मान्सून आणि भारतीय समाज-संस्कृती

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

सुनील तांबे

देशातील कोरडवाहू वा पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. हे शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची तारीख पारंपारिक ज्ञानाच्या आधारे ठरवतात आणि त्यानुसार शेतीचं नियोजन करतात. 1950 साली केंद्र सरकारने कॅलेंडर रिफॉर्म समिती स्थापन केली होती. या समितीकडे संपूर्ण देशातून 30 कॅलेंडर वा पंचांगं जमा झाली. आजही सणवार आणि शेतीचं नियोजन करण्यासाठी ही पंचांगं उपयोगात आहेत. अनेक लोकगीतांमध्ये, देशी भाषांमधील उक्ती वा म्हणींमध्ये नक्षत्रांचा त्या नक्षत्रांमुळे येणार्या पावसाची नोंद आहे. ही भारतीय पंचांग सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि गावागावात पोचलेली आहेत.

000000000000000000000

     मान्सून वा मोसमी वारे आणि त्यामुळे पडणारा पाऊस व पावसाळा हा ऋतू, भारतीय उपखंडाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय उपखंडातील संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण जडण-घडणीला भूगोल आणि मान्सून हे दोन घटक कारणीभूत आहेत. त्याची रूपरेखा मांडणं, हे या लेखाचं प्रयोजन आहे.

मान्सून हवामान प्रणाली

     मान्सून वैश्विक आहे. हवेचा दाब कमी असेल, म्हणजे हवा विरळ असेल, तिथे आसपासच्या प्रदेशातली हवा येते. त्याला वारे म्हणतात. तापमान वाढलं की, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे अधिक दाबाच्या क्षेत्रातून कमी दाबाच्या क्षेत्रात वारे येतात. विषुववृत्ताच्या वर आणि खाली कमी दाबाचे पट्टे तयार होत असतात. कारण, या प्रदेशावर सूर्याची किरणं सरळ रेषेत पडतात. साहजिकच तेथील समुद्राचं तापमान वाढतं. पाण्याचं रूपांतर बाष्पात होतं, हवा वर जाऊ लागते. कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. या पट्ट्याला म्हणतात ‘इंटर ट्रॉपिकल कॉन्वर्जन्स झोन’. दक्षिण आणि उत्तर गोलार्धातील वारे या पट्ट्यात एकमेकांना मिळतात. संपूर्ण पृथ्वीवर जिथे जिथे इंटर ट्रॉपिकल कॉन्वर्जन्स झोन तयार होतात, तिथे मान्सून असतो. मात्र, ह्यापैकी बहुतांश पट्टे समुद्रात तयार होतात. फारच कमी ठिकाणी त्यांचा परिणाम जमिनीवर होतो, उदा. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इत्यादी.

     पृथ्वीची विभागणी आपण दोन गोलार्धात केली आहे. दक्षिण आणि उत्तर. सूर्य उत्तर गोलार्धात सरकला की, संपूर्ण आशियामध्ये नवीन वर्ष साजरं केलं जातं. हा वसंताचा काळ असतो. केरळमध्ये विशू, आपल्याकडे गुढीपाडवा, कर्नाटकात उगादी, पंजाबात बैसाखी, आसाममध्ये बोहाग बिहू. रब्बी हंगामातील पिकांच्या कापणीचा हा काळ आहे. सूर्य दक्षिण गोलार्धात सरकला की, उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू होतो. त्यामुळे जगभर सामान्यपणे वसंत, ग्रीष्म, शरद आणि शिशिर असे चार ऋतू असतात.

     भारतीय उपखंडाची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या हिंदी महासागराच्या शाखा आहेत. उत्तरेला भूखंडाने बंद केलेला हा एकमेव महासागर आहे. त्याशिवाय, हिमालयाच्या पलीकडे तिबेटचं पठार आहे. त्यामुळे भारतातील मान्सून कमालीचा तीव्र आहे. सूर्य उत्तर गोलार्धात सरकला की, तिबेटचं पठार तापू लागतं. जून महिन्यात उन्हाळा परमोच्च बिंदूकडे सरकू लागतो. साहजिकच भूपृष्ठावरील म्हणजे, भारतीय भूखंडावरील हवा विरळ होऊ लागते. म्हणून समुद्रावरून वारे भारतीय उपखंडाकडे वाहू लागतात. हे वारे समुद्रावरून बाष्प घेऊन येतात आणि आपल्याकडे पावसाळा सुरू होतो. लंडनला वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या सहापट पाऊस चेरापुंजीला एका पावसाळ्यात पडतो. मेघालयात पडणारा पाऊस सिंगापूरला वर्षभर पडणार्‍या पावसापेक्षा अधिक आहे. भारतीय मान्सून म्हणून अतितीव्र मानला जातो.

