ख्रिस्ती समाजातील जाती आणि जमातीच्या कथा  

-कामिल पारखे

मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.

केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगीजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समूळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.

रॉबर्ट डी नोबिली

दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.

देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व – वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या – जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा – १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.

    या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर’ असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.

राजकुमारी अमृत कौर

इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदू व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशू ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ”नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,” असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.

ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.भारतात उच्चवर्णीय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.

  ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला. त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.

मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे. मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

Dulip singh

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स’ चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार. रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती. पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.

अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील.“सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ” ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.

यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन’ ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे साळी समाजाचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.

कोर्नेलिया सोराबजी

अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.

विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो. असे असले तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात जातीभेद मात्र नाही, असे ठोसपणे म्हणता येते.

तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleहात् तिच्या ऋतू व्हावला वाटतं…!
Next articleअसमंजस आणि पिसाटलेली माध्यमे…  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.