कणा मोडून पडलेली सध्याची पत्रकारिता !

-प्रवीण बर्दापूरकर

द्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे उठलेल्या वादळावरुन आमच्या काळची पत्रकारिता आणि पत्रकार आठवले . आमचा काळ म्हणजे , १९७० ते ८० च्या दशकात जे पत्रकारितेत आले आणि ज्यांनी पत्रकारिता केली त्यांचा काळ . तेव्हा फक्त मुद्रित माध्यम आणि दूरदर्शन होतं . संपूर्ण राज्यात मिळून जास्तीत जास्त साडेसातशे आठशे पूर्णवेळ पत्रकार होते , त्यांना श्रमिक पत्रकार म्हणत . मुंबईच्या वृत्तपत्रांच्या डाक आवृत्ती महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचत असा तो काळ होता.  मंत्रालयातही दैनंदिन येणारे १८-२० पत्रकार असत . काही विशेष असेल किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीचं ब्रीफिंग असेल तर ही संख्या २२-२५ वर पोहोचत असे . मुख्यमंत्र्यांचं ब्रीफिंगही त्यांच्या बैठकीच्या खोलीत होत असे , इतकी पत्रकारांची संअधिकाऱ्यांचं ख्या कमी होती . तेव्हा . पत्रकार आणि पत्रकारितेला विश्वासार्हता होती . पत्रकारांचा मान सन्मान राखला जात असे . अगदी मुख्यमंत्र्यांकडेही पाच-सात पत्रकार एकत्र मिळून अचानक गेले तर बैठक थांबवून मुख्यमंत्री , ‘काय झालं रे बाबांनो ?’ हे विचारायला बाहेर येत . त्या काळात पूर्णवेळ पत्रकारिता करणाऱ्यांची संघटना सशक्त होती . मुंबई , पुणे , नागपूर , औरंगाबाद , सोलापूर अशा काही ठिकाणी पूर्णवेळ पत्रकारांची संख्या लक्षणीय होती आणि तिथे श्रमिक पत्रकार संघ असे . राज्यस्तरावर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ होता . तेव्हा राजकारणी आणि प्रशाकीय अधिकारी फारच क्वचित बेताल वागत .

      अलीकडच्या काळात राजकारण आणि प्रशासनातील नेते-अधिकाऱ्यांचं बोलणं आणि वागणं खूपच बेताल आणि उर्मट झालं आहे. आमचा एकेकाळचा सहकारी आणि आता शिवसेनेचा बडा नेता असलेला खासदार संजय राऊत तर शिव्यांना ओव्या म्हणतो. मानतो . शस्त्रापेक्षा शब्दाचा घाव जास्त दुखावणारा असतो , हे संजय विसरुनच गेला आहे ! किती नावं घ्यावी ? ‘हुच्च’ नेत्यांची फौजच आता राजकारणात आहे . राजकारणात आडदांडपणा आणि राडा संस्कृती आणली ती शिवसेनेनं आणि त्याची लागण सर्वपक्षीय झालेली आहे . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी तेव्हाच्या औरंगाबादला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसैनिकांनी पत्रकारांना कसं तुडवलं आणि जीवाच्या भीतीनं काही पत्रकार कसे झाडावर चढले होते , या हकीकती जुने पत्रकार आजही उमाळे काढून सांगतात.

     तेव्हा पत्रकार जसे संख्येने कमी होते , तसंच व्यवस्थापन ‘धंदेवाईक’ नव्हतं . अनेक व्यवस्थापनात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असणारे उच्चपदस्थ होते . त्यामुळे एक गांभीर्य पत्रकारितेला होतं . त्या काळातल्या एक-दोन आठवणी इथे सांगण्याचा मोह आवरत नाही . वसंतराव साठे हे तेव्हा काँग्रेसच्या राजकारणातलं एक बडं प्रस्थ होतं . गांधी कुटुंबीयांशीही त्यांचा निकटचा संपर्क होता . वसंत साठे यांचं व्यक्तिमत्त्व मोठे रुबाबदार शिवाय , त्यांचं मराठी आणि इंग्रजी ही वाचन समृद्ध होतं . राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात वावरल्यामुळे एक मुरब्बीपणा त्यांच्या अंगात होता . इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते . ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर रंगीत टीव्ही देशभर पोहोचवण्याचं श्रेय इंदिरा गांधी यांच्यासोबत वसंत साठे यांनाही जातं . ते संपूर्ण विदर्भाचेच ‘बापूसाहेब’ होते . वसंत साठे तेव्हा केंद्रीय खाण आणि कोळसा मंत्री होते. ते  नागपूरला आले की हमखास एक पत्रकार परिषद घेत . आमच्यासारखे काही नवखे वगळता बाकी सगळे ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या वैयक्तिक संपर्कात होते नंतर आम्हीही त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्हा सर्वांना ते अगदी पहिल्या नावाने संबोधत असत इतका संपर्क निकटचा होता . पण , वसंत साठे यांना एक मोठी खोड होती . ते कधीच कुठे वेळेवर जात नसत . पत्रकार परिषदेलाही ते तास दीड तास उशिरा येत . एक मात्र खरं , वसंत साठे नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पंचशील चौकातल्या चांद्रमौळी कार्यालयात येत आणि एकदा आले की दीड दोन तास पत्रकारांमध्ये रमून जात . अनेकदा वसंत साठे आमच्यासोबत पत्रकार संघासमोरच्या कॉफी हाऊसमध्ये बैठक ठोकत .