     सप्टेंबर महिन्यात सूर्य दक्षिणेकडे सरकतो. साहजिकच दक्षिण गोलार्ध तापू लागतो. तेथील हवा विरळ होऊ लागते, त्यामुळे मान्सूनचे वारे दक्षिण गोलार्धाकडे वळतात. त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो. दिशा बदलून वाहणारे आणि पाऊस आणणारे वारे म्हणजे मान्सून. त्यामुळे भारतात तीन ऋतू असतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. ही सर्व माहिती आपण शाळेत शिकलो आहोत. परंतु, पावसाळ्याचे सामाजिक-सांस्कृतिक परिणाम जाणून घेण्यासाठी ती उपयोगी आहे, म्हणून त्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मान्सून आणि व्यापार

     मान्सून हा शब्द भारतीय भाषेतला नाही. ‘मौसिम’ या अरेबिक शब्दापासून तो तयार झाला आहे. खरीप आणि रब्बी हे शब्दही अरेबिक आहेत. खरीप हंगामात वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात आणि रब्बी हंगामात वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. हे वारे घड्याळाच्या काट्याप्रमाणे अगदी चोख चालतात. या वार्‍यांचा अभ्यास करून प्राचीन काळी हिंदी महासागरातील व्यापार चालत असे. कारण या वार्‍यांमुळे जहाजांना लांबचे अंतर कापणे सहज शक्य होत असे. जलप्रवास तुलनेने कमी काळात पार पडायचा. पर्शियाच्या आखातापासून इंडोनेशिया द्वीपसमूहातील सुमात्रापर्यंतचा प्रवास 70 दिवसांत पूर्ण होत असे. भूमध्य समुद्रातील शिडाच्या जहाजांच्या दुप्पट वेगाने हिंदी महासागरात जहाजांची वाहतूक व्हायची. याचं श्रेयही मान्सूनच्या वार्‍यांना द्यायला हवं.

     व्यापार म्हटला की, तंटेबखेडे होणारच. त्यावर मुस्लिम कायद्यानुसार निर्णय दिला जायचा. त्यासाठी केरळमधील हिंदू राजांनी काझी कोर्ट स्थापन केले होते. तिथले काझी, अर्थातच इस्लामी कायद्याचा अभ्यास केलेले मुसलमान असायचे. त्यांचे निर्णय हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन सर्वांना मान्य असायचे. अरबस्थान, आफ्रिका येथून आलेल्या व्यापार्‍यांना परतीच्या प्रवासासाठी रब्बी हंगामाची वाट पाहाणं भाग होतं. त्यासाठी ते किनारपट्टीला मुक्काम करायचे. त्यामुळे गुजरातपासून ते केरळपर्यंत किनारपट्टीला मशिदी होत्या. केरळमधल्या हिंदू राजांनीच मशिदी बांधण्याला परवानगी दिली होती. कारण, व्यापारामुळे मिळणारं उत्पन्न मोठं होतं. पद्मनाभ मंदिरातील संपत्तीची मोजदाद अजूनही करता आलेली नाही, त्यावरून व्यापारातून मिळणारं उत्पन्न किती असेल, याची कल्पना करता येईल.

     सध्याची जहाजं मान्सूनच्या वार्‍यांवर चालत नाहीत. त्यांचा वेगही अधिक आहे. मात्र, समुद्रमार्ग प्राचीनच आहेत. जगातील 60 टक्के खनिज तेल इराणच्या खाडीतून निर्यात होतं. हे तेल हिंदी महासागरातूनच चीन वा जपानपर्यंत जातं. या व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारत अमेरिकेच्या गटात जातो आहे. मान्सूनने निश्चित केलेल्या समुद्रमार्गांवरच आजचं ‘जिओपॉलिटिक्स’ वा ‘भू-राजकारण’ सुरू आहे. अरब राष्ट्रं, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएटनाम, लाओस ते पार फिलिपिन्स वा चीन व जपानशी असलेले आपले आर्थिक-राजकीय-लष्करी संबंध मान्सूनच्या समुद्रमार्गाशी निगडित आहेत.

