धर्मप्रसारक की रोगप्रसारक

साभार:साप्ताहिक चित्रलेखा

-ज्ञानेश महाराव

देशातला ‘कोरोना’बाधितांचा २४ मार्चपर्यंतचा आकडा पाचशे होता. तो २८ तारखेपर्यंत एक हजार झाला.  त्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यामध्ये आणखी हजार रुग्णांची वाढ झाली. जगभरात धुमश्चक्री घालून भारतात आलेल्या ‘करोना’च्या वादळाने देश हादरून गेलाय. सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे,असे वाटत असतानाच दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात असलेल्या ‘तबलीग जमात’च्या धर्मप्रसार केंद्राच्या बातमीने  ‘कोरोना’ला आणखी एक  ओळख दिली. २/४ ‘कोरोना’बाधित सापडले तरी ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकते,अशा परिस्थितीत निजामुद्दीनची बातमी फुटली. या बातमीच्या पहिल्याच झटक्यात ७ जणांचे मृत्यू  , २४ पॉझिटिव्ह रुग्ण आणि साडेतीनशेच्यावर संशयित; असा ‘होलसेल’मध्ये आकडा जाहीर झाला.  त्यांच्यातले आणखी आठशेहून अधिक लोक क्वारंटाइन करावे लागले. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या ‘दिल्ली राज्य सरकार’ने  जवाहरलाल नेहरू स्टेडियमची मागणी केंद्राकडे केली. प्रकरण एवढेच असते तरी हरकत नव्हती. त्याहून गंभीर बाब म्हणजे, निजामुद्दिन इथे देशभरातून लोक आले होते. त्यातील बरेचसे इथे राहून  विविध राज्यांतील आपल्या घरी पोहोचले होते. ते ‘करोना’चे संशयित होते. त्यामुळे देशभर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली. ती नंतरच्या चार दिवसांत खरीसुद्धा ठरली. कारण देशभरात ‘तबलीग जमात’शी संबंधित ६५० लोकांना ‘करोना’ची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. ही साखळी कुठपर्यंत वाढत जाणार आहे, याचा अंदाज कुणालाच नाही. म्हणजे रोगाची साखळी तोडण्यासाठी २४ तारखेपासून देशभरातील लोकांनी कामधंदे सोडून स्वतःला घरात कोंडून घेतले आहे आणि या अर्धवटांच्या जमातीने आपल्या मूर्खपणामुळे देशभर रोगाचा फैलाव केला! त्यामुळे यांना धर्मप्रसारक म्हणायचे की रोगप्रसारक ?

त्यांच्या या कृत्यामुळे प्रत्येक प्रकरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याऱ्या रा.स्व.संघाच्या पिलावळीला भलताच  चेव आला. त्यातूनच चीनमध्ये जन्मलेला ‘कोरोना’ स्पेन-इटालीत वाढला,अमेरिकेत माजला आणि भारतात आल्यावर तो मुस्लीम झाला. अशाच प्रकारे ‘मोदी मीडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसार माध्यमांनी  निजामुद्दीन प्रकरण लावून धरले. परिणामी, ‘करोना’च्या प्रसाराचे सगळे खापर मुस्लीम समाजावर फोडण्यास त्यांनी सुरुवात केली. या ‘निजामुद्दीन रिटर्न’ तबलिगींमुळे महाराष्ट्रात इस्लामपूर, जामखेड वगैरे ठिकाणी मुस्लिमांना ‘करोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. ‘करोना’चा प्रसार वाढू नये, यासाठी देशभरात दोन आठवड्यांहून अधिक काळ कडेकोट व्यवस्था राबवली जात होती. तरीही देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत बेपर्वाईने कळस गाठला. निजामुद्दीन येथील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि तबलीग जमात केंद्राचे व्यवस्थापन या तिन्ही घटकांनी आठवडाभर घोळ घालून कागदी घोडे नाचवल्यामुळेच संकटाची तीव्रता वाढली.१४ व १५ मार्चला वसई येथे राज्य स्तरीय ‘तबलीग जमात’चे आयोजन होणार होते. ते तातडीने पावले उचलून ‘राज्य सरकार’ने रद्द करायला लावले. अशीच कारवाई दिल्ली पोलिसांनी केली पाहिजे होती. दिल्ली पोलीस हे ‘केंद्र सरकार’च्या अखत्यारीत येतात. म्हणजे या प्रकरणात ‘ठाकरे सरकार’च्या तुलनेत ‘मोदी सरकार’ कुचकामी ठरलं, हे स्पष्ट होतं.

