खळखळून हसायला लावणारा ‘उलटा चष्मा’

‘इडियट बॉक्स’ म्हणून विचारवंतांनी कितीही हिणविलं तरी छोटय़ा पडद्याने (टीव्ही) आपल्यापैकी बहुतेकांचं आयुष्य व्यापून टाकण्याला आता बरीच वर्ष लोटली आहेत. 90 च्या दशकात टीव्ही आपल्या घरात घुसल्यानंतर तो आपल्या मेंदूवर आणि मनावर केव्हा राज्य करायला लागला, हे ध्यानातही आलं नाही. कबूल करायचं, नाही करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आपल्यापैकी बहुतांश लोक आवडती मालिका, चित्रपट, बातम्या, डिस्कव्हरी, अँनिमल प्लॅनेट, कॉर्टून्स सिरियल्स, क्रिकेट व इतर खेळांच्या मॅचेस यापैकी काहीतरी पाहायला दिवसाचा एखादा तास तरी टीव्हीसमोर बसतात. टीव्ही आता मनोरंजनासोबत ज्ञान देणारंही माध्यम झाल्याने पूर्वीप्रमाणे आता टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचं का, यावरही विचार करावा लागणार आहे. आज हे टीव्ही पुराण यासाठी की, सोनीच्या ‘सब’ टीव्ही या चॅनलवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय विनोदी मालिकेचा काल मंगळवारी 1000 वा भाग प्रसारित झालाय. 

 
घराघरात हास्याचे फवारे फुलविणारी ही मालिका केवळ अद्भुत आहे. ज्याला हसायचं वावडं आहे आणि जो एरंडेल तेल पिऊन बसला आहे, अशांनाही खदखदून हसायला लावेल, अशी ताकद या मालिकेत आहे. नवज्योत सिद्धू किंवा अर्चना पुरणसिंह यासारखे पैसे घेऊन हमखास कृत्रिम हसणारे निवेदक वा परीक्षक नसतांनाही केवळ कथानकातील गमती-जमतीच्या जोरावर निर्भेळ विनोदनिर्मिती करणार्‍या या मालिकेने भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

एखादी मालिका 1000 भाग पूर्ण करते ही आता फारशी नवलाची गोष्ट उरली नाही. 2001 ते 2008 या कालावधीतील ‘क्यो की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचे 1830 भाग झाले होते. (या मालिकेने ‘तुलसी’ बहू स्मृती इराणीला खासदार बनविले.) याशिवाय ‘बालिका वधू’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘उतरन’, ‘दिया और बाती’ अशा काही मालिकांनी 1000 भाग पूर्ण केले होते. मात्र या सार्‍या मालिका शेवटी शेवटी उगाचच ताणल्या जात आहे. कथानकात दम नसतानाही लांबविल्या जात आहेत, हे स्पष्ट लक्षात येत होतं. याउलट ‘तारक मेहता..’ ही पहिली विनोदी मालिका आहे, जी 1000 भाग पूर्ण होऊनही अजूनही ताजी-टवटवीत आहे. या मालिकेचं म्हणालं, तर सलग असं कुठलं कथानक नाही. मालिकेत कुठला ड्रामाही नाही. मुंबईच्या गोकुलधाम सोसायटीत राहणारे पाच कुटुंब व लगAासाठी अतिशय आतुर असलेल्या एका अविवाहित पत्रकाराभोवती फिरणारी ही मालिका आहे. दयाबेन, जेठालाल व चंपकलाल गडा हे गुजराती कच्छी कुटुंब, माधवी व आत्माराम भिडे हे मराठी, रोशन सोधी हे पंजाबी, बंगाली बबिता व क्रिष्णन अय्यर हे दक्षिण भारतीय, कोमल आणि हंसराज हाथी व अंजली आणि तारक मेहता हे उत्तर भारतीय, अशा पाच कुटुंबाच्या रोजच्या व्यवहारातील जगणं आणि त्या जगण्यातून निर्माण होणार्‍या गमती-जमतीचं चित्रण या मालिकेत आहे. (या पाच कुटुंबाच्या माध्यमातून गुजराती, मराठी, पंजाबी, बंगाली आणि उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीतील वेगळेपण व त्या त्या भाषेतील बारकावेही दिग्दर्शकाने उत्तम टिपले आहेत. प्रसंगानुरूप पंजाबी, मराठी, गुजराती व उत्तर भारतीय उत्सवही मालिकेत येतात.) जेठालाल गडाच्या दुकानाचा मॅनेजर नटू काका, त्याचा नोकर बाघा, साळा सुंदर आणि सोसायटीच्या कंपाऊंडला लागून छोटं दुकान चालविणारा अब्दुल हे पात्रसुद्धा या मालिकेची रंगत वाढवितात.

