ती सारी पत्रं मुळातूनच वाचण्याजोगी आहेत. अतिशय सुंदर इंग्रजीत लिहिलेल्या त्या पत्रात एकमेकांबद्दलची अनिवार ओढ, तडफ, नात्याला नेमकं काय स्वरूप द्यायचं याबद्दलची संदिग्धता दिसून येते. गांधीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील मित्र हरमन कॅलीनबाच यांना सरलादेवींसोबतच्या आपल्या संबंधाबाबत १0 ऑगस्ट १९२0 रोजी एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात ‘ our relation is beyond definition. I call Saraladevi my spiritual wife. one friend described it as a wedding based on knowledge.’ गांधीजी सरलादेवींना जी पत्रं लिहित त्याचा शेवट कधी ‘–‘ असा, तर ‘with love’ असा करत. कधी ते आपल्या पत्रात भगवत गीतेतील श्लोक नमूद करत तर कधी वैष्णव जन तो… या आवडत्या भजनाचा इंग्लिश अनुवाद टाकत असे.
महात्मा गांधी आणि सरलादेवी यांच्यातील नात्यांचा बारकाईने अभ्यास करणारे लेखक मार्टिन ग्रीन यांच्या मते गांधीजी सरलादेवीसोबत लग्न करण्यास अतिशय उत्सुक होते. त्यांच्यात प्रेम होतं, हे नाकारण्यात अर्थ नाही. सरलादेवीचं व्यक्तिमत्व त्यांना काहीसं देवी दुर्गेसारखं वाटत होतं. त्यामुळे तिच्यासोबतच्या लग्नातून आपलं व्यक्तिमत्व अधिक उन्नत होऊन स्वातंत्र्यांच्या लढाईत अधिक जोरकसपणे आपण आपलं योगदान देऊ शकू असे त्यांना वाटत होते, असे ग्रीन त्यांच्या पुस्तकात नमूद करतात. मात्र भारतात हे एवढं सरळसोपं घडून येणं शक्यच नव्हतं. गांधी आणि सरलादेवीत निर्माण झालेल्या नात्याबद्दल लवकरच कुजबूज सुरू झाली. गांधी दुसरं लग्न करू इच्छित आहे, ही बातमी त्यांच्या जवळच्या मंडळींसाठी अतिशय धक्कादायक होती. गांधीजींच्या घरातील सदस्य तर यामुळे कमालीचे प्रक्षुब्ध झालेत. राजगोपाल गांधी लिहितात, मला अजूनही तेव्हाचं घरातलं तंग वातावरण आठवते. ‘तेव्हा माझे वडिल आणि इतर सदस्य बापूंना हे काय झालं. त्यांना यातून बाहेर काढलं पाहिजे.,’ असे सातत्याने बोलत असे.
बापूंची सरलादेवींबद्दलची ओढ कमी होत नाही हे लक्षात येताच त्यांचे चिरंजीव देवदास गांधींनी सी. राजगोपालचारींकडे धाव घेतली. महादेव देसाई आणि मथुरादास यांनाही त्यांनी कल्पना दिली. राजगोपालचारींना प्रकरण माहीत होतचं. त्यांनी गांधीजींना एक अतिशय कठोर पत्र लिहिले. त्यात त्यांनी गांधीजींची निर्भत्सना करताना ‘तुम्ही एक खोटा भ्रम बाळगून निसरड्या वाटेवर चालला आहात. कस्तुरबा आणि सरलादेवी यांच्यात कुठे तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही त्या भ्रमातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे हिताचं आहे. नाहीतर सार्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याला जबाबदार तुम्ही असाल.’, असा इशारा दिला. देवदास गांधींनीही आपल्या वडिलांना कठोर शब्दात ‘तुम्ही जे करता ते ठीक नाही’, असे सुनावले. या सर्वांचा परिणाम म्हणा वा गांधीच्या आतील आवाजाने त्यांना समज दिली म्हणा, त्यांनी सरलादेवींसोबतचे संबंध तोडण्याचे कबूल केले. काही वर्षानंतर फादर लॅशला याबाबत लिहिलेल्या पत्रात गांधींनी कबूल केलं की, ‘त्यांच्या अतूट प्रेमाने मला अतिशय जोरकसपणे सरलादेवीपासून ओढून आणलं. त्यांनी मला वाचविलं.’
