ग्रेप्स ऑफ रॉथ:एका महान कलाकृतीचा सकस व सरस अनुवाद

 

-किशोर देशपांडे   

दक्षिण-मध्य अमेरिकेत ‘ओक्लाहोमा’ नावाचे घटक राज्य आहे. त्या राज्याच्या विस्तीर्ण ग्रामीण भागात, फारशा उपजाऊ नसलेल्या अनेक शेतजमिनी होत्या. त्या शेतजमिनींच्या तुकड्यांवर शेकडो खंडकरी व कष्टकरी अशी शेतकरी कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत होती. कोणाजवळ तीस-चाळीस तर कोणाजवळ साठ-सत्तर एकर अशा जमिनी, वहितीसाठी जमीन-मालकांनी कुळहक्काने दिलेल्या होत्या. आपापल्या जमिनीवरच घरे बांधून ती शेतकरी कुटुंबे जगत होती. ते लोकं अल्पशिक्षित किंवा अगदीच अशिक्षित असले तरीही कष्टाळू, पापभीरू, नम्र, आतिथ्यशील, नृत्य व संगीतप्रेमी आणि एकमेकांना जिव्हाळ्याने धरून राहणारे होते. ते गरीब आणि नम्र असले तरीही स्वाभिमानी देखील होते. गुन्हेगार, लाचार अथवा कामचुकार नव्हते.

   एकोणीसशे तीस ते चाळीसच्या दशकात त्या परिवारांजवळ असलेल्या शेतजमिनींचा ‘कस’ खालावत चालला होता. निसर्गाचा लहरीपणा आणि अकस्मात उद्भवलेली धुळीची वादळे यांनी त्यांच्या पिकांची धूळधाण करून टाकली होती. जमीन-मालक जरी दूर शहरात राहात असले तरीही ते माणसंच होते. त्यामुळे, त्यांच्यापैकी अनेकांना या कुळांची कणव वाटूनही कर्जबाजारीपणामुळे नाईलाजास्तव त्या मालकांनी कुळांच्या ताब्यातील शेतजमिनी बँकांच्या आणि मोठ्या कंपन्यांच्या हवाली करून टाकल्या. तिथे कुळ-सरंक्षण कायदा नव्हता. बँका आणि कंपन्या हृदयहीन होत्या. त्यांना फक्त गणिती डोकं होतं आणि नफा हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. या नव्या मालकांच्या Tractors नी, शेतजमिनीत घुसून कुळांच्या घरांसकट त्या नांगरल्या आणि हजारो परिवार विस्थापित होऊन देशोधडीला लागले. त्यांच्या कानावर बातम्या येत होत्या की २००० मैल दूर पश्चिमेकडे असलेल्या ‘कॅलिफोर्निया’ नावाच्या घटक राज्यात मोठमोठे हिरवेगार फळांचे बगीचे, ऊस आणि कपाशीची शेती आहे. तसेच त्या भागात द्राक्ष, सफरचंद, पीच इत्यादी फळांची आणि ऊसाची तोडणी करण्यासाठी आणि कपाशी वेचण्यासाठी पुष्कळ मजुरांची गरज असते. अचानक झालेल्या या विस्थापनामुळे गांगरून गेलेले, रुष्ट झालेले परंतु निराश नसलेले हे हजारो परिवार, महामार्ग क्रमांक सहासष्ट (Route 66) वरून जुन्यापुराण्या मोटारगाड्यांमधून जवळचे उरलेसुरले सामान घेऊन कासवगतीने पश्चिमेकडे प्रवास करू लागले. या प्रवासात त्यांना अनेक डोंगर आणि वाळवंटही पार करावे लागले. जवळची तुटपुंजी रक्कम संपून गेली. परिवारातले काही सदस्य मरण पावले, तर काही एकटेच अनोळखी वाटेने निघून गेले.

   ओक्लाहोमा व त्याच्या आसपासच्या राज्यांमधून असे लाखो विस्थापित परिवार कॅलिफोर्नियामध्ये कामाच्या शोधात उपाशीपोटी वणवण भटकू लागले. स्थानिकांना प्रथम त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली. पण विस्थापितांच्या जत्थ्यांची संख्या जसजशी फुगू लागली तसतसे त्या सहानुभूतीचे रूपांतर भय, असुरक्षितता, संताप, विरोध आणि प्रतिकारामध्ये होऊ लागले. तिथल्या फळबागांचे व शेतांचे व्यवस्थापक पुरवठा वाढल्यामुळे मजुरीचे दर खाली-खाली आणत राहिले. पुष्कळदा तर उपासमारीने गांजलेल्या आणि वणवण करून थकलेल्या अनेक विस्थापितांनी केवळ एका पावाच्या तुकड्यासाठी दिवसभर कष्ट उपसले. तिथे किमान वेतन किंवा रोजगार हमीचे कायदेही नव्हते. ‘उदारमतवादी लोकशाही’ देशातली मुक्त अर्थव्यवस्था तेवढी होती. विस्थापितांचे आपसांत संघटन होऊ नये यासाठी मालक/व्यवस्थापक सतर्क राहत असत आणि कोणी असे संघटन करू पाहिल्यास ते त्यांना ‘लालभाई’ (Reds) म्हणून बदनाम करीत व तुरुंगात टाकत अथवा त्यांचा खात्मा करत.

