ब्रिटनच्या राजाने अल्बर्ट पदक देऊन केला होता गौरव; इनाम म्हणून मिळालेली ४५ एकर जमीन वनविभागाने हडपली
-तिरुपती चिटयाला
वाघाच्या जबड्यात सापडलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी बडा माडिया जमातीतील एका युवकाने अद्भुत शौर्य दाखविले. त्याच्या शौर्यगाथेची पताका ब्रिटनमध्ये फडकली. दस्तूरखुद ब्रिटनचा राजा त्याच्या शौर्यावर मोहित झाला. राजाने स्वतः पुढाकार घेऊन त्याला ‘अल्बर्ट’ पदकाने सन्मानित केले. ‘अल्बर्ट’ पुरस्कार मिळविणारा हा एकमेव भारतीय आहे. विभाजनपूर्व चंद्रपूर जिल्ह्यातील मुडेवाही येथील सामा वेलादी असे त्या शूरवीराचे नाव आहे. वेलादीच्या तिसऱ्या पिढीने आपल्या आजोबाचे पदक जपून ठेवले आहे. ब्रिटनच्या माध्यमांनी सामाच्या शौर्याची दखल घेतली होती. मात्र आता दंडकारण्यालाच त्याचे विस्मरण झाले आहे.
सिरोंचा तालुक्यातील एका शूरवीराने दाखविलेल्या शौर्याची चर्चा ब्रिटनमध्ये झाली. सिरोंचाची ओळख सातासमुद्रापलीकडे घेऊन गेलेला हा शूरवीर सिरोंचा तालुक्यातील मुडेवाही येथील सामा वेलादी आहे. ९ नोव्हेंबर १९२४ रोजी फॉरेस्ट ऑफ दक्षिण चांदा डिव्हिजनचे डेप्टी कंजर्वेटर एच. एस. जॉर्ज हे सामा वेलादीला सोबत घेऊन सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली वनक्षेत्रात भटकंतीला गेले. भटकंतीच्या दरम्यान वाघाने जॉर्ज यांच्यावर हल्ला केला.जॉर्ज यांची मानगुटी जबड्यात घेऊन वाघ त्यांना फरपटत नेत होता. जॉर्ज यांच्यापुढे असलेल्या सामाने त्यांची किंचाळी ऐकली. तो मागे फिरला. त्याच्याकडे जॉर्जची बंदूक होती. मात्र, ती त्याला चालविता येईना. अशा बिकट स्थितीत सामाने हातातील बंदूक फेकली अन् वाघाच्या दिशेने झेप घेतली. केवळ शारीरिक बळाने सामाने वाघाच्या जबड्यातून जॉर्जला सोडविले. जखम मोठी होती. अतिरक्तस्त्राव झाल्याने जॉर्ज बेशुद्ध पडला होता. आपल्या खांद्यावर जॉर्जला घेऊन सामाने गाव गाठले. त्याला मुडेवाही गाव गाठायला तब्बल सात दिवस लागले. सात दिवस वनौषधींच्या मदतीने सामाने उपचार केला अन् जॉर्ज अधिकाऱ्याचे प्राण वाचविले. ब्रिटनच्या राजापर्यंत सामाची शौर्यगाथा पोहोचली. त्यांनी ‘अलबर्ट’ मेडल सामा वेलादी यांना जाहीर केले. नागपूर येथील एका सोहळ्यात सामा वेलादीला पदकाने सन्मानित करण्यात आले. सामा वेलादींना मिळालेले प्रशस्तिपत्र, पदक, चांदीचे कडे तिसऱ्या पिढीने आजही जपून ठेवले आहे.
ब्रिटनच्या माध्यमांनी केला गौरव सामा वेलादी याचा शौर्यगाथेची ब्रिटनचा माध्यमांनी तोंड भरून कौतुक केले. ‘दी स्ट्रेट्स टाईम्स’ने १५ जून १९२५ ला आपल्या अंकात ‘ इंडियन हीरो’ अशी उपाधी सामा वेलादी यांना बहाल केली. वेलादी यांची शौर्यगाथा पेज दोनवर त्यांनी छापली होती.
सामा वेलादी यांना दिलेल्या प्रशस्तिपत्रात त्यांना ब्रिटिश सरकारने दान दिलेल्या जमिनीचा उल्लेख आहे. १५ एकर जमीन मुडेवाही वनक्षेत्रात, १० एकर जमीन जार्जपेठा वनक्षेत्रात, तर २० एकर जमीन कक्ष क्र. २१ आणि ३१ मध्ये प्राणहिता नदीच्या काठावरील आहे.
दान दिलेली ४५ एकर जमीन सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. ही जमीन परत मिळविण्यासाठी सामा वेलादी यांची मुले, नातवंडांचा गेल्या तीन पिढ्यापासून संघर्ष सुरू आहे.वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
ब्रिटिश वृत्तपत्राच्या माहितीनुसार स्टेनली जेपसन पुस्तकांत ‘बिग गेम एन्काऊंटर’ आणि ब्रिगेडियर-जनरल आरजी बर्टनच्या ग्रंथात ‘ए बुक ऑफ मैन-इटर्स’असे नमूद आहे.आणि वायर एजेंसीने मे-जून १९२५ च्या जवळपास ऑस्ट्रेलिया,स्कॉटलंड आणि ब्रिटनमध्ये सामा वेलादीच्या शोर्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. सामाने तेव्हा भारताचे नाव साता समुद्रापलीकडे पोहचविले. अमात्र आदिवासी समाजातील योद्ध्याची आजची पिढी मात्र सनदच्या रूपाने आपल्या पणजोबाला ब्रिटिश सरकरकडून मिळालेल्या आपल्या हक्काच्या जमिनीसाठी वणवण भटकंती करावा लागत आहे.
(लेखक दैनिक ‘नवराष्ट्र’चे सिरोंचा येथील प्रतिनिधी आहेत)
9421147890
पूर्वप्रसिद्धी – दैनिक ‘नवराष्ट्र’, नागपूर
सामा वेलादी यांना मानाचा मुजरा…
असे अनेक सामा इतिहासाने दखल न घेतल्याने काळाच्या पडद्याआड लुप्त झालेत,अन ज्यांनी ऐतिहासिक असं काहीच प्रभावशाली केलं नाही ते केवळ एका वर्गाचे असल्याने प्रकाशझोतात आहेत.
“सत्याला सत्य आणि असत्याला असत्य जाणा” या बुद्धाच्या तत्वा प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी “जातीचे निर्मूलन” या ग्रंथाची सूर्वात केली आणि या देशाच्या सर्व प्रश्नांची मूळ मेख कुठे आहे हे दाखवून दिली. व त्यावर उपाय ही दिला. या पद्धतीचा वापर केला तर हजारो सामा सत्य उत्खननातून बाहेर येतील. त्यासाठी साठीत्यकाची लेखणी या लेखा प्रमाणे तेजाळली पाहिजे.