भारतीयांना नवजीवन बहाल करणारा मान्सून

भारतातील १ अब्ज २५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. विदर्भात कोणत्याही क्षणी मान्सूनच्या धारा बरसतील, अशी स्थिती आहे. मान्सूनचं आणि आपल्या देशाचं एक अनोखं नातं आहे. मान्सूनला ‘भारताची जीवनरेखा’ असंच म्हटलं जातं, ते उगीच नाही. आपल्या देशातील माणसं अक्षरश: डोळ्यात प्राण एकवटून मान्सूनची वाट पाहत असतात. एवढी तीव्रता भारतालगतचे काही देश सोडलेत, तर इतर देशांत क्वचितच असेल. आपल्या येथे मान्सून हा जीवनमरणाचाच प्रश्न असतो. मान्सूनचं आगमन थोडं जरी लांबलं वा मान्सूनचा पाऊस व्यवस्थित कोसळला नाही, तर एक प्रचंड अस्वस्थता आपल्याकडे निर्माण होते. देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सार्‍याच घटकांवर मान्सूनचा प्रभाव वाढतो. मान्सून हा भारताचा पालनकर्ताच आहे.प्रचंड उन्हामुळे सारी जमीन आणि माणसाची मनं करपून गेली असताना मान्सून येतो आणि देशातील नद्यांना प्रवाहित करतो, धरणं भरतो, शेतीला पाणी देऊन देशाला अन्न देण्याची सोय करतो. माणसांना, पशुपक्ष्यांना आणि निसर्गाला खर्‍या अर्थाने दरवर्षी तो नवजीवन बहाल करतो. हा मान्सून अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. वेदकाळापासून मान्सूनचा अभ्यास झाला आहे. वराहमिहीर, भास्कराचार्यांसारख्या त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या शास्त्रीय नोंदी घेऊन मान्सूनच्या गुणधर्माचा अभ्यास केल्याचे पुरावे आहेत. भारतीय कालगणनेमध्ये मान्सूनच्या आगमनापासून तो परत फिरण्याच्या कालावधीपर्यंतच्या घटना शास्त्रीय आधारावर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील शेतकरी, आदिवासी आणि मच्छीमार हजारो वर्षांपासूनचे पारंपरिक ज्ञान व नैसर्गिक निरीक्षणाच्या आधारे पावसाचे अंदाज हवामान खात्यापेक्षाही अचूक लावत असल्याचे पाहावयास मिळते.

मान्सूनबाबत इतर रोचक माहिती जाणून घेण्याअगोदर आपण मान्सून म्हणजे काय हे समजून घेऊ या. साधारणत: उष्णकटिबंधीय प्रदेशात जे देश वा भूभाग समुद्राने वेढले असतात, तिथे मान्सून ही वार्षिक हवामानाची स्थिती अनुभवायला मिळते. मान्सूनचं खरं कारण दडलं आहे ते तापमानात. उन्हाळ्यात जमीन प्रचंड तापायला लागली की, तापलेल्या जमिनीवरील हवा वर जाते आणि त्यामुळे तेथे कमी दाब निर्माण होतो. जमिनीच्या तुलनेत समुद्राचे पाणी कमी प्रमाणात तापते. त्यामुळे तेथून हवा वर जाण्याचे प्रमाण कमी असते. दाब मात्र जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. अशा रीतीने समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागतात. ठरावीक काळ हे वारे त्या-त्या प्रदेशात पाऊस देतात. नंतर समुद्राचे तापमान वाढू लागले की समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ते वारे पुन्हा उलट्या दिशेने फिरतात. पृथ्वी फिरत असल्याने आपल्याकडे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. मोसमी वार्‍यांचे आगमन झाले की, मान्सून आल्याचे मानले जाते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सतत सुरू असते. भारताप्रमाणे आफ्रिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या भागातही अशाच प्रकारे मान्सून येतो.

