‘सगळ्यात कडू काय’, असं जर कुणी ध्यानीमनी नसताना विचारलं, तर अभावितपणे माझ्या तोंडून उत्तर येईल- आईचं दूध! कारण माझ्या जिभेला कडू चवीची झालेली पहिली जाणीव आईच्या दुधाचीच होती. ती चव आठवली की जीव आजही कसनुसा होतो. झालं असं होतं, की अगदी तीन-चार वर्षांचा जाणता झाल्यावरही मी आईच्या अंगावरचं दूध प्यायचो. आईसकट सगळ्यांनी खूप प्रयत्न करून झाले, तरी माझी ही सवय काही सुटत नव्हती. रोज सकाळी उठल्यावर मला पहिल्यांदा आईच्या अंगावर प्यायचं असायचं. शेवटी एके वर्षी उन्हाळ्यात गावी गेलो असताना कुणीतरी आईला काहीतरी उपाय सांगितला… आणि एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी आईचं दूध प्यायला गेलो, तर ते इतकं कडू लागलं की मी पटकन ते बाहेर थुंकून टाकलं. आता आई पी-पी म्हणत होती, पण मी मात्र दूध प्यायला बिल्कूल तयार नव्हतो. दुधाची ती कडूजार चव जिभेवर अशी बसली, की त्यानंतर मी कधीच पुन्हा आईच्या अंगावरचं दूध प्यायला गेलो नाही… आणि अंगावर प्यायची माझी सवय गेली ती गेलीच!
पुढे कळत्या वयात आईला विचारलं- आई न्हानपणी एकदा तुजा दूध कडू कसा काय लागला? तेव्हा ती अगदी खळखळून हसली आणि म्हणाली- ‘बब्या नं तू अंगावर प्यायचा बंद व्हत नव्हतास, म्हणून एके सकाळी तू उठायच्या आधीच दोनीव दुधांना देवखोलीतल्या कडूतेलाचा बोट लावून ठेवला नि तू उठल्यावर दिलं तुला प्यायला, तर तू कडू-कडू म्हणून रडाय लागलास…’ तिने दिलेलं हे उत्तर ऐकून मग मीही बेदम हसलो… नंतर कधीतरी गावाला गेलो असताना मी मुद्दाम एकदा आमच्या देवखोलीतल्या समईतल्या तेलात बोट बुडवून ते चाखलं होतं, तर तोंड अगदी लहापणासारखंच कसनुसं झालं होतं.
आजचं माहीत नाही, परंतु हे कडूतेल पूर्वी कोकणात घरोघरी देवखोलीत असायचं. देवासमोर रात्रभर समईतली वात जळायची, ती या कडूतेलाच्या भरवशावरच. तेव्हा बहुतेकांची उंडीची झाडं असायची. उन्हाळ्यात उंडीच्या झाडाखाली, उंडीची कठीण टरफलांची फळं पडलेली असायची. ही फळं गोळा करून ती फोडली की आतमध्ये गोट्यांच्या आकाराचा गर असायचा. मेणबत्तीचा स्पर्श कसा असतो, तसा हा गर हाताला लागायचा. हे फोडलेले गर जमा करून मग गावातल्या तेलाच्या घाणीतून त्यांपासून तेल काढलं जात असे. हे तेल सुमारे वर्षभर पुरत असे. या तेलाची चव कडू असल्यामुळेच त्याला उंडीच्या तेलाऐवजी ‘कडूतेल’ असंच म्हटलं जायचं. अनेक ठिकाणी वंगण म्हणूनही याचा वापर केला जायचा. आज हे कडूतेल कुणी देवघरात वापरतं की ही ते माहीत नाही… कारण प्रत्येकाच्या देवखोलीच आता रात्रभर लाल रंगाचे दिवे पेटलेले असतात.
… तर आज हे कडूतेलाचं पुराण एवढ्याचसाठी, की पुन्हा एकदा कोकणातलं वातावरण सुरंगीच्या मादक गंधाने घमघमलंय… माशांचे थवेच्या थवे सुरंगीच्या वळेसरांभोवती पिंगा घालतायत. अगदी शहरांतही अवचितपणे एखाद्या फुलवालीकडे सुरंगीचा धुंद पिवळसर रंगाचा वळेसर दिसतोय आणि पावलं थबकतायत…
एकदा असंच दुर्गाबाईंकडे (दुर्गा भागवत) जाताना, समोर दिसला म्हणून मी सुरंगीचा वळेसर घेतला होता. तर माझ्या हातातला सुरंगीचा वळेसर बघून दुर्गाबाई कोण खूश झाल्या. वळेसर हातात घेत नि त्याचा गंध शांतपणे हुंगत म्हणाल्या- ‘व्वा, माझ्या आवडीच्या उंडीच्या फुलांचा गजरा…’ आणि मी चमकलो! सुरंगी म्हणजे उंडीचीच फुलं हे मला तोपर्यंत ठाऊकच नव्हतं. खरंतर गावाकडे मी लहानपणापासून उंडीची फळं पाहिली होती. मी मे महिन्यातल्या सुट्टीत गावी जायचो, तेव्हा कधीतरी बहिणीबरोबर रानात आमच्या उंडीच्या झाडाखाली उंडीची फळं गोळा करायला जायचो. मात्र तोपर्यंत फुलांचा हंगाम सरलेला असायचा, त्यामुळे मी गावाला कधी उंडीची फुलं पाहिलीच नव्हती. म्हणूनच उंडीची कठीण कवच असलेली फळं म्हणजेच, फुलांचा बहर ओसरल्यावर धरणारी ‘फळं’ हे मला दुर्गाबाईंमुळे उमगलं.
… पण त्याही पलीकडे दुर्गाबाईंमुळे मला तेव्हा आणखी एक आकळलं, की जगात जे-जे सुवासिक असतं, त्याच्या मुळाशी कडू चव असते.
तेव्हापासून सुरंगीचा सुगंधी-मादक वळेसर दिसला, की मला त्यामागचा कडू गुणधर्मही आठवतो आणि मग सोबत जिभेवर आईच्या कडू दुधाची चवही उतरत जाते….
कडू दूध… बालपणीचा गोड आठव. आणि सुगंधाच्या मुळाशी कडू चव असते. खूप सुंदर अनुभव .. वाचनीय लघुलेख.