– सुलक्षणा वर्हाडकर
काल एल्विस प्रिस्लेच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहिला.
जड मनानं थिएटर बाहेर आले.
एका कलाकाराची शोकांतिका काळाला पुरून उरलीय.
आयुष्यात पाॅज घेणं किती महत्वाचं आहे यावर लिहावंसं वाटतंय.
एक दीड मिनिट थांबणं. उत्तर देण्यापूर्वी Pause घेणं हा बावळटपणा नाही.
धाडकन कुणाचा अपमान करत खिल्ली उडवणं सोप्पंय.
नहले पे दहला.
ये लगा सिक्सर.
सांस्कृतिक बुद्धिमत्ता शिकताना दीड मिनिटांचा पाॅज याबद्दल नेहमी सांगतात.
Unwanted Outcome टाळण्यासाठी या पाॅजचा उपयोग होतो.
तुम्ही कोणत्या संस्कृतीत वाढलात त्यावर या पाॅज घेणा-याला लेबल्स लागतील.
कुणी बावळट म्हणेल, कुणी कुंपणावर बसणारा कुणी म्हणेल अंदाज घेतोय तर कुणी म्हणेल मोठ्याची बाजू.
कुणाला वाटेल मंद आहे, अज्ञानी आहे, आत्मविश्वास कमी आहे.
भावनिक बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता यामध्ये हा पाॅज जागरूकता घेऊन येतो.
उत्तम भावनिक बुद्धिमत्ता असेल तर आपल्याला नेमकं समजतं कशाने आपण ट्रिगर होतो. केव्हा आपल्याला पाॅज घ्यायचाय.
उत्तम सांस्कृतिक बुद्धिमत्ता असेल तर आपण या पाॅजला Context मध्ये बदलू शकतो.
जिथे EQ संपतो तिथे CQ सुरू होतो.
नव्वद सेकंदाच्या वेळेत आपण इगो बाजूला ठेवू शकतो, आपल्याला जे वाटतंय त्या भावनेला नाव देऊ शकतो. जे घडलंय आणि घडू शकतंय याचा विचार करू शकतो. तडकाफडकी नको ते शब्द बोलून मन दुखावण्यापेक्षा थोडं थांबून चित्त था-यावर आणू शकतो.
थोडं स्लॅन्ग बोलायचं झालं तर छोट्या बापाचं झाल्यानं काही बिघडत नाही. Impulsive react केल्याने होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
फक्त थोडंसं गप्प तर रहायचंय.
थांबून उत्तर द्यायचंय.
‘पाॅवर ऑफ पाॅज ‘ म्हणतात याला.
खूपदा ओठावर येतं की याला उपरोधाने काही बोलावं, सुनवावं, झाडून काढावं,शाळा घ्यावी.
हा क्षणिक मोह टाळायला हवा.
आपले इमोशनल ट्रिगर्स आपल्याला समजायला हवेत. इतका प्रामाणिकपणा स्वतःला दाखवायला हवा.
दीड मिनिटं म्हणजे नव्वद सेकंद थांबायचं.
विचार करायला वेळ घ्यायचा. रिॲक्ट न करता रिस्पाॅन्ड करायचं.
कुणाला लगेच उत्तर न दिल्याने कमीपणा येत नसतो.