मात्र या घटनाक्रमाचा सरलादेवींवर खूप परिणाम झाला. एव्हाना ती गांधीजींच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. गांधींनी आपल्या नात्याला एक आकार द्यावा, याबाबत ती आग्रही होती. राजगोपालचारी आदी मंडळींनी बापूंना तिच्यापासून दूर केल्यानंतर तिने राजगोपालचारींना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, ‘एका पारड्यात जगातील सर्व खुषी आणि आनंद असावा आणि दुसर्या पारड्यात बापू आणि त्यांचे तत्व, नियम. अशा स्थितीत मी दुसरे पारडे निवडले. मात्र मला माझा मूर्खपणा आता कळतो आहे.’ तिने गांधीजींनाही माघार घेतल्याबद्दल कठोर पत्र लिहिले होते. त्याला गांधीजींनी मोठे तात्विक उत्तर दिले होते. ‘मी तुझ्याबद्दलच्या माझ्या प्रेमाचं विश्लेषण जेव्हा करतो, तेव्हा मी Spiritual marriage या कल्पनेपर्यंत जाऊन पोहोचतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तितील हे बंध असे असणार आहे की, ज्यात शारीरिक भावनेला काही महत्व असणार नाही. हे असे संबंध भाऊ-बहिण, वडिल-मुलीतही असू शकतील.’ गांधींनी त्या पत्रात आणखीही बरंच काही लिहिलं.
मात्र त्याचा सरलादेवींवर काही परिणाम झाला नाही. ती स्वतंत्र विचाराची स्त्री होती. गांधीजीसोबतचा नात्यातलं तिचं नेमकं स्थानं काय आहे, एवढंच ती जाणून घेऊ इच्छित होती. त्यांच्यातील नात्याला कायदेशीर स्वरुप मिळावं असेही तिला वाटत होते. गांधीजींकडून निराशा झाल्यानंतर तिने त्यांच्याकडे कायम पाठ फिरविली. १९२३ मध्ये तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर ती कोलकात्याला गेली. तिथे तिने आध्यात्मिक साधनेत मन गुंतविण्याचा प्रयत्न केला. इतिहासकार दत्ता म्हणतात, ‘गांधीजींसोबतचं प्रेमप्रकरण ती आयुष्यभर विसरु शकली नाही. एवढय़ा प्रतिभावंत स्त्रीचं पुढील आयुष्य व्यर्थ गेलं, उद्ध्वस्त झालं.’ राजगोपाल गांधी या प्रकरणाबाबत पुस्तकात आपलं मत नोंदवितांना म्हणतात. ‘मागे वळून पाहताना तो माझ्या आजोबाच्या आयुष्यातला एक रोमांचक अध्याय होता, एवढंच म्हणावंस वाटतं. ते आयुष्यभर आपल्या पद्धतीने आयुष्य जगत आले. स्वत:शी झगडत, चुकांपासून शिकत, संघर्ष करत ते रस्ता शोधत असे. मला वाटते, या कथेतून ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने कळतील.’
संदर्भ – 1) Mohandas: The true story of a man, his people, and an Empire
2) Gandhi- Voice of new age revolution- Marteen Green
3) The Tribune
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.
