कौलाची ही बंडी माझी

 

– सुनील यावलीकर

अठ्ठावन्न वर्षांपूर्वीची गावगाड्याची विविध रूपं अजूनही डोळ्यासमोर जशी आहे तशीच दिसतात. कधी कधी स्वप्नात येतात, तर कधी चित्रांच्या रूपाने अंतर्मनात उमटलेल्या विविध प्रतिमा जशाच्या तशा कॅनव्हासवर उमटतात. कवितेमध्ये प्रतिमांची संदर्भाशिवायची रूपके, प्रतिमा आपसूकच येत जातात आणि बालपणाच्या पुनःप्रत्ययाचा खेळ अंतर्मनाच्या जाणिवेचा एक दीर्घ खेळ बनून जातो… इतकं बालपण मेंदूच्या तळकप्प्यासोबत एकजीव झालेलं आहे.

काळाच्या परिमाणामध्ये अठ्ठावन्न वर्षे हे खूप दखलपात्र आहे, असं नाही; पण निसर्गाने दिलेल्या मेंदूच्या जाणिवेचा कालसापेक्ष तुकडा आपल्या अस्तित्वाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यातून स्वतःच्या मेंदूच्या सापेक्ष अनुभवांच्या आधारावर काळाची तुलना करत जाणे; त्यातून गवसलेले जगण्याचे समृद्ध क्षण शोधणे; तापदायक दुःखद अनुभवातील होरपळ अनुभवणे… त्यातील सुसंगती-विसंगती शोधणे; स्वतःला अधिकाधिक सुसंगत ठेवत जाणे, ही सारी धडपड सुरू असण्याच्या काळात पाठीमागे घडून गेलेल्या काळाचा पट आपल्या स्मरणावर विसंबून उलगडत जाणे, हे आनंददायी आहे आणि स्वतःला सोलत जाणेही आहे. समष्टीची स्वतःसहित चिकित्सा करणे, हे वाटते इतके सोपे नसते.

गाव जीवनाची दृश्यपटलावर कोरलेली बालपणीची काही दृश्यं अजूनही आठवतात. माझं गाव नरसिंगपूर. यावली आणि नरसिंगपूर तसे एकच. रायघोळ नदीच्या पूर्व-पश्चिम वाहणार्‍या प्रवाहानं गावाचे दोन भाग केलेले. उत्तरेकडील यावली आणि दक्षिणेकडील नरसिंगपूर.
१९४२  च्या ‘चले जाव’ आंदोलनात महात्मा गांधींनी दिलेल्या आदेशात माझं गाव सहभागी झालं होतं. तेव्हा इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात यावलीचे सात लोक शहीद झाले होते. ऑगस्ट क्रांती दिनाला दिलेला गांधीजींचा आदेश १८ ऑगस्टला यावलीत पोहोचला आणि मोठं आंदोलन उभं झालं. त्यात अनेक लोकांना चार चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व आमच्या कुटुंबातील पंजाबरावांनी केलं होतं.

गांधीजींचा आदेश त्यांच्या नावाने आला होता, पंजाबराव यावलीकर या नावाने. तेव्हापासून, म्हणजे १९४२ पासून त्यांच्या कुटुंबातील आम्ही सर्व यावलीकर झालो, असा इतिहास आमचे वडील सांगायचे. पंजाबरावांच्या दोन आठवणी अजूनही स्मरणात आहेत. ते म्हणजे मी खूपच लहान असताना, सहा वर्षांचा. १९७१  साली ते कर्करोगाने गंभीर आजारी होते. गावाबाहेर झोपडीतच राहायचे. त्यांना भेटायला मी आईसोबत गेलो होतो, तेव्हा ते माझ्याशी बोलले होते. त्यांच्याकडे कॅसेटचा टेपरेकॉर्डर होता. ते बेडवर पडून होते. त्यांनी मला गाणं म्हणायला लावलं होतं. मी आपलं झुक झुक अगीनगाडी, हे गाणं म्हटलं. त्यांनी टेपचं बटन सुरू केलं आणि मला पुन्हा माझाच आवाज ऐकवला. आणि म्हणाले, ‘हा बघ दुसरा सुनील टेपरेकॉर्डरमध्ये आहे.’ तेव्हाच मला खूपच कुतूहल वाटलं होतं आणि दुसरी आठवण त्यांच्या अंत्ययात्रेची. यावलीतून निघालेली प्रचंड मोठी अंत्ययात्रा नरसिंगपुरातून मागे आखरात जात होती. या दोन्ही स्मरणटीपा अजूनही डोळ्यासमोर स्पष्ट उभ्या आहेत. यावली हे तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आणि येथून जवळच असलेली मोझरी गुरुकुंज ही गुरुजींची कर्मभूमी. १९६८ ला तुकडोजी महाराजांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांची अंत्ययात्रा गुरुकुंजातून काढली होती. तेव्हा मी आण्याजींच्या खांद्यावर बसून रथात ठेवलेले त्यांचे पार्थिव पाहिलेलं मला अजूनही धूसर आठवतं…