गुजराती हास्य लेखक तारक मेहता यांच्या ‘दुनियाने उंधा चष्मा’ या कथेवरून ही मालिका प्रेरित आहे. मूळ कथेत पाऊडर गल्लीत ही कथा घडत असल्याचे दाखविले होते. मालिकेत मात्र उच्च मध्यमवर्गीयांची गोकुलधाम सोसायटी उभी करण्यात आली आहे. मालिकेत जे तारक मेहता दाखवितात, ते खरे तारक मेहता नाहीत. शैलेश लोढा हा कलाकार त्यांची भूमिका साकारतो आहे. या मालिकेचे खर्‍या अर्थाने नायक-नायिका मात्र जेठालाल व दयाबेन गडा हे नवरा-बायकोच आहे. आपल्या अतिउत्साहीपणामुळे कायम अडचणीत सापडणारा पण त्यातून काहीही न शिकणारा जेठालाल दिलीप जोशीने तर दयाबेन दिशा वाकाणी या कलाकारांनी भन्नाट साकारली आहे. हे दोघे या मालिकेचा ‘प्राण’ आहेत. प्रत्येक मिनिटाला हे दोघे हास्य निर्माण करतात. त्यांचे हावभाव, त्यांच्या लकबी, कोणी इंग्रजी बोललं, तर त्यांच्या चेहर्‍यावर उमटणारे भाव, त्यांचा खटय़ाळपणा, एकमेकांची फिरकी घेणं हे सारंच लाजवाब आहे. वडिलांसमोर (बापूजी) आज्ञाधारकपणाचे नाटक करणारा, साळा सुंदरच्या करामतीमुळे कायम परेशान असणारा, बबिताकडून कुठलाही प्रतिसाद नसतानाही तिच्यावर लाईन मारणारा, भिडे आणि अय्यरला कायम डिवचणारा जेठालाल आणि कोणाच्याही मदतीला सदैव तत्पर असणारी, नवरा जेठालालला गमतीने खेचणारी, कुठलाही समस्या आली की ओùù माताजी म्हणणारी, आनंदाच्या प्रसंगात लगेच बेभानपणे गरबा करणारी दयाबेन निव्वळ अप्रतिम. या मालिकेअगोदर दिलीप जोशीने ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘खिलाडी 420’, ‘यश’, ‘वन टू का फोर’ ‘हमराज’, ‘दिल है तुम्हारा’ या चित्रपटांमध्ये, तर दिशा वाकाणीने ‘कमसिन’, ‘फूल और आग’, ‘देवदास’, ‘मंगल पांडे’, ‘जोधा अकबर’, ‘सी कंपनी’ आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र या दोघांना खर्‍या अर्थाने ‘स्टार’ या मालिकेने केले आहे. आज हे दोघे जिथे जातात तेथे त्यांच्याभोवती चाहत्यांची अफाट गर्दी असते. अनेक ठिकाणी स्टेज शोसाठी या दोघांना भरभक्कम मानधन देऊन बोलाविले जाते.