       त्यांच्याशी मैत्रभाव असा होता की आमच्या पिढीचेही पत्रकार बिनदिक्कत त्यांच्यासमोर कॉफी हाऊस कल्चरला साजेसं धूम्रपान करत . वसंत साठे यांचा उशिरा येणं आम्हाला फार खटकायचं . आमच्या सोबतचे काही ज्येष्ठ पत्रकार निवृत्त झाल्यावर आम्ही तरुण पत्रकारांनी वसंत साठे यांना धडा शिकवायचं ठरवलं . अशीच एकदा वसंत साठे यांची पत्रकार परिषद ठरली . ठरल्याप्रमाणे आम्ही पत्रकार भवनात सकाळी ११ वाजता पोहोचलो . साडेअकरापर्यंत वाट पाहून आम्ही पत्रकार भवनाला कुलूप लावलं आणि समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन गप्पा मारत बसलो . इकडे पत्रकार भवनाला कुलूप बघून तिथे आलेले खाण मंत्रालयाचे अधिकारी चमकले आणि आम्हाला बघून त्यांनी पत्रकार परिषदेला चालण्याची खूप आर्जवं केली पण पत्रकार काही बधले नाहीत . दरम्यान वसंत साठे हेही पत्रकार भवनाच्या आवारात पोहोचले . पत्रकार भवनला कुलूप बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं . अधिकाऱ्यांनी त्यांना जे काय सांगायचं ते सांगितलं . वसंत साठे यांनी कॉफी हाऊसकडे बघितलं . त्यांना काचेतून तिथं बसलेले पत्रकार दिसले . त्यांनी तिथूनच पत्रकारांना हात हलवून अभिवादन केलं आणि सर्व शिष्टाचार बाजूला सोडून वसंत साठे कॉफी हाऊसमध्ये येऊन आम्हा पत्रकारांच्या घोळक्यात स्थानापन्न झाले .

      खरं तर , केंद्रीय मंत्र्याचा एक प्रकारे उपमर्द पत्रकारांनी केला होता पण , वसंत साठे यांनी ते मनावर घेतलं नाही तर खिलाडूपणे घेतलं . आमच्यासोबत वेळही घालवला . नंतर मात्र त्यांनी पत्रकार परिषदेची वेळ कधीच चुकवली नाही . गोपीनाथ मुंडे यांच्यावर ‘लेट लतीफ’ असा शिक्काच बातमीतून मी मारला होता . अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे याच्या एका बातमीच्या निमित्तानं रा . सू . गवई यांचा पत्रकारांनी जाहीर निषेध केला होता . मात्र वसंत साठे , गोपीनाथ मुंडे , रा. सू . गवई यांच्यासारखा उमदेपणा असणारे राजकारणी तेव्हा बहुसंख्य होते . पत्रकारांना मारण्याची भाषा त्यांनी कधीच केली नाही ; ते कंत्राट शिवसेनेकडे होतं !