  अशा लाखो विस्थापित कष्टकरी परिवारांपैकी, एका ‘जोड’ आडडनावाच्या परिवाराची कहाणी जॉन स्टाइनबेक यांनी ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीत सांगितली आहे. त्यांची ही कादंबरी बहुस्तरीय आहे. एका पातळीवर जशी ती ‘जोड’ अडनावाच्या कुटुंबाची कहाणी आहे, तशीच दुसऱ्या पातळीवर ती लाखो विस्थापितांच्या वेदनांची, जगण्याच्या धडपडीची, चिकाटीची, सहकार्याची आणि पराभवाचीही कथा आहे. तिसऱ्या एका पातळीवर, स्टाइनबेक यांनी अनियंत्रित भांडवलशाहीतून उद्भवलेले व केवळ नफ्यासाठी होत असलेले औद्योगीकरण अमानुषतेकडे कशी वाटचाल करते, याचे सूचनही पार्श्वभूमीवर सातत्याने केले आहे.

कादंबरीतील प्रत्येक पात्र हे थोडक्या पण नेमक्या शब्दांत चितारले आहे. कादंबरीच्या रंगमंचावर त्या-त्या प्रसंगास धरून एकेक पात्र ठळक होते आणि पुन्हा अलगदपणे मागच्या पुसट अंधारात सरकून आपल्या अस्तित्वाचा विसर मात्र पडू देत नाही.   ‘मा’ (आई) हे या कादंबरीतील सर्वात विलोभनीय पात्र आहे. नवरा (पा), सासू, सासरा, दीर, चार मुलगे, दोन मुली, एक जावई आणि त्या कुटुंबासोबत लटकत चाललेला ‘उपदेशक’ असा हा भला मोठा परिवार मा स्वतःच्या उपजत शहाणपणाने आणि जिव्हाळ्याने तोलून धरते. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला ती पूर्णपणे ओळखून असते आणि त्या प्रत्येकाशी तिचे स्वतंत्र नाते असते. त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणे आणि त्यांच्या भल्यासाठी दिवसरात्र झटत राहणे हेच तिचे ध्येय असते. एरवीच्या कुटुंबातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम स्थान स्वीकारून पतीच्या मागे उभी राहणारी मा, अटीतटीच्या प्रसंगी मात्र कर्ते पुरुष हतबुद्ध झाल्याचे दिसून येताच केंद्रस्थानी येते आणि उपलब्ध परिस्थितीत योग्य मार्ग सुचवते. त्यावर अंमल करण्यासही कुटुंबास भाग पाडते. प्रसंगी पतीच्या टोमण्यांना आणि मारहाणीच्या क्षीण धमक्यांना हसण्यावारी नेऊन अतिशय समजूतदारपणे त्याचा ‘इगो’ही सांभाळते. कुटुंबातले पुरुष बिकट प्रसंगी कोलमडून, खचून जाऊ नयेत यावर तिचा कटाक्ष असतो. ‘मा’मध्ये वात्सल्यासोबतच सोशिकता, कल्पकता, कष्टाळूपणा, स्वाभिमान आणि ‘ग्रेस’पण आहे.

  कादंबरीतील अखेरचा एक प्रसंग सांगण्याचा मोह मी येथे आवरू शकत नाही. ‘जोड’ परिवारातील विवाहित मुलगी ‘रोझ ऑफ शेरॉन’ ही विस्थापनाच्या वेळी गर्भवती असते आणि तिच्या पतीसह ती या परिवारासोबत कॅलिफोर्नियात आलेली असते. तिचा पती तिला सोडून गुपचूप निघून जातो. तिचे तिन्ही तरूण भाऊसुद्धा परिवारापासून तुटून आपापल्या अनोळखी वाटांवर निघून गेले असतात. तिच्या बाळंतपणाच्या वेळी तो परिवार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात एका ‘बॉक्सकार’ मध्ये दाटीवाटीने राहत असतो. मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला असतानाच व बॉक्सकारमध्ये पाणी साचले असताना ‘रोझ ऑफ शेरॉन’ मृत अर्भकास जन्म देते. तिचा काका त्या अर्भकाला वाहत्या पाण्यात सोडून येतो आणि पुरले म्हणून सांगतो. रोझ, तिची मा, तिचे पा, काका आणि लहान भाऊ-बहीण तशाही अवस्थेत बाहेर पडून कंबरभर पाण्यातून रस्त्यावर चालत राहतात आणि कडेच्या टेकाडावर दिसलेल्या एका जुनाट गोदामात शिरतात. तिथे त्यांना एक सुमारे पंचावन्न वर्षांचा माणूस मरणासन्न अवस्थेत पडलेला व त्याचा लहान मुलगा शेजारी बसून असलेला दिसतात. मुलगा त्यांना सांगतो की त्याच्या ‘पा’नी सहा दिवसात काहीही खाल्ले नाही आणि आजच त्याने कुठूनतरी एक पाव चोरून त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उलटी केली. त्यांना सूप किंवा दुधाची गरज आहे. रोझ आणि तिची मा अर्थपूर्ण नजरेने एकमेकींकडे खोलवर पाहतात. कुटुंबातल्या इतर सर्व लोकांना त्या मुलासह बाहेर पडायला सांगतात. मा बाहेरून दार बंद करून घेते. रोझ हळूहळू चालत त्या माणसाशेजारी पहुडते आणि अतीव करुणेने त्याला आपले दूध पाजते. बाळंतपणापर्यंत अल्लडपणे स्व-केंद्रित राहणाऱ्या व बाळाच्या भविष्याची स्वप्ने पाहत राहणाऱ्या रोझ ऑफ शेरॉनचे त्या आणीबाणीच्या क्षणी पूर्ण करुणामयी ‘मा’ मध्ये रूपांतर होते. कादंबरी इथेच संपते.

