माणसं: साधी आणि फोडणीची.. भाग चार
*******
-मिथिला सुभाष
मोहनने घाईने हात मागे घेतला आणि संकोचाने म्हणाला, बनियन आहे!
“बनियन? मंदाकिनीसाठी बनियन?”
मोहन लाजत म्हणाला, म्हणजे.. ते.. मोठ्या बायका पोलक्यात घालतात ना.. ते बनियन..
सगळ्या बायका चेकाळल्यासारख्या हसायला लागल्या. कोणीतरी त्याच्या हातून ते पुडकं हिसकावलं.. या गोंधळात ते उघडलं आणि त्यातून अतिशय सुंदर अशी लाल लेसची ब्रा बाहेर आली. सगळ्या खिदळत होत्याच, मोहन पण आता खुश झाला. “छान आहे ना, छान आहे ना” असं सगळ्यांना विचारायला लागला. सगळ्या बसलेल्या बायांत सासूबाई भयंकर खट्याळ! त्यांनी विचारलं, मेल्या, भैताडा, माप कुठून आणलंस रे तिचं?
मोहन निरागसपणे म्हणाला, मला माहितीये, मी बघितलंय ना तिला..
“अरे पण दुकानात माप सांगितलंस कसं?”
मोहनने दोन्ही हातात फळं धरल्यासारखे हात केले आणि म्हणाला, असं दाखवलं..
सासूबाईंनी त्या दोघांवरून भाकरतुकडा ओवाळला, पापण्यांना पाण्याचं बोट लावलं आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या, ये..
आणि तेवढ्यात कुठूनसा तो बोलतच आला-
“मुंबई दादा, तू मंदाकिनीशी नाय ना लग्न केलं?”
आसपास उभे असलेले सगळे दीर, दोघी जावा, मुलं, सासू-सासरे मोठ्याने हसले. तिचंही सालसपणाचं बेअरिंग एकदम गळून पडलं आणि तिनं मान वर करून बघितलं..
पाच फुटी बटू मूर्ती, काळा मस रंग. विरळ झालेले कुरळे केस. चाळीशीची उमर आणि अंगात आसपास उभ्या असलेल्या कुठल्यातरी भरभक्कम दिराचे कपडे. कमरेवर नाडीने आवळलेली पँट. हाफ बुशशर्टच्या बाह्या कोपराच्या खाली आलेल्या. चेहऱ्यावर प्रसन्न, मनमोकळं हसू आणि वटारल्यासारखे मोठ्ठे नितळ डोळे.
तेवढ्यात मोठ्या वहिनी म्हणाल्या, “नाही हो मोहन भाऊजी, मंदाकिनीशी कसं करतील? त्यांनी कुठल्यातरी साध्याच मुलीशी लग्न केलंय.” मोहनने ‘तिच्या’कडे पाहिलं आणि म्हणाला, “साधी नाय, बावळट दिसते ही!” ‘ती’ चमकली, दुखावली.. तिच्या नवऱ्याने हळूच तिच्या कानात सांगितलं, “लक्ष नको देऊ, वेडा आहे तो..”
हळूहळू तिला कळलं, तो वेडा नाही, मूर्ख आहे.. आणि मूर्ख माणसं असतात तसा आगाऊ आहे. पण मनाने निर्मळ आहे. त्या एवढ्या मोठ्या घरातला feel good factor होता तो. काहीही बोलायचा पण सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा. तिचं लग्न थोडं जुनं झाल्यावर त्याने सांगितलं,
“मुंबईच्या वहिनीबाईसाहेब, मी घाबरलो होतो. मुंबईदादा मंदाकिनीशी लग्न करतात की काय.. पिच्चर लायनीत होते ना दादा.. माझी तयारी फुकट गेली असती..”
“तुम्ही तयारी केलीये लग्नाची?” तिनं विचारलं.
“हो..” असं म्हणून तो दडदड जीना उतरून खाली गेला. जिन्याच्या खाली त्याचा संसार होता. त्यातली एक मळकी पिशवी घेऊन आला. त्यात मंदाकिनीचे शेकडो फोटो होते. त्यातूनच त्याने एक कागदी पुडा काढला आणि संकोचाने हातात ठेवला. ती म्हणाली, दाखवा ना मोहन भाऊजी, काय आणलंय मंदाकिनीसाठी.. तो थोडा वेळ टंगळमंगळ केल्यावर म्हणाला, तुम्हाला नाही आवडणार. तोपर्यंत तिच्या दोन जावा, सासू आणि धाकटी नणंद तिथे येऊन बसल्या. फावल्या वेळात मोहनला उचकवून त्याचं बोलणं ऐकण्याचा परिपाठच होता बायकांचा. सगळ्या त्याला आग्रह करायला लागल्या. नणंदेनं तर त्याच्या हातातला पुडा हिसकावायला घेतला. तेव्हा मोहनने घाईने हात मागे घेतला आणि संकोचाने म्हणाला, बनियन आहे!