     एक खास हकीकत सांगायला हवी . नागपूरला सध्या धरमपेठ मध्ये पत्रकार वसाहत ज्या जागेवर उभी आहे ती जागा मंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून मिळाली . ती मिळवून देण्यात नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव किंमतकर यांचा मोठा वाटा होता . ( हे घडवून आणणाऱ्या पत्रकारांपैकी प्रकाश देशपांडे , मनोहर अंधारे , अनिल शर्मा आता हयात नाहीत . बाकी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची यादी बरीच मोठी असल्याने ती मी देत  नाही . ) ती जागा मध्यवर्ती होती पण , त्या जागेवर एक खूप मोठं अतिक्रमण होतं . पत्रकार वसाहत उभारण्याआधी ते अतिक्रमण दूर करणं अतिशय आवश्यक होतं . त्यासाठी सर्व पत्रकार जीव तोडून प्रयत्न करत होते . या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अतिक्रमणाला आशीर्वाद कुणाचा आहे याची माहिती काढली तर समजलं की नागपूरचे  तत्कालीन एक बडं प्रस्थ असलेले आमदार गेव्ह आवारी यांचा त्या झोपडपट्टीवासीयांना आशीर्वाद आहे .  मग त्या संदर्भात पत्रकार संघाच्या सभागृहात खूप चर्चा झाली आणि गेव्ह आवारी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला . गेव्ह आवारी तेव्हा नागपूर काँग्रेसचे अध्यक्षही होते शिवाय , एक टर्म त्यांनी खासदारपदही भूषवलेलं होतं .  त्यांच्या वडिलांचं स्वातंत्र लढ्यात मोठे योगदान होतं अशी पार्श्वभूमी गेव्ह आवारींची होती . त्यामुळे बहिष्काराचा हा निर्णय कितपत अंमलात येऊ शकेल याविषयी शंका होती पण , ज्येष्ठ पत्रकारांनी तेव्हा वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाला भेटून सर्व माहिती दिली आणि बहिष्काराच्या निर्णयात सहभागी होण्याची विनंती केली . उल्लेखनीय बाब म्हणजे सगळ्या वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनानं श्रमिक पत्रकारांच्या या निर्णयाला होकार दर्शवला आणि गेव्ह आवारी यांच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळणं बंद झालं . स्वाभाविकच त्यामुळे गेव्ह आवारी आधी चिडले आणि नंतर अगतिक झाले  .व्यवस्थापनाला भेटून त्यांनी पत्रकारांचा निर्णय मोडून काढण्याचा प्रयत्न केला पण , त्यात त्यांना यश आलं नाही . अखेर पत्रकारांशी चर्चा करुन त्या अतिक्रमणवासीयांना असलेलं संरक्षण यापुढे देणार नाही असं त्यांनी मान्य केलं आणि हा बहिष्कार उठला . सांगायचं तात्पर्य हे की पत्रकार संघटित असले की काय घडू शकतं .

      तपशील नेमका आठवत नाही पण , शिवसैनिकांकडून औरंगाबादला पत्रकारांना मारहाण झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली . मुंबईच्या पत्रकारांनी शिवसेनेची दहशत न जुमानता शिवसेना भवनासमोर निदर्शने केली होती आणि उल्लेखनीय  म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनीही त्या निदर्शनांना हरकत घेतली नव्हती . याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिवसेनेचे तत्कालीन नेते ( जे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ) मनोहर जोशी यांच्या नागपुरात झालेल्या एका पत्रकार परिषदेवर आम्ही सर्व पत्रकारांनी बहिष्कार टाकला होता . मनोहर जोशी यांचे अनेक पत्रकारांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध तरी हा बहिष्कार टाकला गेला . बहिष्काराच्या काही तासानंतर आम्ही २/३ पत्रकार मनोहर जोशींची भेट घ्यायला गेलो आणि सोबत चहापान केलं होतं . मात्र त्याची बातमी केली नव्हती . अशा अनेक घटना सांगता येतील . तोपर्यंत पत्रकारिता म्हणजे मुद्रित माध्यम एवढाच परिघ होता . साधारण १९८८ नंतर हे चित्र बदललं . नंतर व्हिडिओ आला ,  प्रकाश वृत्तवाहिन्या आल्या आणि वृत्तपत्र व्यवसाय ‘माध्यम’ झाला .  जागतिकीकरण आणि खुली अर्थ व्यवस्था स्वीकारल्यावर पुढे तर सोशल मीडिया , डिजिटल मीडिया त्याही पुढे जाऊन युट्युब सारखी वैयक्तिक चॅनल्स आली , माध्यमांचा अफाट विस्तार झाला . मुंबई पुण्यापुरत्या मर्यादित असलेल्या वृत्तपत्रांच्या साखळी आवृत्ती राज्यात सुरु झाल्या आणि महाराष्ट्रात पत्रकारांचं  अमाप ‘पीक’ आलं ; इतकं पीक आलं की महाराष्ट्रातील पत्रकारांची संख्या किमान २५ ते ३० हजार झाली असावी .