पावसाळी वातावरण होतं. १९७१ चा जुलै महिना. आप्पाजीनं बोट धरून मला शाळेत नेलेलं. गावातल्या गांधीचौकात असणार्‍या बालवाडीच्या जुन्या इमारतीच्या बाजूला असलेल्या टिनाच्या पहिल्या वर्गात माझं नाव टाकलं होतं. बालभारतीचा सिम्बॉल असलेलं पिवळ्या रंगाचं मराठी बालभारतीचे पुस्तक माझ्या नॉयलॉनच्या झोर्‍यात होतं. त्यात एक पाटी होती. शाळा प्रवेशानंतर बाकी काही आठवत नाही. लघवीच्या सुट्टीत पंचमुखी महादेव मंदिरापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या कोपर्‍यापर्यंत लघवीला जावे लागायचे. कोपर्‍यावर पिशा पाचघरीनचं घर होतं पडलेलं. ती बिचारी कुणाशी काही बोलत नव्हती. दुपारच्या सुट्टीत घरी जेवायला यायचं. पुन्हा शाळा. खूप पाऊस असला की, नदीला पूर असायचा. पलीकडे जाता यायचं नाही. त्यामुळे शाळेला सुट्टी मिळायची. पूर्वी म्हणे या नदीत खूप दलदल होती. माणसे फसायची. दलदलीला डेरे म्हणायचे. त्यामुळे पूर्वी या गावाला डेर्‍याची यावली म्हणायचे. नदीवर पूल नव्हता. नदी बारा महिने वाहती होती. फक्त उन्हाळ्यात मात्र काही ठिकाणी कोरडे पडायचे. एरव्ही ती सदा वाहती. नदीच्या काठावर दाट वाढलेलं उंचच उंच बाभुळबन. काठावर थोड्या अंतरावर माझं घर. उजव्या हातावर नदीच्या दोन्ही काठांवर वाढलेले बाभुळबन नदीपात्रावर दोन्ही बाजूने कमान धरणारे. पावसाळ्यात नदीला मोठे पूर यायचे. पुराचे पाणी घराच्या ओट्याला टेकायचे. पूर उतरण्यासाठी वडील नदीची पूजा करायचे. नदीच्या पहिल्या पुरात खयवाडीतील काट्या, झाडांची खोडं वाहून यायची. त्या पुरात पोहायची कोणी हिंमत करत नव्हते. दुसर्‍या पुरात नारळ पकडण्यासाठी आम्ही पुरात उड्या घ्यायचो. पोहण्यावरून आठवलं, अण्णांच्या आखरातल्या विहिरीत भर उन्हाळ्यात आपण पोहणं शिकलेलो. त्यामुळे स्थिर होऊन पोहणं, बुडी मारणं हे प्रकार यायचे. लांबदूर पोहत जायचं, म्हणजे पाय दुखायचे. नदीला लांब पोहण्याजोगं पात्र नव्हतं. विहिरीतलं पोहणंच तिथे कामी यायचं. पण, दुथडी भरलेल्या नदीच्या पुरात उडी टाकून पैलतीरावर निघण्यासाठी विहिरीतील पोहणंच कामी यायचं. या गोष्टींवर वडिलांचे लक्ष नसायचे. त्यामुळे आपलं एक बरं झालं, हे कर ते करू नको असे सल्ले कधी ऐकायची गरज पडली. त्यामुळे जे काही चांगले वाईट झाले, त्याला आपणच जबाबदार होतो.

घरी पेपरची एजंसी होती, आप्पाजींपासून. आप्पाजी गेल्यानंतर ती वडिलांनी चालवायला घेतली. चौथीनंतर पेपर वाटायचे काम आपल्याकडे आलेले. लोकमत, तरुण भारत, अमरावतीचा हिंदुस्तान, उदय, बातमीपत्र हे पेपर यायचे. अमरावतीहून सकाळी दहा वाजता गाडी यायची. पार्सल उतरवून घेणे, पेपर लावणे, पूर्ण गावात पेपर वाटणे आणि अकरा वाजता शाळेत जाणे असा दिनक्रम सुरू होता. त्यातून पेपर वाचण्याची सवय लागली. काही गोष्टी कळायच्या, काही नाही कळायच्या. इन्स्पेक्टर गरुड चित्रमालिका होती, ती खूपच आवडायची.

