एक सप्टेंबर पासून ते आजपर्यंत, दरदिवशी किमान एक हजार लोकांचा भारतात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अठ्ठावीस दिवसांत तीस हजार आठशे चाळीस रुग्ण मृत पावले आहेत. जवळपास प्रत्येकाच्याच जवळचे, ओळखीचे कोणीतरी मृत्यू पावले. एवढ्या कमी कालावधीत कोरोनामुळे एवढे मृत्यू झालेला भारताव्यतिरीक्त इतर कोणताही देश नाही! सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे मृत्यूची एक सुनामी लाट येऊन गेली पण भारतीय लोकांच्या ‘जोपर्यंत आपल्या घरातील व्यक्ती मृत पावत नाही तोपर्यंत आपले त्याच्याशी घेणेदेणे नाही’ या मानसिकतेमुळे या लाटेची जाणीव तीव्रतेने झाली नाही. ज्यांचे स्वकीय, नातेवाईक गेले त्यांनाच काय तो फरक पडला.
आकडेवारीतील, आलेखातील हे बदल खरंतर खूप काही मोठे नाहीत, एका रात्रीतून सर्व काही बदलले असंही काही नाही… येणाऱ्या काळातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचे जे समाधानकारक निकाल येणार आहेत त्यासाठी ही जमीन तयार होत असल्याचे चित्र आहे. कुठेतरी हे थांबू शकते यासाठीचा हा आशावाद आहे! कोविड आयसीयुला काम करत असलेला एक डॉक्टर म्हणून माझ्यासाठी तरी ही खूप समाधानकारक बाब आहे!
सहा महिन्यांनंतर एका समाधानकारक गोष्टीच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे, अजून खूप वाटचाल करायची आहे. सध्यातरी ‘लस येईल’ ही एक अंधश्रद्धाच आहे त्यामुळे त्यावर विसंबून राहू नका. स्वत:ची आणि स्वकीयांची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येकालाच ठाऊक आहे फक्त त्याची अंमलबजावणी होत राहाणं गरजेचं आहे. उंबरठा ओलांडताना ही गोष्ट पक्की लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, सॅनिटायझर आपले कवच आहे. प्रत्येक स्पर्श अजूनही वैऱ्याचा आहे, एका व्यक्तीचा मृत्यू घर कायमचं उद्धवस्त करुन जातो. ती वेळच येऊ नये म्हणून जागरूक राहणं आवश्यक आहे.