         इतकी संख्या वाढल्यानंतर पत्रकारितेची गुणवत्ताही ढासळली आणि विश्वासार्हताही कमी झाली शिवाय , गळेकापू स्पर्धा आल्यानं पत्रकारितेला एक वेगळं ‘परिमाण’ लाभलं . समाजाच्या सर्वच स्तरांचं जे सुमारीकारण झालं त्याचं प्रतिबिंब पत्रकारितेत उमटलं . पत्रकार गटा-तटात , विविध राजकीय रंगात विभागले गेले . श्रमिक पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या महाराष्ट्रात पत्रकारांच्या आज कमीत कमी २५ तरी संघटना असतील आणि त्या संघटनांमध्ये कोणताही संवाद नाही , सामंजस्य नाही शिवाय , पत्रकारितेचं स्वरुपही आता ‘धंदेवाईक झालं आहे .स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेली व्यवस्थापनातील पिढी कधीच काळाच्या पडद्याआड गेली ; त्यांची तिसरी पिढी माध्यमांचं नेतृत्व करत आहे . हे नेतृत्व केवळ व्यवस्थापकीय पातळीवर राहिलेलं नसून संपादकीय पातळीवरही आलेलं आहे . पूर्वी ‘संपादक’ ही एक विश्वसनीय ‘संस्था’ होती परिणामी संपादकाचा शब्द प्रमाण होता . आता ‘संचालक संपादक’ संपादकीयही निर्णय घेतात आणि संपादक तसेच संपादकांचे सहकारी त्या निर्णयांची अंमलबजावणी करतात अशी परिस्थिती आहे .

         प्रकाश वृत्तवाहिन्यांनी तर भाषा आणि वृत्त मूल्य या दोन्ही पातळ्यांवर जी काही पातळी गाठलेली आहे ती अतिशय चिंताजनक आहे . वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना अचूक भाषा व वृत्त मूल्यापेक्षा टीआरपीची जास्त चिंता असते तर मुद्रित माध्यमातील संपादकांना सहकाऱ्यापेक्षा स्वतःच्या भवितव्याची जास्त काळजी असते . बहुसंख्य संपादकांना डोनाल्ड ट्रम्पच्या चहाच्या कपात साखर कमी पडली की जास्त हे ठाऊक असतं पण या राज्यातल्या असहाय्य सामान्य माणसांच्या प्रश्नाची माहिती नसते . परिणामी आजची पत्रकारिता निव्वळ प्रतिक्रियावादी झाली असून पत्रकार प्रस्थापितांना खडसावून प्रश्न विचारण्याचं विसरले असल्याचं चित्र आहे .आता संपादक संस्था राहिली नसून ‘पत्रकारांचा पालक’ हे बिरुदही बहुसंख्य संपादकांनी गमावलेलं आहे . प्रयोग शाळेतल्या शेपटी तोडलेल्या उंदरासारखी अवस्था बहुसंख्य संपादकाची झालेली आहे . कोरोनाच्या काळात संपादकीय विभागातील कोणते सहकारी कमी करावे याच्या याद्याच बहुसंख्य संपादकांनी व्यवस्थापनाकडे दिल्या होत्या . पत्रकारांच्या त्या कपातीबद्दल कुठल्याही संपादकांनी आजवर कधी आवाज काढलेला नाही .

      एकूण एक प्रकारची अधोगती आहे ; यामुळे पत्रकारितेचा सन्मान आणि विश्वसनीयता धोक्यात आली शिवाय ते पत्रकारांच्या संघटितपणाला अतिशय बाधक ठरलं  आहे . त्यामुळे कितीही म्हटलं तरी , कोणत्याही आणि कितीही खालच्या पातळीवरच्या नेत्यावर पत्रकार बहिष्कार टाकू शकत नाहीत , अशी आजची परिस्थिती आहे कारण पत्रकार ,  संपादक आणि व्यवस्थापन यांचे ‘अजेंडा’ आणि ‘पॅकेजेस’  वेगवेगळे आणि धंदेवाईक आहेत . पत्रकारितेची आजची  अवस्था अनेकांना अस्वस्थ करणारी असली तरी वास्तव वेगळं आहे . जेव्हा पत्रकारांचा पालक म्हणजे संपादक आणि त्याचे सहकारी पत्रकार , धंदेवाईक व्यवस्थापनाच्या ताटाखालचं मांजर होतात तेव्हा पत्रकारिता निर्भीड आणि समाजातील असहाय्य अबोलांचा आवाज असावा अशी अपेक्षा कशी काय बाळगता येईल ? कणा मोडून पडलेल्या विद्यमान पत्रकारितेकडून अपेक्षा बाळगणंच व्यर्थ आहे !

चित्र- विवेक रानडे , नागपूर

(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)

+919822055799

Previous articleबीटींच्या सहवासात…
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here