“बनियन? मंदाकिनीसाठी बनियन?”
मोहन लाजत म्हणाला, म्हणजे.. ते.. मोठ्या बायका पोलक्यात घालतात ना.. ते बनियन..
सगळ्या बायका चेकाळल्यासारख्या हसायला लागल्या. कोणीतरी त्याच्या हातून ते पुडकं हिसकावलं.. या गोंधळात ते उघडलं आणि त्यातून अतिशय सुंदर अशी लाल लेसची ब्रा बाहेर आली. सगळ्या खिदळत होत्याच, मोहन पण आता खुश झाला. “छान आहे ना, छान आहे ना” असं सगळ्यांना विचारायला लागला. सगळ्या बसलेल्या बायांत सासूबाई भयंकर खट्याळ! त्यांनी विचारलं, मेल्या, भैताडा, माप कुठून आणलंस रे तिचं?
मोहन निरागसपणे म्हणाला, मला माहितीये, मी बघितलंय ना तिला..
“अरे पण दुकानात माप सांगितलंस कसं?”
मोहनने दोन्ही हातात फळं धरल्यासारखे हात केले आणि म्हणाला, असं दाखवलं..
सगळ्यांनी अभावितपणे आपापले पदर सावरले. पण मोहनचं तिकडे कुठेच लक्ष नव्हतं त्याच्या नजरेत फक्त मंदाकिनी होती. बाकीच्या सगळ्या त्याच्यासाठी ‘वहिनीबाईसाहेब’ ‘आईबाईसाहेब’ आणि ‘ताईबाईसाहेब’ होत्या!
असा होता मोहन. खूप पूर्वी जेव्हा ही मंडळी इथे स्थिरस्थावर होत होती तेव्हा त्यांनी दुदवडकर पतीपत्नीला आपल्यासोबत इथं आणलं. काका दुदवडकर गरीब होते पण हिशोबाच्या कामात चोख. ते आजोबांच्या व्यवसायाचा हिशोब ठेवायला लागले. आजोबांच्या नातवंडांच्या वयाची दोन मुलं होती दुदवडकरना. मोठा मोहन आणि धाकटी लीला. काकी दुदवडकर घरातल्या कामात मदत करायच्या. मोहन आणि लीला घरातल्या इतर मुलांच्या सोबत शाळेत जायचे. पण घरातली मुलं आणि लीला आठवी, नववी, दहावी, कॉलेजात जात होती तेव्हा मोहन सहावीत गटांगळ्या खात होता. पाचवीपर्यंत नापास करत नाहीत, म्हणून पठ्ठा सहावीत पोचला होता. आजोबा वारले. कारभार बाबांच्या हातात आला. आणि त्याच सुमारास एक वर्षाच्या अंतराने मोहनचे आई-बाबा पण वारले. काहीही न शिकलेला मोहन आणि अडनिड्या वयाच्या लीलाची जबाबदारी एकदम या कुटुंबावर आली. दोन्ही मुलांचे कुठलेच नातेवाईक त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. घरात दोन्ही मुलांचा लळा होता. दोघं घरच्यासारखी तिथंच राहायला लागली. अकरावी झाल्यावर घरच्या मुलीचं करावं तेवढ्या थाटात बाबांनी लीलाचं लग्न लावलं. ती भरल्या घरात गेली. तिचा जीव मोहनसाठी तुटायचा, पण ती सासुरवाशीण. माहेराला म्हणून यायची आणि मोहनच्या हातात काहीतरी देऊन जायची. समजुतीच्या चार गोष्टी सांगायची. पण समजून घेण्याची ऐपतच नव्हती त्याची. तो बांडगुळासारखा त्या घरात राहायला लागला. इथल्या सगळ्या भावांना पडेल ती कष्टाची मदत करायचा. डोकं नव्हतंच! पण घरात कधीच त्याचा अपमान झाला नाही. या भावातला एक भाऊ म्हणून तो अखेरपर्यंत राहिला. पण त्याचा वावर अतिशय प्रसन्न असायचा. एक-एक करत पाच भावांची लग्न झाली. आणखी दोघांची व्हायची होती. दोघी बहिणी परणून गेल्या.. खोल्या कमी पडायला लागल्या आणि मोहनची रवानगी जिन्याखाली झाली.