या दोघांसोबत या मालिकेत काम करणारे सारेच पात्र ‘नमुने’ दाखविण्यात आले आहे. कायम पार्टी शार्टी करायला उत्सुक असलेला सरदार रोशन सोधी, ‘गोकुलधाम सोसायटीका एकमेव सेक्रेटरी’ असं सांगणारा आत्माराम तुकाराम भिडे, बबितासारखी सुंदर बंगाली बायको असलेला पण काहीसा बावळट असा शास्त्रज्ञ अय्यर, प्रचंड खावखाव करणारे डॉ. हंसराज हाथी, त्यांचा तसाच खादाड मुलगा गोली, लगA व्हावं यासाठी काहीही करायला तयार असणारा फुकटय़ा पोपटलाल, जेठालालला कायम इरिटेड करणारे नटूकाका आणि बाघा, बहिणीसाठी काहीही करणारा पण जावई जेठालालला कायम चुना लावणारा सुंदर, या सार्‍याच पात्रांनी आपल्या अकृत्रिम अभिनयाने या मालिकेला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. या सर्व पात्रांच्या लकबी पाहण्याजोग्या आहेत. हे पात्र पडद्यावर आलेत की बॅकग्राऊंडला जी टय़ून वाजते ती मोठी वेधक असते. सोधी आला की ओùù पापाजी, अय्यर असला की अय्ययोùù, बाघा आला की बाघा.. अशी टय़ून मस्त वातावरण निर्मिती करते. जेठालालच्या वडिलाची भूमिका करणारे चंपकलाल गडा उर्फ बापूजींचंही मालिकेत एक वेगळं स्थान आहे. या बापूजींचा वडिलधारा म्हणून धाक तर आहेच पण अनेकदा त्यांचाही अतिउत्साह हास्याचे फवारे निर्माण करतो. ही भूमिका अमित भट्ट यांनी केली आहे. मालिकेत त्यांनी जेठालालच्या वडिलाची भूमिका केली असली तरी प्रत्यक्षात ते दिलीप जोशीपेक्षा वयाने लहान आहेत. या अमित भट्ट यांना चंपकलालची भूमिका साकारताना पहिली दोन वर्ष दर दोन दिवसाआड डोक्यावरचे केस काढावे लागत असे. काही महिन्यांपूर्वी परदेशातून चांगला विग बोलाविल्यानंतर आता त्यांची त्यापासून मुक्तता झाली आहे. या मालिकेत पोट धरून हसायला लावणार्‍या नटूकाकाची भूमिका घनश्याम नायक यांनी तर बाघाची भूमिका तन्मय वेकरिया यांनी केली आहे. मालिकेतील मराठी पती-पत्नी आत्माराम व माधवी भिडेंची भूमिका अनुक्रमे मंदार चांदवडकर व सोनालिका जोशी यांनी केली आहे. पंजाबी मिस्टर अँन्ड मिसेस रोशन सोधीची भूमिका गुरूचरण सिंग आणि जेनेफिर मिस्त्री बन्सीवाल यांनी साकारली आहे. मिसेस अंजली तारक मेहता ही प्रत्यक्षात श्वेता भोसले ही मराठी तरूणी आहे. बबिताची भूमिका मूनमून बॅनर्जी ही बंगाली कलाकार, तर अय्यरची तनूज करतो आहे. डॉ. हंसराज हाथी हे आजाद कवी, तर कोमल हाथी ही अंबिका रांजनकर साकारत आहे. पत्रकार पोपटलाल पांडेंची भूमिका श्याम पाठक, सुंदरची मयूर वाकाणी, अब्दुलची शरद सांकला, तर प्रिया रिपोर्टरची भूमिका निधीने साकारली आहे. मुलांमध्ये खोडकर टपूची भूमिका भव्य गांधी, गोगीची समय शहा, सोनूची झिल मेहता, गोलीची कुश शहा करतो आहे.

28 जुलै 2008 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके फिल्मसिटीत होते. तेथे गोकुलधाम सोसायटीचा संपूर्ण सेट उभारण्यात आला आहे. आतील दृष्यासाठी कांदिवलीच्या एका शाळेत पूर्ण फ्लोअरवर सेट उभारला आहे. सारे ताणतणाव विसरायला लावून खळखळून हसायला लावणार्‍या या मालिकेने ‘लॉगेस्ट रनिंग डेली कॉमेडी शो’ आणि ‘ऑफ द ऑल टाईम ऑन इंडियन टेलव्हिजन’ हे नवीन विक्रम नोंदविले आहेत. कुठल्याही नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आजकाल या मालिकेचा उपयोग होतो, यावरून या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. या मालिकेचं सर्वात मोठं कुठलं वैशिष्टय़ असेल, तर ही मालिका कायम ताजीतवानी असते. यातील विनोद अगदी फ्रेश असतो. विशेष म्हणजे तुम्ही कधीही ही मालिका पाहायला सुरूवात केली, तर काहीच अडचण येत नाही. रविवारी दिवसभर दाखविल्या जाणार्‍या जुन्या एपिसोडमधूनही तोच आनंद मिळतो. तुम्ही श्रीमंत असा, मध्यमवर्गीय वा गरीब; तुम्ही कुठल्याही कारणाने त्रस्त असाल, वैतागले असाल, चिंतीत असाल, तर ‘तारक मेहताका उल्टा चष्मा’चा डोस दररोज नक्की घेऊन पाहा. आयुष्य आनंददायी होईल की नाही, माहीत नाही. मात्र हसायला तुम्ही नक्की शिकाल.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-8888744796

Previous articleप्रसारमाध्यमांची विश्वासार्हता उरली कुठे?
Next articleनक्षत्राच्या हाती उजळले दिवे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.