अमरावती शहराशी संबंध खूपच कमी, म्हणजे नसल्यात जमा. अमरावतीच्या कापूस बाजारात कापसाच्या बंड्या जायच्या. अमरावतीला बंडीवर बसून वडील 24 किलोमीटर अमरावतीपर्यंत जायचे, कापसाचे पैसे घेण्यासाठी.मोठे आण्याजी राहायचे अमरावतीला, त्यांच्याकडे कधी कधी जाणे व्हायचे. तेवढाच आपला अमरावतीशी संबंध. बाकी गाव आणि आपण हे तसे एकात्म होतो, असे म्हणायला हरकत नाही. दहावीपर्यंत पायात चप्पल नव्हती, त्याचे काहीच वाटत नव्हते. पायजमा शर्ट ड्रेस होता घरचा आणि शाळेतला. चौथीपर्यंत कसा काळ गेला काही आठवत नाही. आप्पाजींचा मृत्यू झाला, तेव्हा मी तिसरीत होतो. कुटुंबातील मृत्यू पहिल्यांदा अनुभवलेला. वडिलांना पहिल्यांदा रडताना पहिलेले.

दरम्यानच्या काळात वडील खूप हतबल झालेले पहिले. त्यांनी क्विंटलभर ज्वारी विकत आणली होती आणि दुसर्‍या दिवशी सरकारी अधिकार्‍याच्या सुपूर्द केली. काही कळेना! तेव्हा त्यांनी सरकारला लेव्ही द्यावी लागते म्हणून सांगितले. अतिरिक्त उत्पन्नाच्या भाग सरकारला द्यावा लागत होता, त्याला लेव्ही म्हणत. इथे पिकलेच नाही, तरीही विकत घेऊन लेव्ही सरकार जमा करावी लागली होती, हे कळत्या वयात कळलं होतं. बालपणी बहुतेक व्यवहार हे पैशांशिवाय चालायचे. आमच्या गावात असणारे डॉक्टर काही दुखलं-खुपलं, तर औषध उपचार करायचे. त्याबद्दल वडील त्यांना डाळज्वारी द्यायचे. तसेच, शेतातल्या नव्हाईच्या वस्तू त्यांना नेऊन द्यायचे. नावाला सुद्धा केस कापण्यासाठी शेतातील धान्यच दिले जायचे. या व्यवहारामुळे गावाला बर्‍यापैकी स्वायत्तता होती.

घर, शेती, शाळा, शाळेतील सोबती हेच तेव्हा आपलं भावविश्व होतं. चौथीला शिष्यवृत्तीची परीक्षा असायची. त्याचा वेगळा अभ्यास करण्यासाठी उमक भाऊसाहेब कंदील घेऊन घरी बोलवायचे. हे परीक्षेपूर्वी दोन महिने अगोदरपासून चालू असायचे. मुलंमुली मिसळून राहायचे. पाचवीपासून दहावीपर्यंत मुलामुलींचा संवाद नव्हताच, साधं बोलणंही नव्हतं. ही गॅप चौथीनंतर कशी पडली, काही कळायला मार्ग नाही. आताही चार पाचजण सोडले, तर कोण कुठे आहे काहीही माहिती नाही. नाही म्हणायला, एकदोनदा मोठ्या आईसोबत अमरावतीला गेलो की राजकमल चौकातल्या राजलक्ष्मी टॉकीजमध्ये नया दौर वगैरे सिनेमे बघितले. घरापासून टॉकीजपर्यंतचा रस्ता फक्त ठाऊक होता. तसेच, शाळेत कधीकाळी प्रोजेक्टर आणून हा ‘माझा मार्ग एकला’ वगैरे सिनेमे पाहिले होते. शहर मात्र कधी आपलं वाटतच नव्हतं.

सकाळी उठून गाईच्या गोठ्यात शेणमूत साफ करणे, नदीच्या पलीकडे असणार्‍या उकिरड्यावर नेऊन टाकणे, नदीमध्ये हातपाय धुणे. तेवढ्या धुतल्याने हाताचा शेणाचा वास जात नाहीच. शेवटी घरी येऊन चुलीतल्या राखेने हात घासून धुणे. सराव आटोपून अभ्यासाला बसणे, समोरच्या ओसरीच्या टिनाची सावली कुठपर्यंत आली, त्यावर शाळेत जाण्याची वेळ ठरलेली. त्या सावलीच्या घड्याळावर शाळेचे वेळापत्रक ठरलेले. हा नित्यक्रम ठरलेला. सुट्टीच्या दिवशी ऋतुमानानुसार खेळ ठरलेले. त्याच ॠतूत खेळ कसे येत असतात, याचं अजूनही आश्चर्य वाटतं. म्हणजे, पावसाळा सुरू झाला शीखखुप्पसचा खेळ सुरू व्हायचा. माती ओलसर मऊ असायची. लोखंडी सळई सहज खुपसायची जमिनीत. ती जमिनीत खुपसून जायची. पडली की सुरू केलेल्या जागेपासून लंगडी घालत जायचे. भोवर्‍याचा खेळही पावसाळ्यात सुरू व्हायचा. चांगला मोठा लाकडी भोवरा, त्याला गुंडाळलेली सुताची दोरी, त्याची शर्यत. जिंकणार्‍याने भोवर्‍याच्या आरूने हरणार्‍याच्या भोवर्‍याला फोडायचे. त्या भोवर्‍यातून निघणार्‍या लाकडी किलच्यांना खोबरं काढणं म्हणायचे.

सुताच्या जाळीने भोवरा फिरवणे, भोवरा हातावर घेणे, हे सर्व करताना किती वेळ जायचा, काही कळायचे नाही. हिवाळ्याच्या सुरुवातीला दगडी गोट्यांचा खेळ व्हायचा. गुल्ल्या पाडून त्यात गोटी टाकायची, डाव्या हाताच्या मध्यमेवर उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीने गोटीने समोरच्या गोटीला उडवायचं. ज्याच्यावर राज्य असेल त्यानं, ढोपरानं ती गोटी ढोपरत गुल्ल्यापर्यंत आणायची.दिवाळी संपल्यावर हिवाळा थोडा कमी व्हायचा. नदीकाठच्या बाभुळबनात गिल्लीदांडूचा खेळ चालायचा. शाळेला सुट्टी असेल, तोपर्यंत तहानभूक हरपून ते सर्व खेळ खेळले जायचे. नदी वाहती असल्यामुळे दुपारी गावातील बाया धुणं धुवायला यायच्या. दुपारच्या निरव शांततेत ठप-ठप असा कपडे धुण्याचा आवाजच तेवढा ऐकू यायचा.

संध्याकाळी बाभुळबन कावळ्या, बगळ्यांच्या आवाजाने गजबजून जायचं. रात्र गडद व्हायला आली की, एखाद-दुसरा अपवाद सोडला की सर्व अंधारात गुडूप होऊन जायचं. संध्याकाळच्या वेळेस दिवालगिरीची, कंदिलाची काच पुसणे आदी कामे करून त्यांच्या उजेडात अभ्यास चालायचा. थोड्या वेळात जेवण करून वाकळीवर झोपून जायचं, असा थोडाफार दिनक्रम असायचा. शनिवार-रविवार वावरातील कामे असायची. कधीकधी वडिलांसोबत जागलीसाठी रात्री पण जावं लागायचं.
पहिली दुसरीत असतानाचे खेळसुद्धा शेताशी जुळलेले असत. कौलाची बंडी, त्याला खापराचे चाक, लाकडाचे बैल जोडून त्यावर कडबा कुटार वाहून आणणे, हेच खेळ चालायचे. ज्वारीच्या धांड्याच्या पेरकंडाची बैलबंडी, छकडं, खुर्ची आदी प्रकार करायचे. त्यात दिवसचे दिवस जायचे. मुलींसोबत खेळायचे खेळ, त्यात अंडे फोडणे, रेसटीप मोठ्या उत्साहाने खेळले जायचे. दसर्‍याच्या दिवसात घरोघरी बाहुल्या बसायच्या.

बहिणीसोबत घरोघरी जाऊन बाहुल्यांची गाणी म्हटली जायची. त्यातील अनेक गाणी अजूनही पाठ आहेत. दिवाळीच्या दिवसात शिडीवर चढून शेणामातीने घर सारवणे, घराच्या खांबाना तेलपाणी देणं, ही कामं मोठ्या आवडीने करायचो. त्यात थकवा कसा तो जाणवायचा नाही. बांबूच्या कमच्या घेउन घेऊन, त्याला तार्‍याचा आकार देऊन, त्यावर बेगडी किंवा पतंगी ताव लावून, त्यात मातीची पणती ठेवून, उंच बांबूला छोटी चक्री अडकवून, त्यावर दोरीच्या सहाय्याने अगाजदिवा चढवण्यातला आनंद आता मिळत नाही.