लॉर्ड माऊंटबॅटन, एडविना व पंडित नेहरू.भापद्मजा नायडूरताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय व भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी एडविना यांच्या प्रेमकहाणीला पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळाला आहे. एडविना यांची मुलगी पामेला माऊंटबॅटन हिने ‘इंडिया रिमेम्बर्ड’ या आपल्या पुस्तकात पंडितजी आणि एडविनाच्या प्रेमसंबंधाबाबत पुस्तकातील ‘A Special Relationship’ या प्रकरणात सविस्तर माहिती दिली आहे. ती म्हणते, ‘माझी आई व पंडितजींमध्ये अतिशय उत्कट प्रेम होतं यात वादच नाही. ‘दो जिस्म एक जान’ या प्रकारातील ते प्रेम होतं. मात्र ते कामवासनारहित (प्लेटॉनिक) प्रेम होतं. मात्र त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध नव्हते. हे भावनिक प्रेमसंबंध समजून घेणं लोकांसाठी अतिशय कठीण बाब आहे. मात्र ते तसेच होते. ते दोघेही एकाकी होते. पंडितजींच्या पत्नीचे निधन झाले होते. मुलीचं (इंदिरा गांधी) नुकतंच लग्न झालं होतं. दुसरीकडे माझ्या आईलाही एकटेपणा वाटत होता. ती मुळातच अंतमरुख स्वभावाची होती. त्यामुळे त्यांच्या मनाच्या तारा जुळल्या असाव्यात. खरंतर माझी आई एडविनाच्या आयुष्यात पंडितजींच्या अगोदर काही पुरुष येऊन गेलेत. तिचे काही प्रियकर होते. त्यांचा वावर बेडरूमपर्यंत राहत असे. यामुळे माझ्या वडिलांना दु:खही होत असे. मात्र पंडितजींसोबतच्या आईच्या प्रेमसंबंधांची जातकुळी वेगळी होती.’आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पामेलाने आपल्या वडिलांनी तिच्या मोठय़ा बहिणीला जून 1948मध्ये लिहिलेल्या पत्रातील काही ओळी नमूद केल्या आहेत. ‘ती (एडविना) आणि जवाहरलाल एकत्र अतिशय गोड दिसतात. ते एकमेकांना शोभूनही दिसतात. जवाहरच्या सान्निध्यात ती अतिशय खूश असते. स्वाभाविकच घरातील वातावरण आनंदी असते.’
पामेलाच्या मते, ‘पंडितजी, एडविना, आपले वडील लॉर्ड माऊंटबॅटन या तिघांमध्ये नात्याची उत्तम समज होती. एकमेकांबद्दलचा ठाम विश्वास होता आणि मर्यादांची जाणही होती.’ तिने या नात्याचा उल्लेख ‘Happy three some’ असा केला आहे. या नात्यात उत्कटता खूप होती हे पामेला नाकारत नाही. पंडितजींनी मार्च 1957मध्ये एडविनाला लिहिलेल्या एका पत्रातील ओळी तिने पुस्तकात नमूद केल्या आहेत. ‘अचानक मला जाणवलं आणि ते तुलाही जाणवत असेल की, आपण दोघेही एकमेकांमध्ये अतिशय खोलवर गुंतलो आहोत. कुठली तरी एक अनियंत्रित शक्ती आहे जिच्याबद्दल नेमकेपणाने मला सांगता येणार नाही. तिने आपल्याला एकत्र आणलं आहे. हे जेव्हा जेव्हा मला जाणवतं तेव्हा मी अतिशय उत्तेजित होतो. आनंदाने फुलून जातो. मात्र एडविना आपल्या नात्यातील काही किरकोळ पेच बाजूला झाले तर आपण एकमेकांसोबत आणखी उत्कटतेने बोलू शकू. कुठलीही भीती किंवा दडपणाशिवाय एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जाऊ शकू.’पंडितजी आणि एडविनाला एकमेकांबद्दल वाटत असलेल्या अनिवार ओढीचे असे अनेक प्रसंग पामेलाच्या पुस्तकात आहेत. ‘आपल्या आईच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1960पर्यंत ही ओढ कायम होती. पंडितजी जवळपास रोज आईला पत्र लिहीत असे. ती पत्रे आकाशी रंगाच्या कागदावर ते लिहीत. अनेकदा त्या पत्रावर गुलाबाच्या पाकळ्या चिकटविलेल्या असे. त्या पत्रांमध्ये एकमेकांवरील प्रेमाव्यतिरिक्त राजकारणातील कटकटी आणि इतरही विषय असत. 1948मध्ये माऊंटबॅटन कुटुंबाने भारत सोडल्यानंतर एडविना दोनदा भारतात आली होती. त्या वेळी तिचा मुक्काम पंडितजींच्या तीन मूर्ती हाऊसमध्येच होता. तिला सरकारी पाहुण्याचा दर्जा असे. पंडितजी जेव्हा-केव्हा इंग्लंडला जात तेव्हा तेसुद्धा माऊंटबॅटन कुटुंबाच्या हॅम्पशायरमधील ब्रॉडलॅण्ड्स इस्टेटमध्ये मुक्काम करत. वर्षातून किमान एक किंवा दोन वेळा ते भेटायचे. त्यांचे नाते खूपच अनौपचारिक होते. ती पंडितजींना जवाहरच म्हणे, तर तेसुद्घा एकेरी नावाचेच तिला हाक मारायचे.’