 सर्वधर्मसमभाव आणि मान्सून

     पूर्वी चातुर्मासात प्रवास करणं अशक्य होतं, कारण बारमाही रस्ते नव्हते. नद्या वा नाले दुथडी भरून व्हायचे. हिंदू, बौद्ध, जैन वा अन्य पंथांचे साधू, संन्यासी इत्यादी या काळात भ्रमण करत नसत. ते एखाद्या नगरात थांबायचे. काशी वा बनारसमध्ये हजारोंच्या संख्येने साधू-बैरागी या काळात असायचे. हिंदूंचा चतुर्मास, बौद्धांचा वर्षावास, जैनांचं पर्युषण पर्व पावसाळ्यातच असतं. या काळात प्रत्येक धर्माचे वा पंथाचे साधू, महात्मे लोकांना धर्मोपदेश करायचे. भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर विविध धर्मांचे, उदाहरणार्थ बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू लोक चार महिने मुक्काम करायचे आणि वार्‍याची दिशा बदलल्यावर आपापल्या इच्छित स्थळी कूच करायचे. व्यापारामध्ये त्यावेळीही धर्मस्थळांच्या यात्रांचा समावेश व्हायचा. त्यामुळे भारतातील अनेक तीर्थस्थानांच्या वा मंदिरांच्याजवळ मुस्लिम वा बिगर हिंदू धर्मीयांची प्रार्थनास्थळं वा कबरी वा मजार आढळतात.

     तिबेट हा आशियाचा ‘जल मनोरा’ समजला जातो. तिबेटमध्ये सुमारे सात हजार हिमनद्या आहेत. आशिया खंडातील महत्त्वाच्या नद्यांचे उगम तिबेटमध्ये आहेत. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, पीत नदी वा यलो रिव्हर, यांगत्से, मेकाँग, इरावंडी इत्यादी. हजारो वर्षे या नद्या हिमालयाच्या पर्वतांमधून माती वाहून आणतात. त्यामुळे पंजाब, सिंध, गंगा-यमुनेच्या खो़र्‍यात सुपीक जमीन तयार झाली. यांगत्से आणि पीत नदीच्या खोर्‍यांमध्येही गाळाची जमीन आहे. साहजिकच अतिप्राचीन काळापासून भारत आणि चीन हे दोन देश शेतीप्रधान आहेत. शेतीसाठी बैल आणि माणसांची गरज असते. साहजिकच या दोन्ही देशांची लोकसंख्या प्राचीन काळापासून अधिक आहे. शेती उत्पादनामुळे विविध वस्तू तयार होतात. त्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहाते. भारतात वस्त्रोद्योग, तर चीनमध्ये रेशीम उद्योग, चिनीमातीची भांडी इत्यादी व्यवसाय उभे राहिले.

     कोणत्या मालाला कुठे मागणी आहे, याची माहिती व्यापार्‍यांना असायची. व्यापारी त्यानुसार शेतकर्‍यांना आणि कारागिरांना कर्ज द्यायचे. पावसाळा कसा असेल, याचा अंदाज बांधून ते पेरणीआधी कर्ज द्यायचे. हा पक्का माल मध्य आशिया आणि पूर्व आशियात पाठवायचे. मध्य आशियात समरकंद, बुखारा, इत्यादी ठिकाणी हिंद सराय होत्या. कर्ज व व्याज याशिवाय व्यापार शक्य नसतो. मुस्लिम धर्मात व्याज घेण्याला बंदी आहे. हिंदू धर्मात असं कोणतंही बंधन नाही. त्यामुळे मध्य आशियातील व्यापारावर हिंदूंची जवळपास मक्तेदारी होती. हिंद सरायांमध्ये हिंदूंना आपले धार्मिक विधि पार पाडता यायचे. हिंद सरायांमध्ये देवळंही होती. सरायांच्या बाहेर हिंदू धर्मविधिंना बंदी होती. भारतातील शेती कर्जाच्या व्यवसायाचा विस्तार हिंदू व्यापार्‍यांनी मध्य आशियात आणि पूर्व आशियातही केला. मारवाडी, बनिया, शीख, चेट्टियार यांनी त्यामध्ये आघाडी घेतली होती.