आपल्याकडे मान्सूनचे वेळापत्रक ठरले आहे. दरवर्षी २0 ते २५ मे दरम्यान मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर धडकतो. त्यानंतर १ जूनच्या आसपास तो केरळमध्ये घुसतो. महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची तारीख ७ जून असते. या तारखांच्या आसपास तो हमखास येतोच. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो पुढे सरकतो आणि १ जुलैपर्यंत जवळपास संपूर्ण देश तो व्यापून टाकतो. यानंतर जवळपास तीन महिने तो कमी-जास्त प्रमाणात कोसळत असतो. मान्सून समाधानकारक असला, तर देशाची नाडी व्यवस्थित चालते. अजूनही देशातील ७0 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्याने आपल्या कृषी उत्पादनावर मान्सून मोठा प्रभाव टाकतं. पिण्याच्या पाण्याबाबतही अशीच स्थिती असते. पावसाळ्यात धरण, विहिरी भरल्या नाहीत, तर या वर्षी मराठवाड्यात जसा दुष्काळ पडतो, तसा दुष्काळ पडतो. सरकारकडे असलेल्या नोंदीनुसार १८0२ पासून आतापर्यंत ४२ वेळा देशात जीवघेणे दुष्काळ पडले आहेत. त्यामुळेच मान्सून समाधानकारक असण्याचा-नसण्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. १९२५ मध्ये तत्कालीन कृषी आयोगाने Indian economy as the Gamble on Mansoon असं वर्णन करून ठेवलंय. ते वर्णन अजूनही आपल्या देशाला चपखल बसतेय. जोपर्यंत थेंब न थेंब पाण्याचं योग्य नियोजन करणं आपण शिकत नाही, तोपर्यंंत मान्सूनवरच आपलं भवितव्य अवलंबून असणार आहे.
                                                            चेसिंग द मान्सून
भारताच्या मान्सूनचं वेड भल्याभल्यांना आहे. अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश लेखकाने ‘चेसिंग द मान्सून’ या नावाचं २७३२ पानाचं एक भलंमोठ पुस्तक लिहिलंय. केरळपासून वर उत्तरेपर्यंत मान्सूनचा पाठलाग करताना त्याला आलेले चित्तथरारक अनुभव त्याने या पुस्तकात शब्दबद्ध केलेय. मान्सूनचा पाऊस पाहता-पाहता ठिकठिकाणी भेटलेली माणसं, त्यांचं वागणं, विलक्षण जगणं त्याने अतिशय रंजक पद्धतीने पुस्तकात मांडलं आहे. एका स्कॉटिश मिशनरीचा पोरगा असलेल्या अलेक्झांडरचं बालपण दक्षिण पॅसिफिकमधल्या छोट्या बेटांवर गेलंय. तिथे मिशनरी सेवेत असलेले त्याचे वडील भारतातील अनुभवांबद्दल सांगताना नेहमी चेरापुंजीबद्दल बोलत. जगात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या या गावाचे एक पोस्टरही त्यांच्या घरी होते. त्यावर लिहिले होते. ‘चेरापुंजी आसाम- द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ.’ तेव्हापासून चेरापुंजी, भारत आणि येथील पाऊस अलेक्झांडरच्या मनात ठसला गेलाय. पुढे मोठा झाल्यावर १९८७ मध्ये अलेक्झांडर भारतात आला आणि त्याने पार पुरातन काळापासूनच्या पावसांच्या कथांचा, दंतकथांचा शोध घेत मान्सून ज्या ज्या वाटेने मार्गक्रमण करतोय त्या वाटेने प्रवास करत हा अनमोल ग्रंथ लिहिलाय. त्रिवेंद्रम ते दिल्ली आणि नंतर चेरापुंजीपर्यंतच्या मान्सूनच्या पाठलागातून त्याने मान्सूनचा भारताच्या विविध समाजघटकांवर कसा प्रभाव टाकतो, हे उलगडून दाखविलं आहे. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर मान्सूनचा कसा प्रभाव आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे.

                                                           प्रोजेक्ट मेघदूत 
अलेक्झांडर फ्रेटरसारखाच काहीसा प्रयोग पुण्यातील काही पत्रकार व विद्यार्थी करताहेत. सुप्रसिद्ध संस्कृत कवी कालिदासांच्या अजरामर असलेल्या मेघदूत या दीर्घकाव्यातील प्रेयसीकडे संदेश घेऊन जाणार्‍या मेघाचा प्रवास ज्या मार्गाने झाला त्या मार्गाने ढगांचा, पावसाचा पाठलाग करून देशाच्या वेगवेगळ्या भागातील माणसांकडून मान्सूनबाबत माहिती मिळविण्याचा प्रय▪पुण्यातील मयूरेश प्रभुणे, अभिषेक वाघमारे, अथर्व वांगीकर, ऋषिकेश वांगीकर या तरुणांनी दोन वर्षांपासून सुरू केलाय. त्यालाच ‘प्रोजेक्ट मेघदूत’ असं नाव त्यांनी दिलंय. मेघदूतमध्ये रेखाटलेल्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन प्रत्यक्षात असणार्‍या मान्सूनच्या प्रवासाशी मिळतेजुळते आहे, असा रोमांचक अनुभव त्यांना आला आहे. गेल्या वर्षी त्यांनी रामटेक ते उज्जैन हा कालिदासाच्या मेघदूतातील मार्ग पावसासोबत पार केला होता. त्या वेळी रामटेक, पेंच, पचमढी, विदिशा, उज्जैन या सर्वच ठिकाणी कालिदासाने १६00 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या श्लोकांतील दृश्ये आजही जशीच्या तशी आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. कालिदासाने त्या वेळी लिहून ठेवलेली भौगोलिक रचना, पावसाच्या आगमनाच्या वेळच्या निसर्गाचे वर्णन, त्या-त्या प्रदेशातील वनस्पती, प्राणी, पक्षी, समाजजीवन यामध्ये आज एवढय़ा वर्षांनंतरही फारसा फरक पडला नसल्याचे या तरुणांना आढळले. पुण्याचे हे तरुण मध्य भारतानंतर उत्तर भारतातील गंगेचे खोरे आणि हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मान्सूनचा अभ्यास करणार आहेत. गेल्या वर्षी ऑस्कर नॉमिनेशन मिळविलेले स्टुर्ला गुनार्सन हे कॅनडाचे डॉक्युमेंटरी फिल्ममेकरही त्यांच्या प्रवासात सहभागी झाले होते.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे
कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६

Previous articleसनातन्यांना आताच आवरायला हवं!
Next articleकचकड्याच्या दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here