मुंबईवाला दादा मुंबई सोडून आला होता. काहीतरी स्वतंत्र सुरु करावं म्हणून त्याचे कर्जासाठी बँकेत खेटे असायचे. मोहन त्याच्या गाडीवर मागे बसून सगळीकडे त्याच्यासोबत जायचा. एक दिवस तो मुंबईवाल्या दादाला म्हणाला-
“मुंबईदादा, बँकेचा तो म्यानेजर तुझ्या ओळखीचा आहे न?”
“मग त्याच्या ओळखीने मला एखाद्या बँकेत म्यानेजरची नोकरी लावून दे ना!”
“तू मॅनेजर होणार बँकेचा?” दादाने चकित होऊन विचारलं.
“हो.. करतो काय तो, नुसत्या सह्या करतो. मला येते सही करता, करून दाखवू?”
दादा काय बोलणार होता?
मोहनचं खाणं अफाट होतं. त्याला कायम खा-खा सुटलेली असायची. घरातले दोघे-तिघे दांडगे भाऊ जेवढं जेवायचे तेवढं एकटा सिंगल फसली मोहन जेवायचा. मूर्खांना जास्त भूक लागते हे सगळ्यांनी मान्य केलं होतं. सासू-सासऱ्यांचा त्याच्यावर जीव होता. त्यामुळे त्याला शब्दाने बोलायची हिंमत नव्हती कोणाची. आणि तो होताही एवढ्या कामाचा की त्याच्या अनुपस्थितीत प्रत्येकाचं काहीतरी काम अडलं असतं. तो सासऱ्यांच्या डोक्याला तेल लावून द्यायचा. सासूबाईंच्या तळव्यांना काशाच्या वाटीने तूप लावून द्यायचा. घरातल्या सगळ्या पोरांना खांद्यावर, कडेवर बसवून, हाताला धरून शाळेत न्यायचा. गिरणीवर दळण ने, जास्तीचं दूध उकळवून ठेव, जावांच्या हाताला जात्यावर बसून भाजणी, तांदूळ दळ, त्यांचे माहेरी डबे पोचव.. घराच्या भोवती मोठी फुलबाग होती. त्यातली फुलं काढून देवांसाठी हार बनव.. ताईबीसाहेब आणि तिच्या मैत्रिणींना गजरे बनवून दे.. अशी एक ना अनेक कामं तो करायचा. ज्या-ज्या घरी जायचा तिथेही लोकप्रिय व्हायचा. जावांच्या माहेरून, भावांच्या मित्रांच्या घरून फोन यायचे, “बरेच दिवसात मोहनला पाठवलं नाहीत, बरा आहे ना तो?” त्याच्या या लोकप्रियतेचं कारण होतं त्याचं बोलणं! घरातले, जवळचे सगळे त्याच्या मूर्ख बोलण्याची मजा घ्यायचे, पण त्यावरून त्याची टवाळी करण्याचं धाडस कोणाकडे नव्हतं, त्याच्यासाठी सगळे भाऊ एक व्हायचे.
एकदा त्याला सासऱ्यांनी एक पत्र कोणाकडे पोचवायला दिलं. ती इमारत सात मजल्यांची होती आणि पहिल्या मजल्यावर पत्र पोचवायचं होता. याने खालून मजले मोजले. आणि ठरवलं, सगळ्यात वरचा तो पहिला.. त्या हिशोबाने आपण सामान्यजन ज्याला पहिला समजतो, तो मोहनच्या मते सातवा मजला. तो सात जिने चढून गेला आणि सासऱ्यांनी सांगितलेले गृहस्थ भेटले नाही म्हणून वापस आला. त्याला समजावून सांगता-सांगता सासऱ्यांच्या नाकी नऊ आले. ही अशी उदाहरणं जवळजवळ रोज व्हायची. एक दिवस धावत आला आणि म्हणाला, “वहिनीबाईसाहेब, तिकडे गावाबाहेर एलायची कॉलोनी बनतेय, तिकडे गरिबांना घरं मिळणार आहेत.” ती एलायची कॉलोनी म्हणजे ‘एलआईजी कॉलोनी’ हे कळायला आधी पाच मिनिटं गेली आणि मग तिथे गरिबांना घरं मिळणार म्हणजे कमी पैशात मिळणार हे त्याला पटेना. त्याचं म्हणणं, तसं कुठे लिहिलंय? फक्त गरिबांना घरं मिळणार एवढंच लिहिलंय! आणि मला आणि मंदाकिनीला संसार करायला एक घर तर पाहिजे ना? तिला जिन्याखाली कसं ठेवणार? कप्पाळ!!