     खैबरखिंडीतून आलेल्या आक्रमकाने क्वचित व्यापारी तांडे लुटले असतील. सम्राट अकबराच्या काळात तर व्यापारीमार्गांवर शांतता व सुव्यवस्था असली पाहिजे, म्हणून बुखारा व अन्य राज्यांशी तह करण्यात आले होते. ग्रँट ट्रंक रोड वा शाही सडकेवरील लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने सैन्य पाठवलं होतं. ही शाही सडक मौर्य काळापासून होती. गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर याच मार्गाने तो गयेपासून वाराणसीपर्यंत चालत आला. मॅगेस्थेनिसच्या नोंदीनुसार, या मार्गाची निगा राखण्यासाठी मगध साम्राज्यात एक स्वतंत्र खातं होतं. पुढे या मार्गाची निगराणी शेरशहा सूरने केली. या मार्गावर व्यापा़र्‍याचा खून झाला, तर पंचक्रोशीतल्या गावांना जबाबदार धरलं जाईल, असा हुकूम शेरशहा सूरने काढला होता. भारतातून अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या सुती आणि रेशमी कापडांची ठाणी आणि गुलाम मध्य आशियात पाठवले जायचे. मध्य आशियातून घोडे भारतात यायचे. पुढे मुघलांच्या काळात राजस्थानातील मारवाडी देशाच्या कानाकोपर्‍यात पोचले. राजस्थानातील मारवाड्यांचं बंगालमधील अर्थव्यवस्थेवर वर्चस्व होतं. त्याची कारणं दोन, एक बंगाल हा सर्वाधिक सुपीक प्रांत होता आणि दुसरं, उद्योग-व्यापारात जोखीम वा रिस्क घेण्याची क्षमता राजस्थानातील व्यापार्‍यांमध्ये होती.

     राजस्थानात सर्वात कमी पाऊस पडतो, तर बंगालात सर्वाधिक पाऊस पडतो. राजस्थानात पाण्याची टंचाई आहे, तर बंगालात उदंड पाणी.

सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम,

शस्यश्यामलाम, मातरम!

     या गीतात भारताचं नाही, तर बंगालचं वर्णन आहे. या दोन्ही संस्कृती मान्सूनमुळेच तयार झाल्या, हे ध्यानी घेतलं पाहिजे. हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष होताच, पण त्यांच्यात आर्थिक सहजीवनही होतं. भारतात सर्वधर्मसमभाव वाढीला लागला, जोपासला गेला यालाही मान्सून कारणीभूत आहे.

परंपराप्रियता आणि मान्सून

     पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकर्‍याकडे असतं. अन्यथा, त्याची शेती तोट्यात जाते. शेतकर्‍यांना मान्सूनच्या हवामान प्रणालीची जुजबी माहिती असते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची, हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकर्‍यांना फारसा उपयोग होत नाही. त्यांचा भर भारतीय कॅलेंडर वा पंचांगांवर असतो. भारतीय कॅलेंडरनुसार सूर्य 27 नक्षत्रांमधून प्रवास करतो. प्रत्येक नक्षत्रात तो 13-14 दिवस असतो. नक्षत्रानुसार किती पाऊस पडणार, याचे ठोकताळे असतात. त्यानुसार शेतकरी पेरणी करतात. सौराष्ट्रातील गुजराथ कृषी विद्यापीठाने यासंबंधात एक अभ्यास केला. पारंपारिक हवामान तज्ज्ञांचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं. त्यांचे आठ अंदाज हे कच्चे सिद्धांत मानून त्यांची सत्यता पडताळण्यासाठी काही वर्षं हवामानाच्या नोंदी ठेवल्या. या सर्व नोंदी कृषिहवामान तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवल्या जायच्या. आठपैकी सात अंदाज वा नियम वा कच्चे सिद्धांत असत्य आहेत, हे सिद्ध झालं नाही.

     अमलताश वा बहावा या झाडाला केरळने राज्य वृक्षाचा दर्जा दिला आहे. अमलताश वा बहावा या झाडाला फुलांचा बहर आला की, 45 दिवसांत मान्सूनचा पाऊस सुरू होतो, अशी समजूत आहे. या समजुतीची खातरजमा करण्यासाठी सौराष्ट्रातील गुजराथ विद्यापीठाने बहाव्याच्या झाडाला केव्हा बहर आला, याच्या काटेकोर नोंदी ठेवल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बहर आल्यापासून 45 नाही तरी 40 ते 50 दिवसांत मान्सून हजेरी लावतो, हे ध्यानी आलं. त्रिपुरा राज्यात पारिजातकाच्या झाडाला येणार्‍या फुलांच्या संख्येवरून पाऊस किती पडणार, याचा अंदाज तेथील आदिवासी आणि अन्य समूह लावतात. त्याची तपासणी तेथील विद्यापीठाने केली, तेव्हा त्यांनाही या समजुतीत तथ्य असल्याचं ध्यानी आलं.

     चातक पक्ष्याच्या दोन जाती आहेत. एक दक्षिण भारतात वास्तव्याला असते. दुसर्‍या जातीचे चातक पक्षी पूर्व आफ्रिकेचे रहिवासी आहेत. मान्सून येण्याच्या पूर्वी ते भारतीय उपखंडात, म्हणजे पाकिस्तान, उत्तर व मध्य भारतात पोचतात. चातक ज्या प्रदेशात पोचतो, तिथे दोन ते तीन दिवसांत मान्सून पोचतो, असं आढळून आलं आहे. यासंबंधात अनेक पक्षिमित्रांनी नोंदी ठेवल्या आहेत, त्या नोंदीचा पद्धतशीर अभ्यासही झाला आहे.