वडील शैव अधिक वारकरी परंपरा स्वीकारणारे होते. आप्पाजी शिवभक्त, तर आमची आजी अवधुती संप्रदायाची भक्त. हे वेगवेगळे संप्रदाय घरी एकत्र नांदायचे. त्यांचे खटके उडाले, असं कधी अनुभवाला आलं नाही. ८३ -८४ सालात गावात मारवाड्याच्या घरी व्हिडिओ आला. व्हीसीआरवर सिनेमे दाखवायला लागले. स्पीकरमधून त्याची जाहिरात व्हायला लागली. शांतचित्त असलेल्या गावाची सायंकाळ, रात्र लाऊडस्पीकरच्या आवाजात गढुळून जायला लागली. सिनेमा, नटनट्या यांची चर्चा व्हायला लागली.

गावाच्या स्टँडवर वरली-मटक्याचा आकड्यांचा खेळ सुरू झाला. बातमी वाचायला येणार्‍यांपेक्षा आकडे विचारणार्‍यांची गर्दी पेपरवर पडायला लागली. कधी नव्हे तो एसटी स्टँडवर पानठेला लागला. तिथे टेपरेकॉर्डर स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजायला लागली. सुरुवातीला तिथे वडाच्या झाडाच्या बाजूला एक छोटेसे शेवभज्यांचे हॉटेल होतं. गावातल्या स्टँड सोबतच गावाचा चेहरा बदलायला लागला. आपण दहावीत असेपर्यंत दिवसभर सुरू असणारं आपल्या गावाचं सार्वजनिक वाचनालय ओस पडू लागलं.

दरम्यान शेती माती जगवण्यासाठी अपुरी पडू लागली, तेव्हा गाव दूर चंद्रपूर जिल्ह्यात मास्तरकी करण्याकरता गेलो. म्हणजे पुन्हा खेड्यातून खेड्यातच. तेथील खेड्यांचे चेहरे म्हणजे आपल्या गावाच्या दहा वर्षे अगोदरचे. बलुतेदारी अजूनही सुरू असलेली. शेतीवर पूर्ण गाव अवलंबून असणारे. एकच गोष्ट नवीन जाणवली, म्हणजे स्त्रियांच्या मतांना महत्त्व होतं. विधवा पुनर्विवाह सहज होत होते. विधवेला, तिच्या मुलांसह सन्मानाने स्वीकारल्या जात होतं, दूध भाऊ म्हणून… बाकी गावकी म्हणजे थोडेफार संदर्भ सोडले तर सारखीच.

ग्रामपंचायत निवडणुकांनी गाव पोखरून टाकलेलं. गावात सरळ दोन उभे तट असलेले. या निवडणुकीने सख्ख्या भावकीत आयुष्यभराची अदावत आणलेली. गेल्या पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या या गावपटावर गावे हळूहळू ओस पडू लागलेली. ज्याला शेतीशिवाय, मजुरीशिवाय पर्याय नाही, तीच माणसं फक्त गावात राहत आहेत. ज्यांना क्य झालं, त्यांनी आपले घर, वाडे गावात सोडून शहरात बस्तान मांडले आहे. शेती लागवणीने देऊन फक्त लागवणसाठी लोक गावाकडे जातात. मास्तरकीनिमित्त अनेक गावांशी संपर्क आला. जी गावे शहराशी जास्त संपर्कात नाहीत, तिथे गावपणाच्या काही खुणा जिवंत असल्याचे जाणवत आहे. असंच अळणगाव या निम्नपेढी प्रकल्पात गेलेल्या गावात मी अनुभवलेलं बालपण मला बर्‍याच अंशी पुन्हा अनुभवायला मिळालं. त्यातूनच माझी बालपणावरील चित्रमालिका तयार झाली. आता तर ते गाव आपल्या सर्व खाणाखुणा पुसून जलमय होणार आहे. पुनर्वसित ठिकाणी ते कसं रुजतं, याचा अंदाज सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही.

हीच जाणीव करजगाव या गावानं दिली. समृद्धीच्या खुणा हरवलेलं हे गाव आपल्या गावपणाची धुगधुगी जिवंत ठेवून आहे.गावाचं सळसळणारं प्रसन्न जिवंत झाड ग्राहकीकरणाच्या विषाक्त प्रदूषणात मलूल झालं आहे. त्याच्या फांद्या शेंडे छाटलेले आहेत.

ते पुन्हा सळसळेल ही आशा खूपच धुसर आहे.

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(लेखक नामवंत कवि ,चित्रकार आणि रेखाटनकार आहेत)
९४०४६८९५१७

Previous articleअशोकराव, ‘डिलर’चे ‘लीडर’ झालात! 
Next articleदंतकथा बननेल्या आमदारांची कुळकथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.