राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी प्राप्त झाली असं म्हणणं आजच योग्य ठरणार नाही मात्र , निश्चेष्ट पडलेल्या या पक्षात चेतना जागवली गेल्याचं अनुभवायला मिळत आहे . महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या मार्गावरुन आतापर्यंत चालली तिथे तरुणांचा भरभक्कम आणि व्यापक प्रतिसाद मिळाला आहे . अनेकदा शेकडो तर अनेकदा हजारो स्थानिक तरुण या पदयात्रेत सहभागी होतं असल्याचं दृष्टीस पडत आहे . शिवाय काँग्रेसपासून विविध कारणाने दुरावलेले राजकीय पक्ष आणि अराजकीय संस्था-संघटना या पदयात्रेशी जोडल्या गेल्याचं दिसून आलं . याचा एक अर्थ दुरावलेल्यांना जवळ करण्याचं कामही राहुल गांधी यांची पदयात्रा करत आहे . या पदयात्रेला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना किती जनाधार असलेल्या आहेत , याच्या तपशिलात जाण्याचा वावदूकपणा करण्याचं काहीच कारण नाही . कारण एक एक काडी जोडूनच शेवटी मोळी तयार होत जाते हे विसरता येणार नाही .
पुन्हा एकदा सांगतो , देशात आज बेरोजगारी , रुपयांचं अवमूल्यन , मातीमोल होणारी कृषी व्यवस्था , वाढती बेरोजगारी अशा अनेक मूलभूत प्रश्नांची चर्चाच होत नाही . हे प्रश्न विचारणारे पत्रकार नाहीत आणि समजा कुणी पत्रकार त्यासाठी सज्ज झाला तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी उपलब्ध होत नाहीत अशी स्थिती आहे . मंदिर , काश्मिरचा स्वायत्त दर्जा काढणं , देशातून विरोधी पक्ष संपवणं भाषा ( की धमकी ? ) उघडपणे होणं आणि त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्नही होणं , यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा प्रवास एक पक्षीयत्व आणि बहुमताकडून धार्मिकतेच्या आधारावर बहुसंख्याकवादाकडे होणं , असे धोके उभे राहिलेले आहेत . हे कुणाही संवेदनशील लोकशाहीवादी माणसाला समजतं . या धोक्याच्या विरोधात फार कमी लोक निर्भयपणे बोलतात , त्यात आघाडीवर राहुल गांधी आहेत . अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधात उघडपणे आणि बेडरपणे भूमिका घेणारे राहुल गांधी हे एकमेव राजकीय नेते आहेत .