निजामुद्दीन येथे ‘तबलीग जमात’चे ‘मरकज’ म्हणजे धर्मप्रसार केंद्र आहे. ‘तबलीग जमाती’ची स्थापना १९२७ मध्ये झालीय. या संप्रदायाचे जगभरात १५ कोटी अनुयायी आहेत. त्यांचा इस्लामचा प्रचार- प्रसार हा मूळ उद्देश आहे. ‘तबलीग’ म्हणजे ‘अल्लाच्या उपदेशाचा प्रचार’ आणि ‘जमात’ म्हणजे समूह. अर्थात, ‘अल्लाच्या उपदेशाचा प्रचार -प्रसार करणारा समूह.’ ज्या गावात मुस्लीम लोकवस्ती आहे, त्याठिकाणी हे तबलीग जमातीचे लोक धर्मप्रसारासाठी जात असतात. त्या गावातील जे मुस्लीम लोक धर्माचे काटेकोर आचरण करीत नाहीत, त्यांच्या गाठीभेटी घेऊन मुस्लीम धर्माच्या रीतिरिवाजांची माहिती देऊन आचरणाचा आग्रह धरतात. पाचवेळा नमाज पढण्यासाठी पाठपुरावा करतात. यासाठी  निजामुद्दीन येथील केंद्रातूनच देशातील वेगवेगळ्या भागांसाठी आठ ते दहा लोकांचे समूह निघतात. कमीत कमी तीन दिवस, पाच दिवस, दहा दिवस, चाळीस दिवस आणि चार महिने अशा कालावधीसाठी ते बाहेर पडतात. वर्षातून एकदा ‘तबलीग जमात’चा ‘इज्तेमा’ होतो. त्यात जगभरातील लाखो लोक सहभागी होत असतात. ‘तबलीग जमात’चे लोक मुस्लीम धर्मातील शिकल्या, सवरल्या सुधारणावादी लोकांचे डोके खाऊन त्यांना धार्मिक आचरणासाठी सतत टुमणे लावत असतात. हेच काम सनातन, हिंदू जनजागृती, श्रीराम सेना, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदि हिंदू संस्था- संघटना करीत असतात. त्यात ‘इंदुरीकर – वक्ते – आफळे’ बुवांसह त्यांच्या आवृत्याही आल्या. ख्रिस्ती, बौद्ध,जैन यातही शुद्ध धर्माचरण प्रचार-प्रसाराचे खूळ आहे. शिखांचाही ‘सच्चा डेरा’ आहे. धर्म संस्कार आणि धार्मिक रीती-रिवाज यांच्या माध्यमातून येणारी कर्मकांडे सर्वच धर्म व्यवहारात आहेत. कट्टरता आणि अंधश्रद्धाही आहेत. असो. पण हे  ‘तबलिगी जमाती’ अन्य धर्माविरोधात प्रचार किंवा इतर धर्मीयांना ‘इस्लाम कबूल’ करण्यासाठी तयार करण्याचे उद्योग करीत नाहीत. ‘तबलीग’मुळे कुठे धार्मिक हिंसाचार घडल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. त्यामुळे कोणत्याही देशाने ‘तबलिग’वर बंदी घातलेली नाही.

धर्मासाठी मेंदू कुलुप-बंद नको

 ‘तबलीग जमात’ प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, ‘निजामुद्दीन येथील केंद्रात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नव्हते. येथे वर्षभर लोक येत असतात आणि राहात असतात. दररोज सुमारे दीड-दोन हजार लोकांची आवक-जावक होते. ती बारा महिने चोवीस तास सुरू असते.’ याठिकाणी १५ मार्चपर्यंत सुमारे अडीच हजार लोक दाखल झाले होते. त्यामध्ये देशाच्या विविध भागांतील अठराशे आणि दिल्ली परिसरातील पाचशे लोकांचा समावेश होता. शिवाय, दोन-अडीचशे परदेशी लोक होते. ‘तबलिग जमात’चे तत्त्वज्ञान व त्यांचे काम भारतातील सर्वच मुसलमानांना पटत नाही. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या लोकांना धर्मासाठी एवढा वेळ देणे, हा मूर्खपणा वाटतो. त्यामुळे शहाणेसुरते मुस्लीम त्यांच्यापासून फटकून राहातात. त्यांच्या धर्म प्रचार कार्यातील कालबाह्यता किंवा अतिधार्मिकता याबाबत आक्षेप, मतभेद असले तरी ते काम विघातक नाही, याची खात्री सगळेच देतात. हे लक्षात घेतले की, देशभरातून ‘तबलीग जमात’ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ‘करोना प्रसारक’ ठरवण्यात आले, ते चुकीचे आहे. तथापि, धर्मपालनाच्या अतिआग्रहातून जे चित्र पुढे येते, त्याची जबाबदारी कोण घेणार?

