-प्रवीण बर्दापूरकर
ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे . ते पुस्तक वाचायला मिळालं कसं त्याचीही एक गोष्ट आहे पण , ती नंतर सांगतो .
पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे . खरं तर , या पुस्तकाला नाव ( Title )च नाही मुखपृष्ठावर आहे ते केवळ लेखकांचं नाव ! . यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव मी सर्वप्रथम नागपूरला ऐकलं . १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि २६ जानेवारी १९८१ ला पुढील पत्रकारिता करण्यासाठी नागपुरात डेरेदाखल झालो . नागपूरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसातच यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव आणि त्यांच्या विषयीच्या धाडसी तसंच कांहीशा रंगतदार कथा ऐकायला मिळाल्या . ते कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते हे कळल्यावर तर त्यांच्याविषयी ऐकण्यात उत्सुकता वाटत असे . कधी कधी त्या कथा दंतकथा वाटत , इतका भक्तीभाव संगणाऱ्याच्या बोलण्यात असे . यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या आठवणी सांगणाऱ्यात ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचे आमचे तत्कालीन मुख्य वार्ताहर , कसदार बालसाहित्य लिहिणारे लेखक म्हणून तेव्हा ओळखले जाणारे दिनकर देशपांडे यांच्यापासून ते बुजुर्ग दि . भा . उपाख्य मामासाहेब भुमरे अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता .
यशवंत बाळाजी शास्त्री या पुस्तकाची प्रथम आवृत्ती डिसेंबर १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली . म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्याला आता जवळजवळ ४८ वर्षे होत आहेत . ज्या पुण्याच्या प्रेस्टिज पब्लिकेशन्स हे पुस्तक प्रकाशित केलं ती प्रकाशन संस्थाही आता बंद झाली आहे . २१८ पानांच्या या पुस्तक वाचनाचा अनुभव एका शब्दांत सांगायचा तर ‘रोमांचित’ करणारा आहे . ११ जानेवारी १९११ ला जन्मलेल्या यशवंत शास्त्री यांचं हे आत्मचरित्र म्हणजे अनेक अफलातून आठवणींचा खच्चून भरलेला खजिनाच आहे . मध्यप्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या देवरी या छोट्याशा गावी यशवंत शास्त्री यांचा जन्म झाला . त्यांचं शिक्षण विदर्भात झालं . मुंबई , पुणे , नागपूर अशा तीन ठिकाणी त्यांनी पत्रकारिता केली . याशिवाय अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता . चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामाच्या निमित्ताने उत्तर भारत आणि पाकिस्तानातही ते भरपूर फिरले ; तेव्हाच्या महागड्या हॉटेलात त्यांनी वास्तव्य केलं . त्यांना भेटलेली सगळीचं माणसं माझ्या पिढीला नावानिशी माहिती आहेत पण , त्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष भेटता आलेलं नाही ; यशवंत शास्त्री मात्र त्या अनेकांना केवळ भेटलेच नाही तर त्यांच्यासोबत त्यांनी कांही केलं . त्यात आचार्य अत्रे , नानासाहेब परुळेकर , पांडोबा भागवत यांच्यासारखे संपादक आहेत ; मीनाकुमारीपासून अनेक अभिनेत्री-अभिनेते , चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आहेत . महत्त्वाचं म्हणजे ती सर्व माणसं आणि त्या काळात आलेल्या अनुभवांना यशवंत बाळाजी शास्त्री अतिशय धाडसानं सामोरे गेलेले आहेत . खरं तर काही अनुभवांच्या बाबतीत रंगेलपणे सामोरे गेले असंही म्हणता येईल कारण केवळ धूम्रपान आणि मद्यपानच नव्हे तर आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि काहींच्या ‘उत्कट सहवासा’ विषयीसुद्धा यशवंत बाळाजी शास्त्री यांनी अतिशय नितळपणे लिहिलं आहे . किती नितळपणे , तर त्यांच्यावर एका स्त्रीकडून झालेल्या बळजोरीची हकिकतही ‘स्त्री कडून पुरुषावर झालेला बलात्कार’ म्हणून त्यांनी सांगून टाकली आहे . कुठलीही लपवाछपवी त्यांनी केलेली नाही . महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ( दुसऱ्या ) पत्नी शालिनी शास्त्री यांच्या केवळ पुढाकारानंच नव्हे तर त्यांच्या निवेदनासह हे पुस्तक यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेलं आहे . शालिनी आणि यशवंत शास्त्री या दांपत्याच्या परस्परांतील विश्वास , सामंजस्य आणि खुलेपणाचा एक प्रातिभ अविष्कार म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल.
‘मी धर्मश्रद्ध आहे पण , धर्मांध नाही . ईश्वरावर माझा विश्वास आहे पण , मी मूर्तिभंजक नाही . मला माणसाचे दैन्य पाहावत नाही . कारण मी दारिद्याचा अनुभव घेतला होता .’ अशी भूमिका ( पृष्ठ ४३ ) मांडत यशवंत बाळाजी शास्त्री व्यक्त झालेले आहेत . उल्लेखनीय म्हणजे व्यक्त होण्याच्या त्यांच्या या भूमिकेविषयी ते ठाम आहेत .
ज्या नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकासाठी यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली ते दैनिक तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नव्हतं . ‘तरुण भारत’ संघाचं मुखपत्र कसं झालं याची यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दिलेली माहिती वाचनीय आहे . ती माहिती देतांना यशवंत बाळाजी शास्त्री म्हणतात, ‘मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आकस नाही . आयुष्यात वेळ मिळाला असता तर कदाचित मी संघाचा स्वयंसेवकही झालो असतो . ’ हे सांगून रा.स्व. संघ एखादी संस्था ताब्यात कशी घेतो त्याचे तंत्रही सांगून यशवंत शास्त्री मोकळे होतात . प्रख्यात साहित्यिक ग . त्र्यं . माडखोलकर यांनी सुरु केलेलं ‘तरुण भारत’ हे दैनिक संघाचं मुखपत्र कसं झालं हे कथन करतांना त्यांनी म्हटलं आहे , ‘एखादी संस्था संपूर्ण हस्तगत करावयाची झाल्यास , त्यासाठी संघाचे तंत्र मोठे मासलेवाईक असते . संघाची माणसे एका मागून एक अशी त्या संस्थेत शिरकाव करुन घेतात आणि हा हा म्हणता शिरजोर होतात . बाळासाहेब देवरस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक ) यांच्या हाती ‘तरुण भारत’ची सूत्रे गेली आणि द्रुतगतीने ‘तरुण भारत’चे स्वरुप पालटत गेले . संघाचे तंत्र आणि मंत्र उपयोगात आणला जाऊ लागला . ’(पृष्ठ ११६)
