अमिताभ बुद्धिमान आहे. त्याला स्वत:च्या चुका उमगतात. त्या सुधारून पुन्हा नव्याने डाव मांडण्याची सकारात्मक उर्जा त्याच्यात शिगोशिग भरलेली आहे. काळात होणारे बदल तो खुल्या दिलाने स्वीकारतो. त्याच्या उमेदीच्या काळात त्याने दुर्जनांना ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडणारे अनगिनत सिनेमे केले. ‘सत्याचा नेहमी विजय होतो’ या तमाम भारतीयांना आवडणार्या आचरट पण लोकप्रिय समजावर ते आधारलेले असायचे. त्यात लॉजिक नसलं तरी लोकांना चालायचं. त्यांना फक्त अमिताभ हवा असायचा. अमिताभने हिंदी सिनेमांची अख्खी मिरवणूक एकहाती वेगळ्या दिशेला वळवली.. पण त्याने जो पायंडा घातला त्यामुळे हिंदी सिनेमांचे नुकसानही झालेलं आहे. अर्थात त्याला नुकसान म्हणायचं की ‘काळाची गरज’ म्हणायची, हा एक वेगळा मुद्दा यातून निघतोच. ज्या पद्धतीच्या सिनेमांनी त्याला मोठं केलं, त्याच सिनेमांनी काही चांगल्या गोष्टी देशोधडीला लावल्या. उत्तम संगीत, दर्जेदार विनोद करणारे विनोदी नट, पहिल्या प्रतीचे खलनायक आणि नायिकेचे महत्त्व, हे सारे संपवण्याचे काम अमिताभच्या सिनेमांनी केलं, तो ज्या पठडीतले सिनेमे करून स्वत:ला प्रस्थापित करत होता, (किंवा ज्या पठडीतल्या सिनेमांची मागणी त्या काळात वाढली होती) त्यात प्रेम, गाणी वगैरेंना फारसा वावच नव्हता. ‘त्रिशूल’ किंवा ‘दीवार’मधे आपण ‘खोया-खोया चांद’ किंवा ‘मुझको अपने गले लगा ले’सारख्या गाण्यांची कल्पनाच करू शकत नाही. राह चलती टॅक्सी थांबवून, दरवाजा उघडून ड्रायवरला रस्त्यावर भिरकावून द्यायचं आणि त्या टॅक्सीतून खलनायकाचा पाठलाग करायचा, ‘मैं आज भी फेंके हुये पैसे नहीं उठाता’ ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं नामुमकीन है’ ‘मैं उसी शांती का बेटा हूं और आप…. मेरे नाजायज बाप हैं’ वगैरेचं गारुड एवढं जबराट होतं की गाणी पडद्याआड जातायत हे जाणवलंच नाही. नंतर अमिताभनेच ‘सिलसिला’ या प्रणयरम्य संगीतपटात काम केलं, ही त्याची खासियत.. किंवा आपणच केलेल्या पापातून बाहेर पडण्याची त्याची अदा म्हणू आपण. जो प्रकार संगीताचा तोच विनोदाचा. अमिताभच्या बोलण्यात रसरशीत असा देसी लहजा आहे. विनोद करतांना तो कामी येतो. शिवाय त्याच्या उंची आणि देहबोलीमुळे खलनायकी कामं देखील त्याला ‘हिरो’सारखी शोभून दिसतात. एखाद्या पोरीला पळवून आणून तिचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून देणं, अॅम्ब्युलन्स घेऊन जाऊन कोणालातरी अर्धमेला होईपर्यंत मारणं, हे सारे तो इतक्या स्टाईलने करायचा की ही गुन्हेगारी कृत्ये आहेत हे विसरून पब्लिक त्याला डोक्यावर घ्यायची. जे आम्ही करू शकत नाही ते हा करतोय, याचंच कौतुक असायचं ते. नायक, खलनायक, विनोदवीर असं सगळं एका पैकेजमधे मिळत असतांना कोण ते प्रेम चोप्रे आणि मेहमूद पाळणार? झालं, संपले बिचारे. त्याच्या हाताखाली विनोद करायला आणि त्याचा मार खायला दुसर्या फळीतले विनोदवीर आणि खलनायक तेवढे राहिले.
पण अति तिथे माती व्हायला लागली तेव्हा बहुतेक त्याची नियती त्याच्यावर नाराज झाली. हळूहळू त्याचे सिनेमे दर्जा सोडायला लागले होते. मधेच एखादा चमकदार सिनेमा यायचा पण अमिताभ संपतोय की काय अशी अवस्था आली. राजीव गांधींना मदत व्हावी म्हणून तो राजकारणात गेला होता. नाही म्हंटलं तरी त्यामुळे त्याची पीछेहाट सुरु होतेय की काय असं वाटायला लागलं. त्याच्या सिनेमांना थिएटर्स मिळेनात. त्याच्या पोस्टरवर काळं फासलं जाऊ लागलं. चाहत्यांच्या जीवाची उलघाल होत होती. त्याने ‘एबीसीएल’ नावाची प्रॉडक्शन कंपनी काढली. त्यात तो धुतला गेला. दिवाळखोर झाला.1988 मधे जेव्हा ‘गंगा, जमना, सरस्वती’ सडकून आपटला तेव्हा ‘द इलस्ट्रेटेड वीकली’ने हताश झालेला अमिताभ कव्हरवर छापून त्याच्या फोटोवर “FINISHED!’ अशी अक्षरं छापली. त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण तो देवांचा लाडका मुलगा होता! आणि देव आपल्या लाडक्या लेकरांसाठी ‘देवमाणसं’ पाठवतो!! आणि त्याचा पत्ता गुपचूप आपल्या लेकराच्या कानात सांगतो. देवाने अमिताभच्या कानात ‘यश चोप्रा’ हे नाव सांगितलं. अमिताभने चोप्रांना फोन केला. मला काम द्या, माझ्याकडे काम नाही असं सांगितलं. त्यावेळी चोप्रा ‘मोहब्बते’ची जुळवाजुळव करत होते. त्यातली नारायण शंकर ही भूमिका अमरीश पुरी करणार होते. पण अमिताभ येतोय म्हंटल्यावर कथेची मांडणी बदलली. अमिताभने ती भूमिका केली आणि कमाल केली. चाहत्यांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढले. त्यांना पण तर आपल्या ‘लाडक्या लेकराचा’ सन्मानाने झालेला पुनर्प्रवेश बघायला थेटरात जायचं असेल ना?? या भूमिकेनं अमिताभला ‘बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्या’चा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. आणि…