पावसाळी वातावरण होतं. १९७१ चा जुलै महिना. आप्पाजीनं बोट धरून मला शाळेत नेलेलं. गावातल्या गांधीचौकात असणार्या बालवाडीच्या जुन्या इमारतीच्या बाजूला असलेल्या टिनाच्या पहिल्या वर्गात माझं नाव टाकलं होतं. बालभारतीचा सिम्बॉल असलेलं पिवळ्या रंगाचं मराठी बालभारतीचे पुस्तक माझ्या नॉयलॉनच्या झोर्यात होतं. त्यात एक पाटी होती. शाळा प्रवेशानंतर बाकी काही आठवत नाही. लघवीच्या सुट्टीत पंचमुखी महादेव मंदिरापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या कोपर्यापर्यंत लघवीला जावे लागायचे. कोपर्यावर पिशा पाचघरीनचं घर होतं पडलेलं. ती बिचारी कुणाशी काही बोलत नव्हती. दुपारच्या सुट्टीत घरी जेवायला यायचं. पुन्हा शाळा. खूप पाऊस असला की, नदीला पूर असायचा. पलीकडे जाता यायचं नाही. त्यामुळे शाळेला सुट्टी मिळायची. पूर्वी म्हणे या नदीत खूप दलदल होती. माणसे फसायची. दलदलीला डेरे म्हणायचे. त्यामुळे पूर्वी या गावाला डेर्याची यावली म्हणायचे. नदीवर पूल नव्हता. नदी बारा महिने वाहती होती. फक्त उन्हाळ्यात मात्र काही ठिकाणी कोरडे पडायचे. एरव्ही ती सदा वाहती. नदीच्या काठावर दाट वाढलेलं उंचच उंच बाभुळबन. काठावर थोड्या अंतरावर माझं घर. उजव्या हातावर नदीच्या दोन्ही काठांवर वाढलेले बाभुळबन नदीपात्रावर दोन्ही बाजूने कमान धरणारे. पावसाळ्यात नदीला मोठे पूर यायचे. पुराचे पाणी घराच्या ओट्याला टेकायचे. पूर उतरण्यासाठी वडील नदीची पूजा करायचे. नदीच्या पहिल्या पुरात खयवाडीतील काट्या, झाडांची खोडं वाहून यायची. त्या पुरात पोहायची कोणी हिंमत करत नव्हते. दुसर्या पुरात नारळ पकडण्यासाठी आम्ही पुरात उड्या घ्यायचो. पोहण्यावरून आठवलं, अण्णांच्या आखरातल्या विहिरीत भर उन्हाळ्यात आपण पोहणं शिकलेलो. त्यामुळे स्थिर होऊन पोहणं, बुडी मारणं हे प्रकार यायचे. लांबदूर पोहत जायचं, म्हणजे पाय दुखायचे. नदीला लांब पोहण्याजोगं पात्र नव्हतं. विहिरीतलं पोहणंच तिथे कामी यायचं. पण, दुथडी भरलेल्या नदीच्या पुरात उडी टाकून पैलतीरावर निघण्यासाठी विहिरीतील पोहणंच कामी यायचं. या गोष्टींवर वडिलांचे लक्ष नसायचे. त्यामुळे आपलं एक बरं झालं, हे कर ते करू नको असे सल्ले कधी ऐकायची गरज पडली. त्यामुळे जे काही चांगले वाईट झाले, त्याला आपणच जबाबदार होतो.
घर, शेती, शाळा, शाळेतील सोबती हेच तेव्हा आपलं भावविश्व होतं. चौथीला शिष्यवृत्तीची परीक्षा असायची. त्याचा वेगळा अभ्यास करण्यासाठी उमक भाऊसाहेब कंदील घेऊन घरी बोलवायचे. हे परीक्षेपूर्वी दोन महिने अगोदरपासून चालू असायचे. मुलंमुली मिसळून राहायचे. पाचवीपासून दहावीपर्यंत मुलामुलींचा संवाद नव्हताच, साधं बोलणंही नव्हतं. ही गॅप चौथीनंतर कशी पडली, काही कळायला मार्ग नाही. आताही चार पाचजण सोडले, तर कोण कुठे आहे काहीही माहिती नाही. नाही म्हणायला, एकदोनदा मोठ्या आईसोबत अमरावतीला गेलो की राजकमल चौकातल्या राजलक्ष्मी टॉकीजमध्ये नया दौर वगैरे सिनेमे बघितले. घरापासून टॉकीजपर्यंतचा रस्ता फक्त ठाऊक होता. तसेच, शाळेत कधीकाळी प्रोजेक्टर आणून हा ‘माझा मार्ग एकला’ वगैरे सिनेमे पाहिले होते. शहर मात्र कधी आपलं वाटतच नव्हतं.