     देशातील कोरडवाहू वा पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. हे शेतकरी मान्सूनच्या आगमनाची तारीख पारंपरिक ज्ञानाच्या आधारे ठरवतात आणि त्यानुसार शेतीचं नियोजन करतात. 1950 साली केंद्र सरकारने कॅलेंडर रिफॉर्म समिती स्थापन केली होती. या समितीकडे संपूर्ण देशातून 30 कॅलेंडर वा पंचांगं जमा झाली. आजही सणवार आणि शेतीचं नियोजन करण्यासाठी ही पंचांगं उपयोगात आहेत. अनेक लोकगीतांमध्ये, देशी भाषांमधील उक्ती वा म्हणींमध्ये नक्षत्रांचा व त्या नक्षत्रांमुळे येणार्‍या पावसाची नोंद आहे. ही भारतीय पंचांग सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि गावागावात पोचलेली आहेत. मान्सूनचे वारे अचूकपणे वाहतात व दिशा बदलतात; मात्र कुठे, केव्हा आणि किती पाऊस त्यामुळे पडेल, ही बाब आधुनिक तंत्रज्ञान अचूकपणे आजही सांगू शकत नाही. त्यामुळे परंपरेचा पगडा आपल्या देशातील बहुसंख्य शेतकर्‍यांवर आहे, आधुनिक वा वैज्ञानिक दृष्टीचा मनोमन स्वीकार बहुसंख्य भारतीयांनी केलेला नाही.

मान्सून आणि राजकारण

     भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशाचे 36 उपविभाग केले आहेत. परिसराची भौगोलिक रचना आणि तिथे पडणारा पाऊस, यानुसार हे उपविभाग केले आहेत. पावसाचं प्रमाण आणि भौगोलिक रचना यानुसार त्या परिसरातील जलचक्र निश्चित होतं, तिथली पिकं आणि व्यापारी मार्ग निश्चित होतात, मासेमारी व पशुपालनाचं चक्र, पशुपालकांचे स्थलांतराचे मार्ग आणि काळ निश्चित होतो. त्यानुसार स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजरचना व समाजजीवन आकार घेतं. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची केवळ भाषा-संस्कृतीच वेगळी नसते, तर राजकीय विचाराचीही जडण-घडण होते.

     स्वतंत्र भारतात भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय झाला. परंतु, 1970 नंतर निर्माण होणारी राज्ये भाषेच्या आधारावर होत नसून, हवामानशास्त्र विभागाने केलेल्या उपविभागांनुसार निर्माण होत असल्याचं ध्यानी येईल. उदाहरणार्थ, झारखंड हा उपविभाग आधीपासूनच होता. हवामानशास्त्र विभाग त्याला पूर्वी छोटा नागपूर म्हणत असे. हवामानवृत्तात तटवर्ती आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि रायलसीमा असा हवामानाचा अंदाज पूर्वीपासून दिला जायचा. बंगालची विभागणी दोन उपविभागांमध्ये करण्यात आलीय. सबहिमालयन वेस्ट बेंगाल आणि गँजेटिक वेस्ट बेंगॉल. दार्जिलिंग भागातच स्वतंत्र गोरखालँण्डचं आंदोलन उभं राहिलं होतं, हे आपण जाणतो. महाराष्ट्रात चार उपविभाग आहेत. गोवा आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा. स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनीच आहे, त्यामध्ये अलीकडे मराठवाड्याचीही भर पडली. मान्सून आणि भूगोल यांच्यामुळे भारतातील राजकारण आकार घेतं.

     भारताचं जिओपॉलिटिक्स वा भू-राजकीय सामरिक नीती, सर्वधर्मसमभाव, परंपराप्रियता आणि राजकारण हे मान्सूनचं चतुर्विध रूप भारतीय उपखंडाच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलामुळे निर्माण झालं आहे. आधुनिक विचाराची मांडणी करणार्‍या डाव्या वा उजव्या राजकीय प्रवाहांना मान्सूनच्या या चतुर्विध रूपाचं आणि देशाच्या भूगोलाचं पुरेसं भान नाही.

———————————

(लेखक नामवंत पत्रकार अभ्यासक आहेत.)

9969404292

Previous articleकळे न हा चेहरा कुणाचा ?
Next articleपत्रकारितेत सुमारांची चलती असते तेव्हा  सत्य दीनवाणं  उभं असतं…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here