संचारबंदीमुळे देवळे,चर्चेस, गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन देरासर बंद होती. तरी बऱ्याच मशिदींतून नमाजाचा घाट का घालण्यात आला? तो रोखणाऱ्या पोलिसांना विरोध का करण्यात आला? कोणत्याही धर्मापेक्षा देशाचा कायदा मोठा आहे, हे मुस्लिमांना कधी समजणार? कायदा मोडून लोकांच्या जिवाशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही. असा खेळ करणार्या शंकराचार्य-परमपूज्य-बुवा -बापू, शाही इमाम-मुल्ला-मौलवी, बिशप-फादर , भन्ते, जैन मुनींना तुरुंगाची हवा खावी लागलीय. शिखांचा धर्मगुरू समजणाऱ्या खलिस्तानवादी भिंदरावाले याचा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातच लष्करी गोळ्यांनी मृत्यू झालाय. हे सारं धर्मपालनासाठी  कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांनी एकदा समजून घ्यावे. निजामुद्दीन प्रकरणात ‘ तबलीग जमात’चीही एक बाजू आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जनता कर्फ्यू’ची घोषणा झाली ; त्या दिवसापासून- म्हणजे १९ मार्चपासून केंद्रात नव्याने प्रवेश बंद करण्यातआले. जे लोक केंद्रात राहात होते, त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरुवात झाली. मात्र परिस्थिती बिघडत गेल्याने २१ मार्चपासून काही मार्गांवरील रेल्वे गाड्या बंद झाल्या. दरम्यान, दिल्ली आणि जवळपासच्या दीड हजार लोकांना घरी पाठवले होते. त्यानंतरही एक हजार लोक शिल्लक राहिले होते.

‘देशव्यापी लॉकआऊट’ जारी झाल्यावर दिल्लीत २२ ते ३१ मार्चपर्यंत  खासगी वाहन मिळणेही बंद झाले. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशाचे पालन करून कुणालाही केंद्रातून बाहेर पाठवले नाही. पोलिसांकडे ‘कर्फ्यू पास’ची मागणी केली. त्यांनी उपविभागीय अधिकारीकडे जायला सांगितले. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी जिल्हाधिकारीकडे जायला सांगितले. यात बराच वेळ निघून गेला. ‘कर्फ्यू पास’ न दिल्यामुळे लोकांना त्यांच्या गावी पाठवता आले नाही.” स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि तबलीग केंद्राच्या व्यवस्थापनामध्ये पत्रव्यवहार सुरू होता. परंतु दिल्लीचे राज्य सरकार म्हणते की, ‘दोन दिवसांपूर्वी आम्हाला याची माहिती मिळाली.’ याचा अर्थ, स्थानिक प्रशासन आणि दिल्ली सरकार यांच्यातील विसंवादामुळे राजधानीतील हे मोठे ‘ब्लंडर’ घडले. ते नियंत्रणात आणता येणारे होते. परंतु निजामुद्दीन केंद्रातून जे लोक देशभर गावी निघून गेलेले होते, त्यांनी दहशत निर्माण केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी आपापल्या ठिकाणी दवाखान्यात दाखल व्हायला हवे होते. ते झाले नाही. त्यांना शोधावे लागले. त्यापैकी अनेकजण ‘करोना’बाधित झाल्याचे आढळून आल्याने आणखी किती जणांना त्यांच्यामुळे लागण झाली आहे, हा प्रश्न संपूर्ण देशाची काळजी वाढवणारा आहे. पण त्यासाठी समस्त मुस्लिमांना ‘कोरोना’ प्रसारक म्हणणे साफ चुकीचे आहे. देव-देऊळ बंद झाले, म्हणून मेंदूलाही कुलूप ठोकणे योग्य नाही.