  अशी ही जनसामान्यांच्या ‘लौकिक’ जगण्याची ‘अलौकिक’ कथा लेखकाने साकारली आहे. या कादंबरीच्या सुमारे दीड कोटी प्रती इंग्रजीत खपल्या आहेत. जॉन स्टाइनबेक यांना १९६२ साली त्यांच्या एकूण साहित्यिक योगदानाबद्दल ‘नोबेल’ पारितोषिकही मिळाले. अनेक भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. या कादंबरीवर चित्रपटही निघाला आहे .खरे तर बऱ्याच वर्षांपूर्वी मी ही कादंबरी वाचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यातील विस्थापितांच्या व ग्रामीणांच्या तोंडी असलेल्या बोलीभाषेमुळे (Slang) मला ती समजणे जड गेले. परंतु, मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला आणि ‘रोहन’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला तिचा अनुवाद इतका सहज, सरस, सकस आणि सक्षम झालेला आहे की आपण जणू मूळ कादंबरीच वाचत आहोत असे सारखे वाटत राहते. अनुवादकाने वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलभाषांचा खुबीने वापर करून त्यांचा ‘झोक’ही उत्तमपणे सांभाळला आहे. स्वतः मिलिंद चंपानेरकर अनेक वर्षे वऱ्हाडात राहिले होते. शिवाय या अनुवादावर मान्यवर साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांचाही संस्कारी हात फिरलेला आहे. त्यामुळे वऱ्हाडी ‘ठेचा’ आणि ठसका छान जुळून आलाय. अनुवादकाच्या मनोगतात मिलिंद चंपानेरकर म्हणतात त्याप्रमाणे, मिश्र-वऱ्हाडी व अमेरिकन खेडेभागातील कादंबरीत वापरलेली ‘वर्गबोली’ यांच्यात त्यांना एक नाते असल्याचे जाणवते, विशेषतः अभिव्यक्तीच्या बाबतीत. त्यांचे ते मनोगत देखील वाचनीय आहे. लेखकाइतक्याच संवेदनशीलतेने अनुवादकही कादंबरीतल्या पात्रांच्या जाणीवेत खोलवर शिरलेला आहे, असेच पुस्तक वाचता वाचता सतत जाणवत राहते.

  असे असले तरी एक कुतूहल कायम राहते की, या सर्व लाखो विस्थापितांचे पुढे काय झाले असेल? त्याबाबत नेमकी माहिती प्रस्तावनेत आली असती तर बरे झाले असते. कष्टकरी गरीबांच्या ‘स्वाभाविक’ एकजुटीबद्दल जो दुर्दम्य आशावाद लेखकामध्ये दिसून येतो, तसे प्रत्यक्षात न घडण्यामागील कारणांची चिकित्साही व्हायला हवी.

  स्वातंत्र्योत्तर भारतात लगोलग जमीनदारी-निर्मूलन, कुळहक्क-संरक्षण, सीलिंग, किमान वेतन, रोजगार-हमी इत्यादी कल्याणकारी कायदे पारित झाले नसते आणि विदेशी भांडवलाला लगेच मोकळी वाट करून दिली असती तर आपल्याकडेही असेच कथानक घडले असते काय? सुमारे एक ते दोन कोटी आदिवासींचे विस्थापन आणि वाताहत तर हे कायदे असूनसुद्धा रोखता आलेले नाही. खेड्यापाड्यातील सुमारे साठ-सत्तर टक्के कृषकांचे विस्थापन टाळण्यास या कायद्यांनी हातभार लावला असणारच.

  चोखंदळ वाचकांनी आवर्जून वाचायला हवी अशी ही भव्य कादंबरी मराठीत आणल्याबद्दल अनुवादकाचे आणि प्रकाशकांचेही मनापासून आभार!

(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)

9881574954

The Grapes of Wrath | #TBT Trailer | 20th Century FOX

 

 

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here