केवळ बातम्यांची कात्रणे/लिंक तसेच भाटगिरी करणार्या पोस्ट व्हायरल करणारे अंधभक्त वा विरोधकांची खिल्ली उडविणार्या ट्रोलर्सची फौज पदरी बाळगली म्हणजे आपण हायटेक प्रचारतंत्र वापरत असल्याचा बहुतेक राजकारण्यांचा गैरसमज असतो. स्वत:ला टेक्नोसेव्ही म्हणविणारे नेतेही याला अपवाद नाहीत. मात्र मोजके पुढारी हे तंत्रज्ञानाचा अतिशय समर्पक वापर करत असल्याचे दिसून येते. यातील विविध आयामांवर मी लक्ष ठेवून असतो. या बाबींचा विचार करता, आपल्या राजकीय कारकिर्दीत टेक्नॉलॉजीचा अतिशय समर्पक व परिणामकारक वापर करणारे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांची गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही लक्षणीय मानावी लागणार आहे.
मार्केटींगच्या तंत्रात आत्यंतिक वाकबगार असणार्या गुजराती बांधवांमध्ये राहून आपले प्रचारतंत्र यशस्वीपणे राबविणारे चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील हे मूळचे भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. १९८९ पासून राजकारणात सक्रीय असणारे पाटील हे तिसर्यांदा लोकसभेत निवडून गेले आहेत. यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कमाल केली. एकही जाहीर सभा न घेता, वा प्रचार फेरी न काढता त्यांनी गेल्या वर्षी देशातून सर्वाधिकक ६.८९ लाखांचे मताधिक्य मिळवून संपादन केलेला विजय भल्याभल्यांना थक्क करणारा होता. (याबाबत मी आधी लिहलेला लेख आपण https://bit.ly/2CPGrYm या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.) सी.आर. पाटील हे कुशल प्रशासक व रणनितीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपर्क कार्यालयास आयएसओचे मानांकन मिळाले असून एका समर्पित व पूर्ण वेळ काम करणार्या चमूच्या माध्यमातून ते आपल्या मतदारांच्या कायम संपर्कात असतात. लोकांची कामे जाणून घेत, त्यांच्या निराकरणासाठी त्यांनी स्वतंत्र प्रणाली उभारली आहे. याच पाटील यांच्याकडे गुजरात भाजपची धुरा आल्याने आता ते डिजीटायझेशनचा हाच पॅटर्न संपूर्ण गुजरात राज्यातील पक्षाच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वापरणार का ? ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. त्यावर लक्ष ठेवून काही अपडेट असल्यास मी याबाबत नक्की लिहेल. तथापि, त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने आजचा मुद्दा हा राजकारणातील तंत्रज्ञानाच्या वापराचा आहे.
डिजीटल मीडिया मॅनेजमेंटमध्ये कंटेंट आणि त्याची डिलीव्हरी हे जितके महत्वाचे घटक आहेत, तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाच्या बाबी म्हणजे डिजीटल माध्यमातील कंटेंट हे युजर्सपर्यंत कसे पोहचते ? याची प्रणाली नेमकी कशी काम करते ? यात काही गैरप्रकार होतात का ? कुणी त्रयस्थ शक्ती यात छेडछाड करू शकते का ? आदी होत. संगणकापासून ते स्मार्टफोनपर्यंतच्या उपकरणांमध्ये अल्गॉरिदम महत्वाचा असतो. याच प्रकारे डिजीटल माध्यमातील माहिती अल्गॉरिदमच्याच मदतीने युजर्सपर्यंत पोहचत असते. जिथे फक्त हार्डवेअरचा संंबंध असतो तिथे ते उपकरण हॅक झाल्याशिवाय त्याच्या माहितीत फेरफार करता येत नाही. तथापि, सायबरविश्वातील विविध सोशल साईटचा स्वतंत्र अल्गॉरिदम असून यात बर्यापैकी ‘काड्या’ करता येतात. गुगल सर्च हे विशिष्ट पध्दतीने प्रोसेसिंग करून आपल्याला सर्च रिझल्ट दाखविते. फेसबुक, ट्विटर, युट्युब आदींसह अन्य सोशल साईटचेही स्वतंत्र अल्गॉरिदम्स आहेत. आता निवडणुकीच्या काळातच नव्हे तर फार आधीपासून हा अल्गॉरिदम समजून त्याच्याशी सुसंगत असा प्रचार करणारा राजकीय पक्ष वा नेत्याला साहजिकच लाभ होईल, ही उघड बाब आहे. नाही तर, कथित ‘वॉर रूम’मध्ये शेकडो जणांना बसवून पोस्ट फॉरवर्ड केल्या तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
डिजीटल मीडिया हा आता नवीन आयामात पोहचला आहे. आता कुणालाही स्वत:चा प्रचार करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अल्गॉरिदम समजून घ्यावा लागेल. म्हणजे डिजीटल माध्यमात भाराभार पोस्ट करण्यापेक्षा त्या अतिशय विचारपूर्वक, योग्य त्या शब्दांची निवड करून व अल्गॉरिदमशी सुसंगत प्रसारीत केल्या तरच परिणामकारक ठरतील. यामुळे आगामी निवडणुकीतील झुंज ही अल्गॉरिदमच्या मैदानावर लढली जाणार हे निश्चित आहे. सोशल मीडियातील ट्रेंडस समजणे तसे थोड्या अभ्यासाने शक्य असले तरी अल्गॉरिदम ही याच्या किती तरी पटीने पुढील बाब असल्याचे मान्य करावे लागणार आहे. आगामी काळातील कोणत्याही निवडणुकीची तयारी करणार्यांना आता डिजीटल प्रचार तंत्रातही गिअर बदलावा लागेल. त्यांना इफेक्टीव्ह कंटेंट क्रियेशन व डिस्ट्रीब्युशनच्या जोडीला अल्गॉरिदमच्या ज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे. आणि अर्थातच माहिती म्हणजे डाटा या प्रचारतंत्राचा आत्मा असेल. यामुळे राजकारण्यांना आता तांत्रिक सल्लागाराचीही आवश्यकता भासेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हा सगळा प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे.
आपण वापरत असणारा डिजीटल मीडिया हा खूप वरवरचा असल्याचे लक्षात येणे, ही याला समजून घेण्याची पहिली पायरी मानावी लागेल. तर, याच्या पलीकडच्या अज्ञात प्रदेशात प्रवेश करून त्यात कौशल्य प्राप्त करणे हे वाटते तितके सोपे नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून याचा ‘किडा’ माझ्या डोक्यात शिरला असून साहजिकच याच्याशी संबंधित बाबींमध्ये मी आकंठ बुडालेलो आहे. कधी तरी याच्याशी संबंधीत अन्य पैलूंवर लिहतो. विशेष करून अल्गॉरिदममधील फेरफार हा किती उलटफेर करू शकतो ? याबाबत सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असेल.
(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)