संकटांचे थवे, मोदींचे दिवे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘टीव्ही’वर येणार असले की,लोकांच्या मनात धडकीच भरते. ‘करोना’चे संकट सुरू झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी तीन वेळा जनतेला संबोधित केले आहे. पहिल्यांदा ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा  करतानाच त्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. त्यानुसार वाजत-गाजत सार्वजनिक धिंगाणा झाल्यावर दुसऱ्या भेटीत तीन तासांचा अवधी देऊन देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली. त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे ३ एप्रिलच्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ‘व्हिडिओ’ संदेशाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ५ एप्रिलला लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले. ‘करोना’च्या संकट काळात केंद्र सरकारने सर्वच  आघाड्यांवर दिवे लावले आहेत. त्यामुळे या ‘दिवे लावणी’च्या आवाहनाची ‘सोशल मीडिया’वर यथेच्छ हजामत करण्यात आलीय. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केलीय. देश प्रचंड संकटात असताना दिवे लावण्याचा ‘इव्हेंट’ हा मूर्खपणा असल्याचा सगळ्यांचाच सूर आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीतही त्यांना इव्हेंट कसा काय सुचू शकतो, याबद्दलही सर्वांनाच आश्चर्य वाटते. प्रधानमंत्री मोदींच्या म्हणण्यानुसार, “पाच एप्रिलला ‘करोना’च्या संकटाला आव्हान देताना प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. रात्री ९ वाजता आपली फक्त ९ मिनिटे हवी आहेत. यावेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा ‘मोबाइल’ची फ्लॅशलाइट लावा.”

*मोदींनी आधी थाळ्या वाजवायला आणि नंतर दिवे लावायला तीन दिवसांचा अवधी दिला. ‘देशव्यापी लॉकआऊट’ जाहीर करताना मात्र अवघा तीन तासांचा अवधी दिला.* यावरून गंभीर संकटातही ते किती नियोजनशून्य व्यवहार करताहेत, हे  दिसून येते. ‘केंद्र सरकार’ची ढिलाई,  यंत्रणांतील त्रुटी आणि निष्काळजीपणा; याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये ; ते भलतीकडे वळावे यासाठी असे उपद्व्याप केले जातात. अचानक टाळेबंदी जाहीर केल्यानंतर देशभरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाची ससेहोलपट झाली. ते लोक आजसुद्धा राज्यांच्या सीमेवरील छावण्यांमध्ये अडकून पडलेत. रुग्णालयात ‘कोरोना’ तपासणीसाठी आणि बाधितांच्या  उपचारासाठी पुरेशी उपकरणे नाहीत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्याकडे पुरेशी सुरक्षितता साधने नाहीत. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पुरेसे नियोजन नाही. त्याकडे जनतेचे लक्ष जाऊ नये, यासाठीच मोदींची इव्हेंटबाजी चालली आहे आणि त्यांचे मूर्ख भक्त त्यांच्या प्रत्येक कृतीला ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून आपल्या महामूर्खपणाचे प्रदर्शन घडवीत आहेत.

(लेखक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

Previous articleसुपरहिरोचा सुपर-गोंधळ
Next articleजैन साधूंच्या ‘मुखपट्टी’चा वैज्ञानिक शोध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. उपरोक्त तिन्ही लेखाशी मी पूर्णपणे सहमत आहो. लेखन वास्तविक ते वर आधारित असून लेखातील सर्व मुद्दे अतिशय योग्य आहेत व मोदीजीं चा तात्काळ लॉक डाऊनमुळे जनतेची ससेहोलपट झाली हे सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे, त्यामुळे खरोखर जनता हवालदिल झाली मोदीजीँना लॉक डाऊन करायचे कराय चे च होते तर त्यांनी नियोजन करून दोन दिवस आधी इंतीमेशन देऊन सर्वांना बाहेर घेऊन जाण्याची सोय करून नंतर लॉक डाऊन ची घोषणा के ली असती तर बरे झाले असते. मोदींना खरोखरच नियोजनशून्य असे म्हटले तरी हरकत नाही, त्यांनी नोट बंदी प्रमाणे लहरी पणाने चुकीचा निर्णय घेऊन देशातील जनतेचे हाल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here