ही तर काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र करणारी मृत्यूघंटाच !

प्रवीण बर्दापूरकर  

‘अंगा पेक्षा बोंगा’ भक्षण केल्यावर अजगर अगदी किमान हालचाल वगळता प्रदीर्घ काळ निपचित पडून राहतो . २०१४च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून आपल्या देशातल्या काँग्रेस पक्षाची अवस्था अशी , निपचित अजगरासारखी झालेली आहे . देशाभिमानाची हिंस्र धार्मिकता निर्माण करणारी एकपक्षीय राजवट देशात येण्याचा धोका स्पष्ट दिसू लागलेला असताना काँग्रेसनं जागं होण्याची गरज आहे . सत्ताधारी भाजपचा प्रमुख विरोधक होण्याची शक्यता केवळ काँग्रेसमधेच आहे पण , दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष मोडून पडल्यातच जमा होत आहे तरी  त्याची काळजी बहुसंख्य काँग्रेस नेत्यांना नाही , असंच स्पष्ट दिसत आहे . लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्या पत्रकारांना ती आहे . या संदर्भात मुद्रित , इलेक्ट्रानिक्स आणि डिजिटल अशा सर्व माध्यमात अलीकडच्या कांही वर्षात प्रचंड मजकूर प्रकाशित झाला आहे ; सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यालाही तसंच वाटतं पण , काँग्रेस पक्ष काही जागा होत नाही . हे आठवण्याचं कारण उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून आता महिना उलटलाय . या पाचपैकी पंजाब , उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था अतिशय दारुण झाली . या केवळ तीनच राज्यात काँग्रेसनं जवळ जवळ शंभर जागा गमावल्या ; पंजाब राज्यातली तर सत्ताही गमावली तरी काँग्रेस पक्ष कांही खडबडून जागा होत नाहीये…

निवडणुका म्हटल्या की जय-पराजय होतच असतात पण , झालेल्या पराजयातून पुढच्या विजयाची बांधणी करायची असते , याचा विसरच काँग्रेसला २०१४नंतर पडला आहे . या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून महिना उलटायच्या आतच भाजप आणि आम आदमी पार्टी (आप ) या पक्षांनी गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकांची तयारीही सुरु केली आहे . गेल्याच आठवड्यात ‘आप’नं गुजरात राज्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकतांना अगदी तालुका स्तरापर्यंत मेळावे घेतले . या मेळाव्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे . अहमदाबादच्या कार्यक्रमात तर तुफान गर्दी झाली . गुजरात विधानसभा निवडणुकीत लढाई भाजपविरुद्ध काँग्रेस अशी नसेल तर भाजपविरुद्ध आप अशी असेल . या निवडणुकीनंतर  गुजरात राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप विधानसभेत दिसेल . दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकात ‘आप’नं उल्लेखनीय यश मिळवताना काँगेसचं अस्तित्व अतिशय क्षीण केलं आहे हे लक्षात घेता गुजरातमधे काँग्रेसच्याच जागा कमी होणार असाच याचा अर्थ आहे . गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातेत काँग्रेसनं भाजपसमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं ; असं जबरदस्त की भाजपला कशीबशी सत्ता संपादन करता आली होती . या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या गोटात अजून तरी शांतताच आहे . सध्या जी काही माहिती विविध पाहण्यातून हाती येते आहे त्यानुसार गुजरातमध्ये ‘आप’ला ५० ते ७० जागा मिळतील . याचाच अर्थ काँग्रेसच्या तितक्या जागा कमी होतील असा होतो . मात्र काँग्रेसला त्याबाबत काही देणं-घेणं आहे किंवा त्याची काळजी आहे हे काही अजून तरी जाणवलेलं नाही . गुजरात पाठोपाठ नागालँड , कर्नाटक , गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभांच्या निवडणुका लागतील ; त्याची तर जाणीव तरी काँग्रेसला आहे का नाही अशी परिस्थिती आहे .

