–प्रवीण बर्दापूरकर
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त झाले ही बातमी माध्यमांच्या कोपऱ्यात लपून गेली . ( जग जरी मनमोहन सिंग या नावानं त्यांना ओळखत असलं तरी ते मात्र स्वाक्षरी ‘मनमोहन सिंह’ अशी करत . ) देशाचे माजी पंतप्रधान आणि त्या आधी , रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर , केंद्रीय अर्थमंत्री , जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ एवढीच कांही मनमोहन सिंग यांची ओळख नाही . आजचा जो विकसित भारत दिसतो आहे त्यांची पायाभरणी करणारे मनमोहन सिंग आहेत . पंतप्रधान पी. व्ही . नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करताना मनमोहन सिंग यांनी या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची जी मुहूर्तमेढ केली त्यांची फळं आज आपण चाखत आहोत . म्हणूनच मनमोहन सिंग यांच्या या नव्या भारतातलं स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे . त्यांचं वय आता ९१ आहे म्हणजे ते एका अर्थानं राजकारणातूनही निवृत्त झाल्यासारखे आहेत पण , विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा निरोप मनमोहन सिंग यांना देणं टाळलं कारण ऐन निवडणुकीच्या वातावरणात मनमोहन सिंग यांना त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप देणं नरेंद्र मोदी यांना अडचणीचं वाटलं असणार . शिवाय विरोधी विचारांच्या लोकांशी किमान उमदेपणानं वागल्याचे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या किरकीर्दीतले दाखलेही फारसे नाहीत . नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी जर आज अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असते तर मनमोहन सिंग यांना सन्मानानं निरोप दिला गेला असता यात शंकाच नाही . मनमोहन सिंग यांना देशातर्फे निरोप देणं भारतीय संसदीय लोकशाहीच्या उच्च परंपरेला साजेसं ठरलं असतं पण , हे कुणाला सांगणार आणि ते कुणाला कळणार ? आधी म्हटल्याप्रमाणं विद्यमान सत्ताधार्यात तेवढा उमदेपणा नाही , सुसंस्कृतपणा नाही . मनमोहन सिंग नावाच्या आपल्या या हिमालयाच्या उंचीच्या नेत्यांच्या सन्मानार्थ एखादा शानदार कार्यक्रम आयोजित करावा तेवढं शहाणपण पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेस पक्षाकडे उरलेलं नाही हे तर वेगळ्या पातळीवरचं दारिद्र्य आहे .
देशाला विकासाच्या वेगळ्या वाटेवर नेणारं व्यक्तिमत्व एवढीच कांही मनमोहन सिंग यांची ओळख नाही . त्यांच्या राजकारण आणि प्रशासनाला अर्थकारणांची खोलवार जाण होती . राजकारणाचा अर्थशास्त्रीय विचार करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते . यांचा अर्थ ते कुशल राजकारणी नव्हते असे नव्हे ; अमेरिकेशी केलेल्या अणु कराराच्या वेळी तीव्र विरोध करणाऱ्या डाव्यांना एकटं पाडण्याचा मुत्सद्दीपणा त्यांनी कसा दाखवला आणि परिणामी देशाच्या डाव्यांची ताकद कशी क्षीण झाली हे कांही वेगळं सांगायला नको . मंत्री मंडळातील सहकाऱ्यांवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत जाहीरपणे बोलत नाही म्हणून ‘मौनी बाबा’ , ‘सोनियांच्या ताटाखालचं मांजर’ आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तर ‘देशाचा सर्वात कमजोर पंतप्रधान’ अशी जहरी टीका त्यांना सहन करावी लागली पण , या टीकेला त्यांनी कधीच भीक घातली नाही हेही तेवढंच खरं . पक्षांतर्गत त्यांचे कांही कमी विरोधक नव्हते पण त्या कुणाबद्दलही मनमोहन सिंग कधीच आकसाने वागले नाहीत कारण त्यांचा स्वभावच ऋजु आणि सुसंस्कृत होता .यांचा अर्थ ते मुखादुर्बल होते असे नव्हेच ; जे कांही बोलायचं ते संयत आणि ठामपणे बोलण्याची त्यांची शैली होती . मनमोहन सिंग यांचा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता ; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्विक दबदबा ! आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ . मनमोहनसिंग निवृत्त झाल्यातच जमा असलं तरी , या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे , देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्ष पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे .
प्रदीर्घ काळच्या पत्रकारितेत मनमोहन सिंग यांना केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणूनही मला अनुभवता आलं . प्रसंग १९९३च्या फेब्रुवारी महिन्यातला . स्थळ नागपूरच्या रवी भवनातील हॉल . केंद्रीय अर्थमंत्र्याची पत्रकार परिषद सुरु असतांना एका पत्रकारानं एका राष्ट्रीयकृत बँकेचा उल्लेख करुन या बँकेच्या सेंट्रल अव्हेन्यू शाखेत नेहेमीच जुन्या व फाटक्या नोटा मिळतात अशी तक्रार केली आणि नवीन करकरीत नोटा देण्याचे आदेश त्या बँकेच्या व्यवस्थापकाला द्यावेत, अशी मागणी केली . पत्रकार परिषदेत सन्नाटा पसरला कारण ज्यांची अर्थशास्त्रज्ञ व तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर ओळख होती ते डॉ . मनमोहन सिंग समोर होते आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारु नये याचं तारतम्य पूर्ण मातीत मिसळलेलं होतं . डॉ . मनमोहन सिंग यांनी एक पॉझ घेतला , नंतरच्या काळात सर्व परिचित झालेलं त्यांचं हलकंसं स्मित दिलं आणि ‘वुईच बँक’ असं विचारलं . त्या पत्रकारांनं बँक आणि शाखेचं नाव सांगितलं . ‘आय वुईल लुक इन टू द मॅटर’, असं डॉ . मनमोहन सिंग यांनी सांगितलं आणि ‘नेक्स्ट क्वश्चन प्लीज’ असं आमंत्रण पत्रकारांना पुढील प्रश्न विचारण्यासाठी दिलं . हे सगळं अचानक घडलं तरी डॉ . मनमोहन सिंग यांच्या त्या शांतपणानं आम्ही स्तिमितच झालो .
दुसरा अनुभव तर हृद्यच आहे . जगातील कांही प्रमुख देशांची शिखर संस्था असलेल्या जी-२० संघटनेची बैठक रशियातील सेंट पीटसबर्ग इथं २०१३मध्ये झाली . या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांच्या चमूत एक पत्रकार म्हणून माझा समावेश झाला तो विजय दर्डा यांच्यामुळे ; त्यावेळी मी लोकमत वृत्तपत्र समुहात राजकीय संपादक म्हणून दिल्लीत कार्यरत होतो . बाय द वे , परदेशी दौऱ्यात पत्रकारांना सोबत सहभागी करुन घेण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केली आहे .
मायदेशी परतीच्या प्रवासात पंतप्रधानांनी उडणार्या विमानातच एक पत्रकार परिषद घेण्याचा रिवाज तेव्हा होता . ( ‘पंतप्रधानांच्या विमानातून’ अशी डेट लाईन असलेल्या बातम्या अनेकांना आठवत असतील .) त्याप्रमाणे पत्रकार परिषदेसाठी रशियातून भारतात परततांना , पत्रकार बसलेल्या विमांनाच्या मध्यवर्ती भागात डॉ . मनमोहन सिंग आले . सर्व पत्रकारांनी अदबीनं उठून उभं राहून पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांना अभिवादन केलं . हात जोडून सस्मित पत्रकारांनी केलेल्या सामूहिक अभिवादनाचा स्वीकार केल्यावर , केल्यावर , स्वत:च्या आसनाकडे जाण्याऐवजी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी प्रत्येक पत्रकाराच्या आसनाजवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केलं . हे इतकं अनपेक्षित घडलं की उपस्थित २२/२३ पत्रकारांपैकी कुणालाही डॉ . मनमोहन सिंग यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचंही भान राहिलं नाही ; अर्थात याची चुटपुट नंतर सर्वांनाच लागली . महापालिकेचा तर सोडाच , नगर पंचायत किंवा पंचायत समितीचा सदस्य झाल्यावर माज ओतप्रोत अंगात भिनलेले लोकप्रतिनिधी गल्लीबोळात एका किलोग्रॅमला हजार पाहायला मिळत असल्याचे दिवस आलेले असतांना पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्चपदी असणार्या शिवाय उच्चविद्याविभूषित असणार्या या माणसाचा हा सुसंस्कृतपणा आणि नम्रता ‘वाखाणणे’ या शब्दात मुळीच मावणारी नाही . चार दशकांच्या पत्रकारितेत कांही पंतप्रधान जवळून तर कांही लांबून पाहता आलं मात्र , असा सच्चा , साधा , नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ . मनमोहन सिंग हेच एकमेव .
मनमोहन सिंग यांचा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता ; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्विक दबदबा ! त्यामुळे आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ . मनमोहन सिंग निवृत्त झाल्यातच जमा होणार असले तरी , या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे , देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्ष पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे .
