त्या काळांत डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या या जास्तीत जास्त २००० टन वजनाच्या होत्या. मात्र जपानने तंत्रज्ञान – अभियंत्रिकी कौैशल्याची कमाल करत तब्बल ६५०० टन वजनाच्या १२० मीटर लांबीच्या I-400 पाणबुड्या बांधल्या. इंधन ( डिझेल ) पूर्ण भरल्यावर एका दमात पृथ्वीची एक प्रदक्षिणा मारण्याची या पाणबुडीची क्षमता होती. पाणबुडीवरुन हवेत झेप घेण्याची क्षमता असलेले M6A1 नावाचे खास विमान हे I-400 साठी विकसित करण्यात आले होते. ५०० किमी पेक्षा अंतर कापत टॉर्पेडो डागत किंवा बॉम्ब फेकत परतण्याची या विमानांची क्षमता होती. समुद्रात उतरल्यावर एका क्रेनच्या सहाय्याने परत पाणबुडीमध्ये ठेवण्याची सोयही करण्यात आली होती. एका वेळी तीन M6A1 विमाने सामावून घेण्याची क्षमता I-400 पाणबुडीमध्ये होती.