‘जवळपास 12 वर्षाच्या प्रेमकहाणीत पंडितजींना एडविनाला जवळपास एक मोठी सुटकेस भरेल एवढी पत्र लिहिलीत. एडविनाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पलंगावर सभोवताल नेहरूंनी लिहिलेली पत्रे होती. ती पत्रे वाचून तिला समाधान, शांतता मिळत असे.’ (एडविनाच्या निधनानंतर पंडितजींनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी भारतीय नौसेनेची एक छोटी नौका पाठविली होती. त्यावरील सैनिकांनी तिला मानवंदना दिली होती.) या प्रेमसंबंधाच्या स्वरूपाबाबत लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मनातील घालमेलही पामेलाने पुस्तकात रेखाटली आहे. ‘माझ्या वडिलांनी आई गेल्यानंतर पंडितजींनी तिला लिहिलेली पत्रे मला वाचायला सांगितली. त्यांच्या मनात किंचित, किचिंत., किंचित शंका होती. पण मी जेव्हा त्यांची पत्रे वाचली तेव्हा त्यांना आश्वस्त करू शकले. मी त्यांना म्हणाले, ते दोघेही एकमेकांना खूप तीव्रतेने हवे होते. मात्र तुम्ही विचलित व्हावं असं त्यांच्या नात्यात काहीच नव्हतं.’ आपली आई पंडितजींच्या जीवनात आली तेव्हा त्यांचं वय 58 तर एडविनाचं वय 45 असल्याची माहितीही ती पुस्तकात देते. या दोघांमध्येच प्लेटॉनिकच प्रेम होतं हे पामेला खूप ठामपणे सांगते. भारताच्या फाळणीदरम्यानच्या घडामोडींवर ‘फ्रीडम अँट मिडनाइट’ या पुस्तकाचे लेखक डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी कॉलिन्स यांचेही मत असेच आहे. ते म्हणतात, ‘नेहरू आणि लेडी माऊंटबॅटन या दोघांमध्ये वेगळ्या प्रकारचे विशेष असे प्रेमबंध आढळत होते. यात यत्किंचितही शंका नाही. मात्र आम्हांला असा एकही पुरावा आढळला नाही की, ज्याचा आधार घेऊन त्या प्रेमबंधाची खिल्ली उडवावी. कारण ते प्रेम सर्वस्वी प्लेटॉनिक होते. त्या प्रेमबंधांना वैषयिक कलंक बिलकूल लागलेला नव्हता. पंडित नेहरूंच्या निवासाची देखभाल करणार्या सेवकांकडेही आम्ही बारकाईने चौकशी केली. त्यांनीही आम्हांला निक्षून सांगितले. ‘नाही, ती दोघे एका खोलीत कधीही झोपलेली दिसली नाहीत. तसला कुठलाही पुरावा नाही.’ अर्थात सर्वानाच हे मान्य आहे अशातला भाग नाही. ‘एडविना आणि नेहरू’ या प्रसिद्ध पुस्तकाची
फ्रेंच लेखिका कॅथरिन क्लिमेंट म्हणते, ‘नेहरूंचे आणि एडविनाचे प्रेमसंबंध बर्याचअंशी प्लेटॉनिक होते; पण नेहमीच नाही. ‘Mostly, but not always’. कॅथरिनाने एडविना माऊंटबॅटनने आपल्या नवर्याला लिहिलेली काही पत्रेही पुस्तकात टाकली आहेत.एका पत्रात एडविना म्हणते, ‘आमच्या पत्रापत्रीवरून तुझ्या लक्षात येईल की, आमचं नातं मोठं अद्भुत, चमत्कारिक आहे. बर्याचअंशी ते आध्यात्मिक आहे. जवाहरचं माझ्या आयुष्यात खूप वेगळं महत्त्व आहे. तसंच माझंही त्याच्या आयुष्यात आहे.’