त्याचं मंदाकिनी वेड हळूहळू वाढतच होतं. त्याच्या मते, ती फारच भोळी होती. झऱ्याखाली आंघोळ करतांना तिला हेही कळलं नाही की आपण एकपदरी साडी नेसलोय आणि भिजल्यावर आपलं सगळं दिसेल! त्यामुळेच तर त्याने तिच्यासाठी ‘बनियनबॉडी’ आणली होती.. खूपशा ओढण्या पण आणल्या होत्या.
त्याचं वय वाढत होतं. मंदाकिनीला भेटण्यासाठीची आतुरता शिगेला पोचली होती. मग घरातल्या भाऊ-वहिनी टोळक्याने ठरवून त्याला मंदाकिनीच्या नावाने एक पत्र पाठवलं. त्यात लिहिलं की, “माझ्या सायबा, मी खूप गरीब आहे. घरच्या लोकांसाठी सिनेमामधे काम करते. माझ्या सगळ्या भावाबहिणींची लग्न झाली की मी तुझ्याकडे येईन आणि मग आपण लग्न करू!” त्यानंतर काय विचारता? मोहन नुसता ‘सुन सायबा, सुन’ वर ठेका धरत सगळी कामं करायचा.
माळावर इथेच उजाड विहिरीआड
वार्धक्य पांघरुन बसले वेडे झाड
एकदाच गेली सुगंधी वाट इथून
निष्पर्ण मनाला डोळे फ़ुटले आठ
किणीकरांच्या या रुबाईसारखी अवस्था झाली होती त्याची. त्याला भावांनी एक वॉकमन घेऊन दिला, त्यात मंदाकिनीची गाणी असणारी एक कॅसेट दिली. मोहन पूर्ण दिवस ती गाणी ऐकायचा. सेल संपले की हक्काने कोणाकडे तरी मागायचा. त्याला नाही म्हणण्याची इच्छा कोणालाच व्हायची नाही. या एका बाबतीत तो भाग्यवान होता, घरातल्या आबालवृद्धांचा लाडका होता! घरातल्यांना त्याच्याबद्दल कणव वाटायची. पण डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं होतं की तो वेडा अजिबात नाहीये, मूर्ख आहे फक्त! आणि त्याला औषध नाही!!
असाच एक दिवस, काहीही झालेलं नसतांना, त्याचा जीव गेला. घरच्या लोकांना कळलं तेव्हाही त्याच्या कानाला वॉकमन होता आणि त्यावर ‘सुन सायबा सुन’ सुरु होतं. सगळं कुटुंब त्याचं शांत मरण बघून थक्क झालं. ‘जग काय म्हणेल’ हा विचार फाट्यावर मारून त्याच्या अंत्ययात्रेत मंदाकिनीची गाणी वाजवली गेली. त्याने मंदाकिनीसाठी केलेली सगळी ‘खरेदी’ त्याच्यासोबत चितेवर गेली. त्याचे सगळे दिवस, सगळं कार्य व्यवस्थित केलं. एका नगण्य माणसासाठी सभ्य, सुशिक्षित लोक अश्रू ढाळत होते. तो दिसायला कुरूप होता, पण मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न हसू होतं. त्या दिवसापासून त्या कुटुंबात ‘सुन सायबा सुन’ हे गाणं ऐकूनही घरातल्या लेकी-सुना डोळ्याला पदर लावतात आणि भाऊ ‘डोळ्यात कचरा गेला’ म्हणत डोळे चोळतात!
मोहन दुर्दैवी होता की भाग्यवान?
(फोटो सौजन्य -गूगल)
…………………………………………………………
Sun Saiba Sun Pyar Ki Dhun Maine Tujhe Chun Liya- नक्की ऐका-क्लिक करा
हे सुद्धा नक्की वाचा –‘नारायणी’ नमोस्तुते! (भाग एक)- समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3Q23Cik
हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ (भाग दोन ) समोरील लिंकवर क्लिक करा –https://bit.ly/3Q9RVqc
अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते (भाग तीन ) समोरील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/3zUMAMW
……………………………..
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)