अरुणा सबाने ह्यांनी आपले घर सोडले (म्हणजे सोडावे लागले) ही दुर्दैवी घटना. अशी घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. पण त्या दुर्दैवाचे दशावतार लोकांपुढे सांगत बसल्या नाहीत. लोक चार दिवस बाईचे किस्से चघळतात आणि तोंडातल्या च्युईंगगमप्रमाणे शेवटी ‘संस्कार-संस्कृती’ नावाच्या केराच्या टोपलीत थुंकून टाकतात.
‘विमुक्त स्त्री’ जी स्पर्शाने आणि नजरेने दाखवता येत नाही, पण ती शब्दातून जिवंत करता येते. ‘विमुक्ता’ च्या दुसऱ्या आवृत्तीच्या मनोगतात अरुणा सबाने आपल्या वाचकांच्या प्रतिक्रिया लिहितात. त्या पैकी एक अशी: “तुमची कादंबरी वाचल्यावर मला कळलं की मी माझ्या आईला, बहिणीला किती गृहीत धरत होतो. त्यांची स्वतःची काही मत असू शकतात, हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. ‘विमुक्ता’ ने मला शिकवलं स्त्रीकडे आधी एक व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. माझी आई, माझी बहीण आधी एक व्यक्ती आहेत. नंतर त्या माझ्या आई किंवा बहिणी आहेत. “
अरुणा सबाने लेखिका म्हणून असा मार्ग केवळ आपल्या कादंबऱ्याच्या पानावर ठेवत नाहीत, तर तो प्रत्यक्ष आपल्या व्यवहारात उतरवतात. स्वतःला भोगाव्या लागलेल्या जखमांना जागूनच त्या सामाजिक रूढीपरंपरांच्या दगडांनी जखमी झालेल्या स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी माहेर ही संस्था स्थापन केली. घरात किंवा घराबाहेर बलात्कार झालेल्या, आपल्याच कुटुंबियांकडून अत्याचार झालेल्या किंवा भोगवस्तू म्हणून फसवल्या गेलेल्या स्त्रियांना ‘माहेर’ हा एक आधार वाटू लागला. अक्षरशः रात्री बेरात्री घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना अरुण सबाने यांनी आपल्या घराचा आसरा देऊन त्यांना विश्वास दिला आहे. त्यांच्या या कृतीतून अन्यायग्रस्त स्त्रियांना माहेरसारख्या संस्थेचा विश्वास वाटतो. पण अरुण सबाने यांना स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांवरील नवीन पिढीचा विश्वास उडू नये म्हणून त्यांना ती स्वतःची सामाजिक जबाबदारी वाटते. अशा सामाजिक क्षेत्रात अनेक व्यक्ती कार्यरत असतात. प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देतात. पण अरुणा सबाने ज्या मूल्यनिष्ठ जाणीवेने हे सगळे करतात, ते दुर्मिळ आहे.
‘पाणी परिषद’ आणि ‘जलसाहित्य संमेलन’ हे अरुणा सबाने यांच्या दीर्घकाळच्या कार्याचा अपरिहार्य भाग बनतो, तेंव्हा त्यामागील त्यांची भूमिका आणखीच त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत आहे असे दिसते. पाणी हे मानवी जीवनाचे जीवन आहे. पण सत्ता आणि संपत्तीप्रमाणे पाण्याचीही भांडवलशाही या समाजात दिसते. आपण लोकशाहीत राहतो, पण क्षणोक्षणी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविण्याचा अनुभव येतो. हा अनुभव तर कुटुंब आणि घरापासून सुरू होतो. घर सांभाळणारी स्त्री म्हणून तिचा गौरव केला जातो. घरातील एकूणच कामाचा केंद्रबिंदू पाणी हेच असते. सकाळी झोपून उठल्यावर पाण्याचा प्रश्न प्रथम घरातील स्त्रीलाच सोडवावा लागतो. ती स्त्री नुकतीच हळद लागलेली नववधू असो, बारा-तेरा वर्षाची मुलगी असो की ऐंशी वर्षाची म्हातारी असो, कुटुंबव्यवस्थेत पाण्याची व्यवस्था स्त्रीच्या माथी मारलेली असते. म्हणून स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल विचार करताना त्यांना पाणी ही एक समस्या दिसली. भर उन्हात मैलभर अंतरावरून डोक्यावर मडके घेऊन पाणी आणणाऱ्या खेड्यातील स्त्रिया असोत की डोळ्यावरील अर्धवट झोप गुंडाळून भल्या पहाटे सार्वजनिक नळावर रांगेत उभ्या राहणाऱ्या शहरातील झोपडपट्टीतील बायका असोत, त्या असमानतेच्या बळी आहेत. यात पुरुष कधी दिसत नाही हा एक स्त्री-पुरुष विषमतेचा भाग आहेच. पण कोणत्याही शहराच्या सिव्हील लाईन्स मध्ये हे दृश्य दिसत नाही, हा परत सामाजिक विषमतेचा भाग आहे. नैसर्गिक संसाधन म्हणून पाण्यावर सर्वांचाच सारखा हक्क आहे. पण काहीना मुबलक पाणी मिळते आणि काही तहानलेले राहतात. या वास्तवाचा सामना मोठ्या संघटना, संस्था त्यांच्या पातळीवर करीत असतील. पण अरुणा सबाने यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी यावर प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जलसाहित्य संमेलनाची चळवळ सुरु केली. त्या चळवळीला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
Excellent