पंडितजी आणि एडविनाच्या प्रेमकहाणीवर एक चित्रपटही काढण्याचा प्रयत्न झाला होता. ह्यूज ग्रँट हा अभिनेता नेहरूंची तर केट ब्लँचेट एडविनाची भूमिका साकारणार होते. अँलेक्स व्हॉन या लेखकाच्या ‘इंडियन समर’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार होता. मात्र भारत सरकारने या चित्रपटाबद्दल नकारात्मक धोरण अवलंबविलं. त्या चित्रपटात नेहरू आणि एडविनात कुठलेही अंतरंग दृश्य दाखविणार नाही, अशी अट घालण्यात आली होती. पुढे तो चित्रपटच बारगळला. असाच प्रकार नेहरूंनी एडविनाला लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहाबाबतही झाला. ही पत्रे पुस्तकस्वरूपात यावी, असे प्रयत्न काहींनी केले. मात्र भारतातील जनतेला ते आवडणार नाही असे सांगत त्या पुस्तकाला परवानगी नाकारण्यात आली. भारतीय जनता नेत्यांना माणूस म्हणून का स्वीकारत नाही? याचा पाश्चात्त्य लेखकांना मोठा पेच पडतो. ‘स्वत: स्खलनशील असले तरी नेत्यांनी मात्र आदर्शच असलं पाहिजे. त्याला काही वैयक्तिक भावभावना नसल्या पाहिजे असंच भारतीय जनतेला वाटतं की काय?’, असं निरीक्षण जॅनेट मॉर्गन या लेखकाने भारतीयांबद्दल नोंदवून ठेवलं आहे. खरंतर एडविना ही काही पंडितजींच्या आयुष्यातील पहिली स्त्री नव्हती. एडविनाच्या अगोदर जवळपास 11 वर्षे सरोजिनी नायडू यांची देखणी कन्या पद्मजा नायडू हिच्यासोबत पंडितजींचे प्रेमसंबंध होते. तिला ते ‘बेबी’ या नावाने हाक मारत. तिलाही त्यांनी भरपूर पत्रे लिहिली आहेत. त्यादरम्यान काही महिने पद्मजा नायडू नेहरूंच्या निवासस्थानीही राहत. पंडितजींची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी याबाबत त्यांना सावध केल्यानंतर पद्मजा दुसरीकडे राहावयास गेल्या. मात्र त्यांचं प्रेम कायम होतं. एका पत्रात पंडितजींनी लिहिलं होतं. ‘मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना बरंच काही भोगावं लागतं. माझं प्रेम कमी होत नाही. पण इतर अनेक बाह्य गोष्टी, भावना, कर्तव्ये वरचढ होतात..मी माझ्या प्रिय व्यक्तीला कवेत घेतलं तरी कित्येकदा माझं मन कुठेतरी भरकटत जातं आणि मी स्वत:लाच परका होऊन जातो. मी वर्तमानकाळ विसरतो. स्वत:कडे तटस्थपणे पाहू लागतो.’ या पद्मजा नायडूंना पंडितजींनी पुढे बंगालचं राज्यपाल केलं होतं. कमला नेहरूंच्या निधनानंतर एकाकी झालेल्या पंडितजींचे नाव मृदुला साराभाई आणि वाराणसीच्या संन्यासिनी श्रद्धा मातेसोबतही जोडले गेले होते. ही सारी प्रकरणं आता इतिहासजमा झाली आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पंडित नेहरू हा माणूस कोणालाही हवाहवासाच वाटायचा.स्त्रियाचं काय, पुरुषही त्यांच्या प्रेमात पडत असे. तेव्हा देशातच नव्हे, तर परदेशातही ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या एडविनासोबतच्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन लॉर्ड माऊंटबॅटननी नेहरूंना फाळणीसाठी राजी करून घेतले, असा आरोप होता.े मात्र यात काहीही तथ्य नाही. देशहिताच्या कुठल्याही विषयात नेहरूंनी प्रेमसंबंध मधे आणले नाहीत. उलट एडविनासोबतच्या संबंधांमुळे माऊंटबॅटननी काश्मीर भारताला दिला, असा जोरदार आरोप फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये होत होता. एडविनासोबतच्या मधुर संबंधातून नेहरूंनी पाकिस्तानसोबतच्या सीमारेषा आपल्या मनाप्रमाणे आखून घेतल्या, असेही काही पाश्चात्त्य इतिहासकार मानतात.
(संदर्भ – इंडिया रिमेम्बर्स-पामेला माऊंटबॅटन, एडविना आणि नेहरू-कॅथरिन क्लिमेंट, इंदिरा-कॅथरिन फ्रँक, टाइम्स ऑफ इंडिया, डीएनए)
भ्रमणध्वनी : 8888744796