काँग्रेस किती बेफिकीर पक्ष आहे याच्या एकेक हकिकती अरबी सुरस कथांनाही लाजवणाऱ्या आणि काँग्रेसमध्ये गंभीर व समंजस नेतृत्च कसं उरलेलं नाही हे सिद्ध करणाऱ्या  आहे . उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हरिश रावत असतील , असं जाहीर करण्यात आलं . पण , गलथानपणाचा कळस म्हणजे  हरिश रावत यांना पंजाब विधानसभा निवडणुकीचं प्रमुख करण्यात आलं . एका राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आपली निवडणूक सोडून दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची अशी राजकीय दिवाळखोरी काँग्रेसच नेतत्व करु जाणे . परिणामी हरिश रावत पंजाबला न्याय देऊ शकले नाहीत आणि उत्तराखंडला ते परत येईपर्यंत वेळ निघून गेली होती . दोन्ही मतदार संघात हरिश रावत यांना पराभवाला सामोर जावं लागलं . तिकडे काँग्रेसनं पंजाबातही सत्ता गमावली . कारण तिथे नवज्योतसिंग सिद्धू सारख्या मर्कटावर काँग्रेसनं विश्वास टाकला आणि पानिपत करुन घेतलं .

गेल्या महिनाभरात काँग्रेसला या पाच राज्यातील निवडणुकांत झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करण्यासही अजून वेळ मिळाला नाही . गेल्या सुमारे अडीच वर्षापासून काँग्रेस पक्ष न-नायक अवस्थेत आहे . पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर पक्षातले ज्येष्ठ २३ नेते आणि शीर्ष नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी , प्रियंका गांधी  व राहुल गांधी यांच्यातील धुसफूस पूर्वी होती तशीच पुढे चालू आहे . ना सोनिया गांधी पक्षाचं नेतृत्व सोडायला तयार आहेत ना या २३ नेत्यांपैकी कुणीतरी ठामपणे पुढं येऊन पक्षाचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे , अशी ही बेबंदशाही आहे . महाराष्ट्रातले पक्षाची आमदार दिल्लीत ठाण मांडून हंगामी अध्यक्षांची भेट मागतात आणि ती मिळण्यासातही त्यांना बारा  दिवस वाट पहावी लागते , हे पक्षात किती शैथिल्य आहे याचंच लक्षण मानायला हवं . पक्षात आपल्या विरोधात असंतोष असेल(च) तर श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवायला हवं . असं धाडस न दाखवून आणि हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा केवळ आव आणून श्रीमती सोनिया गांधी फार मोठी चूक करीत  आहेत .  त्याचे परिणाम काँग्रेसला आणखी भोगावेच लागतील . पक्षाचं कवच नसेल तर भाजप सरकार आपल्यावर कांही कारवाई करेल अशी तर धास्ती सोनिया गांधी यांना वाटत नाहीये ना , अशी कुजबूज मोहीम आता सुरु झाली आहे ते त्यामुळेच .

दुसरीकडे  जी-२३ गटातील नेत्यांत  देशव्यापी म्हणावा असा चेहरा कुणीच नाही . एखाद दुसरा अपवाद वगळता यापैकी एकही नेता स्वबळावर त्याच्या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही तरी यातील कांही नेत्यांचा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं  नेतृत्व सोपवण्याला विरोध आहे . मात्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकटे राहुल गांधीच ठामपणे उभे राहिलेले आहेत . म्हणूनच राहुल गांधी हेच पुढचं नेतृत्व असायला हवं अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना वाटतं . कारण गांधी नावाचा करिष्मा अजूनही जनमानसावर कायम आहे आणि तोच करिष्मा सत्तेच्या मार्गावर नेऊ शकतो असं  बहुसंख्यांना वाटतं .  पुष्पा मुंजियाल या  ७८ वर्षांच्या वृद्धेनं तिची सर्व संपत्ती पक्षकार्य करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नावे केली असल्याची माहिती काँग्रेसच्या हॅंडलवर प्रकाशित झाली आहे ; असा गांधी घराण्याचा करिष्मा आहे .  तरी , जर ‘गांधी नेतृत्व’ निवडणुकीत विजयी होण्यासाठी परिणामकारक ठरत नसेल अशी भावना   जी-२३ नेत्यांच्या मनात प्रबळ झालेली असेल तर त्यांनी एक तर गांधी नावाचं जोखड काँग्रेसच्या मानेवरुन फेकून द्यायला हवं . त्यासाठी अतिशय योग्य वेळ हीच आहे . ती हिंमत नसेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व मुकाटपणे स्वीकारावं आणि ते हांकतील त्या दिशेनं आजवर केलं तसं मार्गक्रमण करावं . पण , तसंही घडत नाही . हा पक्ष म्हणजे सगळा घोळात घोळ झालेला आहे . त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्ष अधिकाधिक विकलांग होत चाललेला आहे . या पक्षात चैतन्य आणायचं असेल तर हे असं निपचित पडणं सोडून द्यावं लागेल आणि नव्या जोमानं कामाला लागावं लागेल अन्यथा राजकीय अभ्यासकांवर , या देशात काँग्रेस नावाचा पक्ष कधी काळी होता , असे केवळ दाखले देण्याची वेळ नजीकच्या भविष्यात  येऊ शकते .

भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘इलेक्शन मोड’मध्ये असतो असं नेहमीच म्हटलं जातं . यात जशी टिका आहे तसं कौतुकही . एक राजकीय पक्ष म्हणून भाजपनं  असं ‘इलेक्शन मोड’मध्ये असणं हे हा पक्ष जागरुक असण्याचं लक्षण आहे . गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास अजून काही महिन्यांचा अवधी असला तरी भारतीय जनता पक्षानं पत्ते पिसायला सुरुवात केलेली आहे . देशाच्या विविध भागातील कार्यकर्ते गुजरातेत डेरेदाखल व्हायला सुरुवात झालेली आहे ; हिसाब-किताब ‘सेटल’ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . कर्नाटकात हिजाब , विशिष्ट धर्माच्या लोकांच्या दुकानातूनच खरेदी वगैरे भावनिक मुद्द्यांची मोहीम राबवून वातावरण निर्मिती सुरु करण्यात आली आहे .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बळकट होत जाणं म्हणजे संघाचा राजकीय मुखवटा असलेल्या भाजपचा विस्तार होणं आणि भाजपचा विस्तार होऊन सत्ताधारी  होणं म्हणजे संघाचा अजेंडा राबवलं जाणं , असं समीकरण असतं . असा परस्पर संबंध जोडल्याचं संघ आणि भाजपला आवडत नसलं तरी , हे सख्खं समीकरण आजवर अनेकदा स्पष्ट झालेलं  आहे . अयोध्येचं राममंदिर किंवा काश्मीरचा स्वायत्त दर्जा काढून घेणं , असे अनेक दाखले त्या संदर्भात देता येतील . म्हणून एक आकडेवारी देतो . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियंत्रण करणारी सर्वोच्च , अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक नुकतीच कर्णावती येथे पार पडली . या बैठकीचा अहवाल आता माझ्यासमोर आहे . त्यानुसार मार्च २०२१ मध्ये संघाच्या देशभरात ५५ हजार ६५२ शाखा होत्या त्या मार्च २०२२ मध्ये ६० हजार ९२९ वर पोहोचल्या आहेत . मार्च २१ ते २२ या काळात देशातील जवळजवळ ४ हजार नवीन गावात संघ पोहोचला आहे ,असं  ही आकडेवारी सांगते . याचा अर्थ गेल्या वर्षभरात संघाचा विस्तार झालेला आहे आणि तो भाजपच्या पथ्यावर पडणारा आहे हे वेगळं सांगायला नको .

याच काळात काँग्रेस पक्ष देशात अधिकाधिक निष्क्रिय , निपचित होत गेला ; साधा नेतृत्वाचा प्रश्न या पक्षाला सोडवता आलेला नाही ; उलट धूसफूस वाढली आहे आणि त्यातून संघटनात्मक  वीण उसवतच चाललेली  आहे . आव्हानांच्या यादीत ‘आप’ची भर पडली आहे . गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ जर खरंच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला तर काँग्रेसला पर्याय म्हणून लोक ‘आप’कडे पाहत आहेत या समजावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते तर काँग्रेसचं अस्तित्व देशात नाममात्र करणारी , काँग्रेसनं स्वत:च वाजवलेली ती मृत्यूघंटाच  ठरेल !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleभयगंड बाळगत खिडक्या बंद करण्याचे दुष्परिणाम
Next articleहौस.. बाग फुलवण्याची!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. अगदी खरयं आप पक्ष स्वतःच काम त्या ताकदीने करून दाखवतयं…..कॉंग्रेसला पूर्वीसारख नेतृत